लहान मुलांनी मोकळ्या जागेत एकत्रितपणे थोडेसे फटाके उडविल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम संपल्यावर विराज आणि रजत हे अजित व सुजित या मित्रांसोबत घरी जात होते. थंडी बरीच होती. जाताना रस्त्यात बार दिसला. त्याच्या जवळून ते जात होते.
"ए चला ना , तिथे जाऊ या. रजत आज तरी तू यायलाच पाहिजे, तुझा पार्टनर पण सोबत आहे. काय विराज , चल येतोस ना?" अजित.
"ए काय रे हे आता? थोड्या वेळात नवीन वर्षाचं स्वागत करायचंय आपल्याला. ते काय असं करणार का? मला नाही यायचं. मी चाललो घरी." रजत.
"हत लेका! तेच आहे का तुझं? हा रजत तर कधीच येत नाही. बरं जाऊ दे. विराज, तू चल." अजित.
"तुला जायचं तर बघ. पण मी नाही येणार, मी नाही घेत रे कधी. तसंही त्यापेक्षा कामं आहेत मला घरी गेलो की. घरीच जाऊ या ना. कॉफी पिऊ घरी सगळे. मी करेन मस्त गरमागरम कॉफी." विराज.
"काय यार तुम्ही दोघे! रजतचं तर माहिती होतं, पण तू का नाही घेत ?" अजित.
"मला नाही आवडत रे. ज्या गोष्टींमुळे स्वतःला स्वतःची शुद्ध राहत नाही, त्या गोष्टी नाही आवडत मला स्वतःला. अन दुसरं म्हणजे आईने लहानपणीच गुरूंसमोर प्रतिज्ञा घ्यायला लावली होती मला." विराज.
"काय? प्रतिज्ञा?" अजित.
"हो. मी लहान असताना आमच्या बाजूला एक फॅमिली राहायची. त्या काकांना खूप सवय होती. त्यामुळे त्यांचे लिव्हर खराब झाले आणि त्यातच फार कमी वयातच गेले ते. त्या कुटुंबाची वाताहत झाली. कसेबसे त्या काकूंनी खूप कष्ट करून सावरले. तेव्हा पासूनच आईने सांगून ठेवलं होतं, की कधीही ड्रिंक्सना स्पर्श करायचा नाही." विराज.
"आता इथे आईही नाही, आणि गुरूही नाहीत ना. मग काय फरक पडतो? कोणाला कळणार आहे?" सुजित.
"आपलं आपल्याला तर कळतं ना? मी तर नाही घेणार. तुला घ्यायचं तर घे, पण मी जातो आता घरी. उद्या सकाळी कार्यक्रमही आहे माझ्या 'दृष्टी' संस्थेमध्ये. त्याची थोडी तयारीही करायची आहे." विराज.
"बरं चल घरीच." अजितलाही आता ते नकोसेच वाटत होते.
सगळे रजतकडे घरी आले. रजतने हॉलमध्ये असलेल्या फायरप्लेस मध्ये जाळ करून पेटविले. मंद आवाजात संगीत सुरू होते. थोड्याच वेळात कॉफीचा दरवळ पसरला. सोफ्यावर बसून या सर्वांच्या गप्पा सुरु होत्या. त्यात सामील होत विराजने सर्वांसाठी कॉफी करून आणली .
"ए चला यार काहीतरी इंटरेस्टिंग करू या . आज गेम खेळू या एखादा?", सुजित.
"हो चालेल ना. काय खेळायचं?" रजत.
"पासिंग द पार्सल खेळू या? ज्याच्याकडे ते पार्सल आलं त्याने बाकीच्यांनी सांगितलं ते करून दाखवायचं." तो सोफ्यावरची एक छोटीशी उशी हातात घेत म्हणाला आणि त्याने म्युझिक सुरू केले. उशी एकमेकांकडे पास करत खेळ सुरू झाला.
