Login

दुभंग (भाग-१)

नात्यातील अंतरात स्वतःच दुभंग निर्माण करणाऱ्या अग्निशची कथा
जलद लेखन स्पर्धा -२०२५

विषय:- नात्यातील अंतर

शीर्षक:- दुभंग

भाग:- १

"सर, एक प्राॅब्लेम झालाय, आपल्या फिल्मच्या हिरोईनचा अपघात झालाय. फिल्मची नुकतीचं शुटिंग सुरू झाली तर हे असं. त्यात राजसरांच्या तारखा किती मुश्किलीने मिळाले आहेत. त्यात हे असं झालं, आता काय करायचं? इतक्या कमी वेळेत दुसरी हिरोईन कशी उभी करायची? आणि जरी मिळाली तरी पुन्हा सर्