(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कुठल्याही घटनेशी याचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)
आठ दिवसांची रजा काढून पद्मनाभ आव्वा आप्पंकडे गेला. या आठ दिवसात त्याला घर साफ करायचे होते, आव्वासाठी मदतीला कोणीतरी बघायचे होते. आणि वीणाची चौकशी करायची होती. काही झाले तरी वीणा त्याचे पहिले प्रेम होते. वीणाला तो अजिबात विसरला नव्हता. तो आल्यावर एकेक कामे त्याच्या मागे लागली. जुने इलेक्ट्रीक वायरिंग खराब झाले होते, ते बदलून घ्यायचे होते. माकडांना खराब केलेल्या छपरावरील कौलांची डागडुजी करायला हवी होती. आता पावसाळा जवळ आल्यामुळे ते करून घ्यायलाच हवे होते. कावडवाला ही पाणी भरायचे पैसे वाढवून मागत होता. आप्पांना त्याला पैसे वाढवून देणे पटत नव्हते पण पद्मनाभने पैसे वाढवून दिले आणि आप्पांना समजावून सांगितले. " ह्या वयात इतक्या लांबून पाणी आणणे तुम्हाला झेपणार नाही आप्पा. आणि आजारी पडाल. तुम्हाला काही व्हायला लागले तर जवळही कोणी नाही. करू देत त्याला काम. " सगळी कामे चार दिवसांत आवरली. आव्वाच्या मदतीला चांगली बाई मिळाली. आता तो परत गेला तरी चालणार होते. पण तो राहिला. आव्वा आप्पांच्या सगळ्या सोई व्यवस्थित होत आहेत ना ते पाहिले. "आता काही झाले तरी त्या बाईला कामावरून काढायचे नाही" त्याने आव्वा आप्पांना बजावून सांगितले. आणि मग तो परत घरी निघाला.
घरी आला तर वीणा ने त्याची आठवण काढून रडून रडून गोंधळ घातला होता. तिला ताप भरला होता. पण तिचा बाबा समोर नसल्यामुळे ताप उतरत नव्हता. त्याला समोर बघताच ती धावत त्याच्याकडे आली आणि त्याला चिकटून बसली. म्हणाली, " बाबा आम्ही रुसलोय तुमच्यावर, आम्हाला सोडून कुठे गेला होता. " तासभर ती त्याला चिकटून बसली होती. अजिबात त्याला नजरेसमोरून हालू देत नव्हती. तिला तो परत आपल्याला सोडून जाणार नाही ना अशी भिती वाटत होती. तिच्या बरोबर बरेच दिवस न खेळल्यामुळे पद्मनाभ ही तिच्या बरोबर खेळण्यात रमला होता. पद्मनाभला बघताच वीणाचा ताप कुठल्या कुठे पळून गेला होता.
दुसऱ्या दिवशी बॅंकेत गेल्यावर पद्मनाभला एक छान बातमी समजली. त्याची प्रमोशनवर बदली करण्यात आली होती. बदली झालेले गाव ही मोठे होते. बेळगाव, कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरचे मोठे शहर होते. पद्मनाभला खूप आनंद झाला. पण आठवडाभरात त्याला तिकडे रुजू व्हायचे होते. त्या आधी बरीच कामे पूर्ण करायची होती. आव्वा आप्पांना जाऊन भेटून यायला हवे होते. तो घरी आला तिलोत्तमाला बातमी सांगितली आणि आव्वा आप्पांना भेटून येतो म्हणाला. पण वीणा काही त्याला सोडायला तयार होईना. शेवटी तो तिला घेऊन आव्वा आप्पांना भेटायला गेला. आव्वा आप्पांच्या चेहर्यावरचा आनंद लपत नव्हता. आनंदाने त्यांनी वीणाला कवटाळले. पण त्यांना आश्चर्य ही वाचले होते. वीणा तिथे छान रमली होती. आजी आजोबा बरोबर छान खेळत होती. जरा सुद्धा रडली नाही किंवा तिला आईची आठवण आली नाही. दुसऱ्या दिवशी ती पद्मनाभ बरोबर जायला ही तयार नव्हती. कशीतरी समजूत काढून तो तिला घेऊन गेला. पद्मनाभला जाताना खूप वाईट वाटत होते. आता सारखे सारखे आव्वा आप्पांना भेटायला येतात येणार नाही ह्याची खंत त्याला वाटत