म्युझिक बंद झाले तर अजितच्या हातात उशी राहिली होती. मग सगळ्यांनी मिळून त्याला अमिताभ बच्चन यांचा एक डायलॉग आणि त्यांच्यासारखा डान्स करायला सांगितलं.
त्याने 'पग घुंगरू बांध मीरा नाची थी , और हम नाचे बिन घुंगरू के...' या गाण्यावर अमिताभ बच्चन यांच्यासारखा, त्यांच्या स्टाईलमध्येच डान्स केला.
सर्वांनी टाळ्या वाजवत साथ दिली. पुन्हा म्युझिक सुरू झाले, या वेळी विराजकडे पार्सल राहिले. मग काय, आता विराजला जाम सतवायचं या दृष्टीने अजित सरसावला.
"ए विराज, तू कधी प्रपोज केलंस का कोणाला?"
"नाही" विराज.
"एवढा हँडसम मॅन आहेस तू. असं कसं रे? प्रेम केलंस का कोणावर?"
"अं... मी? ... का रे?", विराजला कळत नव्हते की काय उत्तर द्यावे. 'हो' म्हणावे तर , त्याच्याकडे होकार आलेला नव्हता आणि तसंही आणखी काही विचारले असते तर पंचाईत झाली असती. कारण या मुलांचा स्वभाव जरा उथळ वाटत होता. काहीही वेडंवाकडं बोलली असती तर ? ते विराजला काही आवडलं नसतं, सहन झालं नसतं अन रजतही समोरच होता ना. विराजला धाकधूक होत होती. 'नाही' म्हणावे तर ही मुलं उगाच काहीतरी बोलत बसणार त्यावरून, की तू असाच, अन तू तसाच. शेवटी तो म्हणाला,
"काय करायचं आहे? सांगा ."
"चल तू इसको प्रपोज कर के दिखा. तेरी प्रॅक्टिस भी हो जायेगी. और इस तरह करना की उसने ऍक्सेप्ट करना ही चाहिये " अजित रजतकडे हात दाखवत म्हणाला. अजित विराजने त्याचा मूड घालवल्याचा वचपा काढण्याच्या पूर्ण तयारीत होता.
"ए ऽऽऽ काहीही काय?" विराज.
आधीच तर काही वेळापूर्वी गाणे गाताना विराजचा मूड थोडा हळवा झाला होता. त्यातून तो कसाबसा बाहेर आला होता तर लगेच हे!
रजतने विराजकडे पाहिले. 'आता हे काय करताहेत उगाचच, पुन्हा विराजचा मूड डाउन झाला तर?' असे त्याला वाटत होते. त्याने विरोध करायचा प्रयत्न केला,
"आता काय मला मुलगी बनायला लावणार का तुम्ही? काहीही. दुसरं काही सांग त्याला करायला."
"अरे यार रजत, अब तू मत शुरु होना. करने दे उसको. अरे चल ना विराज जलदी. ऐसा समझ की ये तेरी गर्लफ्रेंड है, और शुरु हो जा." अजित जोर देत होता. सोबतच त्याने सुजितलाही इशारा केला की तूही जरा जोर दे.
"हो विराज, गेमच तर आहे. काय फरक पडतो? कर लवकर." सुजित.
विराजने मिनिटभर डोळे मिटले. स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. रजतच्या समोर आला. क्षणभर डोळे मिटले तर ऋजुताचा हसरा चेहरा डोळ्यासमोर तरळला. आता त्याला रजत दिसतच नव्हता. त्याच्या जागी ऋजुता बसलेली त्याला दिसत होती. गुडघ्यावर बसून रजतचा हात हातात घेत त्याच्याकडे प्रेमाने बघत तो म्हणाला,
" प्रिन्सेस,
माझ्या मनाच्या राज्यावर तुझे अस्तित्व उमटलेय
तुझेच रूप माझ्या हृदयात कोरले गेलेय
तुझ्या हसऱ्या चेहऱ्याचा छंद मला जडलाय
तुझ्या गुणांवर लुब्ध मी झालोय
आता माझा मी उरलोच कुठे
मला लागलाय तुझाच ध्यास
तुझ्याविना कसा मी घेऊ श्वास ?
