Login

दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 63

Rujuta in dilemma.

मागील भागात...

ठरल्याप्रमाणे दोघीही वेळेवर रोहितच्या ऑफिसमध्ये पोचल्या. प्रीती त्यांना त्यांच्या जागेवर घेऊन गेली. निकिता आणि प्रीती रिलीजच्या कामाला लागल्या. ऋजुता थोडं बाजूला बसून लॅपटॉपवर आपलं काम करत बसली होती.

तासभर झाला असेल तेवढ्यात रोहितने तिथे एक चक्कर टाकली. ऋजुताला बघून त्याला आश्चर्यमिश्रित आनंद झाला. त्याचा चेहरा चमकला. मनात कसलातरी निर्धार त्याने केला.

आता पुढे..


"हे गर्ल्स, हाऊ आर द थिंग्स? रिलीजचे काम सुरु झाले ना?" रोहित आत येत म्हणाला.

तसे सर्वांचे लक्ष त्याच्याकडे गेले.

"हो, सुरु झालंय सर." प्रीती आणि निकिता म्हणाल्या.

"इज एव्हरीथिंग गोइंग स्मूथली टिल नॉव?" रोहित.

"येस, एव्हरीथिंग इज फाईन." निकिता आणि प्रीती म्हणाल्या.

"ग्रेट! " रोहित.

"ऋजुता, तू इथे ?  व्हॉट अ प्लेझन्ट सरप्राईज! तू सुद्धा येणार होतीस, सांगितलं नाहीस तसं." रोहित.

"नाही सर, ऍकच्युअली प्रसाद येणार होता पण त्याला गावाला जावं लागलं. त्यामुळे मी आले. पण रिलीजचे काम मुख्यत: निकिता बघतेय." ऋजुता.

"ओके. इट्स अल्मोस्ट लंच टाईम. व्हेन आर यू पीपल प्लॅनिंग टू हॅव लंच?" घड्याळ बघत रोहितने असे विचारले आणि दुसऱ्या कोणाला बोलूही न देता स्वतः लगेच पुढे म्हणाला,

"ऋजुता, प्लीज जॉईन मी फॉर लंच टुडे. लेट्स गो टुगेदर. इथे जवळच चांगलं हॉटेल आहे. प्रीती, तुमचं काम आटपलं की तू निकिताला घेऊन जाशील तुझ्याबरोबर जेवायला. "

"अं... मी टिफिन आणलाय सर. आईने सकाळी लवकर उठून बनवून दिलाय." ऋजुता टाळाटाळ करत होती, तसंही रेखाताईनी टिफिन दिलाच होता.

'अरे यार, आता ही टिफिनचं काय घेऊन बसली आहे! मोठ्या मुश्किलीने आज जरा बोलता येईल अशी संधी मिळतेय.' रोहित मनात विचार करत होता.

आज विराज ऋजुताबरोबर नसताना ही एवढी चांगली संधी सोडेल तो रोहित कसला! त्याला आज कसेही करून ऋजुताला बरोबर न्यायचंच होतं. तो म्हणाला,

"ठीक आहे घेऊन चल, तोही खाऊ आपण. मी पण टेस्ट करेन त्या निमित्ताने."

"मग कॅन्टीनमध्येच जाऊ या. तसंही यांना इथे काही प्रॉब्लेम आला तर लवकर यायला बरं पडेल. मी खरं तर त्यासाठीच आलेय इथे." ऋजुता.

ऋजुताने नजरेनेच निकिताला म्हटलं, "बघ, मी म्हणत होते ना."

निकितानेही तिला नजरेनेच उत्तर दिलं,"डोन्ट वरी, जा तू."

"ओके. कॅन्टीनमध्येच जाऊ या. चल." रोहित.

दोघेही गेले. रोहितने एक बऱ्यापैकी शांत ठिकाणचे टेबल निवडले आणि तिथे बसला. ऋजुताही जाऊन बसली. थोड्या वेळात जेवण होत आले. आज का कोण जाणे, रोहित एकदम मनमोकळेपणाने बोलत होता. स्वतः बद्दल, त्याच्या परिवाराबद्दल, त्याच्याकडे असलेल्या भरपूर प्रॉपर्टीबद्दल तो ऋजुताला सांगत होता.

"मी, माझी आई आणि माझी ताई एवढाच परिवार आहे. ताईचे लग्न झाले आहे आणि ती बडोद्याला असते. दोन मुले आहेत तिला. इथे एक रो हाऊस आहे आमचं, लोणावळ्याला एक विला आहे. मला तर तू ओळखतेसच. कामाच्या निमित्ताने का होईना आपण तीनचारदा भेटलोय. मी या कंपनीत गेल्या पाच वर्षांपासून आहे. माझ्या आईचा स्वभावही छान आहे. आवडेल तुला." रोहित.

"हो, पण..." ऋजुता.

ऋजुताला कळत नव्हते की तो इतकं सगळं तिला का सांगतोय. तिच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह बघून तो पुढे म्हणाला,

"तुला असं वाटतंय न, की मी हे सगळं तुला का सांगतोय?"

"हं. म्हणजे मला कळलं नाही." ऋजुता.

" मी हे सगळं तुला सांगतोय कारण तुला सगळं माहीत असायला हवं. " रोहित.

"अं..." ऋजुताच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह अजून गडद झालं होतं.

"ऋजुता, तुला स्पष्टपणेच सांगतो. तुला पहिल्यांदा इथे माझ्या ऑफिसमध्ये बघितलं ना, तेव्हाच तू मला आवडलीस. त्यानंतर  आपण जेव्हा जेव्हा कामानिमित्त भेटलो, माझा विचार पक्का होत गेला. हे सांगायलाच मी तुला कॉफीसाठी येतेस का विचारलं होतं. सी, आय एम अ व्हेरी प्रॅक्टिकल पर्सन. मी एकदम प्रॅक्टिकल माणूस आहे. प्रेम वगैरे मला कळत नाही आणि ते शब्दात फिरवून मला सांगताही येत नाही. पण असं वाटलं की माझं पूर्ण आयुष्य मी तुझ्याबरोबर घालवू शकतो. लग्न करशील माझ्याशी? बनवशील का मला तुझ्या स्वप्नातला राजकुमार?" रोहित.

ऋजुताने क्षणभर डोळे मिटले.


हे सगळं तर अगदी अनपेक्षित होतं ऋजुतासाठी. कुठे तिला वाटत होतं की रोहित रागावेल आणि कुठे हे सगळं!

"पण सर..." ऋजुता. तिच्यासाठी हा एकदम धक्काच होता. ती गोंधळून गेली होती. एकतर ऑफिसमध्ये असल्यामुळे आणि आजूबाजूला काही लोकही असल्यामुळे शांतपणे ही परिस्थिती हाताळावी लागणार होती , त्यामुळे काय बोलावे ते कळत नव्हते तिला.

"तू आधी ते सर म्हणणं बंद कर पाहू. तू जर होकार देशील तर मी आईला घेऊन तुझ्या घरी येईन तुला मागणी घालायला." रोहित.

"तुमची काम करण्याची पद्धत वगैरे मला आवडते, प्रोफेशनली तुम्ही खूप छान हॅन्डल करता सगळं, तुमच्या टीमशीसुद्धा खेळीमेळीने राहता. पण मी कधी असा विचार नाही केलाय सर तुमच्याबद्दल. म्हणजे मी प्रोफेशनल नात्याच्या पुढे जाऊन कधी विचार नाही केलाय  आणि लग्नाचाही विचार केला नाही मी अजून." ऋजुता.

"हो, मान्य, नसेल केला तू अजून विचार. मग आता कर ना. बघ, इतकी प्रॉपर्टी आहे की तू जॉब जरी नाही केलास तरी राणीसारखी राहू शकशील. " रोहित अगदी आत्मविश्वासाने तिचं मन खेचून घेण्याचा प्रयत्न करत होता.

"विराजपेक्षा तर नक्कीच सुखात ठेवेन मी तुला." रोहित. बोलता बोलता त्याच्या मनात असलेली धाकधूक त्याच्याही नकळत बाहेर आली होती. "ही माईट बी इन लव्ह विथ यू पण ..."

आता हा अजून दुसरा धक्का होता ऋजुतासाठी. विराजचे नाव ऐकून तिचे आधीच टपोरे असलेले डोळे अजून विस्फारले. 'विराजचे प्रेम आहे माझ्यावर? पण असते तर तो बोलला असता ना! तो तर साधा मेसेजही करत नाही आजकाल.'

रोहितचे बोलणे मधेच तोडत ऋजुता आश्चर्याने म्हणाली,

"त्याने सांगितलं हे तुम्हाला?"

"नाही. त्याने नाही सांगितलं, पण सांगण्याची काय गरज आहे? मी जेव्हा जेव्हा तुम्हाला बघितले तेव्हा मलाच जाणवलं ते. इट इज ऑबव्हिअस फ्रॉम हिज आईज अँड द वे ही सपोर्ट्स यू. ज्याप्रकारे तो तुला समजून घेऊन सपोर्ट करतो त्यावरूनही कळतं आणि त्याच्या डोळ्यातही दिसतं. डोन्ट टेल मी डॅट यू डिडन्ट नो इट." रोहित.

ऋजुता खाली बघत आपल्याच विचारात गढली होती.

"हे बघ ऋजुता, त्याचं प्रेम असेल तुझ्यावर. बट इफ यू थिंक अबाऊट युअर फर्दर लाईफ, लाईफ स्टाईल, आय कॅन कीप यू हॅपीअर. माझा परिवारही छोटा सुटसुटीत आहे. तुला पुढे फार सांभाळण्याचं टेन्शनपण नाही. घरी काम करण्यासाठी नोकर आहेत. आफ्टरऑल जगण्यासाठी फक्त प्रेम असून भागत नाही ना. ती फक्त एक गोष्ट झाली. मी सर्व सुखं तुझ्या पायाशी आणून ठेवेन. खूप खूष ठेवेन तुला. राणीसारखी राहशील. प्रेम म्हणशील तर ते काय? होईलच ना लग्नानंतर. तशीही मला आधीपासूनच आवडतेस तू आणि मीसुद्धा माझ्यामते हँडसम आहेच." रोहित.

"करशील ना मग माझा विचार? " रोहित ऋजुताच्या टेबलवर ठेवलेल्या हातावर हात ठेवत म्हणाला.

तिने पटकन आपला हात काढून घेतला. ती विचारात पडली होती. ऋजुताच्या चेहऱ्यावर अस्वस्थता उमटलेली पाहून रोहित म्हणाला,

"ओके ओके, डोन्ट वरी. " त्यानेही हात काढून घेतला. "यू टेक युअर टाइम. दोन तीन दिवस विचार कर हवं तर आणि मग सांग."

पण ऋजुताला तर काही सुचतही नव्हतं आणि पुढचं काही ऐकूही येत नव्हतं. तिला आता तिथून जायचं होतं, बाकी काही सुचत नव्हतं. खाली हातातल्या फोन कडे बघत तिने रोहीतच्या नकळत निकिताला पटकन एक मेसेज पाठवला, तो पण ब्लँक. निकिताने तो बघितला आणि ऋजुताला कॉल केला.

"काय ग, काय झालं?" निकिता.

"हं बोल, काय झालं? प्रॉब्लेम येतोय? बरं आलेच मी. " ऋजुता मुद्दाम म्हणत होती.

"अग नाही, ठीक चाललंय. " निकिता.

"हं आलेच मी दोन मिनिटात. मग बघू." असे म्हणून ऋजुताने फोन ठेवला.


"सर, मला जायला हवं, काहीतरी इश्यू येतोय वाटतं निकिताला. निघू या?" ऋजुता.

"ओके." म्हणून रोहितही उठला. तसंही त्याला जे तिच्याशी महत्वाचं बोलायचं होतं ते झालंच होतं. त्याने समर्थपणे तिच्याकडे त्याचे प्रपोजल मांडले होते.

रोहित आपल्या केबिनमध्ये गेला तो आनंदातच. 

क्रमश:

© स्वाती अमोल मुधोळकर.

कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. कसल्याही प्रकारची कॉपी खपवून घेतली जाणार नाही. साहित्यचोरी हा गुन्हा आहे. 

तर वाचकांनो, काय वाटतं? ऋजुताच्या दृष्टिकोनातून काय जास्त महत्त्वाचे असेल ? छोटासा परिवार आणि भरपूर संपत्ती असलेल्या रोहितला ती होकार देईल का?

कथेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना धन्यवाद. भाग आवडल्यास लाईक कमेंट करून नक्की कळवा.

🎭 Series Post

View all