होती. आव्वा आप्पांसारखेच आता रामचीही भेट सारखी होणार नव्हती. रामला आणि पद्मनाभला रोज एकदा तरी भेटल्या शिवाय चैन पडत नसे. आता कसे होणार याची रामला देखील चिंता वाटत होती. दुसऱ्या दिवशी बॅंकेत गेल्यावर रामच्या ही हातात बदलीचे लेटर पडले आणि ते दोघेही आश्चर्यचकित झाले. रामची बदली ही बेळगाव लाच झाली होती, फक्त वेगळ्या शाखेमध्ये झाली होती. आनंदातिशयाने दोघांनी एकमेकांना मिठी मारली. " आता राम तरी आपल्या जवळ आहे" हे ऐकून पद्मनाभला खूप हायसे वाटले. दोघांनी बेळगांवला जायची तयारी केली आणि आठवड्याभरात बेळगावमध्ये आपापल्या शाखेत रुजू झाले. अजून कुटुंबाला घेऊन जाणे शक्य नव्हते. त्यांना पटेल आणि परवडेल अशी जागा बघून मग ते परिवाराला नेणार होते. पंधरा वीस दिवसांच्या शोधानंतर त्यांना त्यांच्या पसंतीच्या जागा मिळाल्या. पद्मनाभला समादेवी मंदीराजवळ चार खोल्यांची जागा मिळाली. तिलोत्तमाचे आईवडील ही बरोबर येणार हे माहिती असल्यामुळे त्याने मोठी जागा बघितली होती. बोगारवेस जवळ रामला ही तीन खोल्यांची जागा मिळून गेली. पुढच्याच आठवड्यात परिवारासह ते बेळगावातील घरी दाखल झाले. बेळगावचा हवा खूप छान, त्यामुळे सगळ्यांना बेळगाव आवडले. पद्मनाभची बॅंक घरापासून जवळ असल्याने तो घरी लवकर येत होता. रोज नवीन जागी फिरायला जाणे, गाव पाहून घेणे सुरू होते. रोज नवीन ठिकाणी फिरायला मिळाल्यामुळे तिलोत्तमा आणि वीणा दोघीही खूष होत्या. इकडे आल्यावर अजून कामाला बाई मिळाली नव्हती त्यामुळे सगळे काम तिलोत्तमावरच पडत होते. ज्याची तिला अजिबात सवय नव्हती. हल्ली बाळंतपणानंतर तब्येतीत सुधारणा झाल्यामुळे तिला फीट आली नव्हती. शिवाय पद्मनाभने दाखवलेल्या डाॅक्टरांनी नवीन बदललेल्या औषधांचा तिलोत्तमाच्या तब्येतीवर चांगला परिणाम झाला होता.तिलोत्तमाचे आईवडील मात्र नवीन जागेत कंटाळले होते. त्यांना तिथे करमत नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या घरी जायचा हट्ट धरला होता. तिलोत्तमाच्या मदतीसाठी बाई शोधण्याचे काम सुरूच होते.
एक दिवस शेजारच्या घरातील काकू एका तिलोत्तमाच्या वयाच्या बाईला घेऊन आल्या. तिचे नावही वीणाच होते. तिलोत्तमाला ती बाई बरी वाटली म्हणून तिने त्या बाईला कामावर ठेऊन घेतले. बाई मिळाल्यावर तिलोत्तमाचे आईवडील त्यांच्या घरी गेले. पद्मनाभला कोणी वीणा नावाचीच नवीन बाई मिळाली आहे एवढेच माहिती होते. सुट्टीच्या दिवशी ती पद्मनाभ घरी असताना कामाला आली. तिला समोर पाहून पद्मनाभचे हृदय जोरजोरात धडधडायला लागले. त्याला काही सुचत नव्हते. तिलोत्तमा समोर तिला ओळख दाखवणे ही शक्य नव्हते. ती खरचं वीणा होती. तिने पद्मनाभला बघितले नसावे असे त्याला वाटत होते. तिला पाहिल्यावर आपसूक त्याच्या मनात तेच गाणे फेर धरू लागले.
"उन को ये शिकायत है कि हम कुछ नहीं कहते
अपनी तो ये आदत है कि हम कुछ नहीं कहते
मजबूर बहुत करता है ये दिल तो ज़बाँ को
कुछ ऐसी ही हालत है कि हम कुछ नहीं कहते"
अपनी तो ये आदत है कि हम कुछ नहीं कहते
मजबूर बहुत करता है ये दिल तो ज़बाँ को
कुछ ऐसी ही हालत है कि हम कुछ नहीं कहते"
क्रमशः
सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
मिरज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा