Login

कुछ ना कहो (भाग १२) नवी कोरी रंगतदार कथा

कुछ ना कहो


कुछ ना कहो ( भाग १२)

(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कुठल्याही घटनेशी याचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)

वीणाची कहाणी अजून पद्मनाभला कळली नव्हती. आक्काचे मात्र वाईट झाले. देव एखाद्याच्या वाट्याला इतके भोग का देतो कुणास ठाऊक. पद्मनाभ बॅंकेत गेला आणि रामला फोन करणार इतक्यात शिपाई निरोप घेऊन आला. रामच्या वडीलांना देवाज्ञा झाली. त्याच पावली पद्मनाभ रामकडे गेला. सगळे वातावरण गंभीर होते, ते असणारच होते. पण रामच्या आईकडे बघून पद्मनाभला हायसे वाटले. कुठलाही दंगा नाही आरडाओरडा नाही. शांतपणे फकत डोळ्यातून आसवे झरत होती. पदकाने ती टिपत होत्या. अतिशय शांत आणि संयमी होत्याच त्या. पण अशा प्रसंगी एवढे संयमाने रहाणे अवघड असते. पद्मनाभने रामला सावरले. त्याला " आईकडे बघ, किती शांत आहे, किती संयम आहे. आता पुढची तयारी करायला हवी. रामने पद्मनाभला मिठी मारली. एकदा पोट भरून रडून घेतले. पुढचे सगळे आवरे पर्यंत उशीर झाला. पद्मनाभ घरी येऊन आवरे पर्यंत वीणा पद्मनाभची छकुली आणि तिलोत्तमा परत आल्या. पद्मनाभला पाहाताच छकुली त्याला चिकटली. पद्मनाभने रामचे वडील गेल्याचे तिलोत्तमाला सांगताच ती जोरजोराने रडू लागली. शेवटी पद्मनाभने ओरडून तिला गप्प बसवले. तिचे ते रडणे पाहून छकुली घाबरून गेली.
पद्मनाभ छकुला घेऊन बाहेर गेला आणि कशीबशी तिची समजूत घातली.

दुसऱ्या दिवशी वीणा आल्यावर छकुली तिला चिकटून बसली, तिला कामच करू देईना. तिलोत्तमा तिला, छकुलीला रागवल्यावर ती आणखीनच वीणाला चिकटली. शेवटी तिला घेत घेतच वीणाला काम आवरले. पण काम आवरल्यानंतर ही छकुली तिला जाऊ देईना. तिला झोपवून वीणा कशीबशी घरी गेली. पण छकुली ने उठल्यावर रडून गोंधळ घातला. तिला बाबा किंवा वीणाच हवी होती. थोड्यावेळाने पद्मनाभ घरी आला. मग छकुली शांत झाली. तिलोत्तमाला मनातून फार आनंद झाला कारण आता वीणा म्हणजे छकुलीला सांभाळायला तिला एकटीला जमत नव्हते. वीणाची छकुलीला सवय झाल्यामुळे आता तिलोत्तमाची चांगली सोय झाली. निदान दुपारी सुखाची झोप तरी घेता येईल असे तिला वाटत होते. शिवाय तसेही सारखे सारखे छकुलीला सांभाळून ती कंटाळून जाई. वेळ बघून तिलोत्तमाने पद्मनाभशी बोलायचे तिने ठरवले.

रामच्या वडीलांचे दिवसपाणी झाल्यानंतर राम बॅंकेत रुजू झाला. पण राम अजिबात नार्मल वागत नव्हता. सारखा उदास राहात होता. पद्मनाभ एक दिवस वीणाला म्हणजे त्याच्या छकुलीला घेऊन रामच्या घरी गेला. छकुली आणि यश खेळत असताना त्याने रामची समजूत घातली. " अरे राम तूच असा उदास राहिलास तर आई आणि बाकीच्यांनी कुणाकडे बघायचे. सावर आता स्वतःला. तो यश बघ किती कोमेजून गेला आहे. जरा त्याचाही विचार कर. आणि सावर स्वतःला. " रामच्या डोळ्यात पाणी आले. त्याने स्वतःला सावरले. मग राम आणि पद्मनाभ बाहेर फिरून आले. तोपर्यंत छकुली यशशी खेळत बसली होती. आणि आता ती घरी जायला तयार नव्हती. पद्मनाभ तिला समजावून घरी घेऊन गेला तर घरी येईपर्यंत त्याच्या नशीबाने वेगळेच वळण घेतले होते. तिलोत्तमाला फीट येऊन ती पडली होती. घरात कोणीच नसल्यामुळे ती किती वेळ अशी पडली होती कळले नाही. पद्मनाभने लगेच तिला डाॅक्टरांकडे नेले. जाता जाता छकुलीला तो रामकडे सोडून गेला. तिलोत्तमाला डॉक्टरांनी एडमीट करून घेतले. आत्ता तिला वीणाच्या म्हणजे छकुलीच्या जन्मानंतर बरेच दिवसांनी फीट आली होती. खरतरं ती माहेराहून परत आल्यावर तिला फीट येण्यासारखे काही कारणही घडले नव्हते. पण माहेरीच काहीतरी झाले असणार अशी शंका पद्मनाभला आली. तिलोत्तमाने पद्मनाभला काही सांगितले नाही, पण ते कळेलच याची पद्मनाभला खात्री होती.

दोन दिवसांनी डाॅक्टरांनी तिलोत्तमाला घरी सोडले. तिला दातखीळ बसली होती, व बी. पी ही वाढले होते त्यामुळे यावेळी तिला एडमीट करावे लागले. दोन दिवस छकुली तिला सोडून रामकडे व्यवस्थित राहिली. ती घरी आल्यावर पद्मनाभ छकुलीला घरी घेऊन आला. तेव्हा छकुलीकडून पद्मनाभला समजले की तिकडे आप्पा आणि तिलोत्तमाचे भांडण झाले, म्हणून त्या दोघी लगेच इकडे परत आल्या. ती कोवळी पोर सांगत होती, " आबांनी आईला मारलं, आणि खूप जोरात रागलले. मग आई रलली." हे ऐकून फक्त काहीतरी भांडण झाले इतकेच पद्मनाभला समजले. \"आतातरी तिलोत्तमाला अक्कल येऊ देत देवा. " तो मनाशी म्हणाला. यावेळी फीट आल्यानंतर तिलोत्तमाला खूप जास्त अशक्तपणा वाटत होता. मानसिक ही ती खचली होती, त्यामुळे ती सारखीच झोपून रहात होती. परत तिला नव्याने औषधोपचार सुरू करावे लागणार असे पद्मनाभला वाटत होते. पद्मनाभने काही न विचारता तिलोत्तमाला एक दिवस सगळे सांगितले, " आपण आई आप्पा साठी तिकडे रहायला गेलो नाही म्हणून आप्पांनी मला त्यांच्या इस्टेटीतून काही द्यायचे नाही असे ठरवले आहे. मी त्यांना माझीही वाटणी मागितली. आमचे भांडण झाले, आयुष्यात पहिल्यांदा आप्पांनी मला मारले. शेवटी मीच सांभाळणार होते ना त्यांना. सगळी इस्टेट ते माझ्या चुलत भावाला देणार आहेत. "

" राहू देत. देऊ देत त्याला. आपल्याला काही कमी पडतेय का? मी तुला सगळे पुरवतो आहे ना? तुला काही कमी आहे का? मग आपल्याला कुणाचे काही नको. जे आपल्याजवळ आहे त्यात समाधानी रहाव माणसाने. तू माझ्या आव्वा आप्पांशी वाईट वागून काय मिळवलेस सांग मला? तुझे आईवडील तुझ्यापासून दूर झाले आणि माझे ही. आता सोड सगळं आणि नीट रहा. ". पद्मनाभने खूप समजुतीने घेतले फक्त वीणासाठी. हो त्याच्या दोन्ही वीणांसाठी. तिलोत्तमा विषयी सहवासाने होत फक्त तेवढेच प्रेम त्याच्या मनात होते. त्याची छकुलीवर वीणा त्याचे सर्वस्व होती, तर वीणा त्याचे अजाणतेपणी केलेले पहिले प्रेम होते.

बॅंकेत कामाचा लोड खूप वाढला होता. सोईसुविधा कमी होत्या, माणसे कमी होती. त्यामुळे पद्मनाभला घरी यायला उशीर होत होता. तिलोत्तमाला फीट आल्यापासून वीणाला त्याने पूर्णवेळ घरी थांबायला सांगितले होते. दोन दिवस रजा काढून पद्मनाभ तिलोत्तमाला तिच्या नेहमीच्या डाॅक्टरांकडे घेऊन गेला. त्यांनी तपासले, पण त्यांना काही शंका आल्यामुळे तिचे स्कॅनिंग करून घ्यायला सांगितले. त्यांची शंका खरी ठरली. फीट आल्यामुळे तिच्या मेंदूत बारीक रक्तस्राव झाला होता. त्यांनी औषधे दिली व "यांना विश्रांती घेऊ द्या. " असा सल्ला दिला. जर पुन्हा जोरात फीट आली तर पुन्हा रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यामुळे त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे, असेही सांगितले. आधीच तिलोत्तमाला आराम प्रिय होता, आता डाॅक्टरांनी सांगितले ते तिच्या पथ्यावर पडले. वीणाच्या हातात घरातले पूर्ण काम सोपवून ती निर्धास्त झाली.


क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

0

🎭 Series Post

View all