Login

दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 75

विराज आणि ऋजुता...

# दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 75 

" बाबा, विराजचा व्हिडिओ कॉल आहे. तुमच्याशी बोलण्यासाठी." ऋजू.

"हॅलो, नमस्कार काका." विराज.

"हं, ते नमस्कार वगैरे बाजूला ठेव. हे काय चाललंय मला कळू शकेल का ? माझ्या परवानगीशिवाय माझ्या ऋजूला ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त, वेळी अवेळी असा फोन करतोस, म्हणजे काय ? " राजशेखर करड्या आवाजात म्हणाले. चेहरा करारी होता. नजरेत नापसंती स्पष्ट दिसत होती.

विराजला धस्स झाले. कसनुसे अवसान आणलेला त्याचा चेहरा खर्रकन उतरला. ऋजूलाही काही कळेनासे झाले. मोठमोठे प्रोजेक्ट हँडल करणारा, मोठमोठ्या क्लाएन्ट मीटिंग एकट्याने हँडल करणारा विराज आता मात्र राजशेखर यांच्यासमोर गडबडला, ते त्यांच्याबद्दल असणाऱ्या आदरयुक्त भीतीमुळे. तो शब्दांची जुळवाजुळव करू लागला.

"नाही काका, ते ... मी... मला ... माझा ..."

"अरे काय ... मला , माझा ?" राजशेखर आवाजात तोच करडेपणा कायम ठेवत म्हणाले.

"काका, ... माझा काही... चुकीचा हेतू नाहीये." विराज.

"मला ऋजूशी लग्न करायचे आहे. त्याबद्दल तिची काय इच्छा आहे ते जाणून घेण्यासाठी तिला फोन केला होता. तुमची परवानगीही मी घेणारच होतो." विराज सौम्यपणे आपले म्हणणे मांडत होता.

"माझी परवानगी घेणार होतास? कधी? लग्न झाल्यावर?" राजशेखरांचा तोच करडा स्वर. एक भुवई उंचावून ते विराजकडे तिरक्या, गंभीर अन् प्रश्नार्थक नजरेने पाहत होते.

"नाही हो काका, प्लीज रागवू नका ना. ऋजुताचा मला होकार असला तर लगेच विचारणार होतो तुम्हाला." विराजचा चेहरा बापुडवाणा झाला होता. तो बघून ऋजुताही कळवळली होती. राजशेखर दोघांकडेही बघत होते.

"अरे मग कधी विचारणार? तिने तर होकार दिलाय ना तुला? मला तर असं वाटतंय, तुझ्यापेक्षा आम्हालाच घाई झाली आहे तुला जावई म्हणून आणायची, हो की नाही ग रेखा?" राजशेखर खो खो हसत म्हणाले. 

त्यांच्या क्षणात बदललेल्या हावभाव आणि स्वराकडे लक्ष जाताच विराज काहीसा गोंधळला. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळल्यासारखे भाव दिसू लागले.

"काय हो , तुम्ही पण ना, काय त्या बिचाऱ्याची खेचताय? पुरे आता. केवढा घाबरला-गोंधळलाय पोर. " रेखाताई विराजकडे बघत राजशेखर यांना म्हणाल्या.

"काय बरखुरदार, जमली की नाही आम्हाला थोडीफार ॲक्टिंग ? ही तुझी काकू लवकरच सापडली म्हणून बेडीत अडकलो ... नाहीतर बॉलीवूड मध्येच गेलो असतो . " शेखर पुन्हा खो खो हसत मजेने म्हणाले.

"बाप रे ! काय सॉलिड एक्टिंग करता तुम्ही, काका ! आणि एकदम दिलखुलास आहात! मी तर खरंच घाबरलो होतो. " विराज काहीसा रिलॅक्स होत , हसत म्हणाला.

" हो ऽ, मग ब ऽ घ बाबाऽ , तुला सासरा पसंत असेऽ ल तऽर पुढे जाऊ." राजशेखर हसत म्हणाले. 

"काय काका !" विराज ब्लश करत होता.

"हा हा, पण तू रीतसर परवानगी घेतल्याशिवाय नाही चालणार बरं. ती तर तुला घ्यावीच लागेल. बोला पुढे बोला." शेखर त्याला म्हणाले.

"काका, माझं आणि ऋजूचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करण्याची इच्छा आहे. तुम्ही आणि काकू आमच्या लग्नाला संमती आणि आशीर्वाद देऊन ऋजूचा हात माझ्या हाती द्याल ना? मी तिला जपेन, सुखात ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन." विराज सौम्य आवाजात पण ठामपणे आणि आत्मविश्वासाने म्हणाला.

"ये हुई ना बात ! दिली ऽ... संमती दिली ऽ ." ते हसून म्हणाले.

"खरंच? थँक यू काका , थँक यू. खरंच मला खूप टेन्शन आलं होतं की तुम्हाला आवडेल की नाही." खूप आनंद झाला होता त्याला.

"अरे पण तू कधी येणार आहेस ? " रेखाताई.

"अजून चाळीसेक दिवस आहेत यायला." विराज.

असेच आणखी काही वेळ बोलून विराजने फोन ठेवला. आता त्याच्या मनावरचे ओझे उतरले होते. 

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये साधारण साडेदहा वाजता ...

"निकी आवरलं का तुझं सकाळचं काम? चल ना जरा कॉफी पिऊन येऊ."

"हो झालंच आहे. चल जाऊ." म्हणत निकिता कॅन्टीनकडे वळत होती.

"निकी, अग तिकडे नाही. बाहेर जाऊ. "

ऋजुता तिला एका जवळच्या कॉफी शॉप मध्ये घेऊन गेली. कॉफीची ऑर्डर देऊन दोघी एका टेबलापाशी बसल्या. 

"बोला मॅडम, क्या बात है? आज चक्क इकडे, तेही सकाळी सकाळी?"

"मला तुला एक सांगायचंय... पण तिथे ऑफिसमध्ये गर्दीत नको."

"अरे बोल बोल , लवकर बोल. तू न असा सस्पेन्स वाढवून ठेवतेस. सांग ना लवकर." निकिता अधीरपणे म्हणाली.

"निकी, विराजने मला प्रपोज केलं, लग्नासाठी विचारलं."

"काय सांगतेस काय?" निकिताचे डोळे विस्फारले होते. तिच्या डोळ्यात एक आनंदाची चमक दिसू लागली , पुढे ऐकायला ती अगदी अधीर झाली होती.

"पावला बाई , भगवंत शेवटी ! अग, मग पुढे काय झालं , तू काय म्हणालीस? सांग ना लवकर , अशी थांबतेस का मध्येच? सांग, सांग पटकन." निकी.

"अग हो, सांगते ना... तू पण ना ... अशी एक्स्प्रेस सारखी सुसाट सुटतेस."

"मी ... मी ... होकार दिलाय त्याला." ऋजुता.

"खरंच!?" एकाच वेळी आनंद, आश्चर्य, समाधान निकिताच्या उद्गारात अन् डोळ्यात दाटले होते. तिला विराजसाठी आणि तिच्या मैत्रिणीसाठी खूप आनंद झाला होता.

"काँग्रच्युलेशन्स माय डिअर ! काँग्रच्युलेशन्स! आय एम सो हॅपी फॉर यू बोथ! फायनली तुला त्यांचे मनापासून असलेले प्रेम कळले म्हणायचे, वेडाबाई !" निकिता तिच्या गळ्यात हात टाकत बसल्या बसल्याच तिला हलकेच मिठी मारत म्हणाली.

" थॅन्क्स निकी , पण ... एक मिनिट, तू मला म्हणाली होतीस , नीट विचार कर, स्वतः च्या मनामध्ये डोकावून बघ... म्हणजे ? तुला हे माहीत होतं? बाय एनी चान्स?" ऋजुता मिठीतून बाजूला होत काहीशी विचार करत निकिताकडे रोखून बघत म्हणाली.

"अं ... ते ... जाऊ दे न. " निकी उगाचच नजर इकडे तिकडे वळवत म्हणाली.

"सांग निकी, नाहीतर फटका खाशील तू माझ्या हातून."

"हे बरं आहे... एकाने प्रॉमिस मागायची अन् दुसऱ्याने फटके द्यायचे... हमारी तो जैसे कोई इज्जत ही नहीं रही अब इस दुनिया में! " निकिता उलटा हात कपाळाला लावत नौटंकी करत होती.

"ए नौटंकी, पुरे हं आता. म्हणजे तुला माहिती होतं तर!" ऋजुता.

"ऋजू, हो, मला माहिती होतं आणि खरं तर त्यांचं तुझ्यावरचं एवढं प्रेम पाहता मलाही मनापासून वाटत होतं की तुमचं दोघांचं जुळलं तर खूप छान होईल. ते तुला खूप सुखात ठेवतील. पण एक मैत्रीण म्हणून तुला तुझ्या आवडीनुसार जोडीदार मिळावा, तुझ्या मनासारखं व्हावं अशीही इच्छा होती. त्यामुळे तू स्वतःच्या मनाला ओळखणे गरजेचे होते ऋजू. म्हणून मी ..."

"ओके, ओके, कळलं... माफ केलं , माफ केलं." ऋजू हसत तिचा हात हातात घेत म्हणाली. "थँक यू यार निकी. खरंच विराज खूप प्रेम करतो माझ्यावर. "

"ओ हो ! लगेच कळलंही तुला ... मॅडमसुद्धा सॉलिड प्रेमात आहेत हां! " निकिता तिला चिडवत मिश्किलपणे हसत होती.

तशी ऋजुता लाजली. 

"पण निकी, ऐक ना, एक प्रॉब्लेम आहे ग."

"काय? आता कसला प्रॉब्लेम? आता तर सगळे प्रॉब्लेम्स सुटले आहेत मॅडम! अब तो बस प्यार ही प्यार है लाईफ मे ..." मिश्किल हातवारे करत निकीचं चिडवणं काही थांबायचं नाव घेत नव्हतं.

"हेच ... हेच ... बघितलस ना, अशी चिडवतेस तू, काही भान नसतं तुला जागेचं. म्हणूनच तुला ऑफिसच्या बाहेर आणलंय मी ." ऋजुता लटक्या रागाने म्हणाली.

"ओहो, बघ जरा आधी किती लड्डू फुटताहेत!" निकी.

"निकी ऐक न, मला ना जाम टेन्शन आलंय ग."

"कसलं टेन्शन आता?"

"अग, वीणाकाकूंनी म्हणजे विराजच्या आईने बोलावलंय मला संध्याकाळी."

"हात्तिच्या! एवढेच ना! त्यात काय , रोजच भेटतेस की तू त्यांना, 'दृष्टी'मध्ये." निकी काही न कळून म्हणाली.

"हो ग, पण आज घरी बोलावले आहे. अन् विराजने सांगितलंय ग त्यांना आमच्याबद्दल. मीच विराजला नादी लावले असं वाटून त्या रागावल्या असतील का ग? मी काय उत्तर देणार त्यांना ? मी कुठे असं काही केलंय? त्यांनी आमच्या लग्नाला नकार दिला तर ? विराज पण नाहीये यार. कसं हॅण्डल करू मी ?" ऋजुताचा चेहरा चिंतेने झाकोळला होता.

"हो ना, त्यांना तर हेच वाटेल ग. आता तुला एकटीला गाठून चांगली कानउघाडणी करतील बघ त्या . " निकिता आपले हसू दाबत , कसेतरी हसू लपवत म्हणाली. 

"काय? तुलाही असंच वाटतंय? बाप रे! गेलीच मग तर मी आता बाराच्या भावात!" ऋजुताचे डोळे विस्फारले होते , स्वर अगदी गंभीर झाला होता.

"ए वेडाबाई, अग इतकं काय टेन्शन घेतेस? " निकी.

"हं, तुझी येऊ दे ना सासू , मग बघतेच तुला मी, कशी करतेस ते." ऋजुता नाक मुरडत म्हणाली. "आता सांगणार आहेस का मला काही तू ?"

"अग, तुला वाटतंय तसं अजिबात काही नाही होणार. माझ्या इतक्या सुंदर , सद्गुणांची खाण असलेल्या मैत्रिणीला कोण नकार देईल? काहीतरीच तुझं. चल कॉफी घे . " वेटरने कॉफी आणलेली बघून ती म्हणाली.

दोघींनी कॉफीचा घोट घेतला. 

"छान आनंदाने अन् शांतपणे बोल त्यांच्याशी. नाहीतर मी येऊ का? घेऊन जा मला." ती हसत म्हणाली.

"ए नको ग बाई, आधीच मला टेन्शन आहे... तू आलीस तर कमी व्हायच्या ऐवजी दुप्पट होईल ते." ऋजुता कपाळाला हात लावत म्हणाली.

"हे बघ, काकू काही म्हणाल्या तरी तू वाद वाढू देऊ नकोस. शेवटी त्या विराज सरांच्या आई आहेत ना. त्यांच्याही काही अपेक्षा, काही मनसुबे असतील. विराज सर पाहून घेतील ना, काय ते. "

"हं." ऋजुता.

"चल , निघू या आता?" निकी.

दोघीही पुन्हा ऑफिसमध्ये आल्या आणि कामाला लागल्या.

 क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर.

संपूर्ण कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. कथा, घटना, प्रसंग, संवाद इत्यादी कसल्याही प्रकारची कॉपी खपवून घेतली जाणार नाही. कायदेशीर कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.  

कथेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना मनापासून खूप खूप धन्यवाद.