ईरा चॅम्पियन ट्रॉफी:-२०२५
लघुकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- दोष
"चार-पाच वर्षे झाली लग्नाला अजून कूस उजळली नाही सुनेची, राधा? बघ बाई चांगल्या डॉक्टरकडे दाखवं तिला." जयंती राधाला टोमणा मारत म्हणाली.
"अगं जया, किती तरी डाॅक्टर झाले, वैद्य झाले. कित्येक मंदिराच्या पायऱ्याही झिजवल्या पण काहीच फायदा नाही बघ." राधा उदास चेहरा करून म्हणाली.
राधा आणि जयंती मैत्रिणी होत्या. आज बाजारात त्यांची भेट झाली. दोघी एका झाडाखाली बसून गप्पा मारत बसल्या होत्या. बोलता बोलता त्यांचा नातवंडांचा विषय निघाला तेव्हा जयंती उत्साहात तिच्या नातवंडाचं कोडकौतुक सांगत होती. त्यामुळे राधाला तिचा हेवा वाटला. तिला अजून नातवंडाशी खेळता येत नाही याच दुःख सलत होतं.
"असं अजून किती दिवस वाट बघणार आहेस तू? काही तर कर लवकर. नाही तर नातवंड नातवंड म्हणत म्हणत जीव जायचा तुझा." जयंती उपहासात्मक हसत म्हणाली.
"सगळे तर प्रयत्न करून तर झाले. वाट बघण्याशिवाय अजून काय शकते मी?" राधा तोंड बारीक करून म्हणाली.
"असं कसं म्हणतेस तू? डाॅक्टर काय म्हणतात ते विचारले नाही का तू तुझ्या मुलाला आणि सुनेला?" जयंती एक भुवई उंचावत राधाला म्हणाली.
"विचारले की पण ते काय नीट सांगत नाहीत. जाऊ दे होतील तेव्हा होतील." चेहरा पाडत राधा म्हणाली.
"मी काय म्हणते? पण बघ बाई तुला पटत असले तर सांगते. नाही तर उगीच तुझा गैरसमज व्हायचा." जयंती तिचा पाहत म्हणाली.
"सांग की तू माझ्या चांगल्यासाठीच सांगशील ना, त्यात मी कशाला गैरसमज करून घेईन. सांग बरं काय ते?" राधा तिचा हात हातात घेत म्हणाली.
"तू ना तुझ्या लेकाचं दुसरं लग्न करं. एखाद्या गरीब घरातील मुलगी बघ आणि चार माणसात करून टाक लग्न. असंही तुझ्या त्या वांझोट्या सुनेचा उपयोग काय? एखादं झाड फळ देत नसेल तर त्या झाडाचा उपयोग तरी काय?" जयंतीने सल्ला दिला.
राधा विचारात पडली.
तिला विचारात पडलेले पाहून जयंती तिला म्हणाली,"काय गं माझा विचार पटला नाही का तुला? बघ बाई तुला नसेल पटत जाऊ दे."
"तू म्हणतेस ते पटत गं. पण माझा मुलगा दुसऱ्या लग्नाला तयार होईल असे मला वाटत नाही." राधा तिच्या मुलाला अमेयला आठवत म्हणाली.
"अगं एकदा बोलून तर बघ. त्याला जर मुलं हवं असेल तर तो नक्कीच तयार होईल. जर नाही तयार झाला तर तू त्याला लग्न करायला भाग पाड आणि ते कसं हे मी तुला वेगळं सांगायला नको." जयंती ओठ तिरकस करत हसत म्हणाली.
"हो, बघते बोलून त्याला." ती हसत तिला म्हणाली.
दोघींनी थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि नंतर आपापल्या घरी निघून गेल्या.
घरी आल्यावर किती तरी वेळ राधाच्या मनात जयंतीचे बोलणे घोळत होते.
अमेयकडे हा विषय कसा काढावा याचा विचार ती करू लागली. त्या दिवशी तिचे जेवणाकडे लक्ष नव्हते. ही गोष्ट तिच्या सुनेच्या मयूरीच्या लक्षात आले.
"आई, काही त्रास होतो का तुम्हाला?" तिने राधाला विचारले.
"नाही गं, मी ठीक आहे." राधा नेहमीसारखे न बोलता कोरड्या आवाजात म्हणाली.
"मग? " मयूरी म्हणाली.
"काही नाही. मन नाही माझे आज. अमेय आल्यावर त्याला माझ्या रूममध्ये पाठवं. खूप महत्त्वाचं बोलायचं आहे त्याच्याशी." एवढे बोलून राधा तिचे काही ऐकून न घेता तिच्या रूममध्ये निघून गेली.
"काय झालं आईंना? आजपर्यंत तर कधी अशा कोरड्या वागल्या नाहीत मग आज असं का वागत आहेत? माझं काही चुकलं का? पण काय? विचारू का त्यांना? नाही नको हे आले की बघू." मयूरी मनात विचार करत म्हणाली.
संध्याकाळी अमेय घरी आला. रोज आल्यावर राधा हसतमुखाने सोफ्यावर बसलेली त्याला दिसायची. आज दिसली नाही तेव्हा त्याला नवल वाटले. त्याने मयूरीला तिच्याबद्दल विचारले तर तिने दुपारचे बोलणे त्याच्या कानावर घातले. त्याला आश्चर्य वाटले. कारण ती अशी कधी वागत नव्हती. काही असेल तर मयुरीला ती सांगायची. दोघीचं चांगलं पटतं होतं, मग आज काय झालं असेल त्याचा मनात विचार येऊन गेला.
फ्रेश होऊन अमेय मयूरीसह राधाच्या रूममध्ये आला. विचारमग्न अवस्थेत राधा खिडकी जवळ उभी राहून बाहेर पाहत होती.
"आई, काय बोलायचे आहे तुला माझ्याशी?" अमेयने तिला म्हणाली.
त्याच्या बोलण्याने तिची विचारांची श्रृंखला तुटली. तिने मागे वळून पाहिले तर मयूरीला त्याच्यासोबत पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"मला फक्त तुझ्याशी बोलायचं आहे." राधा मयुरीकडे पाहत म्हणाली.
तिच्या बोलण्याचा रोख ओळखून मयूरी चुपचाप बाहेर जाऊ लागली. तेव्हा अमेय तिचा हात धरत म्हणाला,"आई, जे बोलायचे आहे ते तिच्यासमोर बोल."
"ठीक आहे. अमू, मी जे बोलणार त्यामुळे हिला वाईट वाटेल म्हणून मला फक्त तुझ्याशी बोलायचं आहे असे म्हटले. तरीही तुला चालणार असेल तर ऐक मग. मी तुझं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे." राधा मयूरीकडे पाहत म्हणाली.
तिच्या या निर्णयाने अमेय तीन ताड उडला तर मयूरीच्या डोळ्यात खळकन पाणी आले.
"काही ही काय, आई? हा कसला निर्णय तुझा अन् कशासाठी?" अमेयने चिडून जाब विचारला.
"कशासाठी म्हणजे, नातवंडासाठी! ह्या चार पाच वर्षात पाळणा हालला नाही. मला नातवंडे खेळवायची आहेत. हिच्याकडून ती अपेक्षा पूर्ण होऊ शकणार नाही, हिच्यात काहीतरी दोष असेल. ती अपेक्षा निदान तुझ्या दुसऱ्या बायकोकडून तरी पूर्ण होईल." राधा कधी नव्हे ते आज मयूरीकडे हिन नजरेने पाहत म्हणाली.
"आई, तू काय बोलतेस ते तुझं तुला तरी कळतं का गं? तुझी नातवंडाची अपेक्षा मयू, नाही मी.." अमेय पुढे बोलणार तोच मयुरीने त्याचा हात गच्च धरून भरल्या डोळ्यांनी पाहत नकारार्थी मान डोलावली.
राधा गोंधळून गेली.
