Login

डॉ. सुधा मूर्ती: एक स्वयंसिद्ध व्यक्तीमत्व

एका थोर व्यक्तित्वाचा प्रेरणादायी प्रवास

“लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करनेवालों की हार नहीं होती||”

सोहनलाल द्विवेदी यांची ही रचना मला किशोरावस्थेपासून खूप प्रिय आहे कारण उमेदीच्या काळात या ओळींनी मला खूप बळ दिले.

स्वतःचं औदार्य,महानता दुरवर दरवळणाऱ्या मोगऱ्याच्या मोहक सुगंधाप्रमाणे अगदी सहज लेवून एक वेगळा ठसा ज्यांनी निर्माण केला अशा अनेक व्यक्ती आणि वल्ली मनातल्या दर्पणात आजवर घर करुन गेल्या.माझ्यासारख्या अनेक पामरांना आकर्षित करून एक प्रेरक विचार प्रवाह त्यांनी प्रचलित केला नव्हे त्याची पेटती मशाल आमच्या हाती दिली.

अभियांत्रिकी क्षेत्रात पदवीधर असल्याने मनाच्या अथांग आसमंतात एक सुवर्ण नाव कायमचे कोरले गेलेले आहे ते म्हणजे भारतातील प्रसिद्ध शिक्षण तज्ञ,समाजिक कार्यकर्त्या,लेखिका तसेच महिला अभियंता डॉ. सुधा मूर्ती.

डॉ. सुधा मूर्ती: बस नाम ही काफी है|

एखादी व्यक्ती सामान्य कुटुंबातून वर येऊन अत्यंत खडतर परिश्रमांनी यशाचे वलय स्वतःकडे कसे खेचून आणते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुधाजी.

अद्भुत शैक्षणिक प्रवास व यशस्वी करियर

विमल कुलकर्णी आणि डॉ. आर.एच .कुलकर्णी यांच्या पोटी १९ ऑगस्ट १९५०,शिगगाव-कर्नाटक येथे हे कन्यारत्न जन्माला आलं.अमेरिकेतील कॅलटेक ह्या प्रसिद्ध कंपनीतील शास्त्रज्ञ श्रीनिवास कुळकर्णी हे त्यांचे बंधू तर
प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक गुरुराज देशपांडे यांच्या पत्‍नी-जयश्री कुळकर्णी-देशपांडे त्यांच्या भगिनी आहेत.

काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास लहानपनापासूनच त्यांच्या ठायी होता. बी.व्ही. भूमराद्दी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (बीव्हीबीसीईटी) येथे सन १९६८ मध्ये प्रवेश मिळालेल्या या एकमेव महिला विद्यार्थिनी होत्या.आजवर कधीही मुलींनी प्रवेश घेतला नसल्याने महिला प्रसाधनगृह या महाविद्यालयात बांधण्यात आलेले नव्हते.हे एक कारण दाखवून महाविद्यालयीन प्रशासन तसेच इतर पुरुष विद्यार्थी सुधाजींना खजील करत असत.१४९ मुलांमध्ये केवळ एकट्या असलेल्या सुधाने जेव्हा प्रथम सत्र परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला तेव्हा तिच्याबद्दलचा आदरभाव सर्वांच्या मनात जागृत झाला.शेवटी पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीच्या संयमाची तसेच कामगिरीची सफल अशी अग्निपरीक्षाच तिला मानाचे स्थान मिळवून देते हा अजरामर इतिहास सुधाजींच्या बाबतीतही खोटा नव्हताच! असे करत करत, पायरी पायरीने स्वतःला प्रतिकूल परिस्थितीत सिद्ध करत त्यांनी बी.ई. इलेक्ट्रिकलची पदवी सुवर्णपदकासह मिळवली.पुढे कॉम्प्युटर सायन्स या विषयातील एम्. टेक.पदवी देखील त्यांनी मिळवली.

नंतर सुधाजींनी संगणक शास्त्रज्ञ व अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. टेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या.त्यानंतर टाटा कंपनीसाठी त्यांनी पुणे, मुंबई तसेच जमशेदपूर येथे काम केले.त्यानंतर, पुण्याच्या ख्राईस्ट कॉलेजात त्या प्राध्यापक म्हणून देखील कार्यरत होत्या.सध्या बंगलोर विद्यापीठात त्या अभ्यागत प्राध्यापिका आहेत. इन्फोसिस या संस्थेच्या विश्वस्त म्हणूनही त्या काम पाहत आहेत.


आयुष्याला कलाटणी

एन.आर.नारायणमूर्ती ही व्यक्ती त्यांना भेटली आणि इतर अनेक मुलींप्रमाणे असणारे त्यांचे आयुष्याचे सुरमयी तसेच तरल सुखी स्वप्न सत्यात उतरले. प्रथमतः नारायणमूर्ती बिज़नेसमध्ये पूर्णवेळ काम करण्यास उत्सुक नव्हते परंतु त्यांचा धीर यशस्वीपणे बळावला तो सुधा मुर्तींच्या साथीने!
अन मग उभयतांचे इन्फोसिसरुपी स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले.या सगळ्यांत अनेक अनुभवांचे तसेच भावनांचे कंगोरे दोहोंनी उत्तमरित्या सोडवले आणि जगात नवा इतिहास घडवला जो सर्वश्रुत आहेच. त्यांची अपत्ये रोहन मूर्ती (मुलगा), अक्षता मूर्ती (मुलगी) आहेत् तर ऋषी सुनक (जावई) हे नुकतेच यू. के. चे पंतप्रधान म्हणून नियुक्त् झाले आहेत.

उत्तम् तत्वज्ञ तसेंच मार्गदर्शक

सुधाजींचे एक वाक्य मी माझ्या डायरीवर अगदी पहिल्या पानावर लिहून् ठेवले आहे जे मी रोज वाचते,
“ जीवनात जे आवडते ते काम केले की आनंद मिळतो आणि जे काम केले ते आवडले की समाधान मिळते.”
खरंच! हे वाक्य वाचून आनंद आणि समाधानाची इतकी सहज सोपी परिभाषा असु शकते हे मला दररोज नव्याने उमगत् जाते.

लग्न झाल्यानंतर आपला साथीदार स्वतः जवळ काहीही नसले तरीही आपल्याला समजून घेणारा नक्कीच हवा हे त्यांचे मत विवाहोच्छूक् तरुणींसाठी खरंच् वाखानन्याजोगे आहे.त्यातही हे नाते शेवट पर्यंत टिकवायची गुरुकिल्ली म्हणजे एक बोलत असेल तर दुसऱ्याने शांत बसने होय हा पायंडा त्यांनी स्वतः देखील अवलंबला आहे,हे सांगताना त्या अजिबात लाजत नाहीत.

बरेच लोक मी खूप मोठा आहे असे भासवताना दिसतात त्यांच्यासाठी सुधाजी म्हणतात,”आपण सर्व कुठे राहतो?इतक्या मोठ्या जगात जिथे असंख्य आकाशगंगा आहेत,महाकाय सूर्य आहे,अनेक ग्रह,उपग्रह आहेत.त्यातील एक म्हणजे पृथ्वी.बरोबर?त्यातही अनेक खंड,मग त्यातला एक आशिया.बरं मग त्यातील अगदी छोटा तुकडा म्हणजे भारत आणि त्यातही अनेक राज्ये बरं का! मग त्यातून एक आपलं राज्य,त्यातील एक शहर किंवा गाव!मग हा मोठेपणाचा बडेजाव कशासाठी?”
अत्यंत सुंदर आणि समर्पक असे हे स्पष्टीकरण समजणाऱ्याच्या पचनी लगेच पडतं.

परिश्रम,सचोटी,चिकाटी, योग्य दिशा ही ध्येयाच्या दिशेने नेणारी मार्गदर्शक तत्वे त्यांच्या देहबोलीतून आणि कामगिरीतुन कणाकणाने प्रगट होताना दिसतात.
त्यांच्या चेहऱ्यावरील सदैव तेवत असणारे निखळ स्मित हास्य म्हणजे सुधाजी एक उत्साह,चैतन्य तसेच समाधानाचा ऊर्जास्रोत आहेत् हे पदोपदी जाणवत राहते.

साहित्य कलाकृती

सुधा मूर्ती यांनी नऊहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह आहेत.सुधा मूर्ती यांनी मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेमधून लिखाण केलेले आहे. त्यांच्या काही गाजलेल्या कलाकृती म्हणजे अस्तित्व,
आजीच्या पोतडीतील गोष्टी,आयुष्याचे धडे गिरवताना,
द ओल्ड मॅन अँड हिज गॉड (इंग्रजी),
कल्पवृक्षाची कन्या: पुराणांतील स्त्रियांच्या अनन्यसाधारण कथा (मूळ इंग्रजी-द डाॅटर्स फ्राॅम अ विशिंग ट्री, मराठी अनुवाद - लीना सोहोनी),गोष्टी माणसांच्या,जेन्टली फॉल्स द बकुला (इंग्रजी),डॉलर बहू (इंग्रजी)
तीन हजार टाके (मूळ इंग्रजी, ’थ्री थाउजंड स्टिचेस’; मराठी अनुवाद लीना सोहोनी),थैलीभर गोष्टी,परिधी (कानडी),परीघ,पितृऋण,पुण्यभूमी भारत
बकुळ (मराठी),द मॅजिक ड्रम अँड द अदर फेव्हरिट स्टोरीज (इंग्रजी),महाश्वेता (कानडी व इंग्रजी),वाइज अँड अदरवाइज (इंग्रजी),सामान्यांतले असामान्य,सुकेशिनी
,हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टु रीड अदर स्टोरीज (इंग्रजी)
या होय.


सामाजिक योगदान

इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून मूर्ती यांनी समाजाच्या विविध क्षेत्रांत विकासकामांना प्रोत्साहन दिले आहे. कर्नाटक सरकारच्या शाळांत त्यांनी संगणक आणि ग्रंथालये उपलब्ध करून दिली आहेत. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया या नावाचे ग्रंथालय सुरू केले आहे.कर्नाटकातील ग्रामीण भागांत, बंगलोर शहर व परिसरात त्यांनी सुमारे १०,००० शौचालये संस्थेच्या माध्यमातून बांधली आहेत. तमिळनाडू आणि अंदमान येथे सुनामीच्या काळात त्यांनी विशेष सेवाकार्य केले आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील लोकांनाही त्यांच्या संस्थेने मदत दिलेली आहे.


पुरस्कार आणि सन्मान

इ.स.१९९५ साली उत्तम शिक्षक पुरस्कार (बेस्ट टीचर अवोर्ड ),इ.स.२००१ साली ओजस्विनी पुरस्कार,
इ.स. २००६ - पद्मश्री पुरस्कार ,इ.स. २००६ साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी आर. के. नारायण पुरस्कार,
श्री राणी-लक्ष्मी फाऊंडेशनकडून १९ नोव्हेंबर, इ.स. २००४ रोजी राजलक्ष्मी पुरस्कार,इ.स. २०१० - एम.आय.टी.कॉलेजकडून भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार.
सामाजिक कामासाठी राष्ट्रीय स्तरावरील सन्मान
सत्यभामा विद्यापीठातर्फे सन्माननीय डॉक्टरेट पदवी तसेच
इ.स. २०२३ - भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार.

किती वर्णावी थोरवी अशा या सुधाजी म्हणजे एक् स्वयंसिद्ध व्यक्तीमत्व नक्कीच आहेत हे त्यांनी साऱ्या जगाला त्यांच्या कर्तृत्वातून निदर्शनास आणले आहे.म्हणूनच मानाचा मुजरा या आगळ्या वेगळ्या गुणवंत महिलेला,तुमच्या माझ्या लाडक्या डॉ. सुधा मूर्ती यांना!

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
नाशिक
मोब.न.9604393622