Login

दोषी की निर्दोष? (भाग १)

अपहरणासारखा गंभीर आरोप ती स्वतःवर घेते. कोणालाही ते खरं वाटत नाही पण तरीही ती अडून राहते. अशातच एका हुशार वकिलाने तिच्या केसमध्ये प्रवेश घेतला. न्याय मिळवूनच देणार म्हणून जिद्दीला पेटला. का बरं ती घेत असेल तो आरोप स्वतःवर? ती खरंच दोषी की निर्दोष? जाणून घेण्यासाठी सौ. जानकी नारायण कटक लिखित ही कथा अवश्य वाचा.
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५.
जलद लेखन.
शीर्षक - दोषी की निर्दोष?


"काय रे धीरू, काय झालं? इतक्या सकाळी अर्जंट मला भेटायला आलास. दोन दिवसांत तू हाताळत असलेल्या केसची सुनावणी आहे ना?" त्याने त्याच्या मित्रासमोर म्हणजेच धीरजसमोर बसत विचारलं. तो पहाटे ८ वाजताच त्याला भेटायला आला होता.

"कामच तसं अर्जंट आहे ऋतु. माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली आहे. तिचा इलाज इथे होणे शक्य नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने तिला पुण्याला हलवण्याचा निर्णय घेतला आहे." धीरजने त्याची अडचण सांगितली. त्याच्या आईबद्दल ऐकून ऋतुराजलाही वाईट वाटलं.

"ठीक आहे रे, पण मग तुझ्या केसचं काय?" एकीकडे त्याच्या आईच्या तब्येतीचीही काळजी वाटत होती, तर दुसरीकडे केसची सुनावणी दोन दिवसांवर आली होती, त्याचीही काळजी वाटत होती.

"त्यासाठीच तर तुझ्याकडे आलो आहे. हे बघ मित्रा, आजपर्यंत तू प्रत्येक गोष्टीत माझी साथ दिलीस. काही केसेसमध्ये आपण एकमेकांचे प्रतिस्पर्धी सुद्धा होतो. यावेळेस मला मदत कर. आईच्या इलाजासाठी मला पुण्याला जावं लागणार आहे, तेही तीन दिवसांच्या आत जायचं आहे. माझी अशी विनंती आहे की, मी लढत असलेली केस तू हातात घे." धीरज विनंतीच्या सुरात म्हणाला. त्यावर ऋतुराज विचार करायला लागला.

ऋतुराज गोखले आणि धीरज कदम दोघेही घनिष्ट मित्र होते. ऋतुराज थोडा सावळ्या वर्णाकडे झुकत होता, तर धीरज थोडा उजळ वर्णाचा होता. दोघांचंही वय वर्षे ३०. दोघेही सोबतच लहानाचे मोठे झाले होते, शिक्षणही सोबतच पूर्ण केलं होतं आणि आता दोघेही पेशेवर वकील होते.

दोघांचाही एकमेकांवर पूर्ण विश्वास होता. एकमेकांना सुख-दुःख सांगत होते, तर वेळ पडल्यास एकमेकांचे प्रतिस्पर्धीही होत होते, पण यामुळे कधी त्यांनी त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण होऊ दिला नव्हता. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य दोघेही वेगळं ठेवत होते. ते दोघेही वकील म्हणून आपल्या कामात प्रामाणिक होते.

सध्या ऋतुराज धीरजच्या बोलण्याचा विचार करत होता. त्याची आईही महत्त्वाची होती, त्यामुळे ऋतुराजने त्याची केस स्वतःकडे घेण्याचा निर्णय घेतला.

"ठीक आहे धीरू, फक्त काकूंसाठी मी ही केस माझ्याकडे घेतो. मला केसची संपूर्ण माहिती दे. आपण उद्या जाऊन तुझ्या क्लायंटची भेट घेऊ. तत्पूर्वी आपल्याला दोघांचे अर्ज कोर्टात दाखल करावे लागतील." ऋतुराज तयार झाल्याने धीरज खुश झाला होता.

"धन्यवाद मित्रा! मला माहित होतं तू नकार देणार नाहीस. तुझ्याशिवाय कोण समजून घेणार मला? आपण दोघेही सोबतच अर्ज दाखल करू. ही बघ, ही मी माझ्या क्लायंटची माहिती आणली आहे." धीरज आनंदाने बोलत होता. त्याने सोबत आणलेली एक फाईल ऋतुराजसमोर धरली.

"नाव आरती पाठक! तिच्यावर आरोप आहे की तिने पैशांसाठी एका १० वर्षांच्या मुलाचं अपहरण केलं आहे." धीरज सांगत होता, पण ऋतुराज मात्र आरती पाठक नाव ऐकून विचारात हरवला होता. शिवाय तिचा फोटोही न्याहाळत होता.

आरती पाठक, एक ३० वर्षीय तरुणी. एका छोट्याशा कंपनीत काम करत होती. पगार बऱ्यापैकी होता. कधी कोणापुढे हात पसरण्याची गरज पडली नव्हती, त्यामुळेच कोणाचाही तिने पैशांसाठी असं पाऊल उचललं यावर विश्वास बसत नव्हता. मात्र जेव्हा तिच्यावर हा आरोप लागला होता, तेव्हापासून तिच्या वडिलांनी तिच्यासोबत अबोला धरलेला होता.

"ऋतु, ऐकत आहेस ना?" धीरजने त्याला भानावर आणलं, कारण तो एकटक आरतीच्या फोटोकडे पाहत होता.

"अ... हो... हो अरे..." तो अडखळत म्हणाला.

"तू नाही ऐकलंस ऋतु. हे बघ, ही केस खूप नाजूक आहे. दिसते तेवढी सोपी नाही. जरा लक्ष देऊन ऐक." धीरजला त्याचं लक्ष नव्हतं हे समजलं होतं, त्यामुळे त्याने गांभीर्य लक्षात आणून दिलं.

"म्हणजे? काय म्हणायचं आहे तुला?" ऋतुराजला त्याच्या शेवटच्या वाक्याचा अर्थ समजला नव्हता म्हणून त्याने विचारलं.

"म्हणजे आम्हा कोणालाही यावर विश्वास नाही की तिने पैशांसाठी असं अपहरण वगैरे केलं असेल. ती निर्दोष आहे." धीरज सांगत होता, त्यावर ऋतुराजने डोळे फिरवले.

"प्रत्येक वकिलाला त्याचा क्लायंट हा निर्दोषच वाटत असतो धीरू." ऋतुराज डोळे फिरवत म्हणाला.

"नाही रे वेड्या. इथे सगळं उलट आहे." धीरज म्हणाला, पण आत्ताही त्याला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला नव्हता.

"तू एकाच पॅराग्राफमध्ये का नाही सांगत आहेस? कोडं कोडं खेळत आहोत का आपण?" ऋतुराज वैतागला होता. ते पाहून धीरज हसला.

"आता हसायचं बंद कर आणि व्यवस्थित सांग, तेही एकाच दमात." यावेळी त्याने त्याला दटावलं.

"चिडू नकोस रे बाबा. बरं मग ऐक आता. जेवढे कोणी आरतीच्या जवळचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी आहेत, त्या सर्वांना असं वाटतं की तिने अपहरण केलेलं नाहीय. अगदी मला सुद्धा तेच वाटतं, पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ती स्वतः म्हणते तिने अपहरण केलेलं आहे." धीरजने जसं सांगितलं, तसा ऋतुराजही आश्चर्यचकित झाला.

"काय!" ते ऐकून तो जवळ जवळ ओरडलाच होता.

"हो, तिने माझ्यासमोर मान्य केलं आहे. एक गोष्ट मात्र मी नक्की सांगू शकतो की ती खोटं बोलत आहे. त्यामागचं कारण माहित नाही. तेच कारण शोधून काढायचं आहे. दोन दिवस होते माझ्या हातात ते कारण शोधायला, पण मध्येच आईची तब्येत बिघडली. त्यात अपहरण झालेल्या मुलाचाही अजून शोध लागलेला नाही." धीरज दोन्ही बाजूंनी नाराज झाला होता.

"आपण निरापराध्याला कधीच शिक्षा होऊ दिली नाही ऋतु. जर ती खरंच निर्दोष असेल, तर तिने न केलेला गुन्हा कोर्टमध्ये मान्य करण्याआधीच पुरावे गोळा करणं आवश्यक आहे. मला तरी १००% खात्री आहे की तिने अपहरण केलेलं नाही." तो ठामपणे म्हणाला, तर ऋतुराजलाही शहानिशा करणं गरजेचं वाटलं.

"तू काही काळजी करू नकोस. एकदा अर्ज मंजूर झाला की मी स्वतः याचा शोध लावेन. खरं-खोटं लवकरच समोर येईल. जर ती निर्दोष असूनही दोष आपल्या माथी घेत असेल, तर नक्कीच त्यामागे काहीतरी मोठं कारण आहे." ऋतुराज विचार करत म्हणाला, त्यावर धीरजने होकारार्थी मान हलवली.


काय कारण असेल यामागे? का आरती अशी वागत असेल? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ती खरंच दोषी आहे की निर्दोष? कळेलच पुढे.