"नाही मयू, आज बोलू दे मला. इतक्या दिवस फक्त तू दिलेल्या शपथाखातर मी गप्प होतो. पण आता नाही. तुझ्यावर लावलेला ठपका, तुला सहन करावे टोमणे मी आणखी नाही सहन करू शकत. आई, आज तर तू कहरच केलास. अगं, नातवंडांची अपेक्षा मयू नाही गं, मी पूर्ण शकत नाही. कारण तुझा मुलगा त्यासाठी सक्षम नाही." अमेय डोळे गच्च मिटून आवंढा गिळत म्हणाला.
हे ऐकून राधाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तोंडालाच हात लावला. आपण जे ऐकले त्या गोष्टीवर तिच्या कानांवर विश्वासच बसला नाही.
तिने स्वतःला सावरत पुढे येत त्यांचे दंड आवळून धरत स्फुंदत म्हणाली, "नाही हे तू खोटं बोलतोस ना, हिला वाचवण्यासाठी नाही."
"नाही आई, मी खरे तेच बोलतोय. काही दिवसांपूर्वी आम्ही दोघेही बाळासाठी चेक करायला गेलो होतो तेव्हा हे मला समजले. एका डाॅक्टरांने नाही आई, चार-पाच डाॅक्टरांनी तेच सांगितले. हे ऐकल्यावर मी खूप खचून आतून तुटून गेलो होतो. तेव्हा मयूने मला सांभाळलं. तिने ते सगळं स्वतःवर घेतले. मी तुला सांगणार होतो. पण हिच्या शपथेमुळे मी गप्प बसलो. तुला ही गोष्ट सहन होणार नाही याचा विचार हिने केला. आता सांग आई, दोष कोणात आहे? आता ही करशील का तू माझं दुसरं लग्न?" अमेय रडत तिला म्हणाला.
काय बोलावं राधाला काहीच कळेना. ती मटकन खालीच बसली. तिच्या डोळ्यांतून अविरत आसवांच्या धारा वाहत होत्या.
"आई, सांभाळा स्वतःला. तुम्हीच असं खचून गेला तर आम्ही काय करायचं?" मयुरी तिला बिलगून म्हणाली.
"माफ कर, मयू. अनवधानाने मी तुझ्यात दोष आहे असे म्हणाले. माझ्या मुलात दोष असेल असा विचार माझ्या मनाला कधी शिवलाच नाही. सगळं खापर तुझ्या डोक्यावर फोडून मोकळी झाले." आसवे गाळत राधा तिची माफी मागत म्हणाली.
"माफी मागू नका, आई. तुम्ही असा त्रास करून घेणार म्हणूनच मी यांना तुम्हाला ही गोष्ट सांगण्यास मनाई केली होती." मयुरी तिला समजावत म्हणाली.
राधाला तिच्या मनाचा मोठेपणा आणि समंजसपणा पाहून अजून भरून आलं. ती तिला कवेत घेऊन रडू लागली. अमेयही त्या दोघींना बिलगून रडू लागला.
थोड्या वेळाने मयुरीनेच स्वतःला सावरत त्यांनाही सावरत म्हणाली,"उद्या एका डाॅक्टरकडे जाऊ या का? टेस्ट ट्यूब बेबीसाठी. मागे तुम्हाला बोलले होते मी. ते या म्हणालेत उद्या. कदाचित आपली बाळाची आस पूर्ण होईल."
"एक आशेचा किरण गवसला म्हणायचा. जाऊ या आपणं." तो तिच्या कपाळाला कपाळ लावत हसत म्हणाला.
राधाला या गोष्टीने समाधान झाले.
अमेय आणि मयूरी दुसऱ्या दिवशी डाॅक्टरांकडे गेले. सगळे रिपोर्ट पाहून काही टेस्ट करायला सांगितले. रिपोर्ट चांगले आले.
काही महिन्यांनी मयुरीने टेस्ट ट्यूब बेबी पध्दतीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तुषार दिसत होते.
बाळाच्या येण्याने मयूरीचा दोष पुसला गेला.
समाप्त -
जयश्री शिंदे
कोणाला दोष देण्याआधी दोष कोणात आहे हे जाणून घ्यावे.
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. असे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा