Login

दोष कुणाचा? भाग ५

Story Of Mrunal
कथा : दोष कुणाचा?
भाग ५ : तो एक दिवस

तो दिवस कुठलाही खास नव्हता. ना सण, ना पाहुणे, ना मोठी घटना. पण आयुष्यात काही दिवस असे असतात, जे शांतपणे येतात… आणि आतून सगळं उलथवून टाकतात.

सकाळ नेहमीसारखीच सुरू झाली. मृणाल स्वयंपाकघरात होती. सासूबाई देवघरात आणि प्रशांत ऑफिसला निघायची तयारी करत होता. सगळं नेहमीसारखं चालू होत म्हणजे मृणालसाठी जड...तेवढ्यात फोन वाजला. सासूबाईंनी उचलला. समोरून नातेवाईकांचा आवाज. काही क्षण बोलणं झालं आणि मग सासूबाईंचा आवाज अचानक मोठा झाला.

“हो हो, कळतंय आम्हालाही… पण आता काय करणारं ? सूनच अशी निघाली.”

मृणालचे हात थांबले. चुलीवरचं दूध उतू लागलं, पण तिचं लक्ष तिकडे नव्हतं. सूनच अशी निघाली हे शब्द घरभर पसरले.
फोन ठेवून सासूबाई सरळ स्वयंपाकघरात आल्या.
“ऐकलंस ना? लोक काय म्हणतात ते? आता नुसतं सहन करून भागणार नाही.”

मृणाल हळूच म्हणाली,
“काय म्हणतात ते?”

“म्हणतात, गरज पडली तर दुसरा लग्नाचा विचार करा प्रशांत च्या ,” सासूबाई निर्विकारपणे बोलल्या,
“घर चालवायचं असतं. वंश चालवायचा असतो.”

मृणालचं अंग सुन्न झालं. तिने प्रशांतकडे पाहिलं. तो तयार होत उभा होता. तिच्या नजरेत भीती होती, विनवणी होती. आता तरी काही बोल असं ती न बोलताच सांगत होती.प्रशांत थोडा अस्वस्थ झाला.
“आई, उगाच फार पुढचं बोलू नकोस,” तो इतकंच म्हणाला.

उगाच?
मृणालच्या आत काहीतरी तुटलं.

सासूबाई लगेच पलटल्या,
“मग काय करू? आयुष्यभर असंच जगायचं?”

त्या क्षणी मृणालने चुल बंद केली. हात पुसले. पहिल्यांदाच तिचा आवाज थरथरत नव्हता.
“माझी तपासणी झाली आहे,” ती शांतपणे म्हणाली,
“डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलंय की दोष ठाम कुणाचाच नाही. पण प्रशांतची तपासणी कधीच झाली नाही.”

घरात शांतता पसरली.
प्रशांत हादरला. सासूबाईंच्या चेहऱ्यावर राग.
“तू आमच्या मुलावर बोट दाखवतेस?” सासूबाई ओरडल्या.

मृणालने खोल श्वास घेतला.
“मी बोट दाखवत नाहीये,” ती म्हणाली,
“मी फक्त सत्य सांगतेय आणि आज पहिल्यांदा… स्वतःसाठी बोलतेय.”

"तुम्हाला वाटत की दोष माझा आहे तर ठीक आहे मी मान्य करेल आणि तुमच्या आयुष्यातून निघून जाईल... पण त्यासाठी प्रशांत नी सुद्धा तपासणी केल्या पाहिजे"....

हा तो दिवस होता जेव्हा तिने रडणं थांबवलं...गप्प बसणं सोडलं
आणि स्वतःसाठी ती बोलली होती आणि इथूनच पुढे मृणाल आतून बदलायला सुरुवात झाली होती...

क्रमशः
0