Login

दोन चेहरे भाग ३

विश्वासघात
“आई, मिलिंदला काही सांगू नका हं, आपण मस्त सरप्राईज देऊ या त्याला.” यशदा हेमाताईंना म्हणाली. “ हो, चालेल. मस्त आयडीया. पण तू आधी खोलीत जाऊन आराम कर. आता अजिबात दगदग नाही हं करायची. मी आहे ना, बसून फक्त हुकूम सोडायचा.” हेमाताई प्रेमानं दटावत म्हणाल्या. यशू आत जाऊन बेड वर बसली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. आपण यांना फसवतोय ही भावना सलत होती तिला पण तिनं सावरलं स्वतः ला. 
मिलिंद जमेल तसं फोन करत होता तिला आणि आई बाबांना पण. पण कुणीच काही सांगितलं नव्हतं त्याला. मिलिंद रात्री आला तेव्हा यशदा पलंगावर पडून पुस्तक वाचत होती आणि हेमाताई स्वैपाक करत होत्या. “यशू, काय गं?? बरं नाही वाटते का तुला?? अशी पडलीयेस आणि आई काम करते आहे.” ती हलकीशी हसली तेवढ्यात ताई आल्या. हातात सुक्या मेव्याची वाटी आणि दुधाचा पेला होता. “उठ गं, एवढं खाऊन घे. अर्ध्या तासात पान वाढते आणि हाक मारते तुला.”
“काय झालंय कुणी सांगेल का मला?”“अरे तिला अशक्तपणा आलाय. उद्या मीराकडे जाऊन या दोघं” म्हणत ताई निघून गेल्या. 
मीराच्या क्लिनिक मध्ये मिलिंद अस्वस्थ पणे बसला होता. यशूला आत मीरा तपासत होती. तेवढ्यात नर्स बोलवायला आली. “ये रे, बस. कसा आहेस??” “मीरा, काय झालंय यशू ला??”“अजून काही झालं नाही पण होणारे लवकरच. ““काय??”“मुलगा किंवा मुलगी किंवा दोन्ही….”मीरा खट्याळ हसत म्हणाली आणि मिलिंदच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले. जरासा रागातच तो मीराला म्हणाला, “काहीही काय बोलतेस? असं कसं शक्य आहे?”“का? का शक्य नाही??”मीरानं उलट विचारलं. “अगं, इतक्या वर्षात झालं नाही ते आता कसं होईल??”मीरानं न बोलता रिपोर्ट्स त्याच्या समोर सरकवले. ते वाचले आणि मिलिंदला अक्षरशः एसीतही घाम फुटला. मीरा त्याला सूचना देत होती. हो हो करत कसाबसा तो बाहेर पडला. घरी पोचेपर्यंत अवाक्षरही बोलला नाही तो. ते पोचले तेव्हा ताई आणि बाबा बाहेर गेले होते. आत आल्यावर ती म्हणाली, “तुला आनंद नाही झाला का मिलिंद?? इतकी छान बातमी इतक्या वर्षांनी मिळालीय. आज माझ्या वाट बघण्याचं सार्थक झालं बघ….”
खसकन तिचा हात ओढून तिला समोर उभं केलं त्यानं. ती न समजून बघत राहिली. त्याचे डोळे आग ओकत होते. सटकन तिला एक थप्पड मारत तो ओरडला, “कुणाचं आहे हे पाप?? मी बाहेर गेल्यावर हे धंदे करत होतीस??….”“मिलिंद….”नुकतेच आलेले बाबा कडाडले. “तोंड सांभाळून बोल. लाज वाटते का तुला हे असं बोलायला??”“आपलंच बाळ आहे रे हे. असं काय करतोस?”“खोटं बोलतेय ही बाबा. हे माझं बाळ असूच शकत नाही. ““का?”“कारण मी कधीच बाप होऊ शकत नाही…”वीज कोसळल्यासारखे सगळे स्तब्ध झाले. आपण काय बोलून गेलो याची जाणीव झाली तेव्हा वेळ निघून गेली होती. तेवढ्यात यशूनं आतून आणलेले रिपोर्ट्स बाबांच्या हातात दिले. “तुम्ही तरी मला सांगायला हवं होतं बाबा. तुम्ही अंधारात ठेवलं मला आणि वरून आई माझ्यावरच ढकलत होत्या सगळं. तुम्ही विश्वासघात केलाय माझा….”यशू रडत म्हणाली. वाचून बाबांना धक्का बसला. “हे, हे काय आहे मिलिंद??आता पर्यायच नव्हता. त्यानं मान खाली घातली. “सात वर्षापूर्वी मी मित्रांबरोबर ट्रीप ला गेलेलो तेव्हा माझा एक्सीडेंट झालेला. तेव्हा पाठीला आणि कमरेला मार लागलेला. डॉक्टरनी तेव्हाच सांगितलेलं की त्यामुळं मी बाप नाही होऊ शकत कधीच. पण मी हे कुणालाच नाही सांगितलं.”“म्हणून तू डॉक्टर कडे यायचं टाळत होतास ना??”यशू ओरडली आणि आईबाबांकडे बघून म्हणाली, “मी प्रेग्नंट नाही आई बाबा. याचं सत्य समोर आणायला मला हे नाटक करावं लागलं. मला क्षमा करा. त्या दिवशी हे रिपोर्ट्स सापडले नसते तर मी आयुष्यभर स्वतःला दोष देत राहिले असते.” म्हणत ती आत निघून गेली. हेमाताईंनी मान खाली घातली. बाहेर येताना यशूच्या हातात बॅग होती. “मला माफ कर यशू, मी चुकलो. पण तू अशी जाऊ नको. माझं खूप प्रेम आहे गं तुझ्यावर.”
“मी मिलिंदला क्षमा नाही करू शकत बाबा. त्यानं ही गोष्ट लपवली ते मी समजू शकते पण ते आरोप माझ्यावर करून त्यानं त्याची पातळी दाखवून दिली आहे. मला थोडा वेळ हवाय. प्लीज.”आणि ती बाहेर पडली. स्वतःला परत शोधायसाठी…..
(समाप्त)

0

🎭 Series Post

View all