Login

दोषी की निर्दोष? (भाग २)

अपहरणासारखा गंभीर आरोप ती स्वतःवर घेते. कोणालाही ते खरं वाटत नाही पण तरीही ती अडून राहते. अशातच एका हुशार वकिलाने तिच्या केसमध्ये प्रवेश घेतला. न्याय मिळवूनच देणार म्हणून जिद्दीला पेटला. का बरं ती घेत असेल तो आरोप स्वतःवर? ती खरंच दोषी की निर्दोष? जाणून घेण्यासाठी सौ. जानकी नारायण कटक लिखित ही कथा अवश्य वाचा.
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५.
जलद लेखन.
शीर्षक - दोषी की निर्दोष?
          


              दुसऱ्या दिवशी धीरजने केसमधून माघार घेण्याचा अर्ज आणि ऋतुराजने केस स्वीकारण्याचा अर्ज कोर्टाच्या रजिस्ट्रार कार्यालयात सोबतच दाखल केले. आता ते मंजूर होईपर्यंत दोघांना वाट पहावी लागणार होती. तोपर्यंत आरतीची भेट घेऊन तिला कल्पना द्यावी, असा विचार करून दोघेही न्यायालयीन कोठडीकडे निघाले. उद्या शेवटची सुनावणी होती त्यामुळे तिला न्यायालयीन कोठडीत ठेवलेलं होतं.

दोघांनी कारागृह अधिकाऱ्यांना कल्पना देऊन परवानगी मागितली. धीरज हा आरतीचा वकील होता, त्याला कायद्याने हक्क असल्याने एका तासात त्यांचा भेटण्याचा अर्ज मंजूर करण्यात आला. त्यांना भेटण्यासाठी अर्ध्या तासाची मुदत दिली गेली. दोघेही भेटीच्या खोलीत जाऊन बसले.

दोन मिनिटांत आरती तिथे आली. ती येताच ऋतुराज एकटक तिच्याकडे पाहू लागला. तिने मान खाली घातलेली होती. चेहरा निस्तेज व निर्विकार होता. तिने नजर वर करून पाहिलेलं नव्हतं, त्यामुळे तिच्या डोळ्यांतले भाव समजत नव्हते.

"मिस आरती, मला तर तुम्ही ओळखलंच असेल. जरा महत्त्वाचं बोलण्यासाठी आलो होतो. मला तुमच्या नवीन वकिलाशी तुमची ओळख करून द्यायची होती. हा माझा मित्र आहे ऋतुराज. मला अचानक केसमधून माघार घ्यावी लागत आहे, त्यामुळे ऋतुराज तुमची केस घेत आहे." धीरज एकटाच बडबडत होता.

ऋतुराज एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहत तिचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होता, पण ती वर पाहत नव्हती. तिचा चेहरा निर्विकार असल्याने त्याला वाचता येत नव्हता. धीरजच्या बोलण्यावरही तिने काही प्रतिक्रिया दिली नव्हती, तसा धीरजने हताश उसासा टाकला. त्याने ऋतुराजकडे पाहिलं. तो अजूनही तिच्याकडेच पाहत होता.

"मिस आरती, तुम्ही अशाच शांत राहिलात तर आपण केस हरण्याची दाट शक्यता आहे. आम्हाला फक्त सांगा की त्यादिवशी काय झालं होतं? तुमच्यावर हा आरोप कसा लागला? कोणाच्या दबावाखाली येऊन तुम्ही तुमच्यावर लागलेला आरोप मान्य करत आहात? जर या गोष्टी आम्हाला समजल्या तर आम्ही पुढे काही करू शकतो. एकदा तुमच्या कुटुंबाचा विचार करा. त्यांचा खूप जीव आहे तुमच्यावर." धीरज शेवटचा प्रयत्न करत म्हणाला, तेव्हा कुठे तिने बोलण्यासाठी तोंड उघडलं.

"निरर्थक प्रयत्न करत आहात तुम्ही वकील साहेब. मी आधीच आरोप मान्य केला आहे. आत्ताही मी तेच सांगेन. मी पैशांसाठी त्या छोट्या मुलाचं अपहरण केलं आहे. तुम्ही उगाच तुमचा वेळ वाया घालवत आहात. मी आता फक्त शिक्षेची वाट पाहत आहे." तिने मागे जे सांगितलं होतं तेच सांगितलं, पण तिच्या बोलण्यात कुठेही खरेपणा जाणवत नव्हता.

"ठीक आहे, आम्ही निघतो. चल धीरज, जर त्यांची इच्छा नाही या आरोपातून निघण्याची तर आपण काहीच करू शकत नाही." ऋतुराज असा म्हणाला आणि धीरजला आश्चर्याचा धक्का बसला.

"हे तू..." धीरज पुढे काही बोलणारच होता तेवढ्यात ऋतुराजने त्याच्या हाताचं मनगट पकडलं.

"आपल्याला उशीर होत आहे धीरज. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण खरंच वेळ वाया घालवत आहोत." ऋतुराज एक कटाक्ष आरतीकडे टाकत म्हणाला.

धीरज पुढे काही बोलणार होता तेवढ्यात ऋतुराजने त्याला ओढत बाहेर नेलं. ते दोघे गेल्यानंतर आरतीने आपले डोळे गच्च मिटून घेतले. डोळे मिटल्याबरोबर तिच्या डोळ्यांतून अश्रूची धार ओघळून गालावर आली. काही मिनिटे थांबून तिने आपले डोळे पुसले आणि निघून गेली.

"ऋतु, तू असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. थोडा वेळ थांबून विचार कर." धीरज काळजीने म्हणाला.

"मला काय करायचं आहे ते मी ठरवलं आहे. तू फक्त काकूंकडे लक्ष दे." ऋतुराज चेहऱ्यावर हलकं हसू आणत म्हणाला.

"म्हणजे ही केस तू सोडणार नाही आहेस?" धीरजला त्याच्या बोलण्यामागचा अर्थ थोडा उमगला होता.

"माघार घेणाऱ्यांतला मी नाही." ऋतुराज तेच हसू कायम ठेवत म्हणाला, त्यावर धीरज खुश झाला.

"मला माहित होतं तू असं अर्ध्यावर सोडणार नाहीस. आजपर्यंत तू एकही केस हरला नाहीस. ही केस सुद्धा नक्कीच जिंकशील." धीरज आनंदाने म्हणाला. पुन्हा थोडं जुजबी बोलून दोघेही आपापल्या घरी निघून गेले.


***************************


ऋतुराज घरी पोहोचल्यानंतर जेवण न करताच काहीतरी विचार करत चकरा मारत होता. रात्र झाली होती पण त्याच्या डोक्यातले विचार काही स्वस्थ बसत नव्हते.

"आरती काहीतरी लपवत आहे. तिच्या बोलण्यावरून हे स्पष्ट समजतं. कुठलाही आरोपी आपल्यावर असलेला आरोप सहजासहजी मान्य करत नाही. आरती मात्र तिच्यावरचा आरोप मान्य करत आहे. नेमकं ते कारण काय आहे? याचा शोध घ्यायलाच हवा." ऋतुराज विचार करून शेवटी सोफ्यावर बसत स्वतःशीच म्हणाला.

स्वतःशीच बडबडत त्याने आपल्या हातातल्या मोबाईलकडे काही क्षण पाहिलं. मग त्याने कोणाचातरी नंबर शोधून फोन लावला. रिंग पूर्ण होण्यापूर्वी फोन उचलला गेला.

"हॅलो..." फोन उचलला गेल्याबरोबर त्याने हॅलो केलं.

बोलून झाल्यानंतर त्याने फोन ठेवला. त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं.

"मिस आरती पाठक, तुम्ही नक्की दोषी की निर्दोष? या प्रश्नाचं उत्तर उद्या मी कोर्टमध्ये देईन." असा म्हणत तो हसतच सोफ्यावर रेलून बसला. आता कुठे त्याला पोटभर जेवण जाणार होतं.


ऋतुराजने कोणाला फोन लावला असेल? कसा शोध लावणार तो? कळेल पुढील भागात.