कुछ ना कहो ( भाग १५)
(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कुठल्याही घटनेशी याचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)
वीणा म्हणजे छकुलीची शाळा छान चालली होती. पद्मनाभचे आयुष्य चाकोरी बद्ध सुरू होते. अधून मधून तो गावाकडे जाऊन आव्वा आप्पांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांची सगळी सोय व्यवस्थित आहे ते बघत होता. दिवस भराभर जात होते. एक दिवस अचानक गावाकडून निरोप आला. पद्मनाभचे आप्पा त्याला सोडून गेले. पद्मनाभला गावी पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. आप्पा त्याची वाट पहात होते, पण दोघांची भेट झाली नाही. पद्मनाभ पोचायच्या आत त्यांचा प्राण देह सोडून गेला होता. त्याची वाट बघत होते म्हणून की काय डोळे उघडे होते. किती मिटले तरी ते परत उघडत होते. पद्मनाभला आव्वाला पाहून शोक आवरला नाही. दोन्ही डोळे मूकपणे अश्रू गाळत होते आणि आव्वाला जवळ घेऊन तो बसला होता. राम पुढचे सारे पहात होता. तिलोत्तमाला आणणे शक्य नव्हते, त्यामुळे वीणाला ही आणता आले नाही. दहन विधी झाल्यानंतर राम परत गेला. पद्मनाभला पूर्ण दिवस होई पर्यंत राहायचे होते. दहाव्या दिवशी पिंडाला कावळा शिवला नाही. " मी आव्वाला अंतर देणार नाही. मी शेवट पर्यंत तिला व्यवस्थित सांभाळून. " असे पद्मनाभ म्हणाला आणि कावळा शिवला. सर्व विधी झाल्यावर पद्मनाभ आवराआवर करू लागला. आव्वा त्याच्या बरोबर यायला तयार नव्हती. " आव्वा, मी आप्पांना वचन दिले आहे, आणि तसेही मी तुला एकटीला इथे ठेवणार नाही. तिथे आता तू फक्त आराम कर." पद्मनाभ बोलत होता. पण आव्वा गप्पच होती. फक्त मानेनी नकार देत होती. "वीणाशी खेळ, आणि आक्कांच्या वीणाला सगळे नीट शिकव. आता तिलोत्तमा ही खूप बदलली आहे. आणि तिचे आई आप्पा ही आता येत नाहीत. फक्त ती आजारी आहे त्यामुळे घरातले सगळे वीणाच करते तेवढे तू सांभाळून घे. शेवटी ती ही एक माणूस आहे. ज्या परिस्थितीत ती वाढली, तशी ती घडत गेली. आता तू तिला वळण लाव. आपली मान आव्वा." तरीही आव्वा बोलत नव्हती. "आपल्या वीणाला छकुलीला ती आई पेक्षाही जास्त बघते जपते. नाहीतर मी काय केले असते? तिलोत्तमा ही अशी, तुम्ही तिकडे नव्हता. वीणा आहे म्हणून मला छकुलीची काळजी नव्हती. आव्वा चल ना ग. का मी नोकरी सोडून इथे येऊन राहू तुझ्याजवळ? " असे पद्मनाभ म्हणताच आव्वा त्याच्या बरोबर जायला तयार झाली.
सगळी आवराआवर करून पद्मनाभ आव्वाला घेऊन घरी आला. आव्वाला बघितल्यावर छकुलीने आव्वाला मिठी मारली. तिलोत्तमानेपण आव्वाला वाकून नमस्कार केला आणि मुसमुसून रडायला लागली. आव्वानी तिच्या पाठीवर हात ठेवला आणि पुढे खुर्चीत जाऊन बसली. तिलोत्तमा परत आव्वा जवळ गेली आणि तिच्या पायावर डोकं ठेवून तिची क्षमा मागून लागली. " आव्वा मी चुकले, खूप चुकले. खूप चुकीची वागले तुमच्याशी. मला क्षमा करा. त्याचीच शिक्षा मला देव देतो आहे आव्वा. माझ्या लेकीला मी नीट सांभाळू शकत नाही. तिच्याकडे नीट लक्ष देऊ शकत नाही. तुमच्या मुलाला मी तुमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला, त्याची शिक्षा म्हणून देवाने मला हा आजार दिला, आणि आता तो वाढला ही आहे. " तिलोत्तमा रडत रडत बोलत होती. इतके दिवस मनात सलत असलेली बोच बाहेर पडत होती. आव्वाने तिला उठवले, " तुझी चूक तुला समजली ना, बास झाले. आता रडायचे नाही आणि तब्येतीला त्रास करून घ्यायचा नाही. तू आजारी पडलीस की छकुलीला मग कोण सांभाळणार. " आव्वाने तिलोत्तमाला समजावले. तोपर्यंत वीणा बाहेरून भाजी घेऊन घरी येत होती. वीणा तशीच घरात येत होती, आव्वाने तिला पाय धुवून घरात यायला लावले आणि बजावले " रोज घरात येताना पाय धुवूनच घरात यायचे. मला माहित आहे तू इथेच रहाते ते. पण आपण बाहेर गेलो की रस्त्यावरची घाण आपल्या पायाला लागते, धूळ पायावर बसते. भाजीपाला बघताना भाजीची धूळ माती हाताला लागते. आपल्या हाता पायावर बाहेरचे जंतू बसतात म्हणून केव्हाही बाहेर जाऊन आले की हात पाय धुवून मगच घरात यायचे असते. " आव्वा वीणाला सांगत होती, पण त्याचा परिणाम छकुलीवर होत होता. दुसऱ्या दिवसापासून छकुली न सांगता पाय धुवून घरात येऊ लागली.
छकुली वीणाला वीणा म्हणूनच हाक मारत असे. आव्वा छकुलीला म्हणाली, " वीणा तुझ्यापेक्षा किती मोठी आहे सांग बरं मला. आहे की नाही. ती तुझ्या आई सारखे तुझे सगळे करते, हो की नाही. मग आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना कधीही नावाने हाक मारायची नसते. तुझ्या आईबाबांना कुणी नावाने हाक मारली तर आवडेल तुला? नाही ना. मग वीणाला आता वीणा मावशी म्हणायचे. " आव्वाची शांतपणे समजावून सांगायची पद्धत खूप चांगली होती. वीणाला लगेच पटले. ती पण लगेच म्हणाली, " आव्वा आजी वीणामावशी खूप मोठ होते ना, थोडस छोट सांग ना. अं … काय बरं हं. मी तिला वीमा म्हणून बोलवू? वी मार्च म्हणजे वीणामावशी." आव्वाला हसायला आले. वीणालाही हे तिचे नवीन नामकरण आवडले. तिने वीणाला जवळ घेतले. अशारितीने वीणाची वीमा झाली.
हळूहळू वीमा आणि वीणा दोघींचीही संस्कार शिकवणी सुरू झाली. पद्मनाभचा जीव भांड्यात पडला. तो आता वीमा आणि वीणा दोघांच्याही बाबतीत निर्धास्त झाला होता. त्याची आव्वा आता त्यांना चांगलेच घडवणार ह्याची त्याला खात्री होती. तिलोत्तमा ही आता आव्वाशी नीट बोलत,वागत होती. एक दिवस तिलोत्तमाला खूप जोरात फीट आली. तिच्या दातात जीभ सापडली. तिला दवाखान्यात एडमीट करावे लागले. खूप रक्तस्राव झाला होता. चार दिवस अन्न खाता येईना. नुसते पातळ पदार्थ घेणे सुरू होते. तिला अशक्तपणा ही खूप आला होता. चार पाच दिवसांनी घरी आल्यावर वीमाने तिची खूप सेवा केली. आव्वा नेही तिला हवे नको ते सगळे तिच्या मनाप्रमाणे करून दिले. तिलोत्तमाला खूप ओशाळवाणे वाटत होते. ती किती वाईट वागली तरी आव्वा तिची खूप काळजी घेत होती. तिलोत्तमाला त्रास झाला की आव्वाला मनापासून वाईट वाटत होते. वीणा मात्र यावेळी खूप घाबरली. आपल्या आईला बरे वाटत नाहीये. हे तिला कळू लागले होते. त्यामुळे ती वीमाच्या आणखी जवळ गेली.
क्रमशः
सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
मिरज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा