Login

दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 74

" क्का ss य ? वेडा आहेस का तू, विराज ? असं कोणी सांगतं का हे? सीक्रेट होतं ना ते आपलं? "


" तू विचारलस का आता ऋजुताला? आपले ठरले होते ना, तू आल्यावर बघू या असं? मग घाई का केलीस अशी? " वीणाताई.

"हो आई. मी विचारलं. ॲक्च्युअली ते असं झालं, की तिला दुसरं स्थळ आलंय . मला तिला गमवायचं नाहीये ग. निदान विचारलंच नाही असं तरी व्हायला नको म्हणून मग घाई करावी लागली मला. सॉरी ना आई... मी तुम्हाला न विचारता पुढे ..." विराज.

"तिला सांग , मला उद्या भेट म्हणावं. अन् हो, घरीच ये म्हणावं. " वीणाताई काहीतरी विचार करत पण ठामपणे म्हणाल्या. " आणि बाळा, अशा गोष्टी योग्य पद्धतीने , वडीलधाऱ्या माणसांकरवी झालेल्या जास्त चांगल्या वाटतात. आता तूच सांग , काय म्हणतील रेखाताई, राजशेखर भाऊजी? काय वाटेल त्यांना?"

"हो ग, मी हा विचारच नव्हता केला. सॉरी. ते स्थळाबद्दल कळल्यावर मी खूप अस्वस्थ झालो होतो ग. माझ्या लक्षातच नाही आलं हे." विराज म्हणाला.

"ठीक आहे . असू दे आता. " विनीत म्हणाले.

"तू उद्या पाठव तिला. मी बोलेन आधी तिच्याशी." वीणाताई मनाशी काही ठरवून म्हणाल्या.

आणखी काही वेळ बोलून विराजने फोन ठेवला. 

ऋजुताच्या होकारासोबतच एक खुशीची सकारात्मकतेची लहर जणू विराजच्या घरादारातून दौडू लागली.

विराजने फोन ठेवला.

तेवढ्यात विराजला ऋजुताचा मेसेज आला "बाबांनी तुला सकाळी कॉल करायला सांगितलं आहे. "

"अरे बाप रे ! " विराज उद्गारला.

त्यालाही आईने सांगितलेले आठवले.
"ठीक आहे , करतो. आणि हां, तुलासुद्धा आईने बोलावलंय उद्या घरीच. मी विसरलोच होतो ." त्याने उत्तर दिले.

" ए राजा, अशा महत्त्वाच्या गोष्टी विसरत जाऊ नकोस ना... रागावतील ना त्या माझ्यावर. " ऋजुताने डोक्याला हात लावला.

" ही ही ही... घाबरतेस का तू तुझ्या सासूबाईंना ?" विराज हसत होता. भरपूर स्माईली टाकत त्याने रिप्लाय केला.

"जसा काही तू अजिबातच घाबरत नाहीयेस. मला दिसलास की तू घाबरलेला." ऋजुता.

"कसा ? ए जा बाबा, आता तुला तिथूनही माझी खबरबात ठेवता येणार का? अडकलो यार आता मी ! माझं स्वातंत्र्य  नाही राहिलं !" विराज मिश्किलपणे आणखी स्माईली टाकत म्हणाला.

"जोक्स अपार्ट, मला सांग ना, ते काय बोलणार आहेत माझ्याशी? चिडलेत का ते माझ्यावर?"

"ते मला कसं माहीत असेल? तूच बघ ना सकाळी." ऋजुताही आता मिश्किलपणे उत्तरली.

"असं का बेटा, थांब बघतोच तुला आल्यावर." विराज उत्तरला.

"बरं, तू सांग ना , काकूंनी कशासाठी बोलावलंय मला? तू सांगितलंस का घरी?"

"हो , सांगितलं. पण मला नाही माहिती तिने कशासाठी बोलावलंय ते. सहज बोलावलं असेल."

"बाप रे , मला ना जाम टेन्शन आलंय रे . फार भीती वाटतेय. एक तर तू पण नाहीयेस न इथे. त्या रागावल्या असतील तर? मी एकटी कशी सामोरी जाऊ रे?"

"हं, मी सांगितलं तिला , तू मला कसे वेगवेगळ्या अटी घालून प्रपोज करायला सांगितलेस ते." विराज मिश्किलपणे तिला चिडवत म्हणाला.

