Login

स्वप्नं भाग -2

गोष्ट स्वप्नपूर्तीची
मोठा जावई बदली होणारा मिळाला म्हणून संध्याला खूप आनंद झाला. निदान मुलीला तरी फिरायला, वेगवेगळे प्रदेश बघायला मिळतील म्हणून ती खुश होती.

एक दिवस मयुरी म्हणाली, "आई, बस् झाली कामं. आता निवृत्ती घे. आमची बदली जिथे होईल तिथे आम्ही तुला बोलावून घेऊ. मग आपण मस्तपैकी हिंडू - फिरू, मजा करू. तेवढीच तुझी इच्छा, स्वप्न पूर्ण होतील. ती पूर्ण होण्यासाठी माझा हातभर लागला तर मला खूप बरं वाटेल."

नेमकं हे एकनाथरावांनी ऐकलं. "अजून धाकटीचं लग्न व्हायचं आहे. लगेच नोकरी सोडायला सांगतेस तिला? शिवाय तुझ्या आजीकडे कोण बघणार? घरची कामं कोण करणारं?" ते रागाने म्हणाले. "आणि माणसाने सतत कामात रहावं. मग त्याला बाहेरची हवा भुरळ घालत नाही."

"बाबा, वय आहे तोपर्यंत फिरून घ्या. शरीर थकलं की मनही थकून जातं. मग काही अंगी लागत नाही की कुठे जाऊ वाटत नाही. अंगात रघ असेपर्यंत जीवनाचा आनंद लुटायचा आणि पुढचं पुढं पाहता येईल म्हणून देवावर सोपवून मोकळं व्हायचं."
मोठे जावई म्हणाले. त्यांना अजून सासऱ्यांच्या स्वभावाची ओळख झाली नव्हती. मयुरीने आपल्या नवऱ्याला डोळ्यांनी खुणावलं. तसा तो शांत झाला.

आपल्या आई - वडिलांचं नातं पाहता दोन्ही मुलींनी ठरवलं होतं, नवरा -बायकोच्या नात्यात मानसिक -भावनिक आधार, बंध, विश्वासाचं नातं, प्रामाणिकपणा, आपुलकी, प्रेम असेल तरच नातं खुलून येतं. एकमेकांच्या गरजा, आवडी-निवडी, अपेक्षा लक्षात घेतल्या तरच संसार सुखाचा होतो. एकाची हुकूमशाही वृत्ती असेल तर दुसरा मन मारून संसार करतो. तिथे प्रेम, स्नेह, विश्वास याला जागा नसते. आपण मात्र असं करायचं नाही. आपलं मत स्पष्टपणे मांडायचं. एकमेकांचा आदर करायचा.

एकनाथरावांनी बदलीवाला जावई पसंत केला म्हणून घरासह सगळ्या नातेवाईकांच्या भुवया उंचावल्या. आजवर घर ते नोकरी अन् नोकरी ते घर असा 'प्रवास ' करणाऱ्या एकनाथ रावांनी मुलीला हे स्वातंत्र्य कसं दिलं? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता.
त्यामागचं खरं कारण असं होतं की, मुलाकडील मंडळींना मयुरी खूप आवडली होती. त्यांनी तिचे कौतुक करून हीच आमच्या घरची सून होणार म्हणून ठासून सांगितलं होतं. आता कुठल्या बापाला आपल्या लेकीचं कौतुक केलेलं आवडणार नाही? म्हणून एकनाथरावांनी या स्थळाला होकार कळवला.
---------------------------------------------------

'समोरच्या व्यक्तीने आपल्या प्रत्येक कृतीला, गोष्टीला विरोध केला की एक दिवस आपलं मन मरून जातं, असं म्हणतात. आता सवय झाल्याने संध्याला कशाचं काही वाटत नव्हतं. पाठीशी जबाबदाऱ्याही तितक्याच होत्या. त्या सोडून कुठे जाणं बरं वाटत नव्हतं. ती गेली अनेक वर्ष मन मारत आली होती. आतल्या आत कुढत आली होती. नाही म्हणायला सासुबाई तिच्या बाजूने उभ्या होत्या. पण त्या थकल्या असल्याने बोलण्यापेक्षा अधिक काही करू शकत नव्हत्या. अशा वातावरणात तिचं व्यक्तिमत्व बहरून येण्याऐवजी कोमेजून गेलं होतं.

एकनाथरावांना वाटायचं, आपल्या बायकोला काय कमी आहे? नोकरीच्या निमित्ताने घरातून बाहेर पडायला मिळतं. चार -चौघात वावरायला मिळतं. स्वतः घर आहे. भरला संसार आहे. साऱ्या सुखसोयी आहेत मग आणि काय हवं?

संध्याच्या दवाखान्याच्या फेऱ्या हल्ली वाढल्या होत्या. रात्रीची झोप मनासारखी लागत नव्हती. कधीकधी जागरण व्हायचं. मग त्याचा कामावर परिणाम ठरलेला असायचा.

"झोपेची गोळी देता येत नाही. कारण पेशंटना त्याची सवय होते. नोकरी करता, शिवाय घर कामही करता. मग दमून -भागून शरीराला आवश्यक विश्रांती मिळायलाच हवी. मला वाटतं तुमचं मन स्वस्थ नाही. जास्त विचार करू नका. मनाला सैल सोडा. हवं तर महिन्यातून एक -दोन दिवस कुठेतरी फिरून येत जा." फॅमिली डॉक्टरांनी नेमकं वर्मावर बोट ठेवलं.
हे ऐकून संध्या खूप रडली. पोटभर रडल्यावर तिला बरं वाटलं. मन मोकळं झाल्यासारखं! तिला वाटलं, 'आज तात्या असते तर त्यांच्या समोर आपण असंच मन मोकळं केलं असतं.'
डॉक्टरांनी पुढे केलेला पाण्याचा पेल्याला हात न लावता ती तशीच केबिनमधून बाहेर पडली. तेव्हा तिच्या लक्षात आलं, मनात साठून राहिलेल्या गोष्टी मनाला आणि शरीराला सुद्धा जाचक ठरतात.
------------------------------------------------------------------

"रविवारी धाकटीला बघायला यायचेत तेव्हा सगळी तयारी करा." हे ऐकून संध्या तयारीला लागली. ठरल्याप्रमाणे मंडळी आली. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. धाकटीला स्थळ आवडलं. एकनाथरावांना हे स्थळ तसं पसंत होतं. पण एकच कमी होती किंवा योगायोग म्हणा, मुलगा मोठ्या पोस्टवर काम करत असल्याने दर दोन वर्षांनी बदली व्हायची.
"मोठा जावई असा आणि आता धाकटाही तसाच कशाला?" ते आपल्या आईला म्हणाले.

"पोरीचं नशीब तुझ्या हातात थोडीच आहे? मीही थकले आता. धाकटीचं लग्न माझ्या डोळ्यांदेखत व्हावं असं वाटत असेल तर हो म्हणा. नाहीतर नेहमीप्रमाणे तू तुझ्या मनासारखं वागायला रिकामा आहेस." आईचं बोलणं एकनाथरावांच्या मनाला लागलं आणि त्यांनी होकार कळवला.

"संध्या, मी थकले असले तरी माझी हाडं अजून मजबूत आहेत. नियती अशीच असते, भूतकाळात जे मिळालं नाही ते वर्तमान आणि भविष्यात देऊ करते. पुढं -मागं तुझंही स्वप्न पूर्ण होईल बघ. अनुभवावरून आताशी माणसांची पारख जमते. चेहऱ्यावरून अंदाज येतो. माझा नात जावई लाखात एक आहे. माझ्या लेकाला आता तोच वळण लावेल बघ."

सासुबाईंच्या बोलण्यावर संध्या आज खूप दिवसांनी मनमोकळी हसली आणि त्यांच्या जवळ बसत म्हणाली, "तुम्ही मला सोडून कुठेही जायचं नाही. आपल्याला अजून बरीच वर्षे एकत्र घालवायची आहेत. मला नातवंडं येऊ देत आणि तुम्हाला पणजी होण्याचा मान मिळायला हवा की नको? आजवर तुम्ही पाठीशी उभ्या होतात म्हणून सगळं निभावलं. तुम्ही आणि मी काय कमी सहन केलं? याची जाण ठेऊन आपण दोघी या घरात माय -लेकीसारख्या वावरलो. आता एक, एक जबाबदारी पार पाडताना मला माझी आई सोबत हवी आहे." सुनेच्या या बोलण्याने सासुबाईंचा उत्साह आणखी वाढला.

त्या रात्री संध्याला छान झोप लागली.

धाकटी लग्न होऊन सासरी गेली आणि सहा महिन्यांत एकनाथराव निवृत्त झाले. संध्याची नोकरी अजून तीन वर्षे बाकी होती. घरी बसून वेळ जाईना म्हणून एकनाथराव काही ना काही कामानिमित्त घरातून बाहेर पडू लागले. या आधी घरातून बाहेर न पडणारा माणूस अचानक कसा काय बाहेर जातो म्हणून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. पण हा नियमातला बदल केवळ एकनाथरावांपुरताच होता. स्वतःचं मन रमावयचं असेल तर माणूस मागे -पुढे पाहत नाही की फारसा विचार करत नाही. त्यांचं तसंच झालं.

'बाबा, रिटायर्ड झालात. आता इकडे या.' म्हणून धाकटा जावई बोलावून थकला. पण एकनाथरावांचा नकार कायम राहिला. "मी पैसा मिळवला तो असा खर्च करण्यासाठी, चैन करण्यासाठी नव्हे तर म्हातारपणाची सोय म्हणून तो राखून ठेवला आहे. तो असाच उधळला तर पुढं काय करायचं?" त्यांनी जावयाला उत्तर दिलं.

"मी सगळा खर्च करतो. गाडी पाठवतो. तुम्ही तिघेही इकडे या." जावई वरचढ म्हणाला. पण ऐकतील ते एकनाथराव कसले? त्यांचा नकार कायम होता.

क्रमशः

🎭 Series Post

View all