शेवटी विराजने तिच्या आवाजातले त्याने रेकॉर्ड केलेले एकुलते एक गाणे काढले आणि इअरफोन्स लावून, डोळे मिटून ते ऐकू लागला.
सलोना सा सजन है और मैं हूँ ...
पुन्हा पुन्हा ते गाणे ऐकताना तिच्या आवाजातल्या माधुर्यात हळूहळू त्याच्या मनाची अस्वस्थता विरत जाऊ लागली. काही वेळ अशी तिच्या स्वरांची सोबत अनुभवल्यानंतर विराजला ठीक वाटले. तो पुन्हा आपल्या कामात गुंतला.
इकडे ऋजुता ऑफिसमधून घरी गेली. निकिता ऑफिसमध्येच बसून मॉनिटरिंग करत होती. ऋजुता गेल्यानंतर निकिताने विराजला एकदोनदा फोन करण्याचा प्रयत्न केला. पण विराज ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये असल्याने फोन सायलेंट मोड वर होता. त्यामुळे त्याला कळलेही नाही. संध्याकाळी घरी येता येता त्याने फोन बघितला तर त्याला निकिताचा कॉल आलेला दिसला.
'निकिताचा कॉल? कशाला केला असेल तिने? आजची तारीख काय आहे? ओह नो, आज तर PACE चा रिलीज होता. असं कसं विसरलो मी? ऋजुताला आणि यांना निदान बेस्ट विशेस तरी दिले असते. कसा झाला असेल, ऋजू आहेच म्हणा तशी. ती असल्यावर नीटच झाला असेल. तेच सांगायला निकिताने फोन केला असेल. आता उशीर झालाय तिकडे, उद्या बघतो.' विराज विचार करत होता.
राजशेखर ऑफिसमधून आले आणि लवकरच रेखाताईंनी सर्वांना जेवायला बोलाविले. जेवताना राजशेखर ऋजुताला तिच्या रिलीजबद्दल विचारू लागले. ऋजुता आज नेहमीसारखं भरभरून बोलत नव्हती. मोजकंच बोलत उत्तरं देत होती. तिने सगळं नीट आटपल्याचं सांगितलं.
जेवण वगैरे झाल्यानंतर थोडीफार आवरसावर करून ऋजुता खोलीत जाऊन आराम करू लागली. पण विचारशृंखला! विचारशृंखला कसली, विचारांचे एवढे थैमान सुरू असल्यावर झोप कशी येईल तिला?
'आईबाबांना सांगावे लागेल ना, रोहित सर काय म्हणालेत ते. पण काय सांगू मी? काय वाटेल त्यांना? दोन तीन दिवसात सांगायचंय सरांना ? बाप रे! काय सांगू मी त्यांना? निकी म्हणतेय, तुला काय हवंय, तुला काय आवडतंय ते बघ. मनाच्या तळाशी जाऊन खोलवर विचार कर. खरंय. बरोबरच म्हणते आहे ती. '
'रोहित सरांच्या मनात इतकं सगळं असेल असं वाटलंही नव्हतं मला. सरळ लग्नासाठीच विचारलं त्यांनी तर. विचार कर म्हणाले. खरं तर सगळं चांगलंच तर आहे त्यांच्या बाबतीत. फार काही नाव ठेवण्याजोगं नाही काही. हं पण ते जे म्हणाले की तू जॉब न करताही राणीसारखी राहू शकते, इतकी प्रॉपर्टी आहे, मला नाही आवडलं ते. असं वाटलं की उगाचच अभिमान दाखवताहेत... आणि असं काही न करता राहून मला स्वतःची ओळख नाही मिटवायची आहे. मी सुद्धा माझं करिअर घडवण्यासाठी अभ्यास केलाय, किती मेहनत घेतली आहे. ती वाया नाही घालवायची मला. असं कसं सगळं सोडून देऊ? त्यांना मी आवडते, हे सांगितल्यावर मला आनंद नव्हता झाला. ओह नो, आता हे काय म्हणताहेत अजून, असं वाटलं. इतकी ओळख असूनसुद्धा हाताला झालेला किंचितसा स्पर्शही अनोळखी वाटला, स्वीकारला नाही माझ्या मनाने. त्यांनी विराजचे नाव घेतले तर मी किती आतुरतेने त्याच्याबद्दल ऐकत होते.'
'खरंच का विराजचं माझ्यावर प्रेम असेल? पण असं असतं तर सांगितलं नसतं का त्याने मला? इतकं आम्ही समजून घेतो ना एकमेकांना मित्रमैत्रिणींसारखं, मग का सांगितलं नसेल त्याने? रोहित सर म्हणाले की त्याच्या डोळ्यातून कळतं. मग मला कसं नाही कळलं? हं, पण त्यासाठी त्याच्या डोळ्यात बघायला तर हवं ना? मी कधी इतकं खोलवर लक्ष देऊन बघितलंच कुठे? आधी तर त्या दृष्टिकोनातून बघितलंच नव्हतं. पण ते म्हणाले तेही बरोबर आहे, विराज नेहमी सपोर्ट करतो मला. प्रोत्साहन देतो, नवीन गोष्टी करण्याचा शिकण्याचा चान्स देतो. विश्वासाने जबाबदारी टाकतो. मी कसा रिस्पॉन्स देईन हेही त्याला माहीत असतं. कधी कोणत्या गोष्टीला पटकन हो म्हणेन, कधी कोणत्या जबाबदारीला घाबरेन, सगळं माहीत असतं त्याला. इतकं कसं ओळखतो तो मला? मला फुलं आवडतात, तर दृष्टीच्या प्रोग्रामच्या एवढ्या धावपळीतसुद्धा माझ्यासाठी आठवणीने मोगऱ्याची फुलं आणली होती त्याने. त्या दिवशी त्याच्या बासरीवादनात एक अनोखी ओढ, वेगळाच दर्द जाणवत होता मला. ते ऐकताना तर जणू असं वाटत होतं, आजूबाजूला काहीच, कोणीच नाहीये आणि तो माझ्यासाठी बासरी वाजवतोय आणि मी ती ऐकतेय. जणू काही माझ्यासाठीच त्याचे ते सूर उमटताहेत, त्यातून तो मलाच काहीतरी सांगतोय.'
'त्याच्या एवढ्या महत्वाच्या दिवशी त्याला माझ्याबरोबर मंदिरात जावंसं वाटलं, थोडा वेळ घालवावासा वाटला. काय बरं म्हणाला होता तेव्हा? हं, आठवलं. "या खास दिवशी खास व्यक्तीबरोबर काही क्षण घालवावे असं वाटत होतं."
म्हणजे 'मी' खास आहे त्याच्यासाठी? '
'त्या दिवशी एकदा गाडी चालवताना म्हणाला होता मला,
"खूप सुंदर दिसते आहेस ". एवढं लाजायला झालं ना मला तर! मी लाजले, तर गाडी चालवतानासुद्धा समोर बघायचं विसरून एकटक माझ्याकडेच बघत राहिला. वेडा कुठला! ' आठवून खुदकन हसूच आले ऋजुताला.
'लंडनला जाताना सुद्धा सगळी तयारी नीट करून गेला इथे. मला कुठलाही त्रास होणार नाही याची किती काळजी घेतली, वेळेवर हॅन्डओव्हर दिला. नाहीतर एखादा दुसरा असता तर, मला काय करायचंय म्हणून कसंतरी थोडंबहुत सांगून काम निपटवलं असतं त्याने. जाताना त्याने किती सरप्राइजेस ठेवलेत माझ्यासाठी! सगळ्या माझ्या आवडत्या गोष्टी, कॅडबरी, हॅन्डमेड ग्रीटिंग्स, आणि त्याचं स्वतःचं बासरीवादन! माझ्या आवडीनिवडी एवढ्या कशा लक्षात राहतात त्याच्या?'
'लंडनला जायला निघताना लाडू द्यायला गेले होते, तेव्हा मला भेटून किती आश्चर्यमिश्रित आनंद झाला होता त्याला ! तो चेहरा अजूनही डोळ्यासमोर येतोय माझ्या. ते भाव खूपच बोलके होते, फार खोलवर काहीतरी दिसत होतं त्याच्या डोळ्यात.' ऋजुता विचार करत होती. तिला तो प्रसंग आठवला, तिच्या डोळ्यासमोर आला आणि त्यावेळी तिला काय वाटत होतं, तिच्या मनात काय चाललं होतं तेही आठवलं.
"ऋजू, माझी वाट पाहशील ना ग?", विराज म्हणाला होता. त्याचा चेहऱ्यावरची उत्तरासाठीची आतुरता, गंभीरता लपत नव्हती. डोळ्यात जणू काही प्राण आणून तो तिच्या बोलण्याची वाट बघत होता. त्याची ती निर्मळ पण आतुर नजर बघून तिच्या मनात कालवाकालव होत होती. ऋजुताचे मन नकळतपणे चलबिचल होत होते त्यामुळे . काहीतरी तिचं स्वतःचं दूर जातंय असं तिला वाटत होतं. जीवाला खूप हुरहूर लागली होती. मात्र हे का हे कळत नव्हतं. दोघांचीही नजर एकमेकांच्या नजरेत कैद झाली होती. ते तसेच स्तब्ध राहिले होते. दोघेही कदाचित मौनात शब्द अन नजरेत अर्थ शोधत होते. तो तिच्या नजरेत काहीतरी शोधत होता. अन तिला त्याच्या नजरेत काहीतरी दिसत होतं, गवसत होतं , ते डोळ्यातून खोलवर हृदयात झिरपत होतं, आपलंसं वाटत होतं आणि ही भावना काही वेगळीच होती. अभावितपणे ती म्हणाली होती , "लवकर येशील ना?". त्याने होकारार्थी मान हलवली होती त्यावर .
"वाटतंय तुला मी लवकर यावं असं?" विराजने हळुवार आवाजात विचारले होते.
"हो", ऋजुता हळूच म्हणाली होती .
"का?", विराज.
"माहीत नाही", ऋजुता.
"शोध मग. वाट बघशील माझी?", विराज तिच्या डोळ्यात बघत एकदम हळुवारपणे विचारत होता.
तिला आठवले.
'म्हणजे तो तेव्हासुद्धा प्रेम करायचा माझ्यावर? आणि त्याला माहितीही आहे, की मी त्याची वाट बघेन! अप्रत्यक्षपणे सांगितलं सुद्धा आहे त्याने त्याची वाट बघायला! तर हे सगळं होतं तेव्हा त्याच्या डोळ्यात? म्हणून दुरावा होण्याची अशी एक जाणीव होत होती त्याला तेव्हा? आणि म्हणून त्याला माझ्या उत्तराची किंवा माझ्या मनात काय आहे ते जाणून घेण्याची आस लागली होती? '
'खरंच, तो जेव्हाही असं माझ्या डोळ्यात बघतो ना, तेव्हा कळत नाही मला काय होतं. अगदी खोलवर हृदयाशी भिडणारी जाणीव असते. मीसुद्धा हरवून जाते त्यात. अगदी खेचली जाते नकळतपणे त्याच्याकडे. तो इथून जाताना मला किती एकटं एकटं झाल्यासारखं, उदास वाटत होतं. जणू तो इथून गेला आणि इकडे सगळं सुनं सुनं झालं. जणू 'माझं काहीतरी' तो घेऊन गेलाय .'
'खरंच मला का वाटतं की त्याने लवकर परत यावं? किती वाट बघतेय मी मनातून त्याने परत येण्याची. दर वेळी मिस करते मी त्याला. काहीही झाले की खूप आठवण येते मला त्याची. दिवसातून कितीदा तरी येते. असं असतं तर विराजने काय केलं असतं, तसं असतं तर विराजने काय केलं असतं, काहीही प्रॉब्लेम्स आले की असं कितीदातरी वाटतं. त्याच्या एकेका मेसेजचीसुद्धा किती वाट बघते मी. मला स्वप्नातला राजकुमार बनवशील का असं रोहित सर जेव्हा म्हणाले, तेव्हा माझ्या स्वप्नातला राजकुमार डोळ्यासमोर आला. मिटलेल्या डोळ्यांसमोर जे चित्र आलं, ते अविश्वसनीय होतं अगदी !'
क्रमश:
© स्वाती अमोल मुधोळकर
कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. घटना, प्रसंग, संवाद इत्यादी कसल्याही प्रकारची कॉपी खपवून घेतली जाणार नाही. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.
कोणतं चित्र आलं असेल ऋजुताच्या डोळ्यांपुढे?
कथेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना धन्यवाद. भाग आवडल्यास लाईक, कमेंट करून नक्की कळवा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा