ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५.
जलद लेखन.
शीर्षक - दोषी की निर्दोष?
जलद लेखन.
शीर्षक - दोषी की निर्दोष?
आज अपहरण केसची सुनावणी होती. ऋतुराज आणि धीरजने जे अर्ज दिले होते, ते मंजूर करण्यात आले होते. निर्धास्त होऊन धीरज त्याच्या आईला घेऊन पुण्याला रवाना झाला होता. जाण्यापूर्वी त्याने ऋतुराजची भेट घेतली होती. आज अखेर निर्णय घेतला जाणार होता.
कोर्टरूममध्ये दोन्ही पक्षांचे वकील, आरोपीच्या कठड्यात खाली मान घालून उभी असलेली आरती, तर समोर विरुद्ध पक्ष, आरतीचे नातेवाईक आणि मित्रमैत्रीण बसलेले होते. तिचे वडील नजर रोखून तिच्याकडे पाहत होते. पहिल्यांदाच असं झालं होतं की त्यांचा या प्रकरणावर विश्वास बसला होता. त्यांची मुलगी त्यांच्या नजरेत पडली होती.
तिची आई आणि भाऊ मात्र काळजीने तिच्याकडे पाहत होते. थोड्याच वेळात जज साहेब त्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले. त्यांना पाहून सर्वजण अदबीने उभे राहिले. त्यांनी सर्वांना खाली बसायला सांगितलं.
"युअर ऑनर, मी ॲडव्होकेट ऋतुराज गोखले. ॲडव्होकेट धीरज कदम हे काही कारणास्तव रजेवर आहेत, त्यामुळे त्यांची केस मी लढणार आहे." ऋतुराज उभा राहून समोर येत म्हणाला.
"कार्यवाहीला सुरुवात करा." जज साहेबांनी कार्यवाही सुरू करायला सांगितली.
"युअर ऑनर, मला माहित आहे आज सुनावणीची तारीख आहे, तरीही मी मिस आरती पाठक यांची बाजू सविस्तर मांडणार आहे. त्यासाठी एक विनंती आहे की, कृपया विरुद्ध पक्षाच्या वकिलांनी यात हस्तक्षेप करू नये." विरुद्ध पक्षाची वकील ही एक स्त्री होती.
तिचं नाव दीप्ती. दीप्ती ही स्वभावाने अतिशय अहंकारी होती. समोरच्या वकिलाला व्यवस्थित आपली बाजू मांडण्याची संधी देत नसायची. ती मध्येच काही बोलू नये म्हणून ऋतुराजने आधीच विनंती केली.
"माफ करा युअर ऑनर! पण जर आरोपी पक्षाचे वकील असूनही माझ्या क्लायंटवर आरोप करणार असतील तर मी मध्ये बोलणारच." दीप्ती मध्येच उभी राहून म्हणाली.
"ॲडव्होकेट दीप्ती, तुमच्या क्लायंटवर कुठलेही आरोप लावले जाणार नाहीत. ॲडव्होकेट ऋतुराज फक्त त्यांच्या क्लायंटची बाजू मांडणार आहेत." जज साहेबांनी सांगितलं, तेव्हा दीप्तीला खाली बसावं लागलं.
"युअर ऑनर, मला मिस आरती पाठक यांना काही प्रश्न विचारायचे आहेत." ऋतुराज खाली मान घालून उभ्या असलेल्या आरतीकडे नजर टाकून जज साहेबांना म्हणाला. त्यांनीही त्याला परवानगी दिली, तसा तो कठड्यासमोर जाऊन उभा राहिला.
"मिस आरती पाठक, आशा आहे की तुम्ही माझ्या प्रश्नांची खरी उत्तरे द्याल." ऋतुराज म्हणाला, पण तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यावर त्याने हलका उसासा सोडला.
"मिस आरती, तुम्ही ११ जानेवारीला रात्री १० वाजेच्या दरम्यान कुठे होतात?" त्याने प्रश्न विचारला, पण तिने उत्तर दिलं नाही.
"मिस आरती, मी तुम्हाला काहीतरी विचारलं आहे." यावेळी त्याने जबर आवाजात विचारलं.
"मी कामावरून घरी परतताना त्या मुलाचं अपहरण कसं करायचं, याची योजना आखत होते." शेवटी तिने उत्तर दिलं, त्यावर तो हलकासा हसला.
"अपहरण करण्यासाठी तुम्ही नेमकी काय योजना आखली होती? कशाप्रकारे अपहरण करायचं वगैरे?" त्याने त्याचा पुढचा प्रश्न विचारला.
"मी... मी त्याला खाऊचं आमिष दाखवून त्याला पळवून नेणार होते." बोलताना तिची जीभ जरा अडखळली होती.
"मग तुम्ही त्याच योजनेनुसार त्याचं अपहरण केलं असणार?"
"होय, मी माझ्या योजनेत सफल झाले होते." तो प्रश्न विचारत होता आणि ती उत्तर देत होती.
"जर तुम्ही स्वतःचा गुन्हा मान्य करत आहात, तर मग हेही सांगा की अपहरण करून तुम्ही त्या मुलाला कुठे लपवून ठेवलं आहे? एवढं सगळं खरं सांगितलं तर हेही सांगण्यात तुमची काहीच हरकत नसावी." ऋतुराज त्या मुलाबद्दल विचारत होता.
आता मात्र तिला काय उत्तर द्यावं हे सुचत नव्हतं. एक मिनिटभर ती विचार करत उभी राहिली होती.
"काय झालं मिस आरती? आत्तापर्यंत तुम्ही पटापट उत्तरे दिलीत, मग या प्रश्नाचं उत्तर द्यायला उशीर का लागत आहे?" तिची चोरी पकडली गेली या अविर्भावात त्याने तिच्याकडे पाहत विचारलं.
"उत्तर नाहीय का?" त्याने विचारल्यावर तिने दोन सेकंदांसाठी डोळे मिटून पुन्हा उघडले.
"युअर ऑनर, मला मिस आरती यांची मैत्रीण मिसेस रचनाला कठड्यात बोलवण्याची परवानगी हवी आहे." ऋतुराजने तिच्या मैत्रिणीला बोलवण्याची परवानगी मागितली, तशी आरती घाबरून त्याच्याकडे पाहू लागली. आत्ताशी तिने त्याचा चेहरा पाहिला होता.
"परवानगी आहे." परवानगी मिळाल्यानंतर रचना लगेच दुसऱ्या कठड्यात येऊन उभी राहिली.
"मिसेस रचना, ११ जानेवारीला रात्री १० वाजेच्या दरम्यान तुमची मैत्रीण आरती पाठक कुठे होती तुम्हाला माहित आहे?" त्याने मुद्दाम तिला हा प्रश्न विचारला होता, कारण खरं काय आहे ते त्याला आधीच माहित होतं.
"हो सर, त्यादिवशी रात्री आम्हाला आमचं काम आवरण्यासाठी उशीर झाला होता. रात्री ११ वाजेपर्यंत आम्ही दोघी आणि आणखी काही सदस्य कंपनीत थांबलो होतो. काम आवरल्यानंतर आम्ही दोघी सोबतच निघालो होतो. तिला तिच्या घरी सोडून मी निघून गेले होते." रचनाने लगेच उत्तर दिलं, कारण तिलाही माहित होतं की आरती या प्रकरणात विनाकारण ओढली गेली आहे.
तिचं उत्तर ऐकून सगळ्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या, तर आरती अस्वस्थपणे हातांच्या बोटांची चुळबुळ करत होती. रचनाचं उत्तर ऐकून दीप्तीला धक्का बसला होता.
"याआधी तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला होता? किंवा तुम्हाला इथे बोलवलं गेलं होतं?"
"नाही सर, मी १२ तारखेला माझ्या माहेरी गेले होते. कालच इकडे आले आहे. आरती वर लागलेला आरोप कानावर आला आणि मी माझ्या वहिनींचं बाळंतपण सोडून इकडे आले."
"ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता." त्याने तिला जायला सांगितलं.
"युअर ऑनर, मला अपहरण झालेल्या मुलाच्या आईला कठड्यात बोलवण्याची परवानगी हवी आहे." त्याने मुलाच्या आईला बोलवण्याची परवानगी मागितली, मात्र ते ऐकून कोणाला काहीच समजलं नव्हतं. तिला तो कशासाठी बोलवत असणार? असा प्रश्न सर्वांना पडला होता.
काय होईल पुढे? कळेलच...
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा