स्वप्नवेडी! चाप्टर -२

एका अंतर्मूख मुलीची वेदनादायी कथा.
स्वप्नवेडी! चाप्टर -२

? प्रस्तावना?

ही कथा आहे एका अंतर्मूख मुलीची... त्यातून तिला येणाऱ्या नैराश्याची. याचा सामना ती आयुष्यभर कसा करते आणि ते करत असताना तिची जीवनव्यथा या कथेत मांडायचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. आपल्या आजूबाजूला किंवा आपणही अशा अनेक प्रसंगांना तोंड दिलेलं असतं. पण बहुतांश वेळा यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडत नाही. जेव्हा सापडतो तेव्हा वेळ मात्र पूर्णपणे हाताबाहेर निघून गेलेली असते. तर याच मानवी भावनेला सखोलपणे साकारायचा प्रयत्न या कथेतून केला जाणार आहे. आशा आहे वाचकांना ही कथा आवडेल आणि यातून काहीतरी वेगळं अनुभवता येईल.

-*-*-*-*-*-*-*-*-

" स्वप्नाली अगं उठ, शाळेत जायचं नाही का तुला आज?" आई तिला उठवायचा प्रयत्न करत होती. पण ती मात्र गाढ झोपलेली.

अगदी नावाप्रमाणेच स्वप्नात रमायला आवडायचं तिला.. या वास्तविक जीवनात फक्त साचलेपण आणि दुय्यमपणा वाट्याला यायचा. त्यापेक्षा कल्पनेत मात्र सर्वस्व आपल्याच मनाप्रमाणे असायचं. म्हणून रोज ती रात्र कधी होतेय याचीच वाट पहायची. आणि ती रात्र संपूच नये असं तिला वाटायचं. पण दुर्दैवाने म्हणा की सुदैवाने तिची हक्काची समजली जाणारी रात्रही लवकरच सरायची. असंच तिला वाटायचं. आज काही केल्या तिला जाग येतच नव्हती. कारण काल रात्री तिने पाहिलेलं स्वप्न अजून पूर्ण झालंच नव्हतं. असं काय होतं तिचं स्वप्न बरं... आपल्याला जसं हवं होतं तसं जगणं अजून वाट्याला आलेलं नाही आणि पुढेही येईल याची शाश्वती नाही. मग निदान मरण तरी चांगल्या गोष्टीसाठी यावं असं तिला वाटत होतं. आणि आयुष्यभर ज्यांनी तिचा तिरस्कार केला त्यांच्या डोळ्यात निदान मरताना तरी तिच्यासाठी प्रेम बघायचं होतं तिला...

ती या स्वप्नात रममाण असतानाच तिच्या अंगावरची चादर खासकन् कुणीतरी ओढून घेतली. त्यामुळे ती दचकून जागी झाली. आणि उठणार तोच जोरात तिच्या कमरेत लाथ घातली. ते सगळं नेहमीचंच असलं तरी आज तिला प्रचंड वेदना होत होत्या. कारण कालच शाळेत कबड्डी खेळताना तिला तिचे मुक्का मार लागलेला. त्या वेदनेने तिच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. त्या आवाजाने घरातले सगळे अचानक काय झालं म्हणून बघायला आले. तर सोनालीने म्हणजेच स्वप्नालीच्या मोठ्या बहिणीने तिला जोरात हिसका देत लाथ मारलेली आणि त्या वेदनेने स्वप्नाली मात्र ओठ दाताखाली दाबत पोटात पाय घेऊन बसलेली...

" काय चाललंय हे सकाळी सकाळी... उगाच आरडाओरडा करून गाव गोळा करायची काय गरज आहे. माझी पूजा भंग झाली यामुळे.. " बाबा रागात म्हणाले.

" काही नाही बाबा. ही उठतच नव्हती. आणि इथलं आवरायचं होतं. किती वेळ पारोसं ठेवणार म्हणून मी तिला नुसतं हलवून उठवलं तर ती वेड घेऊन पेडगावला जातेय बघा कशी..." सोनालीने नाटकी स्वरात नेहमीप्रमाणे स्वताची कातडी वाचवण्यासाठी जे घडलं त्याच्या अगदी विरुद्ध सांगितलं. ते ऐकून तर बाबांची तार अजूनच सटकली.

" मी मी____" स्वप्नाली बोलतच होती की बाबांनी तिच्याकडे द्वेषपूर्ण नजरेने बघत मान फिरवली.

" ही मुलगी जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत कधीच या घरात शांतता नांदणार नाही. माझ्या एकुलत्या एक वंशाचा दिवा विझवून हिचं समाधान झालं नाही. ही म्हणजे माझ्या घराला लागलेली साडेसाती आहे. " बाबा अतिशय तिरस्कारित नजरेने बघत तिच्या आईला बोलत होते. आणि आपलं पातळ सांभाळत तिथून निघून गेले.

ते गेल्यावर सोनाली मात्र दात काढत हसत होती. आणि हसतच ती बाहेर गेली. स्वप्नाली मात्र या शब्दांनी चांगलीच दुखावली गेलेली. आधीच या दुखण्याची झळ कमी त्यात याची भर म्हणून तिला ते असह्य होत होतं. आईला तिच्याकडे बघून तिची कणव वाटत होती. स्वप्नाली मात्र मान खाली घालून तशीच अवघडून उठायचा प्रयत्न करत होती. आईने न राहवून तिला आधार द्यायचा प्रयत्न केला पण तिने तो नाकारला. आणि तशीच कण्हत बाथरूमच्या दिशेने गेली.

तर स्वप्नाली ही मोहितेंच्या म्हणजेच एका मध्यमवर्गीय कुटूंबातील द्वितीय मुलगी होती. जन्मतः तिला एक जुळा भाऊ होता. पण तो या जगात येतानाच एका दुर्धर आजाराने पीडित होता. आणि यामुळेच वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी तो काळाआड जात अल्पायुषी ठरला. पण या सगळ्या गोष्टीचं गालबोट मात्र त्याची जुळी बहिण असलेल्या स्वप्नालीवरच लागलं. तिनेच तिच्या भावाला आणि तिच्या घराच्या वंशाला गिळलं असंच सगळ्यांना वाटायचं. त्यात तिचे वडिल प्रखर सनातनी विचारांचे आणि पुरूषसत्ताक व्यवस्थेचे पुढारीच... म्हणून त्यांनी त्यानंतर कधीच स्वप्नालीला वडिलांचं प्रेम दिलेलं नव्हतं. पण या सगळ्यात त्या निष्पाप जीवाचा मात्र जन्मापासून सगळे दुस्वास करत आलेले... यात तिची चुक काय हे तिला माहित नव्हतं. पण जबाबदार मात्र तिलाच धरलं जायचं. म्हणून ती काळानुरूप जास्तच एकलकोंडी आणि कुठेतरी हरवलेली असायची. स्वता स्वताचं अस्तित्व शोधायचा प्रयत्न करायची. पण तिच्या पदरी निराशाच पडायची. परिणामी ती इतरांच्या तुलनेत जरा जास्तच आत्ममग्न आणि अंतर्मूख झाली.


क्रमशः

🎭 Series Post

View all