Login

ध्रुवताऱ्याची गोष्ट

मनोरंजक बाल कथा
ध्रुवताऱ्याची गोष्ट

"आई बाबा कुठे आहेत?" शाळेतुन आल्या आल्या मीराने विचारले.

" बाबा बाहेर गेलेत. येतील इतक्यात, का ग, काय झाल?"

"काहीनाही उद्या आमच्या शाळेत युनिक कथा स्पर्धा आहे. त्यात मी भाग घेतलाय. बाबांकडून मस्त एखादी युनिक स्टोरी घेते म्हणजे माझा पहिला नंबर येईल!"

"अस, म्हणून बाबांना शोधतेस होय!"

दरावरची बेल वाजली तसा मीराने लगेचच दरवाजा उघडला.

"बाबा तुम्ही शंभर वर्ष जगणार,आताच तुमची आठवण काढली आणि तुम्ही समोर !" म्हणत तिने बाबांना मिठी मारली.

"ओ! आज फारच बाबांवर प्रेम उतू चाललंय! काय हवंय काय आमच्या राणी सरकारला?"

"बाबा आमच्या शाळेत उद्या स्पर्धा आहे!"

"कसली स्पर्धा आहे ग!"

"बाबा उद्या ना आमच्या शाळेत युनिक कथा स्पर्धा आहे. त्यात अशी गोष्ट सांगायची त्याच्यात काहीतरी वेगळेपण असले पाहीजे.. तरच पहिला नंबर येईल!"

"अरे व्हा! छानच आहे स्पर्धा!"

"बाबा, मला लिहुन दया ना एखादी युनिक गोष्ट!"

यावर बाबा थोडा विचार करून
म्हणाले." तु ध्रुवताऱ्याची गोष्ट सांग!"

यावर बाजुला उभी असलेली आई म्हणाली "अहो! युनिक कथा स्पर्धा आहे. जुनीक कथा स्पर्धा नाही. ही फार जुनी आणि सगळ्यांनी ऐकलेली गोष्ट आहे!"

"हो बाबा, ही गोष्ट मुलांना माहिती आहे.ती मला हसतील. काहीतरी युनिक सांगा ना!"

"मीरा तु हिच गोष्ट सांग तुला नक्की पहिले बक्षिस मिळेल!"

तशी मीरा काहीश्या नाराजीने तयार झाली.

"अहो! तुम्ही स्वतःला खगोलअभ्यासक म्हणवता...मग एखादी खगोलशास्त्रीय युनिक गोष्ट दया ना!"

"तु चहा टाक तो पर्यंत मी मीराला गोष्ट सांगतो!"

"काय झाल मीरा फार खुशीत दिसतेस!" चहाचा कप बाबांच्या हातात देत आईने विचारले.

" काहीनाही बाबांनी ध्रुवबाळाची गोष्ट सांगीतली म्हणून!"

सकाळी मीरा अगदी खुशीत शाळेत गेली. स्पर्धेला सुरवात झाली. काही वेळाने मीराचा नंबर आला.

तिने हात जोडुन सर्वाना नमस्कार केला.

मी आज तुम्हांला ध्रुवबाळाची गोष्ट सांगणार आहे. मीराच्या या वाक्यावर सगळी मुलं ओरडायला लागली.. "आम्हांला महिती आहे! आम्हांला माहिती आहे!!" अस सांगुन अंगठा खाली करून दाखवायला लागली... बराच गोंधळ उडाला.. शिक्षकांनी मुलांना शांत केल्यावर मीराने पुन्हा सुरवात केली.

"मी माझ्या गोष्टीची सुरवात ऐक श्लोक म्हणुन करते!" तिने हात जोडले.व

ध्रुवतारं स्थिरं ग्रंथे मन्यन्ते ते कुबद्दय:।

हा श्लोक सांगितला.

"मित्रांनो हया श्लोकाचा अर्थ मी शेवटी सांगेन कारण ती एक गंमत आहे!"

" तर फार जुनी गोष्ट आहे. एक राजा होता त्याला दोन राण्यां होत्या. एक आवडती एक नावडती. एक दिवस काय झाल.नावडतीचा मुलगा राजाच्या मांडीवर बसला होता. तस आवडतीला राग आला. तिने मुलाला राजाच्या माडीवरून खाली खेचले. तसा तो मुलगा रडत याच्या आई जवळ गेला. आईने संगितले तु तप करून देवाला प्रसन्न कर व देवाकडून वर माग. आईचा सल्ल्याने त्याने तप करून देवाला प्रसन्न केले आणि मला कोणी हलवू शकणार नाही म्हणजेच अढळतेचा वर मागितला."

"म्हणजे ध्रुवतारा अढळ आहे बरोबर?" तिने मुलांना प्रश्न विचारला ..मुलांनी होssss असा प्रतिसाद दिला.

" पण मित्रांनो तुम्ही समजता तसा ध्रुवतारा अढळ म्हणजे स्थिर नाही. आपल्या पृथ्वीचा ध्रुवतारा हा बदलत असतो!"

."चार हजार पाचशे वर्षा पूर्वी ठुबान हा कालेय तारकासमूहातला तारा आपल्या पृथ्वीचा ध्रुवतारा होता. आज पोलरीस हा ध्रुवमत्स्य तारकासमूहातील तारा पृथ्वीचा ध्रुवतारा आहे. त्यानंतर आठ हजार वर्षानी डेनेब हा हंस या तारकापुंजातील तारा ध्रुवतारा होईल. त्या नंतर बारा हजार वर्षानंतर अभिजित हा वीणा तारकासमूहातील तारा आपल्या पृथ्वीचा ध्रुवतारा होईल हा सगळा पृथ्वीच्या परांचन गतीचा परीणाम आहे.परांचन गती पृथ्वीला चंद्र आणि सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे प्राप्त झाली आहे!."

"आपल्या पृथ्वीचा ध्रुवतारा कसा बदलतो पाहिले ना?"

"आहे की नाही गंमत! " मीरा हसुन म्हणाली.

आता त्या श्लोकाचा अर्थ सांगते. त्याचा अर्थ असा की, "जो कोणी ध्रुवतारा स्थिर मानतो तो बुद्दीहीन म्हणजेच वेडा होय!"

"तुम्हीही ध्रुवतारा स्थिर आहे अस मानत होता. म्हणजे तुम्ही कोण?"

वेडेsss समोरुन हळुच आवाज आला.

"धन्यवाद " मीराने गोष्ट संपवली.

आधी आरडा ओरडा करणारी सगळी मुलं शांत झाली. कारण त्या सगळ्यांना वेड्यात काढुन मीराने चांगलीच चपराक दिली होती.

मीराच्या कथेनंतर परीक्षक एकमेकांकडे पाहु लागले. या मुलीने तर आपल्यालाही वेड्यात काढले. असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

आपण वेडे ठरू नये म्हणून परीक्षकांनी मीराला पहिला क्रमांक दिला.

-चंद्रकांत घाटाळ
0