संध्याकाळचा सातचा सुमार. हिवाळ्याचे दिवस असल्याने एव्हाना चांगलेच अंधारून आले होते. मीनल अॉटोरिक्शाने चौकात उतरली. ती काम करत असलेल्या कॉलेजमधे प्राध्यापकांसाठी ट्रेनिंग आयोजित केल्याने आज तिला परतायला उशीर झाला होता. सावकाश चालत ती तिच्या घरी निघाली. चौकातून थोडे पुढे आल्यावर मोकळ्या मैदानातून जात असताना सहज तिचे लक्ष मैदानाच्या कडेला असलेल्या एका झाडापाशी गेले. स्ट्रीटलाईट च्या अंधूक प्रकाशात नववार साडी नेसलेली, कपाळावर मोठे कुंकू लावलेली एक ग्रामिण स्त्री झाडाला टेकून उभी असलेली तिला दिसली. ती स्त्री एकटक मीनल कडे पहात होती. का कोण जाणे? पण त्या स्त्री ची आरपार भेदून जाणारी नजर पाहून मीनल च्या अंगावर सरसरून काटा आला. तिने आसपास पाहिले. मैदानात दूरवर काही मुलं फुटबॉल खेळत होती. पण जवळपास कोणीच दिसत नव्हते. तिने आपल्या चालण्याचा वेग वाढवला. आजकाल हे असंच व्हायचं. लहान सहान गोष्टींनी ती अस्वस्थ व्हायची. जरा मनाविरुद्ध झालं की तिच्या डोळयांत पाणी यायचं. काही दिवस माहेरी राहून कालच ती परत आली होती. माहेरी असताना तिच्या आईशी बोलताना तिच्या मनाची ही अवस्था तिने सांगितली होती. त्यावेळी आईने तिची समजूत काढली होती की "गर्भारपणात असे होते कधीकधी. त्यात तुला बरेच दिवस वाट पहावी लागली आहे. त्यामुळे मन साहजिकच हळवं झालं असणार." मीनल आणि अजयला लग्नानंतर पाच वर्षं वाट पाहून बाळाची चाहुल लागली होती. नुकताच तिसरा संपून चौथा महीना लागला होता. सर्व सुखरूप व्हावं यासाठीच ती माहेरच्या कुलदेवतेचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी गेली होती.
मीनल गेट उघडून घराच्या मुख्य दरवाजापाशी आली. अजय अजून आलेला दिसत नव्हता. कुलुप काढून ती सरळ माडीवरच्या आपल्या खोलीत फ्रेश होण्यासाठी निघाली. हातपाय धुवून, कपडे बदलून ती सहज खोलीच्या गॅलरी चे दार उघडून, गॅलरीत आली. बाहेर झोंबणारा गार वारा सुटला होता. अंगावरची शाल अजूनच लपेटून घेत तिने सहजच गेटसमोर नजर टाकली आणि भीतीची एक लहर तिच्या अंगातून सरसरत गेली. तिने मघाशी घरी येताना पाहिलेली ती स्त्री गेटसमोरील गुलमोहराच्या झाडाला टेकून उभी होती आणि एकटक नजरेने मीनलकडे बघत होती. मीनलने पटकन गॅलरीचे दार बंद केले आणि ती थरथरत दाराला पाठ टेकून उभी राहिली. भर थंडीतही तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. वातावरणात एक प्रकारची नकारात्मकता आणि औदासीन्य भरून राहिले होते. अचानक दारावरची बेल कर्णकर्कश्शपणे वाजली. मीनल खूपच घाबरली. तिला वाटले ती स्त्री घरात येऊ पहात आहे. तिच्या हातापायांचा कंप वाढला. दारावरची बेल पुन्हा दोन तीन वेळा वाजली. पाठोपाठ अजय चा आवाज आला. "मीनू !!" तिच्या जीवात जीव आला. पायर्या उतरून ती खाली दारापाशी आली. दार उघडून अजयला बिलगून ती हमसाहमशी रडू लागली. "काय झालं मीनल? मला सांगशील का?"
"ती. . . ती. . .बाई. . .मला खूप भीती वाटतेय अजय." एवढे बोलून ती पुन्हा रडायला लागली. अजयने आत येउन दार बंद केले. तिला डायनिंग टेबलपाशी खुर्चीवर बसवून, तांब्यातील पाणी पेल्यात ओतून प्यायला दिले.
