Login

दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 62

Viraj Gets A Great News.


"हॅलो, दादा, मी जर तुला एक ग्रेट न्यूज दिली तर तू काय देशील मला?" विधी मिश्किलपणे विराजला विचारत होती.

"काय? कोणती ग्रेट न्यूज?" विराज.

"अरे दादा, अशी न्यूज आहे की तुझा उरलासुरला तापही पळून जाईल. ताप बिप सगळं हिस्टरीमध्ये जमा होईल." विधी उत्साहात, हसून म्हणाली.

"अग, पण काय? सांग न लवकर." विराज.

"अं हं, आधी सांग काय देशील? एकतर मी बातमी पण चांगली देणार आहे आणि त्यासाठी आम्ही मेहनत पण घेतलीय." विधी मुद्दाम आढेवेढे घेत होती.

"अं..., बरं, देईन तू जे म्हणशील ते. सांग आता लवकर." विराज आता अधीर होत होता.

"अरे दादा, बाबा आणि मी आईशी बोललो. ऋजुतासाठी कनव्हिन्स करायचा पुष्कळ प्रयत्न केला." एवढं सांगून विधीने मोठ्ठा पॉझ घेतला.

"मग? मग काय झालं? पुढे सांग न, खूपच भाव खातेस तू." विराज.

"आई म्हणाली, की ती सध्या मावशीला काही सांगणार नाही. विचार करेल ऋजुताचा आणि तिच्या मनात काय आहे त्याची काही आयडिया येते का तेही बघेल. आहेस कुठे दादा? गड अर्ध्याच्या वर सर झालाय." विधी हसत म्हणाली.

"काय? खरं सांगतेस तू हे? येस्स येस्स! " विराजला खूप आनंद झाला होता.

"तसं बहुधा आई बाबा बोलतीलच तुझ्याशी उद्या वगैरे , पण मला राहवलं नाही. म्हणून लगेच फोन केला.

"थँक यू ग, माझी गोडुली! थँक यू सो मच. " विराज आनंदाने म्हणाला.

"आहे की नाही ग्रेट न्यूज? आणि हं तू मला मी जे मागेल ते देणार आहेस हं, हे पण लक्षात असू दे." विधी हसून म्हणाली.

"पण तू सांगितलंच कुठे, काय हवंय ते?" विराज.

"आता नाही, पण मागेन ना कधीतरी, तेव्हा दे म्हणजे झालं." विधी.

"ओके बाबा, देईन. डोन्ट वरी." विराज.

फोन ठेवून विराज खुशीतच बाहेर आला.

"काय राजे, खुषी मावत नाही आहे चेहऱ्यावर. काही विशेष?" रजत.

"भाई, आई सध्या मी परत जाईपर्यंत थांबायला तयार झालीय आणि विचार करते म्हणाली." विराज.

"अरे वा, मग राजांनी अर्धा गड सर केलाच म्हणायचा. चला पार्टी करायला पाहिजे मग तर. चल आईस्क्रीम पार्टी करू. " रजत.

पण लगेच लक्षात येऊन तो म्हणाला, "अरे पण तुझा घसा दुखतोय. "

"चल कोई बात नही, आपण लाडू पार्टी करू या. लड्डू पेश किया जाये " तो नाटकी अंदाजात म्हणाला.

तसे विराज लाडूचा डबा उघडून अदबीने त्याच्यासमोर धरत म्हणाला, "लड्डू हाजिर हैं जहाँपनाह!"

"हो, आज तर हा लाडू जास्तच गोड लागेल राजेंना." रजत गमतीने म्हणाला.

दोघेही हसत हसत रेखाताई आणि ऋजुताने दिलेले लाडू खाऊ लागले.



दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ऋजुताकडे,

ऋजुताला तिच्या टीममधल्या प्रसादचा फोन आला. ती त्याच्याशी बोलत होती.
"काय? अन हे तू आत्ता सांगतोय? "

"मी रात्री उशिरा निघालो इकडे यायला. तसंच अर्जन्ट नसतं तर मीही आलोच नसतो. पण ते जमिनीच्या केसच्या बाबतीत काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून बाबांनी अर्जन्ट बोलावलं." प्रसाद.

"अरे, आज रिलीज आहे ना आपला. तू नसशील तर इथे तुझं सगळं डिप्लोयमेन्ट कोण करणार? कोणालाच येत नाही तुझी ही टेक्नॉलॉजी." ऋजुता.

"हो, खरं आहे. निकिताला थोडंफार माहिती झालंय मी काय केलंय ते. डिप्लोयमेन्ट ती करू शकेल का? मी गरज पडली, काही प्रॉब्लेम आला तर इथून फोन वरून सांगेन." प्रसाद.

"अरे तिला तिचं आणि बाकीच्यांचंही डिप्लोयमेन्ट करायचंय ना. एवढं सगळं कशी करेल ती? ऑफिसला गेल्यावर बघते मी तिच्याशी बोलून. पण तू फोनवर अव्हेलेबल रहाशील रिलीजच्या वेळी." ऋजुता.

"हो, ओके." प्रसाद.

"बाय." ऋजुता.

फोन ठेवून तिने काय करावं असा विचार करत चहाचा कप हातात घेतला.

"काय झालं बेटा? काही प्रॉब्लेम झालाय का?" राजशेखर विचारत होते.

"हो ना बाबा, आज प्रोजेक्ट रिलीज आहे रोहित सरांच्या प्रोजेक्टचा, अन प्रसादला अचानक गावाला जावं लागलं. त्याचा बॅक अप कोणीच नाही टीम मध्ये. म्हणजे तो ज्या टेक्नॉलॉजीवर काम करतो ती फक्त मला आणि त्यालाच येते. बघते, लवकरच निघावं लागेल आज ऑफिसला. "

"ओह, असं झालंय का? बरं, मग तू असं कर, आज कार तू घेऊन जा. तेवढंच तुला बरं राहील कार हाताशी राहिली तर." राजशेखर.

"हं ओके."

"छकुली, पटकन हे खाऊन घे अन डबा झालाच आहे, घेऊन जा बरं का, तशी नको जाऊ." रेखाताई तिला नाश्त्याची प्लेट देत म्हणाल्या.

"तुझा नाश्ता आणि डबा सुद्धा तयार झाला एवढ्या लवकर?"

"हो ग, आज जरा लवकरच उठून केलं. तू सांगितलं होतं ना की रिलीज आहे आमचा, मग मला वाटलं कदाचित तुला सकाळी लवकर जायची घाई असेल. मग म्हटलं आपण आपलं तयार ठेवावं सगळं." रेखाताई.

"ओह माझी प्यारी मम्मा, थँक यू सो मच."

"हो, थँक यू म्हणे." रेखाताई टॉवेलाला हात पुसत तिच्याजवळ आल्या अन हसून तिचा गालगुच्चा घेत म्हणाल्या.

ऋजुताने भराभर नाश्ता केला. सोबतच निकिताला फोन करून लवकर यायला सांगितले आणि तीही ऑफिसला गेली.

"निकी, केबिनमध्ये ये. " ऋजुताने निकिताला डेस्कवर फोन करून बोलावले.

"का ग, काय झालं? मी तशीही आज लवकर येणारच होते." निकिता.

मग ऋजुताने निकिताला प्रसाद येणार नसल्याचं सांगितलं.

"अरे बाप रे! आता काय करणार? मी एकटी कसं करू एवढं सगळं? त्याचं काम तर तोच करायचा, मला माहितीही नाही जास्त." निकिताला घाम फुटला.

"तू नंदनला नेतेस का बरोबर? किंवा प्राजक्ताला ने. त्या दोघांपैकी कोणी फ्री असेल तर बघ. मदत होईल तुला थोडी." ऋजुता.

"अग ते दुसऱ्या टास्क्सवर काम करताहेत ना. त्यांना यातलं फारसं काही माहितीही नाही आणि येतही नाही ग, ज्युनिअर्स आहेत ना ते. काही प्रॉब्लेम आला तर काय करणार वेळेवर? एकतर चालू सर्व्हरवर डाउनटाइम घेऊन आपण करणार आहोत. तेवढ्या वेळात झालं पाहिजे." निकिता.

"हं, ते तर खरंय." ऋजुता.

"बरं, मी डाउनटाईम जरा वाढवून घेते. मेल टाकते लगेच." ऋजुता.

"हो. पण ऋजू, तूच चल ना ग सोबत . मला फार भीती वाटतेय. वेळेवर काही प्रॉब्लेम आला अन मला नाही सोडवता आला तर ग?" निकिता.

"निकी, तू अशीच घाबरत राहणार आहेस का? तू आता लीडर झालीयेस ना? शिकावं लागेल तुला सगळं. अशा काही ना काही अडचणी येतच राहणार. तुम्ही जाणार असं ठरलं होतं ना. मलाही माझी कामं आहेत ना इथे ?" ऋजुता रागावली होती.

"ऋजू, इतक्या दिवसांमध्ये तू पहिल्यांदा चिडलेली दिसते आहेस मला. प्लीज चिडू नकोस ना. बरोबर आहे ग तुझं. पण तुझ्यासारखीच मलाही नव्यानेच ही जबाबदारी मिळालीय ना ग. आत्ता या वेळी तू चल सोबत. हवं तर तू तुझंच काम कर तिथे. फक्त काही प्रॉब्लेम सोडवता येत नसेल तरच मी तुला विचारेन. पण तू सोबत असली तर मला खूप आधार वाटेल."

"अन मला काही प्रॉब्लेम आला तर काय करू मी?" ऋजुता. खरं तर या अजून एका काळजीमुळे ऋजुताचा आवाज नकळत वाढला होता आणि निकिताला वाटलं होतं की ती तिच्यावर चिडते आहे.

"तुला कसला प्रॉब्लेम येणार ग?" निकिता.

"काही नाही, तू फक्त मी कसलाही इशारा केला की लगेच मला हेल्प करशील."

"काय झालंय ऋजू?"

"अग काही नाही, ते रोहित सर असतील ना तिथे. मी त्यांना दोनदा नाही म्हणाले होते कॉफीसाठी. त्यांना फेस करायला जीवावर येतंय मला आता." ऋजुता.

"ओह! एवढंच ना. विसरलेही असतील ग ते. ते सोड ग. तेवढ्याने काय होणार आहे. तू चल." निकिता.

"ठीक आहे. हं, उत्तर आलं त्यांचं. डाउनटाईम वाढवून दिलाय." ऋजुता.

"चला, ते बरं झालं. अकरा वाजता निघूया मग." निकिता.

"हो, मी कार आणलीय. नो वरीज." ऋजुता.


ठरल्याप्रमाणे दोघीही वेळेवर रोहितच्या ऑफिसमध्ये पोचल्या. प्रीती त्यांना त्यांच्या जागेवर घेऊन गेली. निकिता आणि प्रीती रिलीजच्या कामाला लागल्या. ऋजुता थोडं बाजूला बसून लॅपटॉपवर आपलं काम करत बसली होती.

तासभर झाला असेल तेवढ्यात रोहितने तिथे एक चक्कर टाकली. ऋजुताला बघून त्याला आश्चर्यमिश्रित आनंद झाला. त्याचा चेहरा चमकला. मनात कसलातरी निर्धार त्याने केला.


क्रमश :

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

कथेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना धन्यवाद. भाग आवडल्यास लाईक कमेंट करून नक्की कळवा.


 

🎭 Series Post

View all