Login

कुछ ना कहो (भाग १९) अंतिम भाग

कुछ ना कहो


कुछ ना कहो ( भाग १९ ) अंतिम भाग

(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कुठल्याही घटनेशी याचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)


" झाले, बाबांचा प्रश्न मिटला. आता मला सांग, तुझा काय विचार आहे. तू कधी लग्न करणार आहेस? " रामने वीणाला विचारले. रेवती ही आता त्यांच्या समोर येऊन बसली होती.
" अजून काही विचारच केला नाही मी काका. बाबांचाच विचार करत होते. " वीणा म्हणाली
" पण, समजा एखाद्या मुलाला तू आवडत असलीस, त्याने तुला मागणी घातली तर? " राम म्हणाला तशी वीणा लाजून म्हणाली, " काय हो काका? ".

" अग खरचं विचारतो आहे. आता स्पष्टच विचारतो. तुला यश कसा वाटतो? यशशी लग्न करायला आवडेल तुला? " रामने विचारल्यावर वीणा बावरली आणि म्हणाली, " या दृष्टीने मी कधी बघितलेच नाही काका. "
" पण यश तुझ्या प्रेमात आहे, त्याला तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे. " रेवती म्हणाली. वीणा लाजली. म्हणाली, " पण काकू मला अमेरिकेत जाऊन एम. एस. सायकाॅलाॅजी करायचे आहे. आणि बाबांना विचारल्याशिवाय मी काय सांगणार? " वीणा हळूच रेवतीच्या कुशीत शिरली.


… … … . … … ..


इकडे पद्मनाभ बॅंकेत काम करत असताना चक्कर येऊन पडला. त्याचे बी. पी. एकदम वाढले. त्याला दवाखान्यात एडमीट करावे लागले. राम त्याच बॅंकेत असल्यामुळे आणि फोनची सोय सुरू झाल्यामुळे त्याला पटकन समजले. तो तसाच कोल्हापूरला गेला आणि पद्मनाभ जवळ राहिला. दोन दिवसांनी त्याला घरी सोडल्यावर त्याला बरोबर घेऊनच परत आला. घरी त्यांनी काही सांगितले नव्हते त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटले आणि सगळे पद्मनाभवर रागवले. वीणा त्याची खूप काळजी करत होती. तर आव्वा त्याला लवकर बरे वाटावे म्हणून सारखी देवाला हात जोडत होती. वीमा मात्र फारच लागली, तिने पद्मनाभशी बोलणेच टाकले. वीणाला हे मजेशीर वाटत होते. एक दिवस तिने वीमाला गाणे म्हणायचा आग्रह धरला. ती वीमाच्या गळ्यात पडली आणि म्हणाओ, " तुझ्या लेकीचा एवढा हट्ट नाही पुरवणार? " शेवटी विमाने गाणे म्हणायला सुरुवात केली.
"इस इंतेज़ार इ शौक को जनमो की प्यास है
इक शमा जल रही है तो वो भी उदास है
मोहब्बत ऐसी धड़कन है जो समझाई नहीं जाती
जो समझाई नहीं जाती
ज़ुबां पर दिल की बेचैनी कभी लाई नहीं जाती
कभी लाई नहीं जाती
मोहब्बत ऐसी धड़कन है"
वीमाचे गाणे ऐकून वीणाही सून्न झाली. पद्मनाभच्या डोळ्यात पाणी आले. ते दोघे टाळ्या वाजवायच्याही विसरले. वीमाच्या डोळ्यात ही पाणी होते. आव्वा मात्र उठून गेली. कारण तिला सगळे माहिती होते, पण पटत नव्हते. वीणा वीमाच्या गळ्यात पडली. " किती गोड गातेस गं वीमा, कुणीही प्रेमात पडेल या आवाजाच्या. " वीणा म्हणाली " अजून एक म्हण ना ग, म्हण ना "
" ते तू नेहमी गुणुगुणायचीस ते म्हण ना. " पद्मनाभ म्हणाला.
" कोणते? " वीमा आठवण्याचा प्रयत्न करत होती. पद्मनाभने सांगितले आणि ती म्हणू लागली., " उनको ये शिकायत हे के हम कुछ नही करते. " गाणे संपले. पद्मनाभ डोळे पुसत उठला आणि खोलीत निघून गेला. वीमा ही उठून गेली.

. … . … … … . … … . … .

