स्वप्नवेडी..! चाप्टर -१ (ट्रेलर)

ही कहाणी आहे एका अंतमूर्ख मुलीची... याच कारणामुळे समाजात आणि इतर माणसात वावरताना तिची होणारी मानसिक, कौटुंबिक विटंबना या कथेत शब्दबद्ध केली आहे. शिवाय प्रत्येक अंतर्मूख म्हणवल्या जाणार्या व्यक्तीला यातून सन्मानाने जगण्याचा संदेश दिला जाणार आहे.
स्वप्नवेडी..! भाग -१ (ट्रेलर)

दिवस सरत जातात
वेळ धावत राहते
काळ संपून जातो...
नाही नाही म्हणता
आयुष्य सरत जातं,
पण सरतील त्या
आठवणी कसल्या;
आठवणी जीवंत राहतात..
मनाच्या एका कोपऱ्यात,
काळजाच्या एका कप्प्यात
आजन्म सतावत राहतात!

तिने नुकतेच तिच्या मनाच्या पटलावर उमटलेले भाव शब्दांत गुंफून कागदावर उतरवले. आणि खोलीतल्या मंद प्रकाशणाऱ्या लाइट्स बंद केल्या. तसं तिने हलकेच नि:श्वास सोडला. अंधार आवडायचा तिला.. जणू त्या अंधारातच तिचं आतापर्यंतचं सगळं आयुष्य तिने काढलेलं... दिवसाची झळ, चटके, होणारे अपरिमित मानसिक हाल, जगाकडून पावलोपावली होणारी विटंबना आणि सदैव आपल्याला व आपल्यातील अव्यक्त मनाला मिळत आलेली दुय्यम वागणूक आणि खूप काही कटू आठवणी त्या दिवसातल्या प्रकाशाने तिला दिलेल्या... पण रात्र मात्र फक्त तिच्यासाठी नि तिच्याभोवतीच असायची. जणू दिवसभर सहन केलेले अन्यायाचे घाव अंधारलेल्या रात्रीच्या काळोखात दिसेनासे व्हायचे. तो अंधार तिला कवटाळून घ्यायचा. तिच्या जळणाऱ्या मनावर हळूवारपणे फुंकर घालायचा. तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या आसवांचं चुंबन घ्यायचा. म्हणूनच तो अंधार तिला अधिक प्रिय होता.

या अंधाराच्या प्रेमाची गोवी गाण्यातच कधी रात्र सरायची तिला कळायचंही नाही. अशा कित्येक रात्री तिने यातच जागवलेल्या... दिवसाढवळ्या गर्दीत चार माणसांत जरी ती असली तरी तिचं मन मात्र एकाकी त्या अंधारातच भटकत रहायचं. लोकांना काळोख नकोसा वाटायचा. कारण ते अशुभ असतं अशी त्यांची भावना... मग तेच लोक डोक्यावरचे केस पांढरे न होता काळेच रहावेत यासाठी कलर, डाय याचा अट्टाहास कशासाठी करत असतील बरं? हा प्रश्न तिला लहानपणापासून पडायचा. पण तिने हे सगळे विचार क्षणात झटकले. या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी तिला वेळ नव्हता. तिला फक्त आता तिच्या आयुष्यात तिने आतापर्यंत केलेल्या चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हवा होता, असंही काही नव्हतं. मग तिला हवं तरी काय होतं, याच तिच्या प्रश्नाचं उत्तर आता तिला हवं होतं.

आणि त्या अंधारलेल्या खोलीत बेडवरून उठून खिडकीजवळ जाऊन उभारली. खिडकी उघडताच बाहेरच्या चंद्राचा मंद प्रकाश तिच्या चेहऱ्यावर चमकला. ती जराशी बिथरली यामुळे, पण क्षणभरच... त्यानंतर त्या अमावास्येपूर्वीच्या लहान आकारातील चंद्राकडे तिने बघितलं. जणू आरशात बघत होती ती... काहीतरी वेगळं जाणवलं तिला आणि एक हलकी वाऱ्याची झुळूक तिला स्पर्शून गेली. त्यामुळे ती शहारली आणि तिने घट्ट डोळे मिटुन घेतले. तिच्या आयुष्यात तिला हवीशी वाटणारी गोष्ट अचानक मनात तरळून गेली.

आयुष्यात एकांताशिवाय हवंहवंसं काही वाटलंच नाही तिला... तिचं जग, तिचं कल्पनाविश्व हे फक्त तिचं होतं. तिथे तिच्याशिवाय इतर कुणालाच प्रवेश नव्हता. अगदी तिच्या बुद्धीलाही नाही... कल्पनेत बेभान झालेल्या तिला तिच्या मनाने भानावर आणलं. आणि तिने पून्हा त्या आकाशातल्या चंद्राकडे बघितलं. आता ढगांआड लपलेला. जणू तोही थकलेला... या विचाराने ती जराशी हसली. आणि पून्हा त्या चंद्राकडे एकटक पाहत म्हणाली,

हे शीतलचंद्रा... तू साक्ष आहेस आतापर्यंतच्या माझ्या जीवनप्रवासाचा. कारण मी अंधारात कधीही कुठेही जात असले तेव्हा तू नेहमी माझ्या डोईवर पहारेकरी बनून माझ्यासोबत असायचास. अंधारात सावली साथ सोडते पण तू कधीच माझी साथ सोडली नाही. म्हणून तू एकमेव साक्षीदार आहेस माझ्या आयुष्याचा... आता मी माझ्या आयुष्यातील शेवटचा काळ अनुभवतेय. त्यामुळे तुझ्याबद्दलची कृतज्ञताही व्यक्त करायची आहे. यासाठी मी कोणता लेख अथवा निबंध नाही लिहिणार तर थेट तुझ्याशी दोन ओळीत माझं हितगुज व्यक्त करणार. मी स्वप्नाली मोहिते... छे छे, हे नाव जगासाठी राहील. पण माझी खरी ओळख ही नावाप्रमाणेच स्वप्नात रमणारी "स्वप्नवेडी" असेल. आणि माझ्या या वेडाला सामावून घेणारा तूच होतास आणि तूच रहावास. यासाठीच माझं दुःख सुख वेळोवेळी फक्त तुझ्यासमोर व्यक्त करत आले. लव्ह यू सो मच...! एवढं बोलून तिने थांबत एक दीर्घ श्वास घेतला.


क्रमशः

🎭 Series Post

View all