मागील भाग येथे वाचा
https://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon---bhag-30_7730
"अरे, पण या ऋजुताचे काय? तिचा नक्की काय गैरसमज झालाय? कोणाला ओळखते ती? मी तर कोणाहीसोबत कधी गेली नाही कुठे. फार फार तर दादा किंवा मैत्रिणीच असतात सोबत माझ्या. ऋजुताला मी जेव्हाही भेटली तर दादाच होता माझ्यासोबत. मग हिला नक्की काय वाटले? दादाला पण आज ती लग्नाबद्दलच विचारत होती. आणि काय म्हणाली होती ? ", विधी आठवू लागली. "हं , तुझं कधीपासून विधीवर प्रेम आहे? अरे हे काय विचित्र? कधीपासून म्हणजे काय? भाऊ आहे तो माझा. लहानपणापासूनच प्रेम करणार ना माझ्यावर. तिला काही कन्फ्यूजन तर नाही झालंय ना?"
"अं, सांगता येत नाही , असू शकतं. नाव काय ग दादाचं तुझ्या?", रजत.
"विराज", विधी.
"ओके , मी बघतो नंतर. ते आज गावाला निघालेत. पोचले नसतील अजून", रजत.
.......
आता पुढे ...
इकडे ऋजुता, रेखाताई आणि राजशेखर कारने गावाला निघाले होते. अर्धेअधिक अंतर पार झाले होते. राजशेखर ड्राईव्ह करत होते , ऋजुता बाजूला आणि रेखाताई मागच्या सीटवर बसलेल्या होत्या. ऋजुता खिडकीतून बाहेर बघत बसली होती. मधेच फोनमध्ये बघत होती.
रजतचा तिला मेसेज आला , "ऋजू, पोचलात का तुम्ही ?"
"नाही रे, वेळ लागेल अजून. का रे?", ऋजू.
"अग थोडं बोलायचं होतं", रजत.
"मग बोल ना, विचारायचं काय त्यात?", ऋजू.
"अग नाही, तुझ्याशी बोलायचंय, आई बाबा पण असतील ना आता . बरं मेसेजच करतो ", रजत.
"हं बरं, काय झालं? ठीक आहे ना सगळं?", ऋजू.
"अग हो, तू मला सांग , तू म्हणाली होतीस ना की विधी कमिटेड आहे", रजत.
"हो , अरे तू अजूनही तिचा विचार का करतोय दादा? मी सांगितलं होतं ना तुला आधीच?", ऋजू.
"अग तेच तर. त्याचं नाव काय आहे? कोण आहे तो?", रजत.
"दादा, प्लीज तू आता यामध्ये पडून कोणाचे वैर ओढवून घेऊ नकोस बरं. मला काळजी वाटते तुझी. सोड ना तिचा विचार. ती काय एकटीच चांगली मुलगी आहे का जगात ? आपण असं कोणाच्या मध्ये पडू नये" , ऋजुताचे रजतला समजावणे सुरूच होते.
"अग नाही नाही, तुला वाटतय तसं मी काहीच करणार नाहीये . तू प्लीज फक्त नाव सांग ना त्याचे.", रजत.
"त्याचं नाव विराज आहे आणि आम्ही सगळे एकदा मंदिरात भेटलो होतो तेव्हा ते सोबतच होते . तिने स्वतः मला सांगितलं होतं की त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे. काल सुद्धा त्याच्या प्रोग्रॅमला ती आली होती ", ऋजूने सांगितलं.
रजतला आता हसावे की रडावे तेच कळत नव्हते. त्याने पुन्हा मेसेज केला .
" नाही ग, तसं नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. म्हणजे तिने जे सांगितलं ते बरोबर होतं पण तू समजतेय तसं नाही आहे", रजत.
"म्हणजे ? काय चाललंय तुझं दादा?", ऋजू.
इकडे रेखाताई आणि राजशेखर यांच्या गप्पा सुरु होत्या. ऋजुताही अधेमध्ये त्यात सामील होत होती. तिने पाण्याची बाटली काढली आणि पाणी पिऊ लागली.
"अग ऋजू, मगापासून बघतोय , कोणाशी एवढं बोलते आहेस? ", राजशेखर विचारत होते.
"काही नाही बाबा, दादाशी बोलत होती", ऋजुता.
"मग एवढं टाईप करण्यापेक्षा फोनवर का बोलत नाही सरळ? ", रेखाताई.
"अग आता आपण तिकडे गेल्यावर बिझी राहू ना, मग बोलता येणार नाही फारसं रजतला, म्हणून केला असेल ग त्याने. एकटा आहे न ग तो तिकडे, जाणवतं अस असल्यावर जरा", राजशेखर.
"या दोघांचेही विधी आणि विराजसारखेच आहे अगदी . बहिणीला भावाशिवाय करमत नाही, अन बहिणीला चिडवल्याशिवाय , जरा दादागिरी केल्याशिवाय भावालाही करमत नाही . काल विधी नाही का हो अशीच म्हणत होती, विराजदादा दादागिरी करतो म्हणे. थांब मीच कॉल करते रजतला ", म्हणत रेखाताईनी रजतला कॉल लावलासुद्धा.
इकडे विराजदादा शब्द ऐकताच पाणी पिता पिता ऋजुताला जोरात ठसका लागला .
कॉल सुरू झाला तसा रजतला खोकल्या चा आवाज ऐकू आला आणि त्याने विचारलं, "कोणाला एवढा खोकला येतोय ग ?"
"अरे, ऋजू पाणी पीत होती तिला ठसका लागलाय. तू बोल ना , काय म्हणत होतास? एवढे मेसेज करण्यापेक्षा फोनवरच बोलायचं ना रे", रेखाताई.
"अग काही नाही, असाच बोलत होतो तिच्याशी. कालच्या प्रोग्रॅम बद्दल", रजत.
"हं, अरे छान झाला प्रोग्रॅम", रेखाताई.
"आता परत कधी येणार तुम्ही गावाहून?", रजतने विचारलं.
"अरे माझं काय? या दोघांनी चला म्हटलं की निघायचं. पण या वेळी आत्याकडचं लग्न म्हटल्यावर एका शब्दानेही नाही न म्हणता बाबांनी पण सुट्टी काढलीय बऱ्यापैकी", रेखाताई हसत म्हणाल्या.
"झालं, मिळाला का चान्स तुम्हाला आम्हाला चिडवण्याचा?", राजशेखर हसत म्हणाले.
"हो मग काय?", रेखाताई.
"छान आहे, मस्त एन्जॉय करा सगळे", रजत म्हणाला. इकडे त्याची घालमेल सुरू होती की ऋजुला कसं सांगू आता.
अन इकडे ऋजुताला पण कळत होतं काहीतरी गोंधळ झालाय . "पण नक्की कोणाचा झालाय? माझा की आईबाबांचा की दादाचा?" , ऋजुता एकीकडे विचार करत होती आणि दुसरीकडे काही कळतही नव्हतं अन बोलताही येत नव्हतं त्यामुळे हताश झाली होती. रेखाताई अन रजत चे बोलणे सुरूच होते.
"काल कसा दिसत होतास रे? आज कसा छान दिसतोय खुशीत अन एकदम फ्रेश. असाच रहात जा रोज. कसा काय एवढा खुशीत ? जरा आम्हालाही सांग काय झालं ते", रेखाताई रजतला बघत म्हणाल्या. तसे ऋजुतानेही त्याला बघितलं.
"हो ना , बऱ्याच दिवसांनी दादा इतका खूष दिसतोय", ऋजुता.
"अग आई ते ... काही नाही... बऱ्याच दिवसांनी मित्रांसोबत बाहेर जातोय ना आता... म्हणून...", रजत अडखळत बोलला. "आईबाबांना विधी आणि माझ्याबद्दल नंतर जरा शांतपणे सांगावे लागेल . कसे रिऍक्ट करतील काय माहिती", रजत विचार करत होता.
"अच्छा, नीट जा रे बाळा", रेखाताई.
"हो ग आई, मी लहान आहे का आता? बरं ठेवू मग आता? नंतर बोलूया, बाय", रजत हसून म्हणाला.
"बाय", रेखाताई, ऋजू.
काही मिनिटे अशीच गेल्यावर ऋजुताला एक आयडिया सुचली.
"बाबा, आपण चहासाठी थांबू या ना एखाद्या चांगल्या ठिकाणी. मग नंतर मी ड्राईव्ह करेन . तुम्ही पण थकला असाल आता", ऋजुता.
काही वेळात ते एका ठिकाणी चहासाठी थांबले.
"आई, तुम्ही व्हा पुढे. मी आले एक फोन करून".
रेखाताई आणि राजशेखर पुढे जाऊन चहा वगैरे ची ऑर्डर देतात. ऋजुताने गाडी जवळ थांबून विराजला कॉल केला.
"हं बोल ऋजुता. गावाला जाणार होतीस ना? पोचलीस का? कसा काय फोन केलास गं? आठवण आली का माझी?", विराज हसून म्हणाला.
"अरे नाही पोचलो. आम्ही रस्त्यात आहोत अजून. तुला एक विचारायला फोन केला. मला सांग, तुझं आणि विधीच नातं काय रे?", ऋजुताला कधी एकदा त्याला विचारते असे झाले होते. तो काय म्हणाला ते लक्षातही आले नाही तिच्या.
"अग काय झालंय काय तुला? कालपासून आमच्या मागे पडली आहेस ?", विराज हसत म्हणाला.
"ए सांग ना रे लवकर . इथे काहीतरी घोळ झालाय. प्लीज तू सांग बरं लवकर", ऋजुता घाई करत म्हणाली.
"अग नातं काय म्हणून काय विचारतेस ? ती सख्खी बहीण आहे माझी", विराज.
"काय? बहीण?" , ऋजुताच्या आश्चर्याला पारावार नव्हता.
"होss. नाहीतर काय? तुला काय वाटलं?", विराज.
"अरे काही नाही. ही तर फारच गडबड झाली आहे. मला वाटलं की ... ", ऋजुता. आता हे कसे सांगू असे ऋजुताला वाटत होते.
"अगं की काय? बोल ना लवकर ", विराज.
"की ... की तुम्ही कमिटेड आहात एकमेकांशी", ऋजुताने शेवटी सांगून दिले.
"काय? अगं वेडी आहेस का तू?", विराज आश्चर्याने म्हणाला.
"सॉरी यार , काहीतरी ना गोंधळ झालाय. त्या दिवशी नाही का, मंदिरात आपण सगळे भेटलो तेव्हा विधी म्हणाली होती ना, की त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणून मी कन्फ्युज झाले रे . पण सॉरी सॉरी. एक्स्ट्रीमली सॉरी ", ऋजुता काहीशी खजील झाली होती, पण कशाचा काय माहिती तिला एक आनंदही होत होता. समाधानही वाटत होतं. काय काय होत होतं तिचं तिलाच कळत नव्हतं.
"हां, हो, ती तेव्हा म्हणाली होती तर खरं", विराज आठवून म्हणाला . "बापरे , बरं झालं आज क्लियर झालं ते. नाहीतर काही खरं नव्हतं", विराज म्हणाला.
"हो ना, किती मोठा गोंधळ झाला होता आणि किती मोठा गोंधळ आणखी होणार होता. थँक गॉड", ऋजुता चा स्वर जरा रिलॅक्स झाल्यासारखा वाटत होता.
"आता आणखी काय गोंधळ होणार होता ?", विराजने हे विचारताच ऋजुताने जीभ चावली , "अरे हे काय बोलून गेले मी" , तिला वाटले.
"अं, ते जाऊ दे, नाही न झाला तो", ऋजुता.
"बरं, पण आज तुला हे कसं कळलं ?", विराज ने प्रश्न केला.
"अरे, आई बाबा काल तुझ्याकडे गेले होते ना, तर ते म्हणत होते, विधी आणि विराजची पण अशीच माझ्या आणि दादा सारखी मस्ती सुरू असते. विधी म्हणाली की विराज दादागिरी करतो वगैरे. म्हणून कळलं मला", ऋजुता म्हणाली
"अस आहे तर? ठीक आहे, ठीक आहे. आता पुन्हा कन्फ्युज होऊ नकोस हं, नाहीतर माझी वाट लागेल", विराज हसून म्हणाला.
"काय म्हणालास? तुझी का वाट लागेल? नाही नाही आता शक्यच नाही परत कन्फ्युज होणं", ऋजुता ही हसून म्हणाली
"नाही , विधीची वाट लागेल म्हटलं, चांगला क्लास घेतो आता तिचा. खोडेलपणा करते ना जास्तच", विराज .
"जाऊ दे रे, लहान आहे ती. गंमत म्हणून केले असेल तिने", ऋजुता.
"तिने गंमत म्हणून केलं पण इकडे माझी वाट लागतेय ना?", विराज पुटपुटला.
"ए, काही नाही झालंय एवढं, आणि फार रागावू नकोस तिला , काय?", ऋजुताने प्रेमळपणे दटावत म्हटले.
"हं, तुला काय माहिती काय झालंय", विराज पुटपुटला.
"बरं चल बाय, निघायचंय मला. आणि थँक्स हं", ऋजुता हसून म्हणाली आणि फोन ठेवला. तेवढ्यात रेखाताईंनी बोलावलं , "अग ऋजू, चहा थंड होतोय, चल लवकर". ऋजुताला रिऍक्ट व्हायलाही वेळ मिळाला नाही.
इकडे विराज मनात म्हणाला, "देवा, काय लिहिलं आहेस माझ्या नशिबात? आता मला कळलं , ती का असे विचित्र प्रश्न विचारत होती ते. तिला आतापर्यंत हेच वाटत होतं विधी आणि माझ्याबद्दल. याचा अर्थ तिने अजूनही माझा त्या दृष्टीने विचारच केला नाहीये. आणि इकडे मी.... विधी , तू गेलीस आता".
क्रमशः
© स्वाती अमोल मुधोळकर
कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. कथा किंवा कथेतील कुठलाही भाग कॉपी करू नये. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा आहे.
आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद. हा भाग कसा वाटला ते जरूर कळवा. आपले अभिप्राय हीच लेखनाची ऊर्जा आणि प्रेरणा. स्वस्थ रहा, आनंदी रहा , मुख्य म्हणजे वाचत रहा आणि कळवत रहा :-)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा