Login

ड्रिंक दोन छोटया गोष्टी.

Drinks Two Short Stories
©®विवेक चंद्रकांत

1) त्यादिवशी अगदी किरकोळ कारणावरून दंगा झाला आणि त्याला ऑफिस सुटताच तडक घरी यावे लागले. एरवी रोज ऑफिस सुटल्यावर बार मध्ये जाऊन ड्रिंक घेऊन बऱ्याच उशिरा तो घरी जात असे. मग जेवण आणि झोप. पण आज सगळेच गडबडलं. आता दारू मिळणे शक्यच नव्हते. घरीही एखादी बॉटल शिल्लक नव्हती. तो स्वतःवरच चिडला. पण इलाज नव्हता.

अखेर बऱ्याच उशिरा तो जेवायला बसला. आज पोटात दारू नसल्याने जेवण जाणार नाही असेच त्याला वाटले. पण तसे झाले नाही. बऱ्यापैकी जेवण गेले.झोप लगेच लागणार नव्हतीच. तो थोडयावेळाने सहज स्वयंपाकघरात डोकावला तर त्याची बायको जेवत होती. म्हणजे? ही रोज आपले जेवण झाल्यावर जेवते? त्याला ती केव्हा जेवते तेच आठवेना. आपण खूप उशिरा येतो त्यामुळे ती आधीच जेवत असावी असे त्याला वाटायचे.

तो दुसऱ्या दिवशी मुद्दामच उशिरा घरी गेला. दारू त्याने कमीच घेतली. त्याचे जेवण करुन तो झोपायला गेला पण झोपला नाही. थोडयावेळाने तो स्वयंपाक घरात आला तर त्याची बायको जेवत होती. तो तिच्याशेजारी बसला.

"झोपला नाही?"

"नाही. तू रोज माझे जेवण झाल्यावर जेवण करते?"

"हो."

" केव्हापासून? "

"खूप दिवसांपासून. खरेतर खूप वर्षांपासून." ती शांतपणे म्हणाली.

"माझ्या लक्षात कसे आले नाही?"

" तुम्ही जेवण करून झोपून जातात. कसे लक्षात येईल?"

त्याला एकदम भरून आले. तिचा हातावर हात ठेवत तो म्हणाला.

"उद्यापासून मी ऑफिसमधून मी लवकर येत जाईल. आपण सोबत बसत जाऊ जेवायला."

तिने प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिले. "आणि?...."

"आणि हो... उद्यापासून दारू सोडली.. कायमची." तो निश्चयाने म्हणाला.

2) त्याचे खरेतर बायकोवर प्रेम होते. पण दारू मात्र सुटत नव्हती. रोज संध्याकाळी तो पिऊन आला की त्याच्यात वाद व्हायचे.

त्याची बायको एकदा आजारी पडली. किरकोळ दुखणे म्हणता म्हणता हॉस्पिटल ला ऍडमिट करावे लागले. दोनचार दिवसात निदान झालं. कॅन्सर.. Third स्टेज. तो उन्मळून पडला. पण तरी वरवर तिच्या समोर सर्व काही ठीक असल्याचा मुखवटा ठेवण्याचा प्रयत्न करत राहिला. संध्याकाळ झाली तसे तिने त्याला जवळ बोलवले.

"मला कॅन्सर निघाला ना?"

" नाही ग. कोणी सांगितले तुला? "

"सकाळपासून तुमचा चेहरा उतरलेला आहे. मला लपवून अश्रू पुसत आहेत. मला समजणार नाही असे वाटले का तुम्हांला?"

"नाही. अजून रिपोर्ट आलेलाच नाही."

"मला फसवू नका. टेन्शन घेऊ नका. संध्याकाळ झालेली आहे. तुम्ही जा आणि ड्रिंक घेऊन या. त्याशिवाय तुमच्या डोक्यातले विचार जाणार नाही."

त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले.

"खरच जा."ती पुन्हा म्हणाली.

रोज ड्रिंक घेतात म्हणून भांडणारी आज स्वतःहून ड्रिंक घ्यायला सांगते. त्याला एकदम भडभडून आले.
तिचा हात हातात घेत आपल्या अश्रूना वाट देतं तो म्हणाला..
"आजपासून ड्रिंक सोडली.... कायमची. तू बरी हो फक्त."

©®डॉ. विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.

0