Login

DINK भाग 34

रिद्धी खेळत असलेल्या खेळाला ओळखू शकेल का पिहू?
दीर्घकथा लेखन स्पर्धा

DINK भाग 34

काही वेळ दोघेही शांत बसल्या मग रिद्धीच पुन्हा बोलू लागली,

" मला माहित आहे त्यालाही दिवसभर कामाचा ताण असेल. होऊ शकतं ऑफिसमध्ये त्याचं कोणाशी भांडण झालं असेल किंवा ठरलेले टार्गेट पूर्ण झालं नसेल म्हणून बॉस रागवला असेल. पण हे सगळं तर आयुष्याचा एक भाग आहे. हे चालतच राहणार हे त्याने समजून घ्यायला नको का? आणि नाहीच तितकी सहनशक्ती तर बाळ कशाला हवे होते त्याला फक्त जगाला दाखवायला की मी पुरुष आहे, माझ्या शुक्राणूत बाळाला जन्म द्यायची शक्ती आहे. "

" मी आता काय बोलू यावर. आपण स्त्रिया स्वातंत्र्याच्या शोधात घराबाहेर पडलो पण झालं वेगळच. आपणच आपल्या भोवती पारतंत्र्याचे जाळे आणखी घट्ट विणले. आधी फक्त घर मूल चूल इतकंच होतं आता घर मूल चूल व ही नोकरी सगळं आलं आपल्यावर. मुलांना नोकरदार बायको हवी आहे, त्यांच्या घरच्यांना कमावणारी सून हवी आहे. पण कोणालाही तिलाही थोडा आराम देण्याची, तिथेही दोन शब्द ऐकून घेण्याची इच्छा नाही आहे." पिहू तिला म्हणाली.

"पिहू, खरं सांगू कधी कधी मला तुझा खूप हेवा वाटतो. तू लग्न ना करून अगदी योग्य निर्णय घेतला आहेस. कधीही या फंदात पडूही नकोस." रिद्धी तिला म्हणाली.

पिहूने अंगठी घातलेल्या हातावर दुसरा हात ठेवत होकारार्थी मान हलवली.

" माझी एक मदत करशील? " रिद्धीने तिला विचारले.

" हो नक्की बोल काय करायचे आहे? " पिहूने हसून विचारले.

" मी आता आणखी त्या घरात नाही राहू शकत. मला एक फ्लॅट शोधायला मदत करशील? मी बाळाला घेऊन तिथे शिफ्ट होईल. " रिद्धी उत्तरली.

" अग मग आपल्या कंपनीच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट हो ना." पिहू तिला म्हणाली.

" इतक्या लवकर मिळेल का? " रिद्धीचा प्रश्न.

" का नाही मिळणार? आता जनरल मॅनेजर तुझी मैत्रीणच आहे." पिहू बोलण्याच्या भरात बोलून गेली. रिद्धीचा चेहरा पडला. पण तिने लगेच चेहऱ्यावरील हावभाव बदलले.

" ठीक आहे तू लवकरात लवकर तरतूद कर मग तशी. बरं होईल आपण आधी सारखे मिळून मिसळून राहु. मला खूप आधार होईल तुझा." रिद्धी तिला म्हणाली.

" कशाचा आधार. मी नाही हा तुझ्या बाळाला सांभाळणार. " पिहू तिला म्हणाली.

" अशी तशी नाही सांभाळणार तुझ्या घरी आणून ठेवेल मी. " रिद्धी खोटा खोटा आव आणून तिला म्हणाली तशी पिहू हसली.

"चला चला, बरीच काम पडली आहेत ती करू आता." पिहू तिला म्हणाली.

"हो हो मॅडम, कळलं आम्हाला आता तुम्ही आमच्या बॉस आहात." रिद्धी गंमतच टोमणा मारून पिहू च्या केबिन मधून बाहेर पडली. मनाशी काहीतरी ठरवून ती तिच्या कामाला लागली.

दिवस जाऊ लागले. रिद्धी पिहूच्या शेजारी राहायला आली. त्या दोघी परत आधी सारख्या एकमेकींसोबत दिसू लागल्या. तिला होईल ती सर्व मदत करू लागली आणि इथेच ती चुकली. परिणामी पिहू जास्त दिवस तेजस बद्दल रिद्धी पासून लपवून ठेऊ शकली नाही. तेजस सारखा प्रसिद्ध वकील, गर्भ श्रीमंत, त्यात दिसायला अगदी उठवदार उंच पुरे व्यक्तीमत्व पिहू सोबत लग्न करायचे म्हणतो हे ऐकून रिद्धीच्या आत कुठेतरी पिहू विषयी परत जळफळाट होऊ लागला. हिलाच आयुष्यात सगळं का मिळत आहे? असा प्रश्न रात्र दिवस तिच्या डोक्यात घोळत असे.

ती पिहूला जास्तीत जास्त ऑफिस कामात व्यस्त कशी राहणार किंवा तेजस सोबत तिला वेळ घालवता येणार नाही यावर भर देऊ लागली. तिचे कामातील बारकावे शिकून तिच्या विरुद्ध वापरू लागली. डायरेक्टर मिटिंगमध्ये एका नवीन प्रोजेक्टची घोषणा झाली आणि पिहूच्या पायाला परत भिंगरी लागली. तेजससोबत बाहेर जाणे बंद झालेच झाले त्याच्या कॉल्सला उत्तर देणेही कमी झाले. एक दिवस तर तेजस पिहूवर चांगलाच रागावला. त्यांनी सोबत लंच करायचे ठरवले होते. पिहूने ती एक दोन घंटे ऑफिस मध्ये नसणार तेव्हा सांभाळून घे असे सकाळीच रिद्धीला सांगितलेही. मात्र रिद्धीने तिच्या मुलाला पाहणाऱ्या बाईला बरोबर बारा वाजता बाळाला ताप आला असा फोन करायला सांगितले आणि फोन येताच ती सॉरी सॉरी म्हणत घरी निघून गेली. परिणामी पिहू ऑफिसमध्येच अडकली. रिद्धीला दिलेले पि पि टी प्रेझेंटेशन ती बनवू लागली.

क्रमश :

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all