Login

दोनाचे तीन भाग ३(अंतिम भाग)

दोनाचे तीन भाग ३(अंतिम भाग)
" भक्ती मुलांना त्यांचा संसार त्यांच्या मर्जीने करू दे.त्यांच्या मागे लागु नको. आजकालच्या परिस्थितीमध्ये आणि आपल्या काळातील परिस्थितीमध्ये बराच मोठा फरक आहे.

आपण जेव्हा त्यांच्या वयाचे होतो तेव्हां आपल्या पुढे आज कालच्या मानाने आव्हानं वेगळी होती. त्यांची विचार सरणी वेगळी आहे.

आपण संसार करतांना विचार करत होतो आपल्या कुटुंबाच पालन पोषण कसं करायचं ? अन्न वस्त्र निवारा यांची सांगड कशी साधायची ?

आताची पिढी वेगळी आहे. ही पिढी त्यांच्या स्वप्नांना गवसणी कशी घालायची याचा विचार करते. स्वप्न कशी पुर्ण करायची, याचं ध्यासाने ते लढत आहेत. आपण त्यांच्या निर्णयाचा मान ठेवायला हवा."

" मी कुठं त्यांना स्वप्न साकारण्या पासुन थांबवते आहे ? मी फक्त अपेक्षा करत आहे. सगळया गोष्टी वेळेत पूर्ण झालेल्या बऱ्या. आपण यांच्या वयाचे होतो तेव्हां आपल्या सक्षम झाला होता. हात पाय धड आहेत तोपर्यंत नातवंडांच्या मागे फिरता येईल. एकदा का वय उलटून गेलं की मुलं सांभाळणं अवघड होत." भक्ती ताई त्यांचा मुद्दा सोडायला तयार नव्हत्या.

भक्तीला समजावणं आपल्या आवाक्यात नाही ही बाब लक्ष्यात आल्यावर संकेतने या विषयावर न बोलणं पसंत केलं. इतक्या वर्षांच्या अनुभवा नुसार त्यांना ठावूक होत, भक्तीने मनात काही ठरवल की ते साध्य होईपर्यंत ती स्वस्थ बसणार नाही.

असेच दिवस जात होते. एक दिवस भक्तीताईंच्या मोठ्या जाऊबाई आणि भावजी घरी राहायला आले होते. त्यामूळे भक्तीताई जरा नरमाई ने वागत होत्या. नंदनदादा आणि पूनम वहिनी जेवणं झाल्यावर गप्पा मारत बसल्या होत्या. आज अर्णवी घरात नव्हती. सकाळीच गेली होती. सक्षमला यायला उशीर होणार होता. त्यामुळं घरात या सिनियर सिटीझन ने गप्पांचा फड रंगवला होता.
थोडया वेळाने नंदनदादा आणि संकेतराव आराम करायला रूम मध्ये निघून गेले. मग या दोघी जावा बसल्या गप्पा मारत. बोलता बोलता भक्तीने नातवंडांचा विषय छेडलाच.

" वहिनी ही अर्णवी बघा ना, बाळाचा विचार करत नाही. तिला कुटुंबा पेक्षा तिचं करिअर आधिक महत्वाचं वाटतं. आता तिला काय समजावयाचं? कसं समजवायचं ?"

" भक्ती, मला तूझी तळमळ समजते आहे ग ! पण जरा त्या दोघांच्या बाजूने पण विचार कर ना ! बाळाचा विचार करण्याआधी त्या दोघांना मानसिक शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे ग. त्यांनी मुलं जन्माला घातलं तरी ते त्याचं पालन पोषण करायला सक्षम नको का ?

ते दोघं बाळाला पुरेसा वेळ देऊ शकतील का ? आपण आहोत त्यांच्या मदतीला, पण आपण बाळाचे आई बाबा नाही होऊ शकत. बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी ते दोघं सक्षम असणं गरजेचं आहे.

या मुलांना वाढत्या महागाईला तोंड द्यायचं आहे. त्यांची स्वप्न पुर्ण करायची आहेत. त्यासाठी ते धडपडत असतात. संसार चालवायला दोन चाकाची गरज आहे. एकट्याच्या बळावर संसार नाही पूढे ओढता येणारं."

पूनम वहिनींनी भक्तीला समजावण्याचा प्रयत्न केला. त्या घरी आल्यापासुन बघत होत्या. दोघं कामात खुप बिझी होते. कधीकधी तर एकमेकांची तोंड बघायला देखील सवड मिळत नव्हती. करिअर करण्यासाठी त्यांची धडपड दिसतं होती. अशात बाळाचा विचार करणं खरचं अवघड होत. ते त्यांचं करिअर सांभाळून बाळाला पुरेसा वेळ देऊ शकतील का ? या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी सापडलं नव्हत.

सक्षमच्या कानावर देखील घरातील कुरबुर आली होती. त्याने वातावरण बिघडू नये यासाठी बराच प्रयत्न केला होता. तो आईचा स्वभाव जाणून होता. एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली की ती गोष्ट पुर्ण होईपर्यंत ती शांत बसणार नाही. त्याचा पाठपुरावा करणं सोडणार नाही. भक्ती काहीशा चिवट स्वभावाची होती.

एक दिवस सक्षम ने आईला सांगितले ,

" आई तुझी इच्छा मला माहित आहे. तु तूझ्या जागी योग्य आहेस. मला पण वाटतं आपलं कुटुंब वाढावं. संसार बहरावा. आई खरं सांगू, अर्णवी बरोबर सांगत आहे. आम्ही दोघं करिअरच्या अशा वळणावर उभे आहोत की, इथून परतणं म्हणजे आजवर केलेल्या कष्टांवर पाणी फिरवण आहे.

आई तुला खरं सांगु, मी सध्या तरी एक जबाबदार वडील होण्याच्या योग्यतेचा नाही आहे. आम्ही दोघं कमावतो. पण आमच्या इन्कम मधला बराचसा भाग घराचं लोन, आमची लाईफ स्टाईल मेन्टेन करण्यात खर्च होतो. प्रोजेक्टच्या डेड लाईन सांभाळताना कसरत करावी लागते.

आमचे कामाचे तास ठरलेले नसतात. मला कामासाठी खूप वेळा कंपनीत थांबाव लागतं. अर्णवीची परिस्थिती पण अशीच काहीशी आहे. अशा वेळी आम्ही बाळाला पुरेसा वेळ कसा देऊ शकणार. मी अजुन पण मित्रांच्या सोबत फिरायला पार्टीला जात असतो. आमची लाईफ स्टाईल एकदम नाही बदलता येणारं. त्यासाठी थोडा वेळ लागेल. अर्णवीला प्रोजेक्टसाठी लंडनला जावं लागू शकत. अशावेळी काय करायचं ?

आई बाळाचा विचार करण्याआधी आम्हाला दोघांना सक्षम व्हायला वेळ हवा आहे. तु थोडं समजुन घे ना मला ."

भक्ती आज पहिल्यांदा सक्षमच्या नजरेत एक वेगळीच असहायता बघत होती. आपल्या पाठपुरावा करण्याच्या हट्टा पायी आपण लेकाचं मन दुखवत आहोत. याची जाणीव झाली होती.
आजपर्यंत त्या फक्त अर्णवीला दोषी मानत होत्या. त्यामूळे सक्षमच्या कमतरते कडे दुर्लक्ष झालं होतं.

त्यांनी त्यांची चूक सुधारण्याच ठरवलं. अर्णवीला तिच्या कामासोबत संसार करताना मदत करत होत्या. कुरकुर करणं, तक्रार करणं कमी केलं होतं. मुलांच्या निर्णयाचा मान ठेवला होता.

बघता बघता दीड वर्ष उलटून गेलं. अर्णवीच्या मेहनतीचं चीज झालं होतं. सहा महिन्यांसाठी तिला लंडनला जावं लागलं होतं. सक्षमने देखील त्याचं मित्रांच्या सोबत फिरायला जाणं कमी केलं होतं. आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याचे प्रयत्न केले होते. आता कधी कोणी भक्तीला नातवंडं याबद्दल काही विचारलं तर ती नाराज व्हायची नाही. उलट हसत उत्तर द्यायची,

" नातवंडं तेव्हाच येईल जेव्हा बाळाचे आई बाबा बाळाची जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम असतील. "
आज अर्णवी सहा महिन्यानंतर घरी परत आली होती.आज तिच्या प्रमोशन मिळाल्याची पार्टी झाली होती. रात्री ती सक्षमला म्हणली,

"सक्षम मी आई होण्यासाठी तयार आहे."

" अर्णवी आपण दोनाचे तीन होण्यासाठी तयार आहोत."

दोघं ही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. काळ पुढे सरकत होता. वर्ष भरातच सक्षम आणि अर्णवीच्या घरी बाळाचं आगमन झालं होतं. भक्ती आणि संकेतराव बाळाच्या मध्ये रमले होते. अर्णवी तिची नोकरी सांभाळून बाळाचं पालन पोषण करत होती. त्यामधे सक्षम तिच्या सोबत भक्कम पणे उभा होता.

समाप्त

© ® वेदा

कथा आवडल्यास कॉमेंट मध्ये सांगा.

या कथेचा वापर यू ट्यूब किंवा इतर कुठेही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

तुमचं मत कॉमेंट मध्ये सांगा.


टीम सुप्रिया