दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 49
"शेवटी तू तुझं खरं केलंच." उद्घाटन कार्यक्रमाला आलेले पिहूचे आजोबा तिला म्हणाले, " कदाचित आम्ही चुकलो तुझी परख करण्यात. "
" खरं सांगू तुमची ही कबुली ऐकायला माझे कान आसूसले होते. धन्यवाद आजोबा आपला अहंकार बाजूला ठेउन मला समजून घ्यायचा प्रयत्न केल्याबद्दल. " पिहु त्यांना म्हणाली.
"हो, पण याचा अर्थ हा नाही की तुझ्या अविवाहित राहण्याला आमचे समर्थन आहे. अजूनही वेळ आहे बघ आजूबाजूला किती छान छान मुलं आहेत. तुझ्या हाताला यश आहे. त्यासाठी कोणाला कोणी होकार नक्कीच देईल. " आजी बोलली.
" मी यावर काहीच बोलणार नाही. तुम्हाला काय काय खायचे प्यायचे आहे ते खा आणि घरी जा. " इतकं बोलून तिने आईला त्यांच्याकडे लक्ष देण्याचे इशारा केला.
"जाऊ द्या तिला. तुम्हाला माहित आहे ना ती कोणाचे ऐकत नाही. सांगा तुमच्यासाठी काय आणू?" पिहूची आई पाठमोऱ्या पिहूला पाहत म्हणाली. त्यांच्या डोळ्यात आपली मुलगी तिच्या मनासारखं जगत आहे याचे समाधान दिसून आले.
अनिता व जिजा ची खरंच खूप मोठी मदत झाली पिहुला. तिनेही दोघींना कन्फाइनमेंट सेंटरची पाच पाच पर्सेंट भागीदारी दिली. तसं हे नवीन बाळंत आईला व चिमुकल्या पिलाला सांभाळण्याचे काम दिसत होतं तितकं सोपं नव्हतं. त्यांना चोवीस तासासाठी एक चांगली ट्रेन झालेली नर्स व दिवसातून सकाळी एक तास, संध्याकाळी एक तास तिथे थांबणार, तसेच काही आणीबाणीची वेळ आल्यास धावून येऊ शकेल अशी एक स्त्री रोग तज्ञ, एक बालक रोग तज्ञ यांची नियुक्ती करावी लागली. कितीही झाले तरी आपल्या देशात अजूनही पारंपारिक पद्धतीनेच नवीन मातेला पाहिले जाते. तिच्यावर खाण्या पिण्यावर, उठण्या बसण्यावर असंख्य निर्बंध लावले जातात. पिहूचा प्रयत्न होता की या कन्फाईनमेंट सेंटरमध्ये असे काही व्हायला नको. पण नवीन मातेची देखभाल करायला व बाळाला पाहायला नियुक्त केलेल्या काही आयांमध्ये हे गुण ठासून ठासून भरले होते. त्यांना कितीही समजावून सांगितले तरीही त्या काहीच समजून घ्यायला तयार नव्हत्या ज्यामुळे कन्फाईनमेंट सेंटर मध्येही बाळंत बाईला घरच्यासारखाच अनुभव येऊ लागला व त्या त्रस्त होऊन पिहूला तक्रार करू लागल्या.
"मॅम इथेही घरच्या सारखेच हे नको खाऊ, अशी नको बसू, बाळ कुपोषितच आहे, तुला दूधच येत नाही, तुझ्यात आई होण्याचे गुणच नाहीत अशा गोष्टी ऐकाव्या लागतील तर आमच्या सासूबाई सोबत घरी राहण्यात आणि इथे राहण्यात काय फरक बरं? उलट आम्हाला पश्चाताप होत राहणार की आम्ही इतकी फि भरून मिळवले काय? तीच घिसिपीटी वागणुक व संताप." आपुलकी मदर अँड बेबी कनफाइनमेन्ट सेंटर मधील पाच नवं मातांच्या प्रतिनिधी स्वरूपात वैदेही पिहूला म्हणाली.
"तुम्ही निश्चित रहा. परत तुम्हाला अशी वागणूक मिळणार नाही. याची हमी मी तुम्हाला देते." पिहूने त्यांना आश्वासन दिले.
"आणि तसे न झाल्यास?" रितूने पुढे होऊन तावातावात विचारलं.
"तुमचा आतापर्यंतचा खर्च काढून उरलेले पैसे परत करेल. ठीक आहे." पिहू उत्तरली.
"अगं पिहू असं प्रत्येकाला पैसे परत देशील तर हे कनफाइनमेन्ट सेंटर बंद होईल लवकरच." ते सर्व जाताच अनिता पिहूला म्हणाली, "तसेही आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिले आहे की एकदा भरलेली रक्कम परत होणार नाही."
"हो अनिता पण सुरवातीला आपली निगेटिव्ह जाहिरात होऊ नये म्हणून आपल्याला असं बोलावं लागेल. त्यात या मुलीही त्यांच्याजागी योग्य आहेत." पिहूने बेल वाजवून चपराशीला बोलावले.
"मॅम." चपराशी आत आली.
"सर्व आया व नर्सला बोलाव." पिहूने सांगितले.
"अनिता शांत बसून फक्त ऐक हं मी काय बोलते ते. काही खटकल्यास नंतर सांग मला तसं." पिहूने आधीच अनिताला हुशार केलं. दोन मध्यम वयीन आया सुमन व निलम आणि दोन तरुण नर्स उमा व राधा आत आल्या.
"उमा, राधा हे मी काय ऐकत आहे? तुम्ही मुलींना डॉमिनेट करता. त्यांच्या मुलांना नावं ठेवता. त्यांना सतत टोकत राहता." पिहूने आधी दोन्हीही तरुण नर्सला फैलावर घेतले, "खरंतर तुमच्यातील अनुभवाची कमी पाहून मी तुम्हाला घ्यायलाच नको होते पण तुम्ही मन लावून कामं करणार बोलल्यामुळे मीही तुम्हाला संधी दिली. पण आता मला खूप पश्चाताप होतोय त्याचा."
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा