ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५.
जलद लेखन.
शीर्षक - दोषी की निर्दोष?
जलद लेखन.
शीर्षक - दोषी की निर्दोष?
आरतीच्या हावभावावरून असंच समजत होतं की याबद्दल तिला काहीच माहित नव्हतं. सगळे शंतनूकडे पाहत होते म्हणून तो पळण्याच्या बेतात होता, पण लगेच त्याला पकडलं गेलं. पकडून त्याला जज साहेबांसमोर आणलं. त्याच्या पळून जाण्याचा प्रयत्न करण्याने तोच खरा अपहरणकर्ता आहे हे सिद्ध झालं होतं.
"शंतनू पाठक, तुम्ही असं का केलं हे आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे." ऋतुराज त्याच्यासमोर उभा राहून विचारत होता, तर तो अतिशय रागाने त्याच्याकडे पाहत होता.
"मग काय करायला हवं होतं मी? अजून किती त्रास सहन करायचा होता मी हिच्यामुळे?" शंतनू आरतीकडे पाहून दात ओठ खात म्हणाला. त्याच्या अशा बोलण्याने आरतीच्या डोळ्यांत पाणी तरळलं.
'मी काय केलं?' असा प्रश्न तिच्या मनाला पडला होता.
"असं काय केलं होतं मिस आरती यांनी जे तुम्ही त्यांच्याविरुद्ध असा कट रचला?" ऋतुराजने दोघांकडे आळीपाळीने पाहून विचारलं.
"तिने माझ्या वाटेचं सगळं सुख हिरावून घेतलं आहे. लहानपणापासून आई-बाबांचं प्रेम तिला जास्त मिळालं. शाळेत हुशार होती त्यामुळे सगळीकडे तिची वाहवाही होत होती. मोठी झाल्यानंतरही सगळ्यांची लाडकी तीच राहिली. मी कोणासाठी कितीही केलं तरी माझं कोणी नाव घेत नव्हतं. अशातच बाबांनी गावाकडच्या जमिनीचा वाटा केला. त्यातलीही ७५% जमीन तिच्या वाटेला गेली आणि माझ्या वाटेला फक्त २५% आली. एक वारस म्हणून मला वाटा जास्त द्यायला हवा होता, पण माझ्यापेक्षा नेहमी हिलाच जास्त मिळत गेलं." अखेर त्याने आपल्या मनातली भडास काढली, जे ऐकून आरती आणि तिच्या आई-बाबांना खूप वाईट वाटलं.
"आता या अपहरण प्रकरणाची योजना तुम्ही कशी केली होती ते सांगा?" ऋतुराजने त्याला विचारलं.
"मला या अनिताने बारावीत असताना नकार दिला होता. तिला माझ्यासारखा मध्यमवर्गीय मुलगा नको होता, म्हणून तिने श्रीमंत माणसाशी लग्न केलं. मी तिच्यासाठी झुरत होतो आणि तिने मला लाथाडून दुसऱ्याशी लग्न केलं होतं. हे मी कसं सहन करू शकणार होतो? त्यानंतर मी काही लग्न केलं नाही. ती मात्र लग्न करून विदेशात गेली होती. तिथून आली ती तिच्या १० वर्षांच्या मुलाला सोबत घेऊनच."
"तिच्या मुलाला पाहून तर आणखीनच माझं डोकं जड झालं होतं. तेव्हाच ठरवलं होतं की या मुलाचा काटा काढायचा. तेव्हा मला आरतीलाही माझ्या रस्त्यातून हटवायचं होतं. जसं तिने नाव कमावलं होतं तसंच तिचं नाव खराबही करायचं होतं, म्हणून मी अनिताच्या मुलाचं अपहरण करून त्याचा आरोप आरतीवर लावला. ज्या दिवशी अपहरण केलं त्याच दिवशी आवाज बदलून मी माझ्या टोपण नावाने रजिस्टर केलेल्या नंबरवरून अनिताला फोन केला. फोन करून मी आरतीचं नाव सांगितलं. विचार केला होता की आता तरी ही बला जाईल माझ्या मागून, पण त्या आधीच सगळं उघडकीस आलं." शंतनू रागात थरथरत बोलत होता, तेव्हा कुठे अनिताला कॉलेजमधला तो दिवस आठवला.
"मिस आरती पाठक, तुम्ही तुमच्या भावाला वाचवण्यासाठी अपहरणाचा आरोप मान्य केला होता का?" तिने पहिल्याच दिवशी लागलेला आरोप मान्य केला होता, तर तो का? याचं कारण ऋतुराजने तिला विचारलं.
"नाही, दादाने असं काही केलं आहे हे तर मला माहितही नव्हतं. मला अटक होण्यापूर्वी एक फोन आला होता. फोनवरची व्यक्ती म्हटली होती की जर मी हा आरोप स्वतःवर घेतला नाही, तर त्या लहान मुलाला जीवानिशी मारलं जाईल. मग स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं की त्या मुलाचा जीव जाऊ द्यायचा? याचा निर्णय त्याने माझ्यावर सोपवला होता. यामध्ये एका निष्पाप लेकराचा बळी जाणार होता, म्हणून मी तो आरोप गुपचूप मान्य केला होता." आत्ता कुठे ऋतुराजला दोन दिवसांपासून छळत असलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं.
"कॉलेजमध्ये असताना माझी एक फ्रेंड मला म्हणाली होती की, 'जर कोणी आपल्यावर अत्याचार करत असेल तर तो डोक्यावरून पाणी जाईपर्यंत सहन करायचा नाही. अशाने आपल्याच अंगलट येतं. जेवढं आपण सहन करू तेवढा समोरचा त्रास देणार. वेळीच योग्य ती हालचाल केली की समोरच्याची हिम्मत होत नाही पुन्हा त्रास देण्याची.' तेव्हापासून मी अत्याचार सहन करतही नाही आणि कोणाला करूही देत नाही." तो तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला. ते शब्द ऐकून आरती झटक्यात तिच्या भूतकाळात गेली.
कॉलेजमध्ये असताना तिचा एक फ्रेंड होता. तो अतिशय लाजाळू स्वभावाचा होता. रॅगिंग वगैरे अशा गोष्टींना तो नेहमी बळी पडायचा. त्याचा लाजाळू स्वभाव पाहता वरिष्ठ विद्यार्थी त्याला खूप छळत असायचे. तेव्हा तिने तिच्या हुशारीने त्याला त्यांच्या तावडीतून सोडवलं होतं. तेव्हा तिने पहिल्यांदा त्याला ते शब्द ऐकवले होते, जे त्याने आजपर्यंत लक्षात ठेवले होते. हळूहळू तिने त्याचा लाजाळूपणा कमी केला होता. मग बिनधास्तपणे एकमेकांच्या गळ्यात हात घालून फिरत होते. काही कारणास्तव तिला तिचं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं, पण त्याने मात्र वकिली पदवी प्राप्त केली होती.
त्यानंतर दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या होत्या, त्या आज अशा वळणावर एकत्र आल्या होत्या. ते आठवून तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. त्यानेही आपली नजर फिरवून घेतली.
'बनी...!' तिच्या मनात तिने त्याला दिलेलं टोपण नाव आलं आणि चेहऱ्यावर हलकं हसूही पसरलं.
"खरा आरोपी आपल्यासमोर आहे युअर ऑनर." ऋतुराज असं म्हणत दोन पावले मागे सरकला.
"सर्व पुरावे लक्षात घेता कोर्ट या निर्णयावर पोहोचली आहे की, मिस आरती पाठक या निर्दोष आहेत. खरे आरोपी शंतनू पाठक यांना ७ वर्षांचा कारावास व ५००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली जात आहे. त्यांनी मुलाला कुठे लपवलं आहे याची आत्ताच्या आत्ता माहिती द्यावी. पोलीसांनी लवकरात लवकर मुलाला त्याच्या आईवडिलांकडे सुरक्षित सोपवावे."
"पालकांना महत्त्वाचा संदेश की, कृपया आपल्याच अपत्यांमध्ये भेदभाव करू नये. अशाने घर तुटतं, नाती तुटतात, मने विभागतात. दोघांनाही समान हक्क, मान-सन्मान, प्रेम द्यावं. एकतर मालमत्तेचे वाटे करू नयेत किंवा केलेच तर समान करावेत. मुलगा असो की मुलगी, दोन्ही एकाच रक्ताचे असतात. रक्त एक आहे तर मग भेदभाव का? सर्व पालकांनी याची काळजी घ्यावी. त्यासोबतच कोर्टची कार्यवाही पूर्ण झाली, असं जाहीर केलं जात आहे." जज साहेबांनी शंतनूला शिक्षा सुनावली, एक महत्त्वाचा संदेश दिला आणि शाईपेनचं टोक खोडलं.
शंतनूला पोलीस घेऊन गेले. सगळे बाहेर पडल्यावर आरतीच्या आई-बाबांनी तिची भेट घेतली. तिच्यावर अविश्वास दाखवला म्हणून तिच्या बाबांनी तिची माफी मागितली. तिच्यावर लटक्या रागाने ओरडलेही की तिने त्यांना आधी का सांगितलं नाही. तिनेही त्याबद्दल त्यांची माफी मागितली. शंतनूला शिक्षा झाल्यामुळे तिघे दुःखात होते, पण ते त्याच्या कर्माचं फळ होतं म्हणून त्यांनी त्याची भेटही घेतली नव्हती.
****************************
"हॅलो धीरू, तुझी केस जिंकली बरं का!" ऋतुराजने कोर्टमधून बाहेर पडल्यानंतर धीरजला फोन लावला होता.
"खूप खूप अभिनंदन ऋतु! तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास होता. तू कुठलीही केस हरत नाहीस. आज तुझ्यामुळे हरत असलेली केस जिंकली." धीरज सगळं क्रेडिट त्याला देत होता. एकदा ऋतुराजने सगळीकडे नजर फिरवली, मग फोनवर बोलू लागला.
"धीरू, तू ओळखलं नाहीस का आरतीला?" त्याने विचारलं तसा धीरज विचारात पडला.
"नाही रे, असं का विचारलंस तू?" न समजल्याने त्याने विचारलं.
"अरे आपण तिघेही सोबतच होतो कॉलेजला. आरती आपल्या क्लासची टॉपर होती." ऋतुराजने सांगितलं तेव्हा कुठे त्याला आठवलं.
"अरे, मी खरंच ओळखलं नाही तिला. इतके दिवस तिच्या बाजूने लढत होतो, पण मी साधं ओळखलंही नाही तिला. असा कसा रे मी!" धीरज कपाळावर हात मारून घेत म्हणाला, तसा ऋतुराज गालात हसला.
"चल जाऊ दे, इकडे आल्यानंतर भेट घे तिची. आता मी ठेवतो फोन. घरी जायला निघालो आहे." ऋतुराजने बोलून फोन ठेवला. तिथून जायला निघालाच होता की...
"बनी..." मागून हळवा आवाज त्याच्या कानांवर आला, तसा तो जागीच थबकला.
त्याने मागे वळून पाहिलं तर आरती डोळ्यांत पाणी घेऊन उभी होती. तिने पटकन पुढे जाऊन त्याला गच्च मिठी मारली. त्यानेही आपले हात तिच्याभोवती गुंडाळले. धीरज तरी कमी मिसळत होता त्यांच्यात, पण हे दोघेजण एकदम जवळचे होते.
"ओळखही दाखवली नाहीस मला." तिने लटक्या रागात विचारलं.
"तू वर पाहिलंच नाहीस माझ्याकडे, मग कशी ओळख देणार?" तोही मुद्दाम त्याच स्वरात म्हणाला. ती त्याच्यापासून बाजूला झाली.
"सॉरी सॉरी!" चूक उमगल्यावर तिने माफी मागितली.
"सॉरी ने काम नाही होणार. ते बघ तिकडे एक कॉफी शॉप आहे." तो तिच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला, तसा तिनेही त्याच्या खांद्यावर हात टाकला.
"चल." ती हसून म्हणाली.
"ऐ पण तू लग्न नाही केलंस अजून?" त्याने चालता चालता विचारलं.
"अरे अजूनपर्यंत तुझ्यासारखा हँडसम, हुशार कोणी भेटला नाही ना म्हणून." ती म्हणाली, तसे दोघेही खळखळून हसले.
क्षणभर का होईना ती तिच्या भावाला जेल झाल्याचं दुःख विसरली होती. मैत्री ही अशीच असते ना, थोडंही बोलल्याने मन कसं हलकं होऊन जातं. कायमचं नाही, पण क्षणिक तरी!
दोघेही कॉलेजमध्ये होते तसे एकमेकांच्या गळ्यात हात टाकून कॉफी शॉपकडे गेले. मनसोक्त गप्पा मारत दोघांनी कॉफीचा आस्वाद घेतला. निखळ मैत्री जी काही वर्षांपूर्वी हरवली होती, ती पुन्हा एकदा सापडली होती.
आमची कहाणी सरो, तुमचं पोट भरो!
आणि जज साहेबांच्या संदेशचा विचारही करो!
आणि जज साहेबांच्या संदेशचा विचारही करो!
समाप्त!
लेखिका - सौ. जानकी नारायण कटक.
