Login

दोष कुणाचा? भाग २

Story Of Mrunal
कथा : दोष कुणाचा?
भाग २ : सासूच्या शब्दाचं ओझं

मागच्या भागात आपण बघितलेच आहे की सासू मृणाल ला काही बोलत असते आणि सगळा तिचाच गुन्हा आहे हे दाखवत असते पण खर तर ती फक्त मन मारून सहन करत असते...
मृणालसाठी दिवस कधी उजाडतो आणि कधी संपतो, याचा तिला हिशोबच उरलेला नसतो. घरात प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते फक्त तिच्या भावना सोडून.सकाळी देवघरात धूप लावताना सासूबाई मुद्दाम मोठ्याने म्हणतात,
“आज मंगळवार आहे. उपवास कर. कदाचित देव दया दाखवेल.”

मृणाल मान हलवते. उपवास न केल्यास दोष तिचाच ठरणार, केल्यासही अपेक्षा पूर्ण न झाल्या तर पुन्हा तिचाच. देवाशी नातं आता भक्तीचं राहिलेलं नसून, अपराधीपणाचं झालं होतं.
दुपारी स्वयंपाक करताना सासूबाई शेजारणीला सांगत असतात,
“आमचं नशीबच फुटकं. सून असूनही घर रिकामंच आहे.”

त्या शब्दांनी मृणालचं मन आतून ओरखडलं जातं. ती तिथेच उभी असते, पण जणू अदृश्य. शेजारणी सहानुभूतीने मान डोलावते आणि दोन चार शब्द आपले पण सांगते म्हणजे आगी मध्ये तेल टाकायचे काम...

एक दिवस सासूबाई अचानक म्हणतात,
“आज डॉक्टरांकडे जाऊन ये. अजून काही इलाज सुचतो का बघ.”

मृणाल हळूच विचारते,
“प्रशांतही येईल का?”

क्षणात सासूबाईंचा चेहरा बदलतो.
“त्याला कशाला? त्याला काही त्रास नाही. सगळं तुझ्यामुळेच अडलंय.”

हे वाक्य जणू रोजचं झालं होतं, पण आज ते अधिक खोल घुसलं. संध्याकाळी प्रशांत घरी आल्यावर मृणालने विषय काढायचा प्रयत्न केला.
“आज आई म्हणाल्या” अशी मृणाल बोलतच तेवढ्यात प्रशांत म्हणाला...

“नको मृणाल,” प्रशांत मध्येच थांबवतो,
“उगाच विषय वाढवू नकोस. आईचं मन दुखेल.”

तिच्या मनाला मात्र कोण समजून घेणार? ती गप्प बसते. गप्प बसणं आता तिचं संरक्षण झालं होतं.रात्री जेवताना पुन्हा तोच विषय.
“आमच्या ओळखीची सून बघ,” सासूबाई म्हणतात,
“दोन वर्षांत दोन मुलांची आई झाली.”

मृणालच्या ताटातलं अन्न घशाखाली उतरत नाही पण प्रशांत मात्र जेवण उरकतो आणि मोबाईलमध्ये गुंततो. तिच्या डोळ्यांत पाणी साठतं, पण ते वाहू देण्याचीही परवानगी नसते आणि कुणाला परवा सुद्धा नसते...

त्या रात्री झोपताना मृणाल मनातच विचार करते
मीच दोषी आहे का?की मला दोषी ठरवणं सोपं आहे म्हणून सगळे तसे करतात?सासूचं ओझं फक्त शब्दांचं नव्हतं.
ते तिच्या आत्मविश्वासावर, शरीरावर आणि अस्तित्वावर पडलेलं होतं...आणि ते ओझं दिवसेंदिवस अधिक जड होत चाललं होतं.

क्रमशः
0