स्वप्नवेडी! चाप्टर -३

एका अंतर्मूख मुलीची संघर्षगाथा...
स्वप्नवेडी! चाप्टर -२


स्वप्नाली आता १४ वर्षांची होती. शाळेत अभ्यासात हुशार आणि तितकीच चाणाक्ष होती. तिला वक्तृत्वाची प्रचंड आवड होती. पण तिला तशी कधी संधी मिळालीच नाही. वर्गातील इतर मुली नेहमी तिला एकटं पाडायच्या. कारण ती हुशार होती यात शंकाच नव्हती. पण तरीही त्या गोष्टीचा असा आगळावेगळा सूड उगवण्यासाठी कायमच सगळीकडे तिचा दुस्वास केला जायचा. तिला आता या सगळ्याची सवयच झालेली. खरं तर आधी तिला वाईट वाटायचं, भाऊ गेल्यापासून ती सतत रडायची. त्यात तिच्या जखमांवर मीठ चोळतानाच ती जखम कायम कशी धगधगत राहील याचीच काळजी घ्यायचे सगळे... दिवसभर सगळं सहन करून रात्री मात्र अश्रूंना वाट मोकळी करून द्यायची. तोंड दाबून दबक्याच आवाजात ती रडत बसायची. आणि जरी कुणी तिला रडताना बघितलं तरी त्यांना फरक पडायचा नाही. म्हणूनच तिच्या रडण्याने काही होणार नसेल तर रडून का अश्रू वाया घालवायचे. कुणाचं प्रेम तर सोडाच पण फक्त एकदाही कुणाला तिच्याकडे आपुलकीने बघावं असं वाटणार नसेल तर तिची आणि तिच्या अश्रूंची किंमतच काय होती. जे पुसायला तिच्याकडे कुणी फिरकणार नव्हतं.

जसजसं तिला कळत गेलं तसतसं तिच्या परिपक्वतेने हिमालयाएवढी उंची व्यापण्यास सुरूवात केली होती. ती फक्त वाचत रहायची. हातात जे पडेल ते वाचायची. अगदी अभ्यासातले न शिकवलेले धडेही ती वाचायची. आणि याच वाचनाचा परिणाम तिला तिचा रिझल्ट आल्यावर दिसायचा. बाकी कुणाला काही वाटो अथवा न वाटो पण काही शिक्षक मात्र तिच्या हुशारीला आवर्जून दाद द्यायचे. पण ती मात्र एकटेपणाने इतकी वेढलेली होती की तिला कुणासमोर नेमकं काय बोलायचं कळायचं नाही. ती फक्त अबोल रहायची. पण तिच्या ज्ञानाचा साठा मात्र इतक्या कमी वयात अवाढव्य होता.

नववीचे वर्ग संपून आता दहावीचे क्लास सुरू झालेले... नववीमध्येही तिने वर्गात तिसरा नंबर पटकावला होता. आणि आता दहावीचाही त्याच जोमाने अभ्यास सुरू केलेला. कारण इतरांप्रमाणे बाहेर ट्यूशन लावणं तिला परवडत असलं तरी कुणी तिच्यासाठी असं काही करायला तयार होणार नव्हतं. म्हणून ती जास्तीत जास्त स्वयंअध्ययनावर लक्ष केंद्रित करत होती.

आणि अशातच एके दिवशी एक नवीन मुलगा त्यांच्या वर्गात अॅडमिशन घेऊन आला. तो अतिशय देखणा आणि हॅन्डसम होता. तो नवीन असल्याने पहिल्याच दिवशी सर त्याला सर्वांसमोर बोलवून त्याची सगळ्यांना ओळख करून देत होते.

" हे बघा सर्वांनी जरा इकडे लक्ष द्या. हा अखिलेश दिवेकर नवीन विद्यार्थी आहे. खरं तर हे वर्ष तुमचं शाळेतलं शेवटचं वर्ष आहे. पण त्याचं तुमच्यासोबतचं हे पहिलं आणि शेवटचं वर्ष असेल. त्यामुळे त्याला सर्वांनी समजून घ्या. " सरांनी त्याला सर्वांसमोर बोलवत सगळ्यांना सांगितलं. तसं सगळ्यांनी हो सर म्हणत सरांची आज्ञा स्विकारली.

अखिलेश रूबाबदार होता. आणि त्याला वरून ते खालपर्यंत न्याहाळताच कुणाच्याही लक्षात येईल की तो अतिशय सुखवस्तू घरातला होता. वर्गातल्या सगळ्या मुली तर त्याला बघताच त्याच्यावर फिदा झालेल्या. आणि मुलंही त्याचा एकूण रोब पाहता त्याच्या मागे पुढे करत होते. हे मधल्या सुट्टीत वर्गात चाललेल्या कुजबुज आणि सगळ्यांच्या वागण्यावरून दिसत होतं. सगळे जण त्याला आपलं नाव सांगून त्याच्यावर इम्प्रेशन पाडायचा प्रयत्न करत असताना स्वप्नाली मात्र तिच्या बेंचवर एकटीच बसून पुढचा तास कधी सुरू होतोय याची वाट बघत बसलेली.

अखिलेशला सगळ्यांचं हे असं बळेच गोड बोलणं वागणं दिसत होतं. पण त्याचं लक्ष एकट्याच बसलेल्या स्वप्नालीकडे गेलं. बारीक अंगकाठीची, मध्यम उंचीची, दिसायला नाकी डोळी छान होती पण तिचं साधं आणि जरासं गबाळं राहण्यामुळे तिच्याकडे कुणी फारसं आकर्षित व्हायचं नाही. पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. जे तिच्या अभ्यासू आणि चातूर्याचं दर्शन घडवत होतं. आणि तेच अखिलेशने पाहिलं. तो तिचं एकटक निरीक्षण करतोय हे स्वप्नालीच्या लक्षात आलं. पण यामुळे आनंद न होता तिच्या चेहऱ्यावर जरासे गोंधळलेले भाव निर्माण झालेले. हेही अखिलेशने नोटिस केलेलं. दरवेळी तो कोणत्याही मुलीकडे पाहत असला की त्या मुली भलत्याच खूश व्हायच्या. किंवा तो पून्हा पून्हा त्यांच्याकडे पाहत राहावा म्हणून त्याचं अटेन्शन मिळवण्यासाठी धडपडायच्या. पण ही मुलगी तर साधं बघतही नाही याचं त्याला आश्र्चर्य वाटत होतं. काहीही झालं तरी हिच्याबद्दल माहिती काढायची आणि तिच्याशी ओळख करून घ्यायची असा निर्धार त्याने केला. तेवढ्यात पुढील तासाचे सर आले आणि तास सुरू झाला.


क्रमशः
काय वाटतं तुम्हाला स्वप्नाली आणि अखिलेश बद्दल? त्यांच्यात खरोखर प्रेमाचे बंध जुळतील का? की हे फक्त एक तारूण्यात पदार्पण करण्यापूर्वीचं आकर्षण ठरेल?
कृपया कमेंट करून कळवा तुमच्या प्रतिक्रिया... आणि सांगा ही कथा तुम्हाला आवडतेय की नाही... धन्यवाद!

🎭 Series Post

View all