Login

Drakula

Dracula
©®विवेक चंद्रकांत....

त्याने तिला रात्री त्या निर्जन स्थळी भेटावयास बोलावले. समुद्रकिनारा.. मंद चंद्रप्रकाश... त्यामुळे चमकणारी वाळू .. आणि दूर बांबूची झाडें.

तो तगडा. ती त्यामानाने नाजूक चणीची. दोघे समोरासमोर येताच एकमेकांच्या बाहुपाशात बद्ध झाले. दोघे एकमेकांच्या ह्रदयाची गती मोजत होते. अचानक त्याने मिठी घट्ट केली. मान वर उचलली. त्याचे दोन मोठे पांढरेशुभ्र सुळे त्या चंद्रप्रकाशात चमकले आणि क्षणार्धात तिच्या मानेत रुतले. तिच्या तोंडातून अस्फुट किंकाळी बाहेर पडली.

©®विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.

काही सेकंदात त्याला काहीतरी वेगळे जाणवले. त्याचे सुळे त्याच्या जरुरीपेक्षा जास्त आत गेले होते. आणि ते खेचल्यासारखे अडकले होते. हे काहीतरी वेगळे होते. त्याने तिच्या मानेतून सुळे बाहेर काढायचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. ते तिथे घट्ट रुतले होते. आणि त्याला ते जाणवले. ज्या सुळ्यांचा उपयोग तो रक्त पिण्यासाठी करायचा त्याच सुळ्यातून त्याचे रक्त तिच्या रक्तवाहिन्यांमध्ये खेचले जात होते.हे वेगळे होते. फासे उलटे पडल्यासारखे. त्याला धोक्याची जाणीव झाली. त्याने तिच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न केला पण आता तिची पकड घट्ट झाली होती. त्याच्या शरीरातले रक्त आता वेगाने तिच्या शरीरात जात होते. त्याची शक्ती झपाट्याने कमी होत गेली. त्याने सुटण्याची शेवटची धडपड केली, पण काही उपयोग झाला नाही. त्याचे पांढरे पडलेलं शरीर निर्जीव होऊन तिच्या शरीराला लोंबकळत राहिले.

तिचा चेहरा आता चमकदार रसरशीत झाला.एका हातांच्या फटक्यानेच तिने त्याचे शरीर दूर उडवून लावले. डोलदार चालीने ती पुढे आली. त्याच्या कलेवराकडे एक तूच्छ कटाक्ष टाकत म्हणाली.

"Stupid. त्याच त्याच जुन्या पद्धती वापरतोय. जो काळाप्रमाणे update होत नाही तो काळाच्या ओघात नष्ट होतो."
(कृपया लेखकाच्या नावासहित share करा.)