Login

DINK

एका स्त्री ची कथा जिला मुलं जन्माला घालण्यात रुची नाही. पण का? तेच आपण या कथेत जाणून घेऊया
दीर्घ कथा लेखन स्पर्धा

DINK - भाग 1

"ताई ही सीट मी रिझर्व्ह केलेली आहे. प्लीज तुम्ही आपल्या जागी बसा आणि मला माझ्या जागी बसू द्या. " पिहू मुंबई ते गोवा जाणाऱ्या वंदे भारत रेल्वेतील आलिशान डब्यातील तिच्या सीटवर बसलेल्या तिच्याच वयाच्या स्त्रीला बोलली.

" ठीक आहे ना ताई. त्यात काय एवढे तुम्ही माझ्या सीटवर बसून जा. " ती बाई हसून तिला म्हणाली, " माझी मुलगी फार रडत आहे. खिडकीतून बाहेर पाहायला लागली तशी गप्प झाली. आता बाजूला झाले तर परत रडायला लागेल."

" ती तुमची समस्या आहे." पिहू निरागस चेहऱ्याने तिला म्हणाली, " मला बाहेरचा देखावा पाहता यावा म्हणून मी ही सीट एक महिना अगोदर बुक केली आहे. तेव्हा प्लीज तुमच्या जागेवर बसा. "

" अरे तुम्ही कशा स्त्री आहे एक स्त्री असून माझी अडचण तुम्ही समजून घेत नाही आहात? " ती स्त्री आता पिहूवर चिडली.

" तुम्हाला तुमचे मुल अडचण वाटते तर जन्म कशाला दिला?" पिहूने तिला सरळ प्रश्न केला. ती तिशीतील स्त्री आ वासून पिहू कडे पाहू लागली. तडक उठून ती पिहूच्या बाजूच्या तिच्या सीटवर जाऊन बसली. तशी तिची दोन वर्षाची मुलगी रडकुंडीला आली. तिचा तो रडवलेला चेहरा पाहून त्या स्त्रीने मुलीच्या पाठीत जोरात एक धपाटा दिला. तसा त्या मुलीने जोरात भोंगा वासला. हे पाहून दुसरीकडे बसलेली त्या स्त्रीची बहीण तिथे आली व पिहूला बोलू लागली,
"अगं ए बाई काय लहान मुलासारखा हट्ट लावला आहे तु? अशी एक लहान मुलगी रडताना चांगली दिसते होय तुला?"

पिहूने तिच्याकडे दुर्लक्ष केले. हे बघून ती स्त्री रडक्या आवजात बोलती झाली,

" काय बाई आहे हिला दिसत नाही की एक लहान लेकरू इथे रडते आहे. पण हिला आपली सीट प्यारी आहे. "

आजूबाजूला कुजबुज सुरु झाली. एक वयस्कर माणूस उठून पिहूला म्हणाला, " अगं बसू दे त्या आई लेकराला तिथे. पुण्य मिळेल तुला. लवकरच तुझीही कूस उजवेल अन तुझ्या कुशीतही असेच बाळ असेल. "

"असलं पुण्य नकोच मला." पिहू स्वतःशीच बडबडली.

"काय बाई आहे, टस कि मस होत नाही. फारच जब्बर आहे." त्या लेकुरवाळीण स्त्री च्या बहिणीने मोबाईल काढून पिहूची शूटिंग घेणे सुरु केले,

"बघा ही बाई. बाईच बाईची शत्रू असते हे म्हणतात ना ते अशाच स्त्रियांमुळे. माझी भाची रडत आहे तिला खिडकीजवळ बसायचे आहे. मात्र ही बाई पाच मिनिट आहे तिला खिडकी जवळ बसू द्यायला तयार नाही काय तर म्हणते की मी ही सीट मिळवण्यासाठी एक महिना अगोदर रिझर्वेशन करून ठेवले होते. आता तुम्हीच न्याय करा." तरीही पिहू शांतच.

"तुला काळीज आहे की नाही? अगं बसू दे ना त्या लेकराला खिडकी जवळ. बाकी बाहेरचे तुला पाहायचेच आहे ते या सीट वरूनही दिसेलच." एक काकू पिहूवर बरसल्या.

" मीच का देऊ? या रेल्वेत इतरही बरेच लोक खिडकीजवळ बसले आहेत. त्यातील कोणाला म्हणा ना तुम्ही. बघा कोण देते का तुम्हाला खिडकीची जागा. " पिहूच्या मनात आले बोलावे. पण मनोमन काहीतरी ठरवून तिने निमूटपणे डोळे मिटून घेतले.

क्रमश :

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याची पुढील भाग चुकू नये यासाठी पेजला आताच फॉलो करा व फॉलो सेटिंग मध्ये जाऊन आताच फेवरेट ऑप्शन वर क्लिक करा म्हणजे एकही भाग सुटणार नाही.

धन्यवाद.
0

🎭 Series Post

View all