Login

दोष कुणाचा? भाग ४

Story Of Mrunal
कथा : दोष कुणाचा?
भाग ४ : एकटी पडलेली बायको

प्रशांत सोबत असूनही मृणाल एकटी होती...हे सत्य तिला आता स्पष्ट दिसू लागलं होतं. घरात माणसं होती, आवाज होते, कामं होती; पण तिच्यासाठी कुणाचाच वेळ नव्हता. तिच्या मनासाठी तर अजिबातच नाही. रोजच्या गोष्टी तरी किती सांगणार माहेरी...उगाच त्यांना टेन्शन नको म्हणून तिने दुःख सांगणे बंद केले होते....

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती सगळ्यांसाठी काहीतरी करत असते. चहा, स्वयंपाक, घर, देवपूजा...सगळं नीट. तरीही दिवसाच्या शेवटी तिच्या वाट्याला येतं ते फक्त एकच वाक्य,
“आज काही विशेष केलं नाहीस.”

प्रशांत ऑफिसहून येतो. थकलेला असतो, चिडचिडलेला असतो. ती विचारते, “जेवायला वाढू?”
तो मान हलवतो. तिच्या आवाजातला कंप त्याला जाणवत नाही. जेवताना ती काहीतरी बोलायला पाहते ...आज मन फार जड आहे, असं सांगायला. पण तो मोबाईलमध्ये गुंतलेला असतो आणि त्याची स्क्रीनवर बोटं फिरतात, तिच्याकडे नजरही जात नाही...

एक दिवस मृणाल धीर करून म्हणते,
“प्रशांत, मला एकटं वाटतं.”

तो हसून टाळतो,
“तुला जास्त विचार करायची सवय आहे. सगळ्यांच्या आयुष्यात असंच असतं.”

सगळ्यांच्या?
तिच्या मनात प्रश्न उभा राहतो. सगळ्यांच्या आयुष्यात नवरा असूनही बायको इतकी एकटी असते का?

सासूबाईंचे टोमणे रोजचेच. “घरात हसू नाही,” “पाळण्याची चाहूल नाही.”

मृणाल शांतपणे ऐकते. कधी कधी वाटतं, आवाज काढला तर अस्तित्वच पुसलं जाईल. म्हणून ती गप्प असते...रात्री प्रशांत झोपतो. मृणाल छताकडे पाहत राहते. आठवते की लग्ना आधीचे दिवस...तेव्हा तिला मित्रमैत्रिणी होत्या, बोलणं होतं, हसणं होतं. आता तिच्या शब्दांना जागा नाही. भावना व्यक्त करायला मंच नाही.तिला जाणवतं ती फक्त घर सांभाळणारी नाही,ती सांभाळली जाणारी असायला हवी होती.

एका क्षणी ती स्वतःशीच विचार करते,मी बायको आहे… पण त्याच्या आयुष्यात माझी जागा आहे का?की मी फक्त एक भूमिका निभावतेय?आणि त्या प्रश्नाचं उत्तर तिला भयानक वाटतं की ती या नात्यात आहे, पण या नात्यासाठी नाही.
त्या रात्री मृणाल पहिल्यांदा मनात ठरवते...असं एकटं जगणं म्हणजे जगणं नाही.काहीतरी बदलायला हवं आता...

मृणाल ला आता स्वतःचाच आवाज ऐकू येईनासा झाला होता. इतकी वर्षे ती गप्प राहिली होती की, मनात उठलेले प्रश्नही आता कुजबुजून बोलू लागले होते. सहन कर, समजून घे हेच शब्द तिने स्वतःला शिकवले होते.
सकाळी सासूबाई म्हणाल्या,
“आज अमुक तमुक व्रत आहे. केलंस तर बरं. नाहीतर देव तरी कधी ऐकणार?”

मृणाल काही बोलली नाही. व्रत तिच्यासाठी श्रद्धे चं नव्हतं राहिलं तर ते आता जबाबदारी चं, अपेक्षांचं ओझं झालं होतं. तिला वाटत होतं, देवही कदाचित तिला दोषीच मानत असेल.
दुपारी नातेवाईक आले. नेहमीप्रमाणे विषय फिरत फिरत तिथेच पोहोचला.

“आठ वर्ष झाली ना?”
“अजून काहीच नाही?”

प्रश्न साधे होते, पण त्यामागचा अर्थ तीव्र. मृणालच्या हातातल्या पाण्याच्या ग्लासात थरथर जाणवली. ती स्वयंपाकघरात निघून गेली. तिथे एकटीच. डोळे मिटून उभी राहिली. मी किती सहन करायचं? हा प्रश्न पहिल्यांदा जोरात उमटला....संध्याकाळी प्रशांत घरी आला. सासूबाईंनी त्याला अलगद सांगितलं,
“आज लोक काय काय बोलून गेले ते ऐकलंस का?”

मृणाल प्रशांतकडे पाहत होती. कदाचित आज तरी…
पण तो फक्त म्हणाला,
“मृणाल, लोक काय म्हणतात ते मनाला लावून घेऊ नकोस.”

तिच्या संयमाचा दोर तिथेच ताणला गेला.
“पण दोष सगळा माझ्यावरच येतोय,” ती थोडी मोठ्याने म्हणाली.

सासूबाई ताठ झाल्या.
“तूच कारण आहेस, नाहीतर घरात एवढा अपशकुन का राहिला असता?”

तो शब्द....अपशकुन!!!!!! तिच्या छातीत घुसला. प्रशांत गप्प. पुन्हा.

त्या रात्री मृणाल बराच वेळ बाथरूममध्ये बसून रडत होती. आरशात पाहिलं, तर स्वतःलाच ओळखू शकली नाही. ही तीच मृणाल होती का, जिला कधी स्वतःवर विश्वास होता? ती मनाशीच म्हणाली,सहन करणं चांगलं… पण स्वतःला संपवून नाही.