" क्का ss य ? वेडा आहेस का तू, विराज ? असं कोणी सांगतं का हे? सीक्रेट होतं ना ते आपलं? काय वाटलं असेल त्यांना? ए, जा , मी नाही जाणार बाबा आता घरी." ऋजुताची लगेच प्रतिक्रिया आली.

"ए वेडाबाई , तू तर अशी करते आहेस  की जणू काही पहिल्यांदाच भेटणार आहेस तिला. " विराज.

"नाही रे, पण ते नेहमीचं वेगळं होतं ना. आता कदाचित त्यांना असं वाटलं तर, की मीच तुला ... किती रागावतील त्या माझ्यावर. " ऋजुता काळजीने म्हणत होती.

"नाही ग, ऑफिसमध्ये इतक्या वेगवेगळ्या आघाड्यांवर यशस्वीपणे लढणारी माझी झाशीची राणी तू! कितीतरी गोष्टी लीलया पार पाडतेस अन् सासूबाईंच्या समोर जायला एवढी  घाबरतेस? मी आहे ना . विश्वास आहे न माझ्यावर? मी सांभाळून घेईन. काही नाही होणार. फक्त सहज बोलायला म्हणून बोलावलं असेल ग तिने. संध्याकाळी जाऊन येशील थोडा वेळ. हवं तर विधीलाही सांगतो तुझ्यासोबत रहायला." विराजने हळुवारपणे समजावले.

"पण विराज..."

आता मात्र विराजला रहावले नाही.

"फसली रे फसली ! माझी प्रिन्सेस , किती निरागस आहेस ग तू ! डोन्ट वरी, अगं मी गंमत करत होतो. मी नाही सांगितलं तसं काही. इतका पण ' हा ' नाहीये मी. " विराज हसून म्हणाला.


" तू झोप आता शांतपणे. " विराज.

"हं, आता कुठे जीवात जीव आला माझ्या.  गुड नाईट" ऋजुता.

विराजने फोन बाजूला ठेवला . समोर बघतो तर काय , रजत हाताची घडी घालून समोर भुवया उडवत विराजकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होता. विधीचे नाचणे सुरू असतानाच त्याला सगळे ऐकू आले होतेच आणि गालात हसू पण आले होते. पण तरीही नक्की काय काय झालं हे विराजकडून जाणून घेण्यासाठी तो कधीपासून उत्सुक होता.

"महानुभाव! आमचा नंबर कधी येणार ? "

" अरे हो हो भाई, तुला सांगायलाच तर धावत आलोय घरी. ती हो म्हणाली मला,  भाई ... भाई .... ये ss!  तिने माझ्याशी लग्नाला होकार दिलाय. मी खूप खूष आहे भाई , खूप खूष आहे आज. तुला काय मागायचे ते माग भाई, आज तू जे म्हणशील ते देईन मी तुला... " विराज खूप आनंदात रजतचे दोन्ही हात हातात धरून त्याला गोल फिरवत होता.

रजतसुद्धा विराज ऋजुतासाठी खूप खूष होता.

"सांगू? सांगू मला काय पाहिजे ते? देशील तू?" रजत गूढ भाव चेहऱ्यावर ठेवत विचारता झाला.

"अरे सांग भाई, सांग. असं काय मागणार आहेस? " विराज म्हणाला.

"विराज , तू ... " बोलता बोलता रजत भावुक होत होता. ऋजुताचे लग्न म्हणजे त्याची लाडकी लहान बहीण त्याला सोडून कायमची दुसऱ्या घरी जाणार , पुढच्या वेळी तो घरी गेल्यावर ती घरी नसणार, हा विचार त्याच्या मनाला शिवला. तसा तो म्हणाला ,

" तू माझ्या सोनुलीला खूष ठेवशील ना? माझी खूप लाडकी आहे ती, लहानपणापासूनच. तू जपशील ना तिला? तिच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाहीस ना? प्रॉमिस कर मला." बोलता बोलता रजतच्या डोळ्यात मात्र पाणी तरळले.

"हो भाई, प्रॉमिस. मी खूप आनंदात ठेवेन तिला. तुझ्या काळजाच्या तुकड्याची मी काळजी घेईन. तू नको काळजी करू." विराज रजतच्या खांद्यावर थोपटत म्हणाला. "चल आता पार्टी करू."

****

सकाळी सकाळी झरोक्यातून एक कोवळ्या उन्हाची सोनेरी तिरीप ऋजुताच्या चेहऱ्यावर आली. एक स्मितहास्य ओठांवर खेळवतच ऋजुता जागी झाली अन् विराज हलकेच तिच्या मनात डोकावला. लगेच ऋजुता तिला सुचलेल्या ओळी टाईप करू लागली. तो उठल्यावर त्याला त्या पाठवण्याचे तिने ठरवले.

तेवढ्यात तिच्या फोन च्या स्क्रीनवर विराजचा मेसेज झळकला.

"गुड मॉर्निंग प्रिन्सेस ."

तो वाचून ,
'अरेच्चा हा कसा काय उठला एवढ्या लवकर ? यावेळी तिकडे तर रात्रच असेल अजून. '
असा विचार करत तिने  लिहिलेल्या ओळी त्याला पाठवल्या.

"कवडसा कोवळ्या उन्हाचा , संदेश घेऊनि आला
साखरझोपेस माझ्या , हलकेच ' जा ' म्हणाला.

उसवली वीण निद्रेची, चुंबिता पापणी हलके
खोडी करण्यास माझी, म्हणे तूच त्या धाडिला.

सुप्रभात "

सकाळच्या सुंदर चित्राबरोबर तिने पाठवलेल्या ओळी वाचून विराज गालातल्या गालात हसला आणि त्याने तिला कॉल केला.

"सुंदर लिहिलेस ग! सकाळी सकाळी माझी आठवण आली तुला? सूर्याचे किरण तुझी खोडी करतात ? लव्हली यार ... हो मीच पाठवले होते त्या किरणांना, तुझी खोडी करायला. " तो गालात हसत म्हणाला.

"आता मी नाहीये न तिथे. तोपर्यंत कोणीतरी हवेच ना तुझ्या खोड्या काढायला. " तो हसून म्हणाला.

ऋजुता हसली. तिची नजर झुकली.

"खरोखरच माझी सकाळ सुंदर झालीय. " विराज तिच्या झोप होऊन फ्रेश झालेल्या आणि टवटवीत दिसणाऱ्या चेहऱ्याकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकत म्हणाला, तसे ऋजुताचा चेहरा आणखी आरक्त झाला.

"तू पण ना, अशी आहेस ! सगळं आजूबाजूचा विसर पडायला भाग पाडतेस मला. बघ विसरलो की नाही मी आणखी कशासाठी फोन केला होता ते!" विराज कपाळाला हात लावत मिश्किलपणे म्हणाला.

"कशासाठी? सांग." ऋजुताला हसू आलं होतं.

"काका म्हणजेच माझे सासरेबुवा उठले असतील ना आता? त्यांनी सकाळी फोन करायला सांगितला होता ना. मला तर टेन्शनमुळे झोपच आली नाही. तू बघ ना, ते फ्री असतील तर दे त्यांना फोन . मी बोलतो त्यांच्याशी.  " विराज.

"अरे त्यासाठी आतापर्यंत जागा राहिलास तू?" ऋजुता डोक्याला हात लावत म्हणाली. "बरं थांब , देते त्यांना फोन."

ऋजुताने हॉलमध्ये बसलेल्या बाबांकडे बघत अंदाज घेतला. राजशेखर पेपर वाचत बसले होते. तिने त्यांना फोन दिला.

" बाबा, विराजचा व्हिडिओ कॉल आहे. तुमच्याशी बोलण्यासाठी.

"हॅलो, नमस्कार काका." विराज.

"हं, ते नमस्कार वगैरे बाजूला ठेव. हे काय चाललंय मला कळू शकेल का ?  माझ्या परवानगीशिवाय माझ्या ऋजूला ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त, वेळी अवेळी असा फोन करतोस, म्हणजे काय ? " राजशेखर करड्या आवाजात म्हणाले. चेहरा करारी होता. नजरेत नापसंती स्पष्ट दिसत होती.

विराजला धस्स झाले. कसनुसे अवसान आणलेला त्याचा चेहरा खर्रकन उतरला.

क्रमशः


© स्वाती अमोल मुधोळकर

संपूर्ण कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. कथा, घटना, प्रसंग, संवाद इत्यादी कसल्याही प्रकारची कॉपी खपवून घेतली जाणार नाही. कायदेशीर कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी हा गुन्हा आहे. 

कथेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना मनापासून खूप धन्यवाद.

🎭 Series Post

View all