Login

स्वप्नं भाग -1

गोष्ट स्वप्नपूर्तीची
"तू कुठेही जाणार नाहीस."

"का?"

"मी सांगितलं ना, कुठेही जायचं नाही. मग विषय संपला." एकनाथराव संध्याला म्हणाले.

"अहो, पण लग्न झाल्यापासून आपण कुठेही गेलो नाही. देवदर्शनासाठी नाही की कधी फिरायला म्हणून गेलो नाही. इतकी वर्षे मी तुमचं म्हणणं डावललं नाही. आता मला जायची संधी मिळते तर जाऊ दे. " संध्या कधी नव्हे ते ठासून म्हणाली.

"इतकी वर्ष माझ्यासमोर बोलायची हिंमत नव्हती ना आता काय झालंय? माझ्याशी अजिबात वाद घालायचा नाही. फिरायला जाणं म्हणजे निव्वळ टाईमपास! वर पाण्यासारखा पैसा खर्च होतो, दगदग, धावपळ होते. त्यापेक्षा नकोच ते. एकदा सवय जडली की माणूस त्याच्या आहारी जातो म्हणतात. मी सांगितलेलं ऐकायचं नसेल तर जातेस तिथेच राहायचं. परत इकडे यायचं नाव काढायचं नाही." एकनाथरावांचा आवाज चढला होता.

एकनाथरावांच्या आई आतल्या खोलीत कॉटवर बसून नवरा - बायकोचं बोलणं ऐकत होत्या. 'याचा बापही तसाच होता आणि हाही आता त्यांचीच गादी चालवतो आहे. आपणही कुठे जायचं नाही की घरातल्या माणसांना कुठे जाऊ द्यायचं नाही. बायकांनी उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवलं की यांच्या तळपायाची आग मस्तकात गेलीच म्हणून समजा. बायकोला नोकरी करू देतो हे त्यातल्या त्यात बरं म्हणायचं. आमचा काळ निराळा होता. पण आम्ही सोसलं ते सुना - पोरींनी का सोसावं?' आईंनी नमस्कार करत जपमाळ बाजूला ठेवली.

बघता, बघता संध्याच्या डोळ्यांत पाणी जमा झालं. नवऱ्याच्या मर्जीत राहायचं अशी आईची शिकवण! लग्न झालं अन् ती तशीच वागत राहिली. नवऱ्याच्या शब्दापुढं कधी गेली नाही. नोकरी करायला मिळत होती ते एकच स्वातंत्र्य होतं. कारण पैशांची गरज होती म्हणून नवरा काही बोलू शकत नव्हता. दोन मुली झाल्या आणि संध्याच्या सासुबाईंनी सुस्कारा सोडला. मुलगा झाला असता तर तोही आपल्या बापासारखा झाला असता! ही त्यांची भीती पळून गेली होती.

पण एकनाथरावांनी आपल्या मुलींनाही कुठे जाऊ दिलं नाही. अगदी शाळेच्या सहलीला जाण्यासाठी सुद्धा त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावं लागे, पैसे मागावे लागत. मग नंतर मुलींनी हा हट्ट करणं सोडून दिलं. तेव्हा संध्याने मनोमन ठरवलं, 'आपण जे सोसलं ते मुलींनी का सोसावं?' ती गुपचूपपणे आपल्या पगारातले पैसे साठवून त्यांच्या हातात ठेवे आणि म्हणे, 'यातून तुमची होईल तेवढी हौसमौज पूर्ण करून घ्या.' तेवढंच मुलींच्या चेहऱ्यावर समाधान दिसे.

तिला वाटायचं, एकनाथरावांनी संसारातल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तरी उचलाव्यात. सगळं घरच्या स्त्रीने करायचं असा नियम का असतो? पुरुषाचं बरं असतं, बायको आली की तिच्यावर सगळी जबाबदारी सोपवून मोकळे होतात. पण बायका मात्र जन्मभरासाठी अडकून पडतात. नाती सांभाळली तरी बोल लावले जातात आणि अंतर राखलं तरी स्त्रीलाच दोष दिला जातो.

संध्याला फिरायची फार आवड होती. इतिहासाच्या पुस्तकात असणारी, टेलिव्हिजनवर पाहायला मिळणारी, नववर्षाच्या कॅलेंडरवर दिसणारी वेगवेगळी ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळं तिला फार आवडायची. त्यांच्या वर्णनात रमून जायला आवडायचं. ती प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावी, त्यांचा स्पर्श अनुभवावा असं वाटायचं. इतिहासाच्या तासाला ती मन लावून धडा शिकून घ्यायची. अर्थातच या विषयात तिचा क्रमांक पहिला यायचा. तिची भलतीच आवड पाहून तात्या म्हणायचे, "संध्ये, तुला सतत बदली होणारा नवरा मिळणार बघ. तुझी आवड नक्की पूर्ण होईल. मग हवं तेवढं फिरून घे."

एकनाथराव बँकेत होते म्हणून तात्यांनी हे स्थळ पसंत केलं आणि संध्या लग्न करून सासरी आली. पण नवऱ्याचा तुटपुंजा पगार म्हणून तिच्यावर नोकरी करायची वेळ आली. तेही तिने मनापासून स्वीकारलं. घर खर्चासाठी थोडा पगार बाजूला काढून एकनाथरावांनी बाकी सगळे पैसे ठेव म्हणून ठेवत होते. आपला पगार आपल्या हाती पडत नाही म्हणून संध्याला वाईट वाटे.

लग्नानंतर तिचं सगळं आयुष्य शिस्त राखण्यात गेलं. वस्तू जिथल्या तिथे नसेल तर एकनाथराव तारस्वरात घर डोक्यावर घेत. सगळं आपल्या मनासारखं व्हावं असा त्यांचा हट्ट पूर्ण करत संध्याने देखील त्यांच्या स्वभावाला खतपाणी घालण्याचं काम नकळत केलं होतं.
------------------------------------------------------

"मला समुद्र किनारा, लेणी, थंड हवेची ठिकाणे, कोरीव मंदिरं, उंच, उंच डोंगर, खोल दऱ्या हे सगळं पाहायचं आहे. त्यातलं सौंदर्य अनुभवायचं आहे आणि त्यातही प्रेमाचे प्रतिक असलेला अप्रतिम 'ताजमहल 'बघणं माझं स्वप्न आहे." संध्या ने कधीतरी आपल्या सासुबाईं पुढं मन मोकळं केलं होतं.

आठवणींना मागे टाकत संध्या डोळे पुसत शेजारी आली. "वहिनी, तुम्ही देवदर्शनाला जाऊन या. मी परत केव्हातरी येईन. उद्या सुट्टी असली तरी कामं भरपूर आहेत. मी आले तर सगळा दिवस वाया जाईल."

"अगं, एका दिवसाने काही बिघडत नाही आणि नवऱ्याला इतकी काय घाबरतेस? नाथाशी मी बोलू का?" संध्या सहलीला का येत नाही हे वहिनींना कळलं होतं. एका मुलीचं लग्न झालं, जबाबदारी काही अंशी कमी झाली होती. निदान आता तरी तिची सुटका व्हावी म्हणून त्या म्हणाल्या.

"नको, नको. त्यांना आवडायचे नाही. त्यापेक्षा मी येत नाही, हेच बरं." तिने पुढ्यात दिलेला चहाचा कप तोंडाला लावला.

-----------------------------------------------------

"नाथा, असं का वागतोस? तुला एक फिरायची आवड नाही. पण बायकोला तरी जाऊ दे. तिची हौस पूर्ण करून तुझ्या पदरी पुण्य पडेल की नाही? आजवर तिला कुठल्या समारंभाला, कार्यक्रमालाही जाऊ दिलं नाहीस. घरी कुठला नातेवाईक आला तरी तुझी चिडचिड.. आम्ही कुठे जायचं म्हंटलं तरी त्रागा. आता हे सगळं कुठेतरी थांबायला हवं." आई पदराने डोळे पुसत म्हणाल्या.

"आई, घरच्या बायकांचा एक पाय उंबऱ्यात आणि एक पाय बाहेर असणं चुकीचं आहे. मला ते कधीही आवडलं नाही आणि आवडणारही नाही. त्यांनी कायम आपल्या मर्यादेत राहायला हवं. नसते लाड करून घेऊ नये. आता राहिला प्रश्न नातेवाईकांचा, आपण दुसऱ्यासाठी कितीही केलं तरी लोकं नावं ठेवतात, पाठीवर बोलतात. आपण त्यांच्यावर केलेले उपकार विसरतात. मला ते मुळीच सहन होत नाही.
शिवाय बाहेर जायचं म्हंटलं की तिथलंच खावं लागतं. ते सोसायला तर हवं? नाहीतरी तब्येत गळ्यात घेऊन फिरायची वेळ यायची. त्यापेक्षा घरचं अन्न बरं."

आई पुढे काही बोलल्या नाहीत. कारण इतकी वर्ष समजावून देखील नाथाच्या स्वभावात बदल होणार नाही हे त्यांना कळून चुकलं होतं. यावर काही उपाय नव्हता आणि करणार तरी काय? आपलेच दात आणि आपलेच ओठ!
टिव्हीचा आवाज मोठा करून त्या कॉटवर पडून राहिल्या. मनात विचारांनी फेर धरला होता. त्याचबरोबर अनेक आठवणी उफाळून वर येत होत्या. त्यात कितीतरी वेळ त्या रेंगाळत राहिल्या.

काही वेळाने येऊन एकनाथरावांनी टिव्हीचा आवाज कमी केल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

'नवऱ्याने नातेवाईक दूर केले म्हणून बायकोला तसं करून चालतं? काहीही झालं तरी तिला नाती धरून ठेवावी लागतात. अडीनडीला मदतीला जावं लागतं आणि मदत घ्यावी सुद्धा लागते तर कधी आठवणीने त्यांना फोन करावा लागतो. विचारपूस करावी लागते.

पूर्वीचा काळ हा निराळा होता. आपण आपली आवड -निवड बाजूला ठेवली.. म्हणजे ती ठेवावी लागली. नवऱ्याचा शब्द प्रमाण मानला. सासूचा वरचढपणा सहन केला. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची मर्जी राखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. नवरा आपल्या बाजूने नसला तर संपूर्ण घर बाई विरुद्ध कसं उभं राहतं, हेही अनुभवलं. घरासाठी खूप कष्ट घेतले.

संध्याच्या बाबतीत तसं होऊ नये म्हणून प्रयत्न केले तरी नाथाने आपल्याला जे करायचं तेच केलं. तो इतकी वर्ष जे पाहत आला तेच संस्कार त्याने घट्ट धरून ठेवले. पुरुषाला बऱ्या - वाईटाची, खऱ्या - खोट्याची जाण असावी लागते. पण इथे सगळंच वेगळं आहे!' आई विचारात गढून गेल्या.