Login

DINK भाग 51 (अंतिम )

पिहू शेवटपर्यंत तिच्या विचारसरणीवरच टिकून राहिली. प्रत्येक मुलीचे ध्येय आई होणे किंवा मुलं जन्माला घालने नसते
दीर्घकथा लेखन स्पर्धा

DINK भाग 51

"बरं बरं चुकले मी. यापुढे कोणालाच काही बोलणार नाही. तोंडाला शिवून ठेवेल. बस." सुमन तोऱ्यात म्हणाली, "पण तुम्हाला काहीतरी मनापासून सांगावेसे वाटत आहे."

"काय?" पिहूने विचारले.

"तुम्ही लग्न करा की नका करू एक बाळ नक्की होऊ द्या. तुमच्या ओटी पोटाची दुखणी कमी होऊन जातील. एखादी वस्तू ज्या गोष्टीसाठी घडवली जाते त्या गोष्टीसाठीच तिचा उपयोग करण्यात आला नाही तर ती वस्तू सडायला लागते तसेच काही बाईच्या गर्भाशयाचे आहे." सुमन उतरली.

पिहूचा चेहरा संतापला. तिने आताच दिलेल्या इतक्या लांबलचक भाषणाचा त्या बाईवर काही परिणाम झाल्यासारखा दिसला नाही. अनिताने त्या चौघींनाही बाहेर जायचा सांगितले, "सुमन ताई पुरे. जा सर्व कामं करा आपली."

"अनिता मला ही इथे नको आहे. आताच्या आता तिचा जो काही हिशोब झाला आहे तो करून तिला पाठवून दे इथून. माझा इतका संताप होत आहे तर बिचाऱ्या मुलींचा किती होत असेल?" संतापलेली पिहू अनिताला म्हणाली.

"पण पिहू, तुझ्या बाबतीत ती काही खोटं बोलली नाही. मला वाटतं तेजस खूप छान मुलगा आहे त्याच्यासोबत तू लग्न करायला हवं. हे बघ लग्न नसेल करायचं तर मुलंच होऊ द्या. आजकाल कितीतरी पद्धती निघाल्या आहेत. कोणी ग्रे डिव्होर्स घेतं, कोणी सिचूयेशनशिप करतं. बाळ झाल्यावर तुम्ही आनंदाने विभक्त आयुष्य जगू शकता." अनिता भडभड बोलली.

"तुझेही विचार त्या बाई सारखेच आहेत. तुही तुझा हिशोब लिहून जा." पिहूच्या नाका डोळ्यातून वाफा निघत असल्याचा तिला भास झाला. इतकं तिचं शरीर तापलं.

"पिहू तू मला माझा हिशोब करायला सांगत आहेस." अनिताने तिला विचारले. पिहू काहीच बोलली नाही.

"ठीक आहे. तुझी जशी इच्छा. तसेही तुझे काम निघाले आहे आता काय गरज असणार आमची?" अनिता तावा तावाने तिच्या बाळाला घेऊन घरी निघून गेली.

पुढील दोन दिवस ती आपुलकी मदर अँड बेबी केअर सेंटरवर गेलीच नाही. दुपारी सेंटर मधून तिच्या मोबाईलवर कॉल आला. तिला वाटले पिहू पुन्हा काही मदत मागून तिचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी कॉल करत आहे म्हणून तिने फोन उचलला नाही. काही वेळाने तिला जिजाचा फोन आला.

" जिजा पिऊन ये तुला फोन करायला सांगितले असेल तर तिला सांग मला तिचे तोंडही पाहायचे नाही. " अनिता तिला म्हणाली.

" ती कशी सांगणार, ती हॉस्पिटलमध्ये भरती आहे. तिला आज सकाळी पोटात खूप कळा येऊन अचानक रक्तस्त्राव सुरू झाल्यामुळे भरती करण्यात आले आहे. डॉक्टर म्हणाले तिला इंडोमेट्रिओसिस (endometriosis) झालं आहे. मला खूप भिती वाटत आहे. तु लवकर ये." जीजा रडकुंडीला आली.

"येत आहे मी. येत आहे." अनिताने तिला आश्वासन दिले. ती अजितला मुलाला पाहायला सांगून दवाखान्यात निघाली. वाटेत तिला ललितचा कॉल आला. आपुलकी सेंटरमधील परिस्थिती बाबत त्याला जाणून घ्यायचे होते. अनिताने त्याला पिऊ दवाखान्यात भरती असल्याचे सांगितले. त्याने लगेच तेजसला कळवले. तसा तेजसही त्याच्या सर्व कामं त्याच्या जूनियरला सोपवून दवाखान्यात आला.

एव्हाना औषधी गोळ्यांनी पिहूला आराम पडला. तिच्या वेदना कमी झाल्या. डॉक्टर तपासणीला आल्या तेव्हा तिने त्यांच्याशी काही वार्तालाप करून काहीतरी निश्चित केले. अनिता, ललित व तेजस यांना सोबत पाहताच पिहूला समजले की आता हे तिच्यावर लग्नासाठी व बाळासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करतील.

"मी अगदी धडधाकट आहे तेव्हा अशा प्रकारे माझ्याकडे पाहू नका. उद्या माझी एक छोटीशी सर्जरी होणार आहे. त्यात माझं गर्भाशय काढण्यात येईल. मग कमीत कमी सहा सात वर्ष तरी मला हा त्रास पुन्हा जाणवणार नाही. आणि कोणास ठाऊक तितके वर्षही मी जगणार की नाही." पिहूचे शेवटचे वाक्य ऐकताच अनिता तिला रागावली,

" खडूस ललिता पवार आहेस तू. पण काय करणार सवय झाली आहे तुझी तेव्हा परत असल्या गोष्टी करायच्या नाही."

"हो पिहू, तुला ऑपरेशन करायचे आहे, कर. पण खाण्यापिण्याकडे लक्ष देत जा म्हणजे झालं." तेजस पिहूचा हात हातात घेऊन तिला म्हणाला, " मी तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझ्यासोबत आहे. प्लीज मला नाही म्हणू नकोस. "

"बघू, पण आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर मी तुला अपत्याचे सुख देणार नाही हे लक्षात ठेव आणि मगच निर्णय घे." पिहू त्याला बोलली.

"अरे हो म्हण लवकर, सगळी संपत्ती मग माझ्याच मुलाला मिळेल." ललित गमतीदार पद्धतीने बोलत स्वतःच हसला, "गूड न्यूज आहे हं आमच्याकडे."

" चला म्हणजे आमच्या कन्फाईनमेंट सेंटरसाठी लवकरच आम्हाला मालदार क्लाइंट भेटणार आहे. " अनिता म्हणाली.

सर्व एकमेकांना पाहत हसू लागले. पिहू व तेजसचा हात अजूनही एकमेकांच्या हातातच होता.

समाप्त.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all