"शांत हो मीनू. .आता मला सांग. . कुठल्या बाईबद्दल बोलते आहेस ? "
तिने अजयला ती कॉलेजमधून घरी येताना पासून ते गॅलरीतून गेट च्या समोर झाडाखाली ती स्त्री दिसेपर्यंत ची हकिकत सांगितली.
"अगं एवढंच ना ? तु त्या बाईला बघितल्यावर तिच्याच विचारात असशील. म्हणून तुला ती परत दिसल्याचा भास झाला असेल. मी आलो तेव्हा तर कोणीच नव्हते तिथं. उगाच नको ते विचार करू नकोस. तु जास्तीत जास्त आनंदी रहायला हवं. असं घाबरण्याने आपल्या बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो." अजयने तिची समजूत काढली.
"चल. जेवायला बसू. मी हातपाय धुवून येतो."
मीनलने , त्याच्या समाधानासाठी हसून मान डोलावली. पण तिचे मन कुठल्यातरी अनामिक, अभद्र आशंकेने काळवंडून गेले. तिने पटकन कुकर गॅसवर चढवला आणि कोशिंबिर करायला घेतली.
रात्री दोनच्या सुमारास तिला अचानक कसल्याशा आवाजाने जाग आली. तीने कूस पालटली आणि जवळच गाढ झोपलेल्या अजयकडे तिची नजर जाताच ती मोठ्यांदा किंचाळली. अजय जागेवर नव्हता. त्याच्या जागेवर संध्याकाळी पाहिलेली तीच बाई झोपली होती. मीनलला जाग येताच ती बाई तिच्याकडे वळून, भेदक नजरेने एकटक पाहू लागली. तिची नजर जणू काही जाळ ओकत होती.
"मीनू . . उठ. जागी हो. अगं केवढ्यांदा किंचाळतेस?"
अजय तिला जागं करत होता. केव्हढं भयानक स्वप्न पडलं होतं तिला. भीतीने ती घामाघूम झाली.
रात्री झोप नीट न झाल्याने तिला सकाळी अजिबात उठावेसे वाटत नव्हते. 'आज सुट्टी टाकावी का? ' ती विचार करू लागली. पण अजय दिवसभर घरात नसणार आणि एकटीने एव्हढा मोठा दिवस घरात राहून पार करण्याची कल्पना तिला फार भयाण वाटली. बेमनाने ती उठली. साडेआठ झाले होते. अजय अॉफिसला जाण्यासाठी तयार होत होता. पोळ्यावाल्या मावशी पोळ्या आणि भाजी करून निघून गेल्या होत्या. तिने पटकन आवरून स्वतःसाठी चहा केला. चहा घेउन तिला जरा बरं वाटलं. तिने दोघांचे डबे भरायला घेतले.
आज अजयने त्याच्या कारने तिला कॉलेजला सोडले. तिचे शिकविण्यातही फारसे लक्ष लागत नव्हते. सकाळपासून पोटात ढवळत होते. जेवणाच्या सुट्टीत लंच बॉक्स उघडल्यावर अन्नाच्या वासाने तिला भडभडून आले. ती वॉशरुमच्या दिशेने धावली. बाहेर आली तेव्हा वॉशरुम बाहेर कोणीही नव्हते. पण वॉशरूम बाहेरच्या पॅसेजच्या टोकाशी कोणीतरी उभं आहे आणि तिच्याकडे रोखून पाहत आहे, असा भास तिला झाला. ती घाई घाईने स्टाफ रूमकडे वळली.
घरी परत येताना अाज ती रिक्षाने घरापाशीच उतरली. कालच्या प्रसंगांची पुनरावृत्ती तिला नको होती. अाज तिला खूप थकल्यासारखे वाटत होते. घरात येऊन तिने सर्व खोल्यांतील लाईट चालू केले. वॉटर फिल्टरमधून ग्लासात पाणी ओतून ग्लास तोंडाला लावणार एवढ्यात तिला कोणीतरी पाठीमागे उभे असल्याचा भास झाला. वळून पाहते तर कोणीही नव्हते.
त्या दिवसापासून तिला घरात त्या दोघां व्यतिरिक्त अजून कोणाचे तरी अस्तित्व जाणवत राहिले. कुणीतरी सतत तिला पहात आहे, ती जिथे जाईल तिथे तिचा पाठपुरावा करत आहे. असं तिला वाटत होतं. दोन तीनदा तिने अजयला सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिच्या मनाचे खेळ आहेत, असं समजावून तिला उडवून लावलं. तिला धड जेवण जात नव्हते. बळे बळेच खाल्लेले चार घासही उलटून पडत होते. ती खूप अशक्त झाली होती. अशा अवस्थेत कॉलेजला जाणे शक्यच नव्हते. त्यामुळे तिने फोनवरून कॉलेजमध्ये कळवून काही दिवसांची रजा टाकली. अजय ऑफिसमधून सुट्टी काढून, घरी राहून तिची पूर्ण काळजी घेत होता. घरातली थोडीफार काम करणं, तिला डॉक्टरकडे नेणं, बळेबळेच तिला खायला घालणं, तिला मानसिक आधार देणं हे सर्व तो मनापासून करत होता. तो जवळ असला कि तेवढ्या पुरती ती ठीक असायची. पण जास्त दिवस रजेवर राहणं अजयला शक्य नसल्याने त्याने मीनलची काळजी घेण्यासाठी तिच्या आईला बोलावून घेण्याचे ठरवले. मीनलच्या आई, सुलभाताई दोनच दिवसांत तिच्या काळजीने तिथे हजर झाल्या. आईच्या येण्याने सुद्धा मीनलच्या तब्येतीत फारशी सुधारणा नव्हती. डॉक्टरांच्या मते मीनल आणि तिचे बाळ शारीरिक दृष्ट्या व्यवस्थित होते पण असंच चालू राहिलं तर बाळाला निश्चितच धोका होता. मीनल दिवसें दिवस मनाने खचत चालली होती. अशातच तिला चौथा संपून पाचवा महिना लागला.
एक दिवस दुपारी आराम करत असताना तिचा डोळा लागला आणि तिला स्वप्न पडले, स्वप्नात तिने पाहिले की एका गर्भार बाईला काही लोक बळजबरीने घराबाहेर काढत आहेत, त्या झटापटीत ती पायऱ्यांवरून पडून तिचा गर्भपात होऊन ती बेशुद्ध पडली आहे आणि रक्ताचे पाट वहात आहेत. ती रडतच दचकून जागी झाली. तिच्या जवळच मासिक वाचत पडलेल्या सुलभाताईंनी तिला शांत केलं. तिने त्यांना तिच्या स्वप्नाबद्दल सांगितलं. ते ऐकून त्यांचा चेहरा पडला. "काय झाले आई?" आईचा चेहरा पाहून मीनलने विचारले, "काही नाही. . . काळजी वाटते तुझी. ." "आई ! तू माझ्यापासून काहीतरी लपवते आहेस. माझ्या स्वप्नाबद्दल सांगितल्यावर तु खूप अस्वस्थ झाल्या सारखी वाटते आहेस. प्लीज. . काय आहे ते सांग मला." "काही नाही गं. . तु आराम कर बघु. ." असे म्हणत सुलभाताईंनी पदराने आपले अश्रू टिपले.
बारा वर्षांपूर्वीचा प्रसंग जसाच्या तसा त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. पण त्याबद्दल मीनलला काहीही सांगणे त्यांना उचित वाटले नाही. सुलभाताईंना आठवले बारा वर्षांपूर्वी त्यांचे गावाबाहेरील शेत दिनकर रावांनी म्हणजे मीनलच्या वडिलांनी त्यांच्या दूरच्या भावाला विकण्याचे ठरवले होते. भावाला लवकरात लवकर शेताचा व्यवहार करून हवा होता. त्या शेतात दोन खोल्यांचे छोटे घर होते. तिथे सुदाम आपली पत्नी रखमा सोबत राहात होता. काही वर्षांपासून दिनकर रावांनी त्याला शेताची राखण करण्यासाठी नेमले होते. दिनकर रावांच्या भावाला ते घर रिकामे करून हवे होते. त्याशिवाय शेताचा व्यवहार पूर्ण करायला तो तयार नव्हता. दिनकर रावांनी सुदामला घर खाली करण्यास सांगितले होते. पण रखमा गर्भार असल्याने आणि हिवाळ्याचे दिवस असल्याने सुदाम त्यांना काही महीन्यांची मुदत मागत होता. त्यासाठी त्यांच्या विनवण्या करत होता, "मालक फकस्त तीन चार महिने दम खावा . . बाइल पोटुशी हाय. .तिला घिउन या मरणाच्या थंडीत आम्ही कुठं जावं?" पण दिनकरराव ऐकायला तयार नव्हते. "ते तुझं तू बघ. . मला जागा लवकरात लवकर रिकामी करून हवी. . नाही तर तुला जबरदस्तीने बाहेर काढणं मला काही कठीण नाही. "
सुदाम - रखमा जागा सोडण्याचे मनावर घेत नाही हे पाहून एके दिवशी दिनकर रावांनी चार पाच गुंड प्रवृत्तीची माणसं सोबत घेतली आणि सुदाम - रखमाचे सर्व सामान शेतातील घरातून काढून बाहेर फेकले.
