Login

DINK भाग 50

पिहूची विचारसरणी कुठे नेईल तिला?
दीर्घकथा लेखन स्पर्धा

DINK भाग 50

"मॅम, मी असं काहीच बोललो नाही. हे सर्व तर या काकू बोलायच्या." नर्स राधा सुमन कडे बोट दाखवून बोलली.

" हो मॅडम तरी मी या सुमनला म्हणत होते की आपलं असं बोलणं बरोबर नाही. " आया नीलमनेही राधाच्या बोलण्याला दुजोरा दिला.

" खूपच नाजूक आहेत या आताच्या मुली. गंमतीत इतकच बोलली की बाळाला केसं नाहीत, लग्नाला मुलगी मिळणार नाही. " सुमन वाकडे तोंड करत म्हणाली.

"अच्छा त्या श्रावणीच्या मुलीला रंग किती काळा आहे रोज साय बेसन लावलं तरीही उजळणार की नाही माहित नाही, हे बोललीस ना." निलम सुमनला बोलली.

" त्यात खोटं काय बोलली? खरंच किती काळी आहे ती मुलगी. " सुमन स्वतःचंच खरं करायला लागली.

" कोणत्या काळात जगत आहेस तू? बरं असेल कोणाचे लेकरू काळे. तू कोण हे लावा ते लावा सांगणारी? तुला काय करायचे कोणाचे मूल काळे आहे की गोरे आहे? तू तुझ्या कामावर लक्ष दे ना. ते त्यांचे पाहून घेतील. आधीच त्यांच्या डोक्याला कितीतरी ताण त्यात आपण मुलांवर टिपण्या करून आणखीन द्यायचा." अनिता न राहावून बोलली. पिहूनेही तिला बोलू दिले.

"अच्छा, दुधा बद्दल कोण बोललं?" पिहूचा प्रश्न.

राधा व निलम दोघींनीही सुमन कडे बोट दाखवलं.

"सुमन काय हे?" पिहूने स्वतःच्या रागावर ताबा ठेवत तिला विचारलं.

" ते सहाजिकच आहे दूध पाजलं नाही बाळाला तर कॅन्सर होतोच म्हणते. " सुमन ठामपणे उत्तरली.

" तू डॉक्टर आहेस का? की कोणी खूप मोठी व्यक्ती आहेस, जिने बराच अभ्यास केला आहे या सगळ्या गोष्टींवर? " पिहू संतापली.

" नाही तसं काही नाही पण आमच्या आई आजीच्या गोष्टी ऐकत आले आहे. आमच्या मागील पाच पिढ्यातील बायका सुईनीचं काम करत आल्या आहेत. " सुमन उत्तरली.

" सुमनताई तो काळ वेगळा होता. तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत जमीन आसमानचा फरक आहे. आता तेव्हा सारख्या धूसफुशीने वागणं चालत नाही. तुझी मुलगी तरी तुम्ही म्हणता तशी वागते का? " पिहूने विचारलं.

"नाही, तिला माझं काहीच पटत नाही. आताच्या पोरींना स्वतःच्या आईचेही ऐकून घ्यायला होत नाही मॅडम." सुमन त्राग्याने बोलली.

" मग तेच म्हणते मी. तुम्हाला कळायला हवे जिथे आपल्या स्वतःच्या मुलीलाच आपले म्हणणे पटत नाही तिथे या नोकरदार मुलीला तुमचे सल्ले कसे पडणार आहे? " पिहू बोलली. क्षणभर शांतता पसरली. मग पिऊनच बोलायला सुरुवात केली,

"हे पाहा सुमन ताई तुमचा अनुभव पाहताच तुम्हाला मी इथे नोकरी दिली आहे. तेव्हा मिळून मिसळून रहा. हसा गंमती करा पण ज्यांना पटेल त्यांच्या सोबतच नाहीतर काही वेळ शांत राहल्याने आपले काही नुकसान होणार नाही. आता बोलायचं ब्रेस्ट कॅन्सर बद्दल तर छातीतील दूध साठवून त्या दुधाच्या गाठी तयार झाल्यास ब्रेस्ट कॅन्सर होत नाही. हो पण त्या गाठी तशाच राहिल्यास तिथे जंतूसंसर्ग होऊन गळू होतो. जे खूप वेदनादायक असतं. ब्रेस्ट कॅन्सर हा एक रोग आहे त्याबद्दल असं बोलून तुम्ही मुलींना ताण देता. आता काही स्त्रियांना मुळात दुधच कमी येतं किंवा येतंच नाही. त्या बिचाऱ्या काय करणार? दुसरी गोष्ट तुम्हाला नोकरीवर घेतले तेव्हाच सांगितले होते मी. आपल्याला इथे आलेल्या स्त्रियांना आराम द्यायचा आहे. याचा अर्थ त्यांना फक्त आयते खाऊ घालायचे किंवा त्यांच्या मुलांना वागवायचे असा होत नाही. तर त्यांना शारीरिक व मानसिक तान येऊ नये याची जबाबदारीही आपल्याला पार पाडायची आहे. नाहीतर त्या त्यांच्या घरीच नसत्या राहिल्या का? कशाला त्यांनी इथे पैसे भरले असते. कशाला मला हे सेंटर उघडून तुम्हा लोकांची गरज लागली असती? तेव्हा आताही मी परत तुम्हाला समजावून सांगत आहे आपला स्वभाव आपली जुनी विचारधारा या सेंटरच्या आत पाय ठेवण्याआधीच विसरून जावी. इथे या नव्याने मातृत्व मिळालेल्या मुलींसमोर किंवा मागे त्यांच्याबद्दल, किंवा आणखी कोणाबद्दलही नकारात्मक बोलायचे नाही. नसेल होत तुमच्याकडून तर जितक्या दिवस तुम्ही काम केले आहे त्याचा तुमचा पगार घ्या आणि चालत्या व्हा." पिहू त्यांना स्पष्टपने बोलली.
क्रमश :

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all