Login

दोस्ती-हनी आणि अक्कूची

एक भावनिक मैत्री कथा
*दोस्ती*

अक्कू आणि हनीची

जोरदार वारा, नदीचा खळखळाट,पानांची सळसळ,पक्ष्यांचे आवाज असं जंगलातील नेहमीचे वातावरण. पण आज हत्तीच्या पिलाची मनाची चिलबिचल ही नेहमी सारखी नव्हती.

कालचा तो आईचा चित्कार आताही त्याच्या कानांत सतत घुमत होता.

आई निपचित पडल्यावर त्या निर्दयी माणसांनी तिचे सुंदर सुळे काढले. ते दृश्य झुडुपा मागुन पाहताना त्याच्या अंगावर शहारे आले होते. तो प्रसंग आता देखिल त्याच्या काळजाचा थरकाप उडत होता.


गाडी जोरात जात होती. त्याच्या मागे बांधलेल्या पिंजऱ्यात एक अस्वल आणि त्याचे पिल्लू होते. त्या निर्दयी माणसांना चांगलच ठाऊक होत एकदा की, आईला पकडले की तीच पिल्लु कुठे जाणार? पण आई ती आई असते. आपल्या पिलांसाठी काहीही करु शकते प्रसंगी आपला जीव देखिल देवू शकते.

त्या आईने देखिल तेच केले जीवाची पर्वा न करता तीने चालत्या गाडीतुन पिंजऱ्याच्या दोन सळईतुन दाबून-दाबून तीच्या पिलाला बाहेर काढले व चालत्या गाडीतुन लोटून दिले.

आईने आपल्याला गाडीतून लोटले म्हणून आपण वाचलो. पण आईच काय झाल असेल? असा विचार करत ते अस्वलाच पिल्लू नदीकाठी उदास बसल होत.

हत्तीच्या पिलाचा जीव तहानेने कासावीस झाला होता. नदीचा खळखळाट ऐकून त्याच्या जीवात जीव आला. आपण किती चाललो आणि आता जंगलात कुठे आलोय याचा त्याला काहीच पत्ता लागत नव्हता.

नदीच पाणी पिल्यावर त्याला थोडी हुशारी आली. मात्र सततच्या चालण्याने त्याला फ़ार थकवा आला होता. म्हणून ते नदीकाठी असलेल्या झाडाखाली बसल.

हत्तीच पिल्लू बसल्या-बसल्या इकडे तिकडे नजर फिरवत होत इतक्यात त्याची दृष्टी अस्वलाच्या उदास आणि एकट्या बसलेल्या लहानश्या पिला कडे गेली.


हत्तीच पिल्लू हळुच उठल व त्या अस्वलाच्या पिला जवळ गेल.

काय रे! काय झाल? इतका उदास का बसला आहेस?


काय सांगु हत्ती दादा ! माझ्यावर फ़ार मोठ संकट आलेय रे!


का रे! काय झाल?

तशी अस्वलाच्या पिलाने आपली सारी हकीकत सांगीतली.

माझी अशीच काहीशी दुःखद कहाणी आहे. माझी देखिल आई नाही! कालच त्या निष्ठूर माणसांनी तिचा जीव घेतला.

नाव काय रे छोटू तूझे ?

हत्ती दादा मी अक्कू!

आणि हत्ती दादा तूझे नाव काय रे?

मी हनी!

बघ अक्कू तु आपल्या आई पासुन दूर झाला आहेस आणि मी देखिल थोडक्यात आपण समदुःखी आहोत. सध्या आपल्याला दुसऱ्या कोणाचाही आधार नाही. मग का नाही आपण एकमेकांचा आधार बनत? म्हणजे थोडक्यात मित्र! काय वाटते अक्कू?

अगदी बरोबर आहे हत्ती दादा!

आता हत्ती दादा नाही फक्त हनी अशी हाक मारायची मला. आत्ता आपण मित्र ना! मग? मित्रानंमधे फक्त मैत्रीच नात असत बरोबर ना?

हनीच्या या वाक्यावर अक्कू खुदकन हसला.


त्या क्षणापासुन दोघांची मैत्री झाली. नुसती मैत्री नाही तर जिवा भावाची मैत्री.जीव ओवाळून टाकणारी मैत्री.

सकाळ झाल्या पासुन दोघं जंगलात भटकत नदीत आंघोळ करत फळे खात मजा करत दोघांचे अगदी छान चालले होते.वेळ गेली तसं दोघंही आपले कुटुंब विसरले. आता ते दोघंच एकमेकांचे कुटुंब होते. अक्कू काहीसा हट्टी व आळशी होता. याचे कारण म्हणजे हनीच होता.अक्कू लहान म्हणून हनी त्याचे खुपच लाड करायचा.त्त्याची खाण्या पिण्याची सोय हनीच करायचा..

बऱ्याच वेळा हनी अक्कूला म्हणायचा अरे! अक्कू आपली स्वतःची काम स्वतः करत जा! कधी मी नसलो तर काय करशील? तेंव्हा अक्कू असं कधी होणारच नाही असं म्हणायचा.

आपण संपुर्ण जीवन सोबतच राहणार आणि हो! तु माझ्या सोबत नसशील असं यापुढे कधी मस्करीत देखिल सांगू नकोस समजल?


हो अक्कू! अस परत नाही बोलणार बस्स!!

हनीला देखील अक्कू पासुन दूर राहणे ही कल्पना सहन होत नव्हती.

हनी अगदी पांढरा शुभ्र असा हत्ती तो त्यांच्या समूहात पांढरा म्हणून त्याच्या जन्मानंतर त्याला आणि आईला समूहाने बाहेर काढले. त्यामुळेच हनीची आई शिकाऱ्याच्या तावडीत सहजा -सहजी सापडली.
शिकारी आल्याची चाहूल लागताच तीने हानीला ऐका झुडपात लपवले व ती स्वतः हून शिकाऱ्या समोरून धावत गेली. जेणेकरून त्यांचे लक्ष हनीकडे जाणार नाही.शेवटी आई ती आई आपल्या मुलांचे प्राण वाचवण्यासाठी ती काहीही करु शकते.

आईच्या म्रुत्यु नंतर हनी समूहात देखील जावू शकत नव्हता कारण समूहाने आधीच त्यांना बहिष्कृत केले होते. बिचारा हनी..

अक्कू देखिल अतिशय पांढरा शुभ्र होता. त्याचं कुटुंब हे बर्फाळ प्रदेशातले.पण या जंगलातून शिकारी त्यांना नेत असताना आईने त्याला गाडीतुन लोटले व त्याचे प्राण वाचवले. आई ती आई असते.आपल्या मुलांचे प्राण वाचवण्यासाठी काहीही करु शकते. अक्कू देखिल त्या बर्फाळ भागात परत जावू शकत नव्हता.बिचारा अक्कू..

हनी आणि अक्कू दोघंही दिसायला अतिशय सुंदर पण हिच सुंदरता त्यांना एक दिवस महागात पडणार याची दोघांनाही कल्पना नव्हती.


दोघांचे जीवन आनंदात सुरु असताना अचानक त्या जंगलात शिकाऱ्यांनी हल्ला केला. त्यांना पाहुन इतर प्राण्यांसोबत त्या दोघांनीही जंगलात धूम ठोकली.पळताना त्यांना जाणीव झाली की, आज आपले काही खरं नाही. इतक्यात हनीला मागे काहीतरी टोचल्याची जाणीव झाली. आणि थोड्या वेळाने त्याची शुद्ध हरपत चालली.. याची जाणीव त्याने अक्कूला येवू दिली नाही. तश्याही परिस्थीतीत त्याने अक्कूला ऐका झुडपात लपवले व स्वतः कस तरी पळत राहिला. थोड्या वेळाने त्याची शुद्ध हरपली व तो जमिनीवर कोसळला.

वेगवेगळ्या विचित्र आवाजाने हनीला पुसटशी जाग आली. त्याने हळुच डोळे उघडले.पाहतो तर तो ऐका मोठ्या पिंजऱ्यात होता. आजूबाजूला इतर प्राण्यांचे आवाज येत होते. आपण नक्की कुठे आहोत या माणसांनी आपल्याला कुठे आणले आहे. अक्कू या माणसांच्या तावडीतुन वाचला असेल का? की, त्यालाही पकडले असेल असे अनेक विचार हनीच्या मनात येत होते.


हनीला जेथे आणण्यात आले होते ती खुप मोठी सर्कस होती. त्यांत वाघ, सिंह, हत्ती, घोडे, माकडे असे अनेक जंगलातील प्राणी होते. जे त्या सर्कस मध्ये काम करत.

हनीच देखील दुसऱ्या दिवशी पासून चाबकाच्या फटकाऱ्यावर प्रशिक्षण सुरु झाले.


प्रशिक्षण सुरु असताना चाबकाचे फटाकारे त्याला असाहाय्य होत. त्याच्या डोळ्यांतुन अश्रूंच्या धारा वाहत. मात्र त्या धारा क्रूर माणसाला कश्या दिसणार?


हनीला अक्कूची आठवण येई. कसा असेल माझा अक्कू? सुखरूप असेल ना? की त्यालाही माझ्या सारखे चाबकाचे फटके मिळत असतील. माझा अक्कू एकतर लहानपणापासून थोडा हट्टी आणि आळशी माणसांनी त्याला पकडले असेल तर काय हाल होत असतील बिचाऱ्याचे.विचार करता करता हनीचे डोळे पाणावले.

नाही! नाही!! तो माणसांच्या हाती लागण शक्यच नाही. कारण मी त्याला झुडपात चांगले लपवले होते. तो स्वतःशीच पुटपुटला.

वर्ष गेले हनीचा रोजचा तोच कार्यक्रम फक्त आता चाबकाचे फटके जरा कमी झाले होते इतकच.

असच ऐका रात्री सर्कशीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अचानक वन अधिकारी व पोलिस यांची धाड पाडली आणि सगळ्या प्राण्यांना जप्त करून ऐका प्राणी संग्रहालयात आणण्यात आले. कारण आता नवीन कायद्या नुसार प्राणी खासकरून वन्य प्राणी पाळता येत नव्हते.त्यामुळे हनी सह सर्कशीतल्या सर्व प्राण्यांना नवीन घर मिळाले.

नवीन घर सर्कसच्या घरा पेक्षा चांगले होते. खाण्या पिण्याची व्यवस्था चांगली होती. हनी पांढऱ्या रंगाचा हत्ती असल्यामुळे तेथे येणाऱ्या पर्यटकांना त्याचे विशेष आकर्षण खास करून मुलांना त्याच्या बरोबर सेल्फी काढायला फ़ार आवडे.

हनीला मात्र हे जीवन कंटाळवाणे वाटे. त्याला ते जंगलातील त्याच्या लाडक्या अक्कू सोबत काढलेले दिवस आठवत आणि त्याचे डोळे भरून येत.

कुठे असेल माझा अक्कू, कसा असेल माझा अक्कू,आमची या आयुष्यात परत भेट होईल? असे अनेक प्रश्न त्याला सतावत.

असच एक दिवस मुलं हनी सोबत सेल्फी काढत होती. इतक्यात एक पिंजरा मोठ्या सुरक्षेत आणण्यात येत होता. त्यात एक सुंदर अस पांढर अस्वल होत. हनीची नजर त्या पिंजऱ्याकडे गेली तर त्याला धक्काच बसला कारण तो अक्कू होता.

अक्कू! अक्कू!! त्याने हाक मारली. हनीची हाक अक्कूने बरोबर ओळखली त्याने देखिल त्याला प्रतिसाद दिला. हनी प्राणी कक्षेच्या गेटवर धावला. अक्कूचा पिंजरा प्राणी कक्षात आणला.हनी पिंजऱ्याजवळच होता. कधी एकदा पिंजऱ्याचे दार उघडते आणि कधी एकदा अक्कूला सोंडेच्या कावेत घेतो असं हनीला झाल होत. शेवटी तो क्षण आला आणि एकदाच ते दार उघडले.

अक्कू आणि हनीची गळाभेट झाली.. तिथे असलेल्या रक्षकांनी हानीला रोखले नाही कारण हनीचा गरीब स्वभाव त्यांना माहिती होता.उलट त्यांनी त्या गळाभेटीचे फोटो आणि वीडियो बनवले.आजू बाजूची लोकं - मुलं ते अदभुत दृश्य पाहत होती व आपल्या मोबाईल मधे कैद करत होती. बऱ्याच लोकांनी गळाभेटीचे वीडियो समाजमाध्यमांवर टाकले. त्या वीडियोला जगभरातुन प्रचंड प्रतिसाद मिळत होता. दोन प्राण्यांच्या मैत्रीची ती एक अनोखी कहाणी होती.

प्राणीसंग्रहालय मोठ होत. त्यांत लहानसे कृत्रिम जंगल त्यामध्ये पाणवठे, गुहा, नाला ई. होत.त्यांत प्राणी खेळत हे पाहण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी असे. आत्ता तर अक्कू आणि हनीचा वीडियो वाईरल झाल्या पासुन त्यांची जोडी पहायला लोकांची अक्षरश झुंबड उडाली.

हनी आणि अक्कू एकमेकांना भेटल्यापासुन ते अतिशय आनंदात होते. दोघंही लोखंडी सळईच्या मजबुत कुंपणाच्या बाहेर येणाऱ्या पर्यटकांना सेल्फी,फोटो, वीडियो देत. अगदी आनंदी आनंद.......


अक्कू! खरं सांगु मी अतिशय कंटाळलोय या जीवनाला.

हनी अरे! काय बोलतोस तु?

हो! अक्कू मी खरं तेच सांगतोय. मला जंगलातुन आणल्या पासुन सर्कशीतले अतिशय कठीण दिवस. त्या नंतर येथील रोजचे तेच जीवन. रोज बुजगावणे सारख उभ रहायचे आणि फोटो काढायचे बस्स!


हनी! आता तर मी भेटलोय ना तुला ..मग?

अक्कू! तु मला परत भेटलास हीच फक्त माझ्या आत्ताच्या आयुष्यातली चांगली गोष्ट. बाकी काहीच नाही.


हनी! तु नक्की काय बोलतोस मला समजत नाही. इथे आपल्याला चांगले खायला प्यायला मिळते, आपल्या आरोग्याची काळजी घेतली जाते तसेच आपल्या सुरक्षेची काळजी घेतली जाते. अजुन काय पाहिजे आपल्याला?


खाण, पिणे,सुरक्षा, आरोग्य ..हो! बरोबर आहे तूझ अक्कू! पण स्वातंत्र्याच काय?


हनी! स्वातंत्र म्हणजे?


अक्कू! आठवतय तुला ते जंगलात आपले मनसोक्त फिरणे, नदीत मनसोक्त डुंबणे, धावणे, खेळणे, पडणे, लोळण,.

बस्स! हनी बस्स!! आता मी समजलो तुला काय म्हणायचे आहे ते.


अक्कू! या माणसांसाठी आपण एक खेळण आहोत रे! खेळण बाकी काही नाही!!
आधी आपल्याला जंगलातुन पकडुन सर्कशीत न्यायचे.आता नवीन कायदा आल्याने प्राण्यांची सर्कस बंद झाली तरी संग्रहालयात सेल्फी सर्कस चालुच आहे ना?

स्वातंत्र्याच काय? आपली सेल्फी काढणाऱ्या ऐका माणसाला सुद्दा वाटत नसेल की, या जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना जंगलातच सोडले पाहीजे?


हनी! आगदी खरं आहे तूझ खरंच! कोणालाच वाटत नसेल? आपण मस्त मोकळ्या जंगलात फिरावं, नदीत खेळाव...


अक्कूच्या या बोलण्यावर हनीने त्याला सोंडेच्या कावेत घेतले. त्याला कुरवाळत आपल्या ओल्या डोळ्यांनी तो म्हणाला नाही रे अक्कू! असं जर एखाद्या तरी माणसाला वाटलं असत नां तर आज आपण जंगलात असतो. एखाद्या नदीत मनसोक्त आंघोळ करत असतो....


अक्कू! मला एक सांग तु या माणसांच्या तावडीत कसा सापडलास?

जावू दे ना हनी! त्या जुन्या आठवणी आता कश्याला? आपण आहोत ना आता एकत्र बस्स!

अक्कूच्या बोलण्यावरून तो आपल्या पासुन काहीतरी लपवतोय हे हनीच्या लगेचच लक्षात आले. कारण तो अक्कूला लहानपणापासुन चांगलाच ओळखत होता.


अक्कू! खरं काय ते सांग.

हो! सांगतो ..तु मला झुडपात लपवलेस काही वेळाने मला धाड! असा आवाज आला. इतक्यात शिकाऱ्यांची गाडी माझ्या समोरून गेली. मी झुडपात असल्याने त्यांनी मला पहिल नाही. मात्र जो धाड! असा आवाज आला होता तो तु जमिनीवर पडल्याचा होता. मला झुडपा आडून सर्व दिसत होत.


एक दुसरी गाडी आली त्या गाडीतुन माणसांनी एक भला मोठा पिंजरा आणला त्यांत तुला भरले.पाहिली गाडी पुढे निघुन गेली. पिंजरावाली गाडी मागे होती. त्यांत फक्त गाडी चालवणारा होता. गाडी जशी झुडपा जवळ आली तशी संधी साधुन मी त्या माणसावर हल्ला केला. त्याला पार जखमी केले. तुला मी फ़ार सोडवण्याचा प्रयत्न केला पण तु बेशुद्ध असल्याने मला काहीच करता येत नव्हते.

पिंजरा गाडी अजुन आली नाही म्हणून पाहिली गाडी परत आली. त्यांतील ऐका शिकाऱ्याने मलाही बेशुद्ध केले.

शुद्धवर आलो तर मी ऐका प्राणीसंग्रहालयात होतो. संग्रहालयात धाड पडली आणि मला येथे आणण्यात आले. कारण ते संग्रहालय कोण्या ऐका खाजगी मालकीच होत. त्यानेच मला त्या शिकाऱ्यां कडुन विकत घेतले होते.


अक्कू! अक्कू!! अरे मला वाचवताना तुला तूझ्या जीवाची पण पर्वा वाटली नाही?


हनी! ज्या आयुष्यात तु नाही मग त्या जीवाचा उपयोग तरी काय ?

त्यावर हनी निशब्द होवून अक्कूला सोंडेने कुरवाळत राहिला.त्याच्या प्रेमळ स्पर्शाने अक्कूच्या डोळ्यांतुन अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.....

- चंद्रकांत घाटाळ
7350131480
0