Login

उलट बोलायचे नाही

मोठ्यांना उलट बोलु नये हा जरी संस्कारांचा भाग असला तरी लहानांना सुद्धा स्वाभिमान असतो हे मोठ्यानी विसरू नये.
"माझ्या आईशी उलट बोलायच नाही, नाहीतर चालती हो घरातून. " रमण कीर्तीशी तावातावाने भांडत होता. कीर्ती थरथर कापत उभी होती.
कीर्ती इंटेरियर डिझायनर होती. अतिशय शिस्तप्रिय कुटुंबात वाढलेली कीर्ती आईबाबांची लाडकी होतीच पण तिच्यावर त्यांच्या संस्कारांचा भरपूर पगडा होता. तिला लहानपणापासून शिकवण्यात आले होते मोठ्या माणसांना उलटून बोलायाचे नाही. ते जे सांगतात आपल्या भल्यासाठी असते. कोणत्याही परिस्थितीत आपली मर्यादा सोडायची नाही. आणि तिनेही निरागसपणे सगळे आत्मसात केले होते. शाळेत शिक्षकांची आणि घरी सगळ्यांची लाडकी होती ती.
यथावकाश तिची डिग्री पुर्ण झाल्यावर तिच्या साठी स्थळ पाहण्याचे सुरू झाले. तिला इतक्यात लग्न करायचेच नव्हते पण, 'बघायला सुरू केल्यावर लगेच थोडीच जमणार आहे, एक दोन वर्ष जाईलच ' असे आईबाबा म्हणाले.
पण तिसरेच स्थळ त्यांना पसंत पडले. रमण शिंदे. आय टी इंजिनिअर, एकुलता एक, मालाड ला स्वतः चा टु बी एच के फ्लॅट. घरी आई. गावाकडे थोडीफार शेती. कीर्ती आणि तिच्या घरच्यांना स्थळ पसंत पडले. लग्न झाल्यावर ती स्वतः जॉब किंवा बिझनेस करु शकते या बोलण्यावर विश्वास ठेवुन कीर्ती ने होकार कळवला. आणि 4 महिन्यात लग्न झाले सुद्धा .
सुरवातीचे मोरपंखी दिवस कसे गेले कळाले नाही. हनीमून साठी केरळ ला जाऊन आल्यानंतर कीर्ती भलतीच खुशीत होती. जणु काही रमण च्या रुपात राजकुमार गवसला अशी अवस्था झाली होती तिची. तोही तिची खुप काळजी घ्यायचा. आईबाबा सुद्धा तिच्यासाठी खुष होते.
जसजसे दिवस जात होते तसतसे सासुबाई आपला मुळ स्वभाव वर काढु लागल्या. त्यांना प्रत्येक गोष्टीत खुसपट काढायची सवय होती. कधी भाजीत मीठ कमी आहे तर कधी तेल जास्त झाल म्हणुन बोलु लागल्या. केर काढताना तर नजरच ठेवुन बसु लागल्या. इथे खुर्चीच्या मागे साफ कर, जोर लावुन केर काढ, आईने साधी साफसफाई शिकवली नाही म्हणुन बोल लावु लागल्या.
सुरुवातीला कीर्ती ने दुर्लक्ष केले आणि उलट बोलणे तर तिच्या स्वभावातच नव्हते. पण नंतर नंतर तिला सहन न होऊन तिने थोड्या फार गोष्टी नवर्‍याच्या कानावर घातल्या. "अग आईच वय झालं आहे, इतकं काय मनाला लावुन घ्यायच. एका कानाने ऐक आणि दुसर्‍या कानाने सोडून दे. " रमण अस बोलल्यावर तर तिला कशाला याना सांगितले अस झाले.
