Login

दोषी की निर्दोष? (भाग ४)

अपहरणासारखा गंभीर आरोप ती स्वतःवर घेते. कोणालाही ते खरं वाटत नाही पण तरीही ती अडून राहते. अशातच एका हुशार वकिलाने तिच्या केसमध्ये प्रवेश घेतला. न्याय मिळवूनच देणार म्हणून जिद्दीला पेटला. का बरं ती घेत असेल तो आरोप स्वतःवर? ती खरंच दोषी की निर्दोष? जाणून घेण्यासाठी सौ. जानकी नारायण कटक लिखित ही कथा अवश्य वाचा.
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५.
जलद लेखन.
शीर्षक - दोषी की निर्दोष?


"युअर ऑनर, मला अपहरण झालेल्या मुलाच्या आईला कठड्यात बोलवण्याची परवानगी हवी आहे." त्याने मुलाच्या आईला बोलवण्याची परवानगी मागितली, मात्र ते ऐकून कोणाला काहीच समजलं नव्हतं. तिला तो कशासाठी बोलवत असणार? असा प्रश्न सर्वांना पडला होता.

"परवानगी आहे." परवानगी मिळाल्यानंतर मुलाची आई लगेच समोर आली.

"मिसेस अनिता, सर्वप्रथम मला सांगा की तुमचा मुलगा किती वर्षांचा आहे? आणि कुठून गायब झाला?" बोलता बोलता तो तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होता. प्रत्येकाचे हावभाव टिपत होता.

"तो १० वर्षांचा आहे. रात्री बाहेर अंगणात खेळत होता. त्यानंतर तो काही दिसलाच नाही." अनिताने तोंडाला पदर लावून रडत सांगितलं.

"साधारण किती वाजेची गोष्ट आहे? कोणी त्याच्याशी कोणाला बोलताना पाहिलं होतं का? किंवा असं हाताला वगैरे धरून घेऊन जाताना?"

"रात्री ९:३० नंतर तो मला दिसला नव्हता. आम्ही शोध घेत होतो, तेव्हा एका अनोळखी नंबरवरून फोन आला होता आणि त्याने या मुलीचं नाव सांगितलं. या मुलीने माझ्या मुलाचं अपहरण केलं आहे." तिने आरतीकडे बोट करून सांगितलं.

"अच्छा, म्हणजे तुम्हाला माहिती पुरवणारा कोणी पुरुष होता तर! कोणाचा नंबर होता तो? काही माहित आहे का? नाव वगैरे काही त्याने सांगितलं नव्हतं का?"

"नाही, मी विचारलं होतं पण त्याने सांगितलं नाही. फक्त तेवढंच सांगितलं आणि फोन कट केला." तिने जसं घडलं होतं तसं सांगितलं.

"ठीक आहे, तो नंबर असेलच तुमच्या मोबाईलमध्ये. तो नंबर दाखवा." त्याने लगेच तो नंबर मागितला. तिनेही आपल्या नवऱ्याकडून मोबाईल घेऊन त्यावरचा नंबर त्याला दिला.

"युअर ऑनर, मी हा नंबर तपासणीसाठी सायबर टीमकडे देण्याची विनंती करतो." जज साहेबांनी होकार दिल्यानंतर त्याने तो नंबर तपासणीसाठी पाठवला.

"कोणाचा नंबर आहे याचा तुम्ही तपास केला नाही का?" त्याने तिरक्या नजरेने अनिताकडे पाहत विचारलं, तशी तिने खाली मान घातली. यावरूनच समजलं होतं की तिने नंबर कोणाचा असेल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नव्हता.

"या तुम्ही." त्याने तिला जायला सांगितलं.

"युअर ऑनर, मिसेस रचना यांनी सांगितल्याप्रमाणे ११ जानेवारीच्या रात्री ११ वाजेपर्यंत मिस आरती पाठक त्यांच्यासोबत कंपनीमध्ये होत्या. मिसेस अनिता यांनी सांगितल्याप्रमाणे मुलाचं अपहरण हे रात्री ९ः३० वाजेच्या दरम्यान झालेलं आहे. या दोन्ही घटनांचा कुठेच मेळ बसत नाही युअर ऑनर."

"जर मिस आरती या ११ वाजेपर्यंत त्यांचं काम करत होत्या, तर मग त्या ९ः३० वाजता मुलाचं अपहरण करू शकत नाहीत. जर अजूनही विरुद्ध पक्षाच्या वकिलांना यावर विश्वास नसेल, तर मी मिस आरती रात्री ११ वाजेपर्यंत कंपनीमध्ये होत्या याचा पुरावा देऊ शकतो." असं म्हणत तो टेबलजवळ जाऊन एक पेन ड्राईव्ह घेऊन आला.

तो पेन ड्राईव्ह एका अधिकाऱ्याने लॅपटॉपला जोडला. ऋतुराजने त्यातील एक फोल्डर उघडून दिलं. आरती काम करत असलेल्या कंपनीची ती सीसीटीव्ही फुटेज होती. त्यात स्पष्ट दिसत होतं की ११ तारखेला आरती रात्री उशिरापर्यंत तिथे काम करत होती. ती सीसीटीव्ही फुटेज बाकी सर्वांनाही दाखवली गेली. प्रश्न हा होता की त्याने फुटेज आणली कधी?

त्याने ज्या व्यक्तीला फोन लावला होता, तो त्याचा खास मित्र होता. त्याने ११ तारखेला रात्री १० पर्यंत आरती कुठे होती याची आणि ती काम करत असलेल्या कंपनीची व मालकाची माहिती काढून ऋतुराजला पाठवली होती, तेव्हा कुठे सकाळी लवकर जाऊन ऋतुराजने कंपनीच्या मालकाची भेट घेतली होती. त्यांनाही आरती अशी करणार नाही यावर ठाम विश्वास होता, त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची परवानगी दिली होती. त्याने त्याची छोटीशी क्लिपही बनवून घेतली होती.

"मिस आरती, यावर तुमचं काय म्हणणं आहे?" जज साहेबांनी विचारलं, तर तिने आपली मान खाली घातली.

"युअर ऑनर, असंही होऊ शकतं की मिस आरती यांनी कोणालातरी सांगून मुलाचं अपहरण करवलं असेल." दीप्तीला आपली हार होताना दिसत होती, त्यामुळे ती पटकन उभी राहून बोलली होती.

"युअर ऑनर, हे सगळं आता त्या नंबरची माहिती मिळाल्यानंतर समजेलच." तो दीप्तीकडे न पाहताच म्हणाला.

"ठीक आहे, आपण नंबरची माहिती येईपर्यंत वाट पाहूयात." जज साहेब म्हणाले.

१० मिनिटांनी त्या नंबरची माहिती आणली गेली. आणल्याबरोबर ती लगेच जज साहेबांसमोर मांडली गेली. त्यांनी त्या नंबरवर फोन लावायला सांगितला, पण फोन काही उचलला जात नव्हता.

"कोणी फोन उचलत नाही आहे त्यामुळे या नंबरचं लोकेशन तपासण्यात यावं." जज साहेबांनी आदेश दिला, तशी पोलीसांची टीम कामाला लागली.

"युअर ऑनर, मी विनंती करतो की कृपया तोपर्यंत कोर्टरूममधून कोणालाही बाहेर पडण्याची परवानगी देऊ नये." ऋतुराजने विनंती केली, तर ती सुद्धा जज साहेबांनी मान्य केली.

१५-२० मिनिटांत पोलीस माघारी आले. त्यांनी आल्याबरोबर उपस्थित असलेल्या लोकांमधील एकावर आपली नजर स्थिर केली. याचा अर्थ ती व्यक्तीही इथेच उपस्थित होती. पोलीसांची नजर पाहून त्या व्यक्तीने घाबरून आवंढा गिळला.

"काय माहिती मिळाली आहे इन्स्पेक्टर?" जज साहेबांनी विचारलं, तसे इन्स्पेक्टर साहेब पुढे आले.

"सर, हा मोबाईल आम्हाला मिस्टर पाठक यांच्या घरी मिळाला. हा मोबाईल आणि नंबर मिस आरती पाठक यांचा मोठा भाऊ, शंतनू पाठक याच्या टोपण नावाने रजिस्टर आहे." इन्स्पेक्टरने धक्कादायक माहिती दिली, तशी आरती धक्क्याने तिच्या भावाकडे पाहू लागली.


तिच्या भावाने घडवून आणलं असेल का हे अपहरण? पाहूयात पुढील भागात.