आता फक्त तुझ्या होकाराची आस
सांग ना, तू माझी होशील ना?
चंद्र-तारे देईन असं प्रॉमिस तर मी नाही देणार,
पण तुझ्या प्रत्येक सुखात मी सोबत असेन
आणि प्रत्येक दुःखाला तुझ्याआधी
माझ्याशी सामना करावा लागेल.
आयुष्याचा जोडीदार म्हणून मला स्वीकारशील का ?
सांग ना माझी होशील का?"
विराजच्या डोळ्यात अगदी आर्त, खरेखुरे भाव दिसत होते. त्याची व्याकुळता जाणवत होती. प्रत्येक ओळ , प्रत्येक वाक्य अगदी हृदयातून आल्यासारखे रजतला वाटले. क्षणभर तो विराजला पाहतच राहिला.
मग तो उठून उभा राहिला. म्हणाला ,
"नक्कीच. खूप आवडेल मला."
रजतचा आवाज ऐकताच विराज भानावर आला.
"जिंकलंस बंधू, जिंकलंस. मलाही जिंकलंस तू. " रजत हसून म्हणाला. त्याला काहीतरी जाणवले होते पण यांच्यासमोर काही बोलायला नको , आता इथेच विषय संपवावा म्हणून त्याने पुढे गेम सुरू केला.
आता रजतचा नंबर आला. त्याला राजेश खन्ना यांच्यासारखा अभिनय करायला सांगितलं. त्याने आनंद फिल्ममधला डायलॉग म्हणून अभिनय केला.
आणखी काही वेळ असेच खेळून झाल्यावर अजित आणि सुजित आपल्या घरी गेले.
"झोपू या आता? उद्या सकाळी तुझा प्रोग्रॅम झाला की डिसूझा अंकल-आंटीना भेटून येऊ. " रजत.
"चेल्म्सफर्डला राहतात ना ते?" विराज.
"हो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ. भेटलो तर तेवढंच बरं वाटेल त्यांना. वयस्कर आहेत. एकटेच, आय मीन दोघेच असतात ते." रजत.
"हो, ठीक आहे. जाऊन येऊ या." विराज म्हणाला आणि खोलीत जायला वळला.
पण आता मात्र रजतला राहवत नव्हते. त्याने विराजला खांद्याला धरून स्वतःकडे वळवले आणि विचारले,
"खूप प्रेम करतोस ना तिच्यावर?"
"अं...?" विराज. पुढे तो काही बोलला नाही. तसाच स्तब्ध राहिला.
"तू बोलला नाहीस तरी मला कळतंय ते. पण तेव्हा मुद्दामच बोललो नाही मी काही. कोण आहे ती? तुझ्या मनावर काही भार असेल तर मला सांगून मन हलकं करू शकतोस."
"भाई, ... कोण?" विराज. खरं तर समजलं होतं त्याला, रजत काय विचारतोय ते.
"तुझं जिच्यावर प्रेम आहे ती? "
क्रमशः
*****
© स्वाती अमोल मुधोळकर
कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.
ज्याप्रमाणे कोणताही कलाकार कलाकृती घडविण्यासाठी परिश्रम करत असतो, त्याचप्रमाणे लेखकही शून्यातून कथा, कविता किंवा कोणतीही साहित्यकृती घडविण्यासाठी त्यात जीव ओतून मेहनत करत असतो. त्यामुळे
1. हे साहित्य लेखकाच्या परवानगीशिवाय आणि नावाशिवाय कुठेही कॉपी किंवा शेअर करू नये. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.
2. भाग थोडा जरी आवडला असेल तर फेसबुकवर एक लाईक आणि अभिप्राय नक्की द्या .
वाचकांचा प्रत्येक लाईक आणि अभिप्राय हा अधिकाधिक चांगले लेखन करण्याची प्रेरणा देऊन उत्साह वाढवत असतो. मागील भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा