Login

DINK भाग 48

पिहू एका वेगळ्या विचार सरणीची स्त्री. कुठे नेईल तिला तिची ही स्वछंदी वाटचाल?
दीर्घकथा लेखन स्पर्धा

DINK भाग 48

" अरे हो थोडे फार थँक्यू तुझ्या त्या मैत्रिणीला, काय नाव तिचे... " आई आठवू लागली.

"पिहू." मिशा बोलली.

" हा त्या पिहूलाही थँक्यू म्हण. तिने माझे डोळे उघडले. माझ्यासाठी काय गरजेचं आहे, कोणाचे दिसणं महत्त्वाचं नाही तर माझ्या मुलाचं एक कुटुंब असण्याचं स्वप्न माझ्यासाठी गरजेचं आहे, याची जाणीव तिने मला करून दिली. खूपच वेगळी मुलगी वाटली मला ती. म्हणजे बघ ना तिच्या मनात असते तर तिने सहजच मला भूल घातली असती. मंदिरात मिशाच्या बाजूला उभी राहून आरती तिने गायली होती, तिचा आवाज ऐकताच मला वाटलं हीच ती मुलगी जिच्या मी शोधात आहे माझ्या लाडक्या मुलासाठी. पण मिशा काळी असल्याने मी कचकली. मात्र मला गाठून तिने तुमच्या दोघांचे प्रेम किती अतुट आहे. मात्र मला दुखी करून तुम्हाला तुमच्या दोघांचा संसार थाटायचा नाही. माझे मत परिवर्तन होण्याची वाट तुम्ही पाहत आहात. त्यासाठी ती तुमची साथ देत आहे. पण मला धोका देऊन तिला तिचा फायदा करून घ्यायचा नाही म्हणून तिने मला सर्व खरं खरं सांगितले आणि आता पुढील निर्णय तुमच्यावर. मुलगा की त्वचेचा रंग निवड तुमची, आनंद तुमचा. असं बोलून निघून गेली. परत कधी भेटलीही नाही." आईच्या तोंडून पिहू बद्दल ऐकून ललितला वाटले सांगून द्यावे आईला की ती तुझी होणारी मोठी सून आहे पण पिहूचा स्वभाव लक्षात घेऊन त्याने कसलीही घाई न करणेच योग्य समजले.

" हो खूप छान मैत्रीण आहे ती आमची. " पिहू बद्दल आईला काहीही न सांगण्याचा इशारा ललितने मिशाला केला. तिनेही होकारार्थी मान हलवली.

ललित पिहूला भेटायला तिच्या ऑफिसमध्ये म्हणजे तिच्या आपुलकी द मदर अँड बेबी केअर सेंटरच्या कार्यालयात गेला.

" वा छान सेटअप तयार केला आहेस तू. " तो आजूबाजूची तयारी पाहून म्हणाला.

" तुला आवडले ना म्हणजे मग इतरांनाही नक्कीच आवडेल." पिहू तिच्या नेहमीच्या अंदाजात बोलली.

"पिहू थँक्यू. तुला माहित नाही, आज माझ्या डोक्यावरचे मोठे ओझे कमी झाले. आई व मिशाला सोबत पाहून इतका आनंद झाला ना मला. आता फक्त तु आणि दादा..." पिहूने अशा अंदाजात त्याच्याकडे बघितले की तो बोलता बोलता थांबला.

"हे अग्रीमेंट सही कर." पिहूने एका अग्रीमेंटवर सही करून ते त्याच्या पुढे सरकवले.

"हे काय आहे?" त्याने पिहूला विचारलं.

"अग्रीमेंट, तुझ्या कडून घेतलेलं अर्ध कर्ज तु माफ केल्याचे." पिहू उत्तरली.

"तु कठीण आहेस समजायला." ललित सही करत बोलला.

"अशीच आहे मी. पैशांचा व्यवहार पूर्णपने कागदोपत्री स्पष्ट असलेलं बरं. म्हणजे मैत्री मैत्रीच्या जागी आणि पैसा पैशाच्या जागी." पिहू त्याला म्हणाली.

"छान, उदघाटन कधी करणार आहेस मग?" ललितने विचारलं.

"हो काही अर्ज आले आहेत. त्यांचे बाळंतपण होताच करायचे आहे. म्हणजे येणाऱ्या पाच सहा दिवसात तुला कधीही निमंत्रण येऊ शकते." पिहू त्याला म्हणाली, " चल आता तुही लवकर आपली फॅमिली वाढवायची योजना कर आणि हो बायको व मुलाला अकरा दिवस आपुलकी कन्फाईनमेंट सेंटरला ठेवायचे हा."

"बापरे आदेश बघा मॅडमचा. माझ्यापेक्षा मोठी आहेस तू. तू कर ना बाळ आधी." ललित तिला म्हणाला.

" काकूला भेटावे लागणार वाटतं. " पिहूने गंभीर चेहरा केला.

" तशी काही गरज नाही. आम्ही लग्नाच्या सहा महिन्यातच बाळाचे प्लॅनिंग करणार आहोत. तसाच खूप उशीर झाला आहे. " ललित बोलला. पिहूच्या चेहऱ्यावर सुहास्य पसरले,
"छान." पिहू गेली.

"काय मैत्रीण आहे माझी. स्वतः मुलाला जन्म द्यायचा नाही आहे. व्यवसाय मात्र त्या मुलांवर आधारितच करायचा आहे. देव तुला तुझ्या वाट्याचा आनंदही लवकरात लवकर देवो." ललित स्वतःशीच बोलला.

कोथरूडला शांत भागात पिहूने एका तिन मजली घरात आपुलकी कन्फाईनमेंट सेंटर सुरु केले. उदघाटन करायला तिने ललितच्या आईला व स्वतःच्या आजीला बोलावले. उदघाटन कार्यक्रम मोजक्या लोकात पण अगदी जोमात पार पडला.

क्रमश :

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all