दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 36
पिहू काही बोलणार त्या आधी रिद्धीने स्टेजवर येऊन तिचा हात दाबून तिला शांत राहण्याचा इशारा केला व ती बोलू लागली,
"तुम्ही अगदी बरोबर बोललात म्हणूनच मी, रिद्धी, एका आठ नऊ महिन्याच्या मुलाची आई इथे आहे. पिहू मॅम फक्त काही शब्द बोलून मलाच आमंत्रित करणार होत्या."
"असे आहे तर आम्हाला काहीच हरकत नाही आहे." तीच पहिल्यांदा मुद्दा उठवलेली स्त्री म्हणाली. रिद्धी आता पिहूच्या समोर येऊन उभी झाली. पिहू साठी तयार केलेले भाष्य तिने रट्टा मारून पाठांतर केले होते. त्यात स्वतःच्या अनुभवाचा तडका मारून ती उपस्थित स्त्रिया व पुरुष सर्वांशी वार्तालाप करू लागली. पिहू पाहतच राहिली. तिला तेजसचे शब्द आठवले. तरी तिने स्वतःला समजावून सांगितले की रिद्धी हे सर्व आपल्या कंपनीचा प्रोजेक्ट पुढे जावा म्हणून करत आहे नक्की मला नीचा दाखवण्यासाठी.
कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला. कन्फाईनमेंट सेंटरसाठी ऑन द स्पॉट बुकिंगही मिळाल्या. परिणामी डायरेक्टर्सनी आणीबाणीची मीटिंग आयोजित करून हा प्रोजेक्ट पूर्णपणे रिद्धीला सोपवून द्यायचा निर्णय घेतला. पिहूला आतल्या आत खूप वाईट वाटू लागले. तिने रात्रंदिवस या प्रोजेक्टवर खूप मेहनत घेतली होती. सध्य स्थितीत उच्च मध्यमवर्गीय आणि वरच्या स्तरावरील गरोदर स्त्रियांचा डाटा काढता काढता तिची दमछाक झाली होती. स्टेजवर काय बोलायचे, प्रत्यक्ष क्लाइंट्स येथील त्यांच्यासोबत काय बोलायचे? पीपीटी प्रेझेंटेशन तयार करण्यापासून ते त्यामधील मॉडेल्सचे शूटिंग वगैरे सगळे तिने खाजगीरित्या बघितले होते. हा जनरल मॅनेजर पदी बसल्यावर तिचा पहिला प्रोजेक्ट तिच्या हातातून काढून घेण्यात आलेला.
" पिहू मला नाही अजिबात आवडलं नाही. तू एकदा मिस्टर अँड मिसेस तुरी सोबत बोलत का नाहीस? " आपल्याला किती वाईट वाटलं असं दाखवत रिद्धी पिऊला म्हणाली.
" त्यांनी आतापर्यंत कधीच असं केलं नाही. यावेळी नक्कीच त्यांनी काही तरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल. तेव्हा असुदे. ऑल द बेस्ट. " पिहू तिला म्हणाली पण पिहूच्या आत प्रश्नांचे वादळ उठले. तिने कधीच विचार केला नव्हता असा दिवस तिला पाहावा लागला. तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. ती कस्तुरीची प्रिन्सेस आहे. ती कस्तुरी राज्य करते. हा तिचा भ्रमाचा भोपळा क्षणात फुटला. पण तिला बरच काही शिकवून गेला. ती तिच्या घरी जाऊन खूप रडली. तिला सर्वात जास्त रडू याचे आले की तिच्या आजोबांचे विचार अजूनही खरेच ठरले. जग कितीही पुढारले तरीही स्त्री त्यांना मुल असलेलीच चांगली दिसते. जे स्त्री लग्न, मुल बाळ आणि पारिवारिक जीवनाला नाकारते तिच्याविषयी नाना प्रकारचे नकारात्मक विचार पसरवण्यात येतात. स्वतःला कसे शांत करावे तिला काही कळत नव्हते. तिच्या आत लागलेली आग तिला गप्प बसू देत नव्हती. तिने खूप दिवसांपासून ठेवलेला वोडका व सोडा काढला. पोट गेलं खड्ड्यात असं स्वतःशीच बोलून तिने मनसोक्त रिचवली. मग मित्र-मैत्रिणींना फोन लावला. काही व्यस्त होते काही मी फोन उचलला तिच्या दोन गोष्टी ऐकल्या, काही ऐकवल्या व तिचे सांत्वन करून फोन ठेवून दिला. तरीही तिला बरे वाटत नव्हते. ती परत रडू लागली. स्वतःलाच विचारू लागली,
"मी कोणाला त्रास देत नाही ना. मग इतरांना माझ्या विचारसरणीचा इतका त्रास का होतो?"
तिचा मोबाईल वाजला. तेजसचा कॉल होता. तिने इतके दिवस ज्या प्रोजेक्टसाठी इतकी मेहनत घेतली त्या प्रोजेक्ट मधून तिला काढून दिल्याचे त्याच्याही कानावर गेले. त्याला फार वाईट वाटले. त्याने लगेच तिला फोन लावला. तिनेही लगेच त्याचा कॉल रिसीव केला. तो काही बोलण्या आधीच ही बोलती झाली,
" खुश तो बहुत होगे तुम आज "
" पिहू हे काय बोलत आहेस तू?" त्याने पिहूला विचारले.
" काय चुकीचे बोलली? माझ्या जखमेवर मीठ चोळायलाच फोन केला आहेस ना तू? जाणून घ्यायला की ज्या प्रोजेक्टसाठी मी तुझ्याकडे दुर्लक्ष केले त्या प्रोजेक्ट मधून मला माशी सारखे बाहेर फेकल्या गेले तेव्हा कशी आहे मी, माझी जिरली की नाही हे जाणून घेण्यासाठी कॉल केला ना तू? " पिहूने त्याला विचारले.
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा