Login

दोन चेहरे भाग २

विश्वासघात
“थँक यू मीरा. आता बघ, त्याच्याच तोंडून हे सत्य कसं वदवून घेते मी. चल निघते. बरीच कामं आहेत.” म्हणत यशू बाहेर पडली.
घरी आली तेव्हा नेहमीप्रमाणे सासूबाईंच्या तोंडावर बारा वाजलेले आणि तोफखाना चालू होता. तिकडे दुर्लक्ष करत ती स्वैपाकघरात शिरली.
दिवस आपल्या गतीनं पळत होते. एका सकाळी स्वैपाकघरात डाळीला फोडणी घालत असलेली यशू अचानक पळत बेसिनपाशी गेली आणि तिथंच चक्कर येऊन पडली. बाबांनी तोंडावर पाणी मारलं आणि सोफ्यावर आणून बसवलं.
“बरं वाटतंय का आता? काय झालं गं अचानक?” बाबांनी विचारलं.
“तिला काय धाड भरली?” सासूबाई नाकतोंड मुरडत म्हणाल्या.
काही नाही बाबा, परवापासून असंच होतंय. वाटेल बरं. आज जाऊन येते मीराकडे म्हणत ती परत कामाला लागली.
तिचा चुलतभाऊ शशांक मिलिंदचा बालमित्र होता. त्याच्याच लग्नात यशूला बघून तिला मागणी घातली होती मिलिंदनं आणि शशांकचा मित्र म्हणून फारशी चौकशी न करता लग्न झालं होतं.
मिलिंद खूप हुशार होता. त्याचा स्वतःचा अल्युमिनियम फ्रेम्सचा व्यवसाय होता.
ती घरुन निघून शशांकला भेटायला गेली.
“मिल्याची पाठ दुखते का गं आता?”
बोलता बोलता अचानक त्यानं विचारलं
काही नुमजून तीनं त्याच्याकडं बघितलं.
“अगं, तुमच्या लग्नाच्या वर्षभर आधी आम्ही ट्रीपला गेलेलो तेव्हा तो झाडावरून पडला आणि त्याच्या कंबरेला मार लागलेला. म्हणून विचारलं.”
काय झालं असावं ते झटकन तिच्या लक्षात आलं आणि तिला मिलिंदचा प्रचंड राग आला.
चल, मी निघते. आता तू ये घरी म्हणत यशदा निघाली. वाटेत थांबून मीराला फोन करून सगळं सांगितलं आणि ती घरी गेली.
बाबा हॉल मधेच तिची वाट बघत बसले होते.
“काय म्हणाली गं मीरा? ठीकाय ना सगळं??” काळजीच्या सुरात त्यांनी विचारलं.
“हो बाबा. उद्या रिपोर्ट येतील.”
हेमाताईंनी पानं वाढली. जेवायला बसल्यावर तिला परत तसंच झालं.
हेमाताईंना वेगळीच शंका येत होती. पण त्या काही बोलल्या नाहीत.
दुसऱ्या दिवशी मीराचा फोन आला.
“काँग्रॅट्स, मी मावशी होणार यशू. तू प्रेग्नंट आहेस. रिपोर्ट्स घेऊन मी स्वतः येतेय.“
यशू गालातल्या गालात हसली.
थोड्याच वेळात मीरा वादळासारखी घरात शिरली.
हेमाताई अगं अगं म्हणेतोवर तिनं त्यांना गोल गोल फिरवलं होतं.
“मला मेलीला झेपतं का हे असलं आता?? म्हातारी मी. दमवलं नुसतं मला. फक्त वयं वाढली यांची….”
“आता झेपवायला पाहिजे आणि दमून पण चालणार नाही.” त्यांच्यासमोर रिपोर्ट नाचवत मीरा म्हणाली आणि खोका उघडून मिठाईचा तुकडा तोंडात घातला.
“हे कशाला?”
“कशाला काय, तुम्ही आजी आजोबा होणार आहात.”
दुसरा तुकडा बाबांना भरवत मीरा म्हणाली.
आधी त्यांना काही कळलंच नाही पण संगती लागली तेव्हा डोळे पाणावले त्यांचे.
यशू इतका वेळ कोपऱ्यात उभी होती तिच्याजवळ जाऊन त्यांनी तिला जवळ घेतलं. बाबांनी देवासमोर साखर ठेवली आणि हात जोडले.
आज खूप दिवसांनी घरात चैतन्य आलं होतं.
0

🎭 Series Post

View all