त्या दोघांना दंडाला धरून, ओढत त्या गुंडांनी बाहेर काढले. या झटापटीत रखमा पोटाच्या भारावर पायऱ्यांवरून गडगडत खाली पडली आणि तिचा गर्भपात झाला. दिनकरराव आणि ते गुंड तेथून निघून गेले. काही लोकांच्या मदतीने सुदामने रखमाला दवाखान्यात दाखल केले. बाळ तर गेलेच होते. तीही वाचू शकली नाही. या घटनेनंतर सुदाम ने घरी येऊन सुलभाताईंना रडत रडत सगळी हकिकत सांगितली आणि जाता जाता एवढेच म्हणाला, "बाईसाहेब ! माझ्या संसाराची राखरांगोळी झाली. ज्या परिस माझ्या वाट्याला दुःख आलं त्यापरीस तुमच्या पोरा बाळांचे हाल होतील, हा माझ्या रखमाचा शाप आहे. ती सोडणार नाय तुमच्या पोरा बाळांला." त्याचा तो तळतळाट आठवून सुलभाताईंच्या मनात चर्र झालं. त्यांच्या मनात अशुभाची पाल चुकचुकली. असाच एक आठवडा गेला. मीनलची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. बाळाच्या हालचाली मंदावल्या होत्या. तिला वरचेवर सलाईन लावावे लागत होते.
एक दिवस अशक्तपणामुळे ग्लानी येऊन तिला गाढ झोप लागली. संध्याकाळचे साडेसहा वाजले तरी ती उठली नव्हती. सुलभाताई स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होत्या. अचानक खूप गार वारा सुटला. हुडहुडी भरावी एवढी थंडी जाणवून मीनलला जाग आली. खोलीत अंधार होता. जिन्यातल्या लाईटचा अपुरा प्रकाश खोलीत येत होता. त्या प्रकाशात तिला पलंगाच्या कडेला कुणीतरी उभे असल्याचं जाणवलं. ती उठून बसली आणि घाबरून बघू लागली. भीतीची एक थंड लाट तिच्या अंगभर सळसळत गेली. पलंगाच्या कडेला तीच बाई उभी होती. तिच्याकडे भेदक नजरेने, रोखून पहात. आज तिच्या चेहऱ्यावर एक विकट, अमानवीय हास्य पसरले होते. पुढे सरकत मीनलच्या दिशेने, हात लांबवून तिने मीनलला तिच्या बरोबर येण्याची खूण केली. विलक्षण घाबरून, क्षणार्धात मीनल उठली, खोली बाहेर पळाली आणि घाईघाईने, धावत, किंचाळत पायऱ्या उतरू लागली. उतरताना अचानक तिचा तोल गेला आणि ती गडगडत पायऱ्यांवरून जोरात खाली आदळली. प्रचंड रक्तस्त्राव होऊन ती तिथेच बेशुद्ध झाली. तिच्या आवाजाने धावत आलेल्या सुलभाताईंनी रडत, ओरडत आसपासच्या लोकांना बोलावून, अॅम्ब्युलन्स मागवून तिला हॉस्पिटलला दाखल केले. तेथूनच अजयला त्यांनी फोन लावला.
आज आठ दिवसांनी मीनल हॉस्पिटलमधून घरी परतली होती. भकास, रिती, रिकामी. अजय स्वतःचे दुःख लपवुन, तिची त्याच्या परिने समजूत काढत होता. सुलभाताई मात्र हे दुष्टचक्र कधी संपणार. . . संपणार की नाही??? हा विचार करत खिन्नपणे बसल्या होत्या.
****************************************************
दुष्टचक्राचा अंत
मीनल अाज विशेष खुशीत होती. त्याला दोन कारणं होती. एकतर आज तिच्या आणि अजयच्या लग्नाचा सातवा वाढदिवस. दुसरं म्हणजे तिला पुन्हा बाळाची चाहूल लागली होती. दोन वर्षांमागे तिचा पाचव्या महिन्यात पायऱ्यांवरून पडून गर्भपात झाला होता. त्यानंतर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सावरायला तिला तीन चार महिने लागले होते. कॉलेजमधील प्राध्यापिकेच्या तिच्या नोकरीमुळे तिला सावरायला फार मदत झाली होती. आता मात्र पहिल्यापासून काळजी घ्यायची, स्वतःला जपायचं असं तिने मनोमन ठरवलं होतं. आज अजय ऑफिसमधून आल्यावर ही गोड बातमी ती त्याला सांगणार होती. दारावरची बेल वाजली. मीनलने दार उघडले. "आज खूप खुशीत दिसतेस. . काय विशेष?" अजयने आत येत विचारले. उत्तरादाखल तिने त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकून त्याच्या कानात ती गोड बातमी सांगितली. "अरे वा! मग आज डबल सेलिब्रेशन. . कुठे जायचं डिनरला? सांग. ." आनंदाने तिला उचलून घेत अजय म्हणाला. "नको, घरी पार्सल मागवू या. . मला बाहेर जायचा कंटाळा आलाय." "ओके. . जैसी आपकी मर्जी. " असं हसून म्हणत पार्सलची ऑर्डर देण्यासाठी अजयने मोबाइल हातात घेतला.
बाळाची चाहूल लागल्याने अजय-मीनल आनंदात होते. पण या आनंदाला काळजीची किनार होती. कॉलेजच्या फुल टाइम नोकरीमुळे आणि शिकवण्या व्यतिरिक्तच्या कॉलेजमधील इतर जबाबदाऱ्यांमुळे मीनलला खूप थकायला व्हायचं. त्यामुळे तिने दीर्घकालीन रजा घेण्याचे ठरवले. अजय ज्या कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करत होता त्या कंपनीचे एक प्रोजेक्ट रत्नागिरीत सुरू होणार होते. रत्नागिरी मीनलचे माहेेर. तिथे तिची काळजी घ्यायला तिची आई होती. म्हणून अजयने वरिष्ठांकडे विनंती करून या प्रोजेक्ट चे काम स्वतः कडे घेतले. लवकरच दोघे रत्नागिरीला जाण्याची तयारी करू लागले. मीनलच्या माहेरच्या घराजवळच त्यांनी तीन खोल्यांचे एक बैठे घर भाड्याने घेतले.
रत्नागिरीत आल्यावर मीनल चा वेळ मजेत जाऊ लागला. सकाळी नऊ वाजता जेवणाचा डबा घेऊन अजय ऑफिसला गेला, की मीनल स्वतःचं आवरून आईकडे जायची. आई बाबांशी गप्पा, वाचन, आराम यात संध्याकाळ केव्हा व्हायची, कळायचंही नाही. सुलभाताई हरतऱ्हेने आपल्या लेकीचे डोहाळे पूरवत होत्या. अजयची घरी येण्याची वेळ झाली की संध्याकाळी सहाच्या सुमारास मीनल घरी यायची. सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण सुलभाताईंच्या मनात थोडी धाकधूक होतीच. रोज त्या देवीला प्रार्थना करत, "आई नवदुर्गे ! माझ्या लेकीचं बाळंतपण सुखरूप होऊ दे. . बाळाला घेऊन दर्शनाला येईन." मीनलचे नाव रत्नागिरीतील अद्ययावत हॉस्पिटल मध्ये नोंदवले होते. दर पंधरा दिवसांनी ती सुलभाताईं बरोबर चेकअप ला जात होती.
पाहता पाहता नऊ महिने पूर्ण झाले आणि मीनलने एका गोऱ्यापान, गोंडस मुलीला जन्म दिला. अजय-मीनलला आनंदा बरोबरच एक जबाबदारीची जाणीव झाली. दिनकरराव-सुलभाताईंना आपल्या नातीला कुठे ठेवू अन् कुठे नको असे झाले. मीनलने मुलीचे नाव आर्या ठेवले. आर्या आई-बाबा आणि आजी-आजोबांच्या छत्रछायेत मोठी होऊ लागली. दिनकर रावांची ती विशेष लाडकी होती. तासंतास ते तिच्याशी खेळत असत. मीनलचा पूर्ण दिवस तिच्या संगोपनात कसा जायचा तिला कळायचे देखील नाही. अजयचे काम आता वाढले होते. त्यामुळे त्याला घरी यायला बरेचदा उशीर व्हायचा. या गडबडीत सुलभाताईंनी बोलल्याप्रमाणे नवदुर्गेच्या दर्शनाला जायचे राहून गेले होते. सगळं काही सुरळीत चाललं होतं. आर्या आता दोन वर्षांची झाली होती.
अलीकडे सुलभाताईंना एक गोष्ट खटकायची, दिनकरराव आर्याला घेऊन बसले असतांना, तिच्याशी खेळत असताना किंवा ती दुसऱ्या कोणाजवळ असताना सुद्धा दिनकरावांकडे रोखून, टक लावून बघत असे. बाकी कोणाला नाही, पण सुलभाताईंना हे चमत्कारिक वाटे. पण हा आपला भास असावा, अशी त्यांनी स्वतःची समजूत घातली होती. अजयला दोन दिवसांची जोडून सुटी आल्याने त्या सर्वांनी मुरुडला नवदुर्गेच्या दर्शनाला जाण्याचे ठरवले.
रत्नागिरीहून मुरुडला येईपर्यंतच्या प्रवासात आर्या अगदी गप्प होती. नेहमीचा तिचा खेळकरपणा कुठेतरी लुप्त झाला होता. जसजसं मंदिर जवळ येऊ लागलं तसतशी ती अधिकच बेचैन होऊ लागली. रडत, ओरडत स्वतःच्या दोन्ही हातात डोके दाबून धरत, हातपाय झाडू लागली. तिची ती अवस्था बघून सगळे काळजीत पडले. मंदिराशी गाडी थांबताच ती अधिकच जोरात किंचाळू लागली. गाडी खाली उतरून सगळे जण मंदिरात जाऊ लागले. पण आर्या गाडी खाली उतरायला तयार नव्हती. तिचे रडणे, ओरडणे, अंग टाकून देणे चालूच होते. मीनलने तिला गाडीतून ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताच तिने पूर्ण शक्तीनिशी मीनलला जोरात ढकलले. त्या अनपेक्षित धक्क्यामुळे मीनल भेलकांडत जमिनीवर पडणार एवढ्यात अजयने तिला सावरले. "आर्याची तब्येत बरी दिसत नाही. तुम्ही सगळे दर्शन घेऊन या, मी आर्या जवळ थांबतो. तुम्ही आल्यावर मी जाईन." अजय म्हणाला.
"अरे असं कसं? तिच्यासाठीच तर आपण दर्शनाला आलो आहोत. तिला . . . " सुलभाताईंचं आर्या कडे लक्ष जाताच त्यांचे शब्द हवेतच विरले. जळजळीत नजरेने आर्या त्यांच्याकडे रोखून पाहत होती. तिची ती विखारी नजर पाहून सुलभाताईंचा ठोका चुकला. मुरुड हून परत येताना गाडीत आर्याला सणकून ताप भरला. परतल्यानंतर दोन दिवस ती हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती. त्यानंतर वरचेवर आर्या आजारी पडू लागली. चांगली असली कि व्यवस्थित खायची, प्यायची, खेळायची. पण आजारी असली की मलूल होउन पडून राहायची. अजय मिनलने तिला मुंबईला नेऊन तिथल्या बालरोगतज्ज्ञा ला दाखवले. पण सगळे रीपोर्टस् नॉर्मल आले. काही निदान होऊ शकले नाही.
एके सकाळी दिनकरराव आपल्या खोलीत दाढी करत होते. आर्या त्यांच्या पलंगावर खेळण्यांशी खेळत होती. अचानक खेळणं सोडून ती आरशात दिसणाऱ्या दिनकर रावांकडे रोखून पाहू लागली. तिची नजर दिनकर रावांना चमत्कारिक वाटली. आरशातून पाहताना अचानक तिच्या जागी त्यांना एक नऊवार साडी नेसलेली, मोठं कुंकू लावलेली, मोकळे केस सोडलेली स्त्री दिसू लागली. त्या स्त्रीचा चेहरा रक्ताने माखला होता. तिच्या डोळ्यांच्या जागी फक्त खोबण्या दिसत होत्या. अतीव भीतीने त्यांनी मागे वळून पाहिले. आर्या शांतपणे आपल्या खेळण्यांशी खेळत होती. त्यांना वाटले आपल्याला भास झाला असेल. पण मनातून मात्र ते प्रचंड घाबरले. चौदा वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग जसाच्या तसा त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला.
चौदा वर्षांपूर्वी दिनकररावांचे गावाबाहेरील शेत त्यांनी त्यांच्या दूरच्या भावाला विकण्याचे ठरवले होते. भावाला लवकरात लवकर शेताचा व्यवहार करून हवा होता. त्या शेतात दोन खोल्यांचे छोटे घर होते. तिथे सुदाम आपली पत्नी रखमा सोबत राहात होता. काही वर्षांपासून दिनकर रावांनी त्याला शेताची राखण करण्यासाठी नेमले होते. दिनकर रावांच्या भावाला ते घर रिकामे करून हवे होते. त्याशिवाय शेताचा व्यवहार पूर्ण करायला तो तयार नव्हता. दिनकर रावांनी सुदामला घर खाली करण्यास सांगितले होते. पण रखमा गर्भार असल्याने आणि हिवाळ्याचे दिवस असल्याने सुदाम त्यांना काही महीन्यांची मुदत मागत होता. त्यासाठी त्यांच्या विनवण्या करत होता, "मालक फकस्त तीन चार महिने दम खावा . . बाइल पोटुशी हाय. .तिला घिउन या मरणाच्या थंडीत आम्ही कुठं जावं?" पण दिनकरराव ऐकायला तयार नव्हते. "ते तुझं तू बघ. . मला जागा लवकरात लवकर रिकामी करून हवी. . नाही तर तुला जबरदस्तीने बाहेर काढणं मला काही कठीण नाही. " सुदाम - रखमा जागा सोडण्याचे मनावर घेत नाही हे पाहून एके दिवशी दिनकर रावांनी चार पाच गुंड प्रवृत्तीची माणसं सोबत घेतली आणि सुदाम - रखमाचे सर्व सामान शेतातील घरातून काढून बाहेर फेकले. त्या दोघांना दंडाला धरून, ओढत त्या गुंडांनी बाहेर काढले. या झटापटीत रखमा पोटाच्या भारावर पायऱ्यांवरून गडगडत खाली पडली आणि तिचा गर्भपात झाला. दिनकरराव आणि ते गुंड तेथून निघून गेले. काही लोकांच्या मदतीने सुदामने रखमाला दवाखान्यात दाखल केले. बाळ तर गेलेच होते. तीही वाचू शकली नाही. त्यांच्या भूतकाळातील ही काळी बाजू त्यांना छळत होती.
आजही आर्याची तब्येत बरी नव्हती. तिला औषध पाजून, झोपवून मीनल रात्रीच्या स्वयंपाकाला लागली. अजय अजून आला नव्हता. अचानक तिला आर्या झोपली होती त्या खोलीतून काही तरी पडल्याचा आणि त्यापाठोपाठ आर्याच्या किंचाळण्याचा आवाज आला. तव्यावरची पोळी तशीच टाकून धावतच ती खोलीकडे धावली. पाहते तर काय खोलीतील सामान इतस्ततः विखुरले होते. ड्रेसिंग टेबल समोर आर्या उभी होती. मीनलने तिथल्या आरशावर चिकटवलेली मोठी लाल टिकली तिने आपल्या कपाळावर लावून घेतली होती. काजळाच्या डबीतील काजल डोळ्यात भरून घेतले होते. दोन वर्षांची गोड, नाजूक आर्या या क्षणी विलक्षण भीतीदायक दिसत होती. मीनलला पाहताच भयावह, भेसूर आवाजात ओरडत टेबलवरील फ्लॉवर पॉट उचलून तिने जोरात आरशावर भिरकावला. आरसा फुटून त्याचे तुकडे आजूबाजूला विखरून पडले. त्यातला एक मोठा काचेचा तुकडा उचलून, डोळयांत अंगार फुलवून, विकट हसत, "सोडनार नाय कुनाला. . ." असे ओरडत ती मीनलकडे धावली. अचानक काचेच्या तुकड्याचा कोपरा तिच्या हातात रुतून भळभळ रक्त वाहू लागले. ते पाहून ती कळवळून, केविलवाणी रडू लागली आणि रडता रडता तिची शुद्ध हरपली. तिची ती अवस्था पाहून मीनलच्या पायाखालची जमीन सरकली. धावत जाऊन तिने आर्याला उचलले आणि रिक्षा करून हॉस्पिटलला नेले. थोड्याच वेळात अजयही तेथे आला. त्याला पाहून मीनलचा बांध फुटला. झाला प्रकार तीनं त्याला सांगितला. "काय झालं असेल रे आपल्या आर्याला? असं का वागत असेल ती?" रडतच तिने अजयला विचारले, "अग टीव्हीवर काहीतरी पाहिले असेल. . किंवा झोपेत एखादे स्वप्न पडल्यामुळे ती अशी वागत असेल." अजयने मिनलची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण मनातून तो चरकला होता.
मध्ये बरेच दिवस निघून गेले. आर्या आता व्यवस्थित होती. थंडीचे दिवस होते. अशात एक दिवस दिनकर रावांनी गावाबाहेरील त्यांच्या भावाच्या शेतात सर्वांनी मिळून जाण्याचा बेत आखला. हेच ते शेत दिनकर रावांनी काही वर्षांपूर्वी आपल्या या दूरच्या भावाला विकले होते. सर्वजण शेतात आले. तेथील शांत वातावरण, चुलीवर शिजवलेले गरम जेवण, यामुळे सगळे मजेत होते. जेवण झाल्यावर सगळे बोलत बसले असताना आर्या दिनकर रावांचा हात ओढत बोबड्या स्वरात म्हणाली, "चला ना आजोबा. . लपाथपी खेलूयात. ." "अगं आत्ताच तर जेवलोय. .जरा वेळाने खेळू. ." पण ती ऐकायला तयार नव्हती. "बर. . चल खेळू या थोडावेळ. ." आर्या आणि तिचे आजोबा लपाछपी खेळायला शेतात बांधलेल्या जुन्या घराच्या बाजूला आले. "तु लप, मी तुला शोधतो. . पण जास्त दूर जाऊ नकोस. ." "बलं आजोबा. ." दिनकर रावांनी डोळे झाकले. "दहा. .वीस. .तीस. ." दिनकरराव आर्याला शोधू लागले. "आजोबा. . मी इथे आहे. ." आर्याचा आवाज त्या घरातून येत होता. पायऱ्या चढून त्या घरात जाउन दिनकरराव तिला शोधू लागले. "अाजोबा. ." 'अरे बापरे ! आर्या चा आवाज विहिरीजवळून येतोय. .' दिनकराव धावले. तिचा आवाज आता थेट विहिरीतून येत होता. घाबरून त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले. "आलात मालक. ." त्यांच्या मागून आवाज आला. वळून पाहिले तर काही अंतरावर आर्या उभी होती. तिच्या चेहऱ्यावरचे त्या दिवशी सारखेच क्रूर, विखारी भाव पाहून दिनकर रावांना थंडीतही घाम फुटला. थोड्याच वेळात त्यांना आर्याच्या जागी रखमा दिसू लागली. रक्ताने माखलेली, केस पिंजारलेली, सुळे बाहेर निघालेली आणि डोळ्यांच्या जागी फक्त काळ्या खोबण्या असलेली रखमा पाहून दिनकर रावांची बोबडी वळली. ओरडावंसं वाटत असूनही त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. हळूहळू ती त्यांच्या दिशेने येऊ लागली. दिनकरराव मागे सरकू लागले. अचानक तोल जाऊन ते कठडा नसलेल्या विहिरीत पडले.
आर्याच्या रडण्याने आरामात बसलेले सगळे विहिरीच्या दिशेने धावले. "आजोबा पान्यात पलले. ." असे म्हणत आर्या जोरजोरात रडत होती. दिनकर रावांना बाहेर काढले तोवर खूप उशीर झाला होता. हे जग सोडून ते केव्हाच निघून गेले होते. सुलभाताई आकांत करत शेतातील घराकडे पाहत म्हणत होत्या. "शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. ."
आज दिनकर रावांना जाउन तीन महीने झाले होते. पुन्हा एकदा सुलभाताई, अजय, मीनल आणि आर्या मुरुडला नवदुर्गेच्या दर्शनाला आले होते. देवीच्या मूर्तीसमोर हात जोडून उभी असलेल्या आर्याच्या गोड चेहऱ्याकडे पाहात असलेल्या सुलभाताईंना एका दुष्टचक्राचा अंत झाल्याची जाणीव झाली.
****************************************************
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा