दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 35
"अरे रिद्धीच्या मुलाला ताप आला होता म्हणून तिला जावे लागले." रात्री फोन करून पिहू तेजसला समजावण्याचा प्रयत्न करु लागली.
"आणि नेहमी सारखं तु चांगली मैत्रीण बनून तिच्या वाटेचे काम केले. ठीक आहे बरं केलं पण तुझ्या वैयक्तिक आयुष्याचे काय? आपल्या नात्याचे काय? किती दिवसांनी आज तु भेटायचं हो म्हणालीस पण आजही मी एकटाच दोन तास तिथे कॉफी वर कॉफी पीत बसलो होतो." तेजसने त्याचे सर्व फ्रस्ट्रेशन तिच्यावर काढले, "पिहू तुझ्या नजरेत माझे काही महत्व आहे की नाही?"
"अर्थातच आहे म्हणून सध्या काम सोडून मी तुझ्याशी बोलत आहे ना." पिहू त्याच्यावर संतापली.
"उपकार केलेत आपण माझ्यावर. खूप खूप आभारी आहे मी आपला. पण असं नातं मला नको आहे ज्यात समोरच्याला मी सोडून इतर सर्व गोष्टी महत्वाच्या वाटतात." तेजस तर आधीच संतापलेला होता.
"नात्याची सुरवात तूच केली होतीस. मी नव्हते आले तुझ्याजवळ अंगठी घेऊन, तू आला होतास माझ्याजवळ." पिहूची सहन शक्ती संपुष्टात आली. ती तावा तावात त्याला बोलू लागली, " त्या वेळीच तुला माझ्या स्वभावाची चांगली कल्पना असायला हवी होती. मी इतर मुलींसारखी तासन तास फोनवर गुलूगुलू बोलू शकत नाही. दिवस-रात्र तुझ्यासोबत चिपकून राहू शकत नाही. माझं कॅरेक्टरच तसं नाही ना कधी होऊ शकत. समजलं."
"चूक झाली माझ्या कडून खूप मोठी. थँक्यू सो मच. धन्यवाद. कर तुझ्या आयुष्याचं वाटोळं. पण एक लक्षात ठेव लवकरच तुझी ती मैत्रीण तुला चांगला डंख मारणार आहे. तेव्हा नको येशील रडत बोंबलत माझ्या जवळ." तेजस तिला म्हणाला.
" वा, आता बोलायला काही उरलं नाही तर माझ्या मैत्रिणीच्या विरुद्ध मला भडकवत आहेस तू. बरं झालं आपली रिलेशनशिप जास्त पुढे जाण्याआधी खरा रंग दाखवल्या बद्दल. " पिहूने कॉल कट करून मोबाईल सोफ्यावर फेकून दिला.
तिने परत स्वतःला ऑफिसच्या नवीन प्रोजेक्ट, कनफानमेंट सेंटर फॉर न्यू मॉम मध्ये झोकून दिले. भारतात हा पहिलाच प्रयोग असल्याने तो यशस्वी होण्यासाठी त्यांना दोन दोन मिनिटांच्या चार जाहिराती तयार करायच्या होत्या तसेच मुंबई, पुणे व नाशिक या शहरातील सर्व मोठ्या मॉल्समध्ये जाऊन या सेंटरची पब्लिसिटी करण्यासाठी कार्यक्रमही घेऊन या कनफानमेंट सेंटर फॉर न्यू मॉमचे महत्वही पटवून द्यायचे होते. पिहू यावर मन लावून काम करू लागली पण तेजस सोबत झालेला वाद अजूनही तिच्या मनातून जाईना. तिने कधीच विचार केला नव्हता की त्यांचे नाते अशा प्रकारे संपुष्टात येईल. किती लक्ष ठेवत होता तो तिचे. ती मात्र त्याच्याशी नीट बोलुही शकली नाही याचा तिला राहून राहून पश्चाताप होऊ लागला.
कनफानमेंट सेंटर फॉर न्यू मॉमचे पहिलेच कॅम्पेन मुंबईमधील आलिशान मॉलमध्ये आयोजित करण्यात आले. एका मोठ्या, चांगले नावाजलेल्या स्त्रीरोगतज्ञालाही तिथे बोलायला आमंत्रित केले गेले. ट्राफिक मुळे डॉक्टरला यायला आणखी वेळ होता म्हणून पिहू माईक हातात घेऊन पोस्ट पार्टम डिप्रेशन काय असतं? त्याचा स्त्रियांच्याच नाही तर संपूर्ण कुटुंबावर कशाप्रकारे वाईट परिणाम होतो ते सांगू लागली.
"वा! आता एक मुलं नको असलेली बाई आम्हाला मुलाला जन्म दिल्यावर होणाऱ्या त्रासा बद्दल समजावून सांगणार?" प्रेक्षकांमधून एक स्त्री ओरडली.
"हो ना मॅडम तर एका लहान मुलीला स्वतःची जागाही थोडावेळ देऊ शकल्या नाहीत. त्यांना काय कळतील आमच्या वेदना." दुसरी एक बाई बोलली.
"कस्तुरीकडे मुलं असलेल्या स्त्री एम्प्लॉईजची काही कमी आहे का?" एक माणूस ओरडला, "कमीत कमी या कॅम्पेनसाठी तरी एका आईला पाठवावे."
"मॅम, सर शांत व्हा ते माझे वैयक्तिक आयुष्य आहे आणि हे माझे काम आहे. दोन्हीही वेगवेगळे आहे." पिहूने स्वतःवर ताबा ठेऊन त्यांच्याशी वार्तालाप करायचा प्रयत्न केला.
"हो पण सध्या तुम्ही एका अशा गोष्टी बद्दल बोलत आहात ज्याचा तुम्हाला अनुभव नाही आणि तुमची विचार सरणी सांगते की तुम्ही आयुष्यात कधी तो मातृत्वाचा अनुभव कधी घेणारही नाही मग आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून त्या कन्फाईनमेंट सेंटर मध्ये का जावे?" लहान बाळाला मांडीवर घेऊन बसलेली एक तरुणी ओरडली.
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा