Login

DINK भाग 29

पिहू कुठे अडकली असेल की तिने तिच्या ऑफिस कामाला तेजसच्या वर ठेवले असेल?
दीर्घकथा लेखन स्पर्धा

DINK भाग 29

" म्हणजे नाही केले. " अनिताने तिला निरखून पाहत तुझ्या हातावर हात ठेवून तिला विचारले, " पोटाचे दुखणे उसळले कि पाळी आली आहे? "

" दोन्हीही काही दिवसांपासून काही पचतच नाही आहे. कंटाळली मी या दुखण्याला. " पिहू त्राग्यानेच उत्तरली.

" म्हणूनच म्हणत आहे दोन दिवसाचा ब्रेक घे, डॉक्टरला दाखव. आराम कर. " अनिता तिला म्हणाली.

" पुढल्या हप्त्यात घेणार आहे. तेजसचा वाढदिवस आहे ना." पिहूच्या या वाक्याने अनिता शॉक झाली.

" म्हणजे तुझ्या लक्षात आहे तर? "

" अर्थातच माझ्या लक्षात आहे आणि मला हेही माहित आहे की तू त्यासाठीच इथे आली आहेस. " पिहू हसली.

"छान छान. म्हणजे यंदा कर्तव्य आहे तर?" अनिताने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघितले.

" ते मी नाही सांगू शकत. माझा अजून लग्न करण्याचा काहीच विचार नाही. " पिहू उत्तरली.

" पिहू छान मुलगा आहे तो. तुला आनंदी ठेवेल. " अनिता तिला म्हणाली.

" अनिता किती वेळा सांगितले तुआपल्याला आणखी कोणी आनंदी ठेवू शकत नाही. " पिहू बोलली.

" ठीक आहे बाई तुझा आनंद तुझ्या हाती. मग त्यासाठीच या मुलाला आपल्या हातातून जाऊ देऊ नकोस बस इतकंच मला म्हणायचं आहे. " अनिता तिला म्हणाली, " चल निघते मी. काही लागलं तरच नाही अशीही फोन करत जा. "

" हो नक्कीच. तू माझं जास्त टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या अजित व सुजित कडे बघ नाहीतर माझ्या नावाने बोट मोडायची ती दोघं. " पिहू बोलली तशा दोघीही खळखळून हसू लागल्या.

मागील काही दिवसांपासून पिहूची पाळी अनियमित झाली होती. अचानक कधीही तिला पाळी यायची. कधी कधी दोन दोन तीन महिने येतच नसे. मग जेव्हा यायची तेव्हा तिला फार त्रास व्हायचा. ती सध्या पेन किलर खाऊन वेळ मारून नेत होती. एकदा हे मुंबई हेड ऑफिसच्या जनरल मॅनेजर पदाची पुष्टी झाली की ती पूर्ण थेरपी घेईल असे तिने स्वतःला आश्वासन दिले होते.

तेजसच्या वाढदिवसाचा दिवस उगवला. तिने त्याच्यासाठी छानसा टाय व त्याच्या कोटला उठून दिसतील असे कफ्लिंग त्याला वाढदिवस निमित्त देण्यासाठी ऑनलाईन मागून घेतले. पुण्यातील ऑफिसचं काम संपून ती दुपारीच तिच्या फ्लॅटवर परतली.

तिकडे तेजसनेही त्याच्या पेंत हाऊसवर त्याच्या वाढदिवसा निमित्त पिहूला लग्नासाठी प्रपोज करायला जय्यत तयारी केली. रोमँटिक वातावरण निर्मितीसाठी गुलाब फुलांची जागोजागी संरचना, टीम टीम लाइटिंग, मंद व्हायोलिनचे संगीत सज्ज झाले. बाकी सर्वात वरचा फ्लॅट असल्याने हवा होतीच सोबत द्यायला. त्याच्या व पिहूच्या जवळच्या मित्र मैत्रिणीला वाढदिवसाचे आमंत्रण देण्यात आले. ललित त्याच्यासाठी खूप आनंदी दिसत होता. त्याने आतापर्यंत सर्वांपासून लपवून ठेवलेल्या  त्याच्या गर्लफ्रेंडलाही सर्वांची ओळख करून देण्यासाठी बोलवले. तिला पाहताच तेजसच्या लक्षात आले की ललितने आतापर्यंत तिला आईला का भेटवले नाही? मिशा एक आफ्रिकन निग्रो मुलगी. आपल्याकडील मंडळी एक वेळ अमेरिका किंवा इंग्लंडची गोरी मेम खपवून घेतील पण आफ्रिकन, ते ही निग्रो काळी, कुट्ट, सून या नात्याने स्वीकार करने कठीणच. म्हणून ते दोघं वादाला तोंड फोडल्यापेक्षा लग्नाशिवाय एकत्र राहु लागले. तशी मिशा व ललित ची भेट ललित बाहेर देशात फायनान्स मध्ये एमबीए करायला गेला तेव्हा झालेली मात्र मीशाचा कल मॉडेलिंग करण्यात जास्त असल्यामुळे तिने सध्या मुंबईतील एका कंपनीसोबत मॉडेलिंगचे काम हातात घेतलेले. इतकी काळी कुट्ट असतांना मॉडलिंग करायची हाऊस ठेवू नये असे तिला तिच्या रंगावरून 99 टक्के मंडळी हिणवायची. पण तिने काही हार मानली नाही. तिने मॉडलिंग साठी आवश्यक सगळे बारकावे आत्मसात केले. आपल्या शरीरयष्टीवर मेहनत घेतली. मिळणाऱ्या नकारांना हसत सामोरे गेली. ताण आला की ललितच्या मिठीत शिरून मनभर रडून घ्यायची किंवा काही काळ एकट्यात बसून आणखी काय करता येईल याबाबत चिंतन करायची. अखेर तिच्या पदरी यश पडले आणि आता ती देश-विदेशातील मॉडेलिंग एजन्सी सोबत काम करू लागली. ललितने सर्वांना मिशा बद्दल माहिती पुरवली.

पण रात्रीचे आठ वाजायला आले तरीही आपल्या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी, पिहू अजून तिथे पोहोचली नाही. अनिता काळजीत पडली. एका कोपऱ्यात उभ्या तेजसला पाहून तिचा जीव धडधड करू लागला.

क्रमश :

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

धन्यवाद.
0

🎭 Series Post

View all