सासूबाईंचे वागणे आणि हिम्मत दिवसेंदिवस वाढतच जात होते. त्यांना भीती होती माझा मुलगा हिच्या आहारी जातो की काय, कारण एरवी रमण आणि कीर्ती यांचं छान जमायच. आता तर त्यांनी जास्तीत जास्त त्रास द्यायला सुरवात केली. 6 महिने झाले तरी तिला माहेरी जाऊ देत नव्हत्या. नेहमी काहीनाकाही खुसपट काढायच्या. या सगळ्याला वैतागून कीर्ती ने रमण जवळ जॉब चा विषय काढला. त्याने फार काही सिरियसली घेतले नाही, "करत रहा अ‍ॅप्लाय " असे बोलुन झोपून गेला.
कुठूनतरी ही गोष्ट सासूबाईंच्या कानावर गेली. त्यांचा अजुनच जळफळाट झाला. त्यांनी रमण चे कान भरले. ही जॉब ला गेल्यावर तुझे माझे घरचे कोण बघणार, माझे पाय दुखतात, काम माझ्याच्याने होणार नाहीत. तुझ्या डोक्यावर बसेल मग कल्याण. रमण च्या डोक्यात नको नको ते विचार यायला लागले. त्याने कीर्ती ला सांगितले जॉब चा विषय तूर्तास सोडुन दे. तसेही पैशांचा आपल्याला फार काही प्रॉब्लेम नाही. किर्ती समजुन चुकली की हा असा का बोलत आहे. पण सगळ्यांच्या नकळत ती जॉब साठी अ‍ॅप्लाय करत होती.
एके दिवशी तिच्या अंगात हलका ताप होता आणि त्या नादात तिच्या हातुन भातात दोन वेळा मीठ पडले. जेवायला बसल्यावर एक घास घेताच सासुबाई नी तोंड वाकडं केले आणि जेवणाचे ताट जोरात सरकवले. रागारागाने त्या किर्ती ला बोलु लागल्या, "साधा स्वैपाक येत नाही तुला. तुझ्या आईने फक्त फुकटचे गिळायला शिकवले आहे वाटते. काय अवदसा मारली आहे आमच्या गळ्यात. " इतके कडवट बोलणे ऐकुन किर्ती चा संयम सुटला. "माझ्या आईला मध्ये आणायची गरज नाही सासुबाई. माणूस आहे मी, चुका होतात, पण म्हणुन एवढा गदारोळ करायची गरज नाही." ती तडक डोळे पुसत खोलीत गेली.
सासुबाई रमण येण्याची वाट बघत होत्या. जसा रमण आला तसा त्यांनी गळा काढायला सुरुवात केली. "काय पाप केले होते म्हणुन हे दिवस दिसत आहेत. एका शब्दाने आम्ही मोठ्यांना दुखावले नाही आणि माझी सून येताजाता उलट बोलते. " रमण चक्रावला त्याने विचारले, "काय झाले आई, काय बोलली किर्ती?" सासुबाई नी तिखटमीठ लावुन रमण चे कान भरले. रमण चिडून खोलीत आला त्याने किर्ती ला हाताला जोरात धरून उठवले. त्याला तिचा हात गरम लागला पण त्याने दुर्लक्ष केले. "कीर्ती काय बोललीस आईला. हिम्मत कशी झाली तुझी तिला उलट बोलायची. आत्ताच्या आत्ता आईची माफी माग. " कीर्ती त्याला समजावुन सांगत होती, "अहो आज ताप आलेला मला. जरा मीठ जास्त झाल तर माझ्या आईचा उद्धार करत होत्या ,मी इतकच बोलले की माझ्या आईला मध्ये आणू नका.यात काय चुकलं माझ. आजपर्यंत मी कोणालातरी उलट बोलले आहे का. माझ्यावर संस्कारच नाहीत तसे ".
" खबरदार! काहीही झाल तरी माझ्या आईशी उलट बोलायच नाही नाहीतर घरातून चालती हो. " तिला जवळजवळ धक्का देउन तो रूममध्ये गेला. सासुबाई सगळा तमाशा मनातल्या मनात हसत बघत होत्या.
कीर्ती कितीतरी वेळ हॉल मधेच बसुन रडत होती. 'चालती हो घरातून ' हे शब्द डोक्यात सतत घुमत होते.
सकाळी रमण काही झालंच नाही या अविर्भावात उठला. तीन चार वेळा हाक देऊन पण किर्ती चा काहीच प्रतिसाद नाही. त्याने सगळ्या घरात शोधले. हॉल मधल्या टेबल वर त्याला कसलासा कागद दिसला. त्याने हातात घेऊन बघितले तर ती चिठ्ठी होती किर्ती ने लिहलेली. ' प्रिय (अप्रिय) रमण, आजपर्यंत या घराला, घरातल्या प्रत्येक वस्तूला, घरातल्या माणसांना मी आपले मानले. जितक करता येईल तितक केल. पण या घरातल्या माणसानी मला माणुस म्हणुन कधी स्विकारलेच नाही. मीठ कमी पडले म्हणून माझ्या आईचा उद्धार करणार्‍या सासुबाईना समजुन घेऊ की अंगात ताप असताना हाताला धरून ओढणाऱ्या नवर्‍याला समजुन घेऊ. अजुन किती समजुन घेऊ. उलट बोलायच नाही हे आईवडिलांनी लहानपणापासून शिकवले. पण सहन करण्याच्या काही मर्यादा असतात हे कोणी समजुन घेतलेच नाही. वयाने मोठे आहे याचा अर्थ लहानांना स्वाभिमान असतच नाही असा नाही किंवा मोठ्या माणसांना कोणी लायसेन्स दिलेले नसते की त्यांनी सतत लहानांना घालुन पाडून बोलावे. जिथे स्वाभिमानाला ठेच लागते तिथे प्रत्युत्तर देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे त्याला उलट बोलणे नाही म्हणत. आणि तुच विचार कर, तुझ्या आईला एकदा बोलल्यावर तुला इतका राग आला तिथे माझ्या आईचा रोज अपमान होत असताना मी का गप्प बसावे. काल मला घरातून चालती हो म्हणालास तर मी खरच जात आहे. मला पुन्हा या घरात यायची इच्छा नाही. '
चिठ्ठी वाचुन रमण च्या पायाखालची जमीन सरकली. त्याने तडक किर्ती च्या माहेरी फोन केला. त्यांनी फोन कट करुन स्विच ऑफ केला. किर्ती ने आईबाबांना सगळे सांगितले होते. त्यांनाही तिच्यासाठी वाईट वाटले. तिचे बाबा म्हणाले, "माफ कर पोरी, वेळीच प्रत्युत्तर द्यायला तुला शिकवायला हवे होते. तु जॉब साठी प्रयत्न कर, आम्ही आहोत तुझ्यासोबत. परत तुला त्या घरी जबरदस्तीने आम्ही पाठवणार नाही. " किर्ती ला लाखमोलाचा आधार मिळाला होता.
रमण तिला बोलावण्याचे प्रयत्न करुन थकला. त्याने त्याच्या आईशी बोलायचे सुद्धा कमी केलेले. त्याला त्याची चुक लक्षात आलेली. इकडे किर्ती ला सुद्धा जॉब ऑफर आली. यादरम्यान रमण 2-3 वेळा तिला न्यायला आला. त्याने नाक घासून तिची माफी मागितली.
कीर्ती ने त्याला शेवटची संधी द्यायचे ठरवले. तेही अटी आणि नियमानुसार. एक म्हणजे ती जॉब करणार असल्याने सगळ्या कामांना मदतनीस ठेवावी. दुसरे सासुबाई नी तिच्याशी निट राहायचे आणि माहेरच्यांना बोल तर अजिबात लावायचे नाहीत. तिसरे तिच्या सगळ्या अडचणी रमण निमुटपणे ऐकून घेईल त्रागा न करता.
कीर्ती आल्यानंतर सासुबाई नी काही दिवस नाक मुरडले पण नीट वागली नाहीस तर आम्ही वेगळे राहु अशी रमण ने धमकी दिल्यानंतर त्या जपुन राहु लागल्या.

मित्रानो मोठ्यांना उलट बोलु नये हा जरी संस्कारांचा भाग असला तरी स्वतःच्या स्वाभिमानाला जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

0