वीणा वीमाला फिरायला म्हणून गावाबाहेरच्या शंकराच्या देवळात घेऊन आली. पूर्ण दगडी बांधकाम असलेले हे देऊळ वीमाला ही खूप आवडायचे. इथे खूप शांतता असायची. स्वतःशी बोलायला मिळायचे. वीमा डोळे मिटून शंकरासमोर बसली होती. " काय मागितले देवाकडे? " वीणाने विचारले.
" काय मागणार? खूप दिले देवाने. आता काय मागायचे? काही नको आता. बास आयुष्य ही पुरे झाले आता. " वीमा म्हणाली.
" असे काय म्हणतेस मग आम्हाला कोण? " वीणा.
" आहेत तुझी आव्वा, बाबा. " वीमा हसून म्हणाली.
" आणि बाबांना कोण? " वीणा.
" तू आहेस की. " वीमा.
" आणि मी परदेशात शिकायला गेले की मग तू काय करणार.? " वीणा.
" तुझ्या बाबांनी ठेवून घेतले तर राहीन इथे, नाहीतर जाईन कुठेतरी. " वीमा.
" पण बाबा का तुला ठेवून घेणार नाहीत? " वीणा.
" आता तू मोठी झालीस वीणा, आता तुलाही नाही लागणार माझी गरज. आणि शेवटी मी एक काम करणारी नोकर आहे." वीमा.
" शूऽऽऽ असे का म्हणतेस? आम्ही वागलो का कधी तुझ्याशी असे. " वीणा लागली.
" नाही ग बाळा, पण आता माझेही वय झाले ना. मग येतात असेच काही विचार. इतकेच. बघू, पुढचे पुढे. " वीमा.
" वीमा तुला एक विचारू. खरे खरे उत्तर देशील? " वीणा.
" हं. बोल. " वीमा.
" तू कधी कुणावर प्रेम केले आहेस? तुला कुणी आवडत होते? " वीणा.
" हे काय नवीनच. काहीपण विचारतेस. " वीमा.
" आता सांगायचे. तू विचार म्हणालीस. आता सांग खरे खरे. " वीणा.
" प्रेम म्हणजे काय हे कळायच्या आधीच लग्न झाले. पण एक मुलगा आवडायचा. तो दिसला की आनंद व्हायचा, तो बोलला तर अंगावर मोरपीस फिरल्यासारखे वाटायचे. पण लग्न झाले आणि सगळेच संपले. " वीमा म्हणाली.
" समजा जर आता तो मुलगा परत आला आणि तुझ्याशी लग्न करतो म्हणाला तर करशील त्याच्याशी लग्न. " वीणा.
" चल, काहीही विचारते. चला उशीर झालाय. आव्वा रागावतील. " वीमा.
" बस ग, काही नाही रागवत आव्वा. मी आहे ना.. सांग ना. करशील लग्न. " वीणा.
" प्रेम कुठल्याही नात्याचे मोहताज नसते वीणा. कुठल्याही नात्याशिवाय ते टिकते, अबाधित राहते. त्यासाठी कुठल्याही बंधनाची गरज नाही. ते खरे असेल तर मग कशाला हवे लग्न? लोकांसाठी? "
वीमा म्हणाली. देवळाच्या दुसऱ्या बाजूला राम आणि पद्मनाभ बसले होते ते हे सगळे ऐकत होते.
" आता स्पष्टच विचारते. वीमा तू बाबांची होशील? त्यांच्याशी लग्न करशील? " वीणा विचारत होती. वीमा उठून गाभाऱ्यात जायला निघाली. " काय उगाच विचारते? " मनाशीच म्हणत ती जात होती आणि समोर आलेल्या पद्मनाभला धडकली. " त्याचे हात तिच्या खांद्यावर होते. आणि ती त्याच्या कवेत. त्याचे डोळे नजरेनेच तिला विचारत होते आणि ती नजरेनेच उत्तर देत होती. ती अलगदपणे त्याच्या मिठीत शिरली. त्याच्या छातीवर तिचे डोकं होत आणि त्याचे हात तिच्या डोक्यावर फिरत होते. राम आणि वीणा दुरूनच हे दृष्य डोळ्यात साठवत होते.


… . … … … … .. … … ..


वीणा आणि यशचे थाटात लग्न झाले. राम आणि पद्मनाभची मैत्री नात्यात बांधली गेली. रेवती आणि रामला वीणाच्या रूपात मुलगी मिळाली.
सगळे वीणाला सोडायला आले होते. वीणा एम. एस. करायला अमेरिकेला निघाली होती. दोन वर्षासाठी. पण जाताना ती बिनधास्त होती. तिच्या बाबांची जबाबदारी वीमाने घेतली होती. यश, राम काका आणि रेवती काकूही वीमा आणि बाबांची काळजी घेणार होते. त्यामुळे हसत हसत तिने सगळ्यांना टाटा केले आणि विमानात जायला निघाली.

समाप्त

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज