दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 31
पिहूच्या पोटात जोरात कळ उठली. तिला अवेळी पाळीचा स्त्राव होऊ लागला. डॉक्टरने तिला भरती करून सलाईनमध्ये औषधं दिली तेव्हा तिला जरा बरे वाटू लागले. अनिता दवाखान्यातून बाहेर जात होती तर तेजस दवाखान्याच्या आत येत होता. दोघांनी एकमेकांना बघितले तसे दोघेही जवळ येऊन बोलू लागले.
" कशी आहे पिहुची तब्येत? " तेजसने अनिताला विचारले.
" बरी आहे पण जास्त काळ राहणार नाही. " अनिता उत्तरली, " तिला तुझ्या सोबतीची खूप गरज आहे. तिचं हे नेहमीच पोट दुखणं ना आता फक्त तूच बरं करू शकतोस."
" हो अनिता मी आहेच. पण तू इतकी डिस्टर्ब का दिसत आहेस? काही मोठा प्रॉब्लेम आहे का? " तेजसने तिला परत प्रश्न केला.
" नाही रे इतकं गंभीर काही नाही. मुलाची परीक्षा सुरू आहे ना घरून सारखा फोन येतोय कधी येतेस. बरं झालं तू आलास. नाहीतर पिऊला असे एकटे सोडून जाताना फार वाईट वाटत होते. " अनिताला पिहूचा कितीही राग आला तरीही ती आपल्या मैत्रिणीची चुगली कधीच करणार नव्हती.
" सॉरी यार मला वेळ झाला. मी लवकर तुझा फोन उचलला नाही. आपल्याच टेन्शनमध्ये काय काय विचार करत बसलो मी आणि पिऊ इथे दवाखान्यात. " तेजसने तिची माफी मागितली.
" मित्र-मैत्रिणींमध्ये चालतेच हे. चल आत जा तु. मी ही निघते." अनिता त्याला बाय करत निघून गेली.
नचिकेत सकाळी आठ वाजेपर्यंत पिहू जवळच थांबला. नंतर त्यालाही ऑफिसला जाणे खूप गरजेचे होते म्हणून त्याने अनिताला फोन करून सर्व हकीकत सांगितली. तशी ती धावपळ करत पिहूजवळ आली. पिहूला दवाखान्यात भरती करतांना तिच्या मोबाईलकडे कोणाचे लक्ष गेले नाही. त्याची बॅटरी संपून तो कधी स्विच ऑफ झाला तिलाही समजले नाही. अनिताने तेजस बद्दल सांगताच पिहूला वाईट वाटले. त्याच्याशी बोलून त्याची माफी मागण्यासाठी तिच्या पर्स मधला मोबाईल काढला तेव्हा तो स्वीच ऑफ झाल्याचे लक्षात आले. पुढे त्या दोघींमधील विषय कुठल्या कुठे गेला आणि संभाषणाचे रूपांतर वादात झाले.
"पिहू, कशी आहेस तु?" तेजसने पिहूला विचारले.
"मी अगदी छान आहे. सॉरी तुझी पार्टी चुकवली मी." पिहू त्याला म्हणाली.
" काहीही काय वेडाबाई. अशा कितीतरी पार्ट्या पुढील आयुष्यात होतच राहतील. " तेजस तिच्या डोक्यावर गंमतच मारून तिचा गाल पकडून तिला म्हणाला.
"नक्कीच." पिहुनेही होकारार्थी मान हलवली.
" पिहू मला बऱ्याच दिवसांपासून तुला काहीतरी सांगायचे होते. " तेजस गंभीर होऊन तिला म्हणाला. पिहूला वाटले त्यालाही ब्रेकअप करायचे आहे. चला बरेच होईल. तसा तो म्हणाला,
" मला आयुष्यभर तुझ्या सोबत राहुन तुझे नखरे उचलायचे आहेत. माझ्याशी लग्न करशील? " त्याने पिहू साठी जपून ठेवलेली रिंग हातावर ठेवून हात तिच्या पुढे केला. पिहू एकटक त्याच्या हाताकडे पाहू लागली.
" अगं पाहतच राहशील की घेशील ती रिंग? " पिहूला तपासायला आलेली डॉक्टर तिला म्हणाली, " तुला माहित आहे ना सध्या तुला जोडीदाराची किती गरज आहे. "
"डॉक्टर, काय झालं आहे पिहूला?" तेजसने चिंतातूर आवाजात डॉक्टरला विचारले, " काही मोठा प्रॉब्लेम आहे का? "
" इतकाही काही मोठा इशू नाही. तिने फक्त स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे. तिला एका चांगल्या रिलेशनशिपची गरज आहे. तिला तिच्या आयुष्यात तुमच्यासारख्या एका चांगल्या माणसाची गरज आहे. जो तिला सांभाळू शकेल. " डॉक्टर पिहूचा हात पकडून तिला तपासु लागली.
"मी आहेच तिच्यासोबत नेहमी. आणखी काही असेल तर तेही तुम्ही मला सांगू शकता." तेजस डॉक्टरला म्हणाला.
" लवकरात लवकर लग्न करून बाळाला जन्म द्या. पेहूच्या 99 टक्के समस्या सुटतील. " डॉक्टर उत्तरली.
" मला काही कळत नाही डॉक्टर. माझ्या मानसिक शारीरिक समस्यांचे समाधान लग्न किंवा बाळ कसं असू शकतं. ठीक आहे लग्न एक वेळ होऊन जाईल पण बाळ अरे त्याला सांभाळता सांभाळता उलट बाईच्या तन-मन धनाची अगदी वाट लागून जाते. माझ्याकडून ते होणार नाही. " पिहू गंभीरपणे बोलली.
" पिहू तुझी ही विचारसरणी योग्य नाही." डॉक्टर तिला म्हणाली.
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा