दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 43
निरवला झोपवून अनिता हॉलकडे आली तेव्हा पिहू व अजित, दोघेही आपापल्या लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसले होते. गाजरचा हलवा त्यांच्या पुढ्यात टी टेबलवर ठेऊन तीही सोफ्यावर बसली.
"सॉरी अजित, मी तुझ्यावर सतत फॅमिली वाढवण्याचे प्रेशर देत आल्याबद्दल." अनिता खाली मान घालून अजितला म्हणाली.
"अगं सॉरी कशाला म्हणत आहेस?" अजित तिचा हात पकडून बोलला, "मीही मूर्खच. माझ्या अडचणी माझ्या लाईफ पार्टनर पासून लपवत बसलो. पण मला ना खरंच खूप ताण आला होता. त्यात तुझ्या नजरेत माझी छवी खराब होईल याचीही भिती मला वाटत होती. पण यापुढे असले काहीच होणार नाही असे वचन देतो तुला मी."
"हो, मीही माझे खर्च कमी करते. आपण मिळून या परिस्थिती सोबत दोन दोन हात करू. तु असतांना कशाला हवी दोन मुलं? आणि बाळ पुढेही ठेवता येईल. आपण उद्याच दवाखान्यात जाऊन गर्भपात करून घेऊ." अनिता त्याचा हात घट्ट पकडून त्याच्या डोळ्यात डोळे टाकून बोलली. तसं त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं.
"मला माफ कर अनिता, माझ्या मनात खूप मोठा मूर्खपणा करायचा विचार आला होता." दोघांचे डोळे पाणावले.
"लोकं म्हणतात तेच खरं. नवरा बायकोच्या भांडणात शहाण्याने पडुच नये." पिहूने लॅपटॉपमध्ये पाहतच अनिता व अजितला टोमणा मारला. तसे ते दोघं रडता रडता हसू लागले.
"हलवा खा तु. बदमाश कुठली." अनिता तिला लटक्या रागात म्हणाली.
"थंडा झालाय गरम करून आन." पिहू तिला म्हणाली.
"किचन त्या दिशेला आहे. स्वतः जाऊन गरम करून माझ्यासाठीही घेऊन ये." अनिता वाकडे तोंड करून तिला बोलली.
"तुम्ही दोघीही बसा. मी घेऊन येतो गरम गरम हलवा आपल्या तिघांसाठी." अजित हलव्याच्या प्लेट्स घेऊन स्वयंपाक खोलीत गेला.
"थँक्यू. तु आज आली नसतीस तर माझ्या डोळयांवरचे झापड कधीच बाजूला झाले नसते." अनिताने पिहूला मिठी मारली.
गरम गरम हलवा खाऊन तिघांनी जेवण केले. पिहू गेस्ट रुममध्ये झोपली व ती दोघं त्यांच्या खोलीत. आज पिहूला काही केल्या झोप येईना. रात्रभर ती या कडेवरून त्या कडेवर होत होती. राहून राहून तिला तिचे बालपण आठवत होते. संतापलेले आजोबा, शांतिचा पुतळा असलेले बाबा आणि त्रस्त आई. या उलट अनिताच्या घरी, तिचे आई बाबा दोघेही नोकरदार, एकमेकांना कामात हातभार लावणारे, एकमेकांच्या अडचणी समजून घेणारे, बसून चर्चा करणारे. अनिताच्या पाठीवर दुसऱ्या मुलासाठी खूप प्रयत्न केला त्यांनी. पण त्याला काही फळ आलं नाही. जवळ जवळ सर्वच मुलांना लहान किंवा मोठे भाऊ बहीण असल्याने अनिताला कुठेतरी एकटेपणा वाटायचा. तिच्या हृदयातील ती दरी भरून काढण्यासाठी तिने तीन मुलं नक्कीच करणार असे पक्के केलेले. तिच्या सारखी समजदार आई प्रत्येक मुलाला मिळायला हवी. पिहूच्या मनात आलं. एखादी दुसरी असती अनिताच्या जागी, तिने अजित व पिहूचे संभाषण ऐकताच घर डोक्यावर घेतले असते. मात्र अनिताने आधी मुलाला झोपवले. मग शांततेत ती अजितसोबत बोलली. त्याला समजून घेतले. काहीतरी मनोमन ठरवून पहाटे पहाटे पिहू झोपली.
"हो, अकरा वाजेपर्यंत पोहोचतो आम्ही." पिहूच्या कानावर अनिताचे शब्द पडले. ती पिहूला उठवायला गेस्ट रूममध्ये आली असतांना तिला क्लिनिक मधून ती किती वाजता येईल याबाबत कॉल आला होता.
"सुप्रभात." पिहू उठलेली दिसताच अनिता तिला म्हणाली.
" सुप्रभात कुठे जाण्याची तयारी आहे सकाळी सकाळी? " पिहूने तिला विचारले.
" कुठे म्हणजे काय कालच ठरलं ना गर्भपात करणार आहे मी. त्यासाठीच डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आहे अकरा वाजताची. " अनिता उत्तरली, " चल माझ्या देखत चहा नाश्ता करून घे. मग मी निवांत होईल. माहित नाही गर्भपात केल्यावर किती वेळ लागेल बरं व्हायला. " अनिता उसासा घेऊन म्हणाली.
" मला वाटतं तू गर्भपात नको करायला अनिता. " पिहू तिला बोलली. तसा अनिताला आश्चर्याचा धक्का बसला.
" तुझी तब्येत ठीक आहे ना? " अनिताने पिहूच्या डोक्याला हात लावून विचारले, " आता कालपर्यंत तू म्हणत होतीस की इतके लेकरं कशाला हवे आणि आता म्हणतेस गर्भपात नको करू. तुझेही मला काही कळत नाही. "
" अजित चांगला पाहतो ना तुला व मुलाला?" पिहूचा प्रश्न.
" अर्थातच ही काही विचारण्यासारखी गोष्ट आहे का? माझ्यापेक्षा जास्त त्याने वागवले आहे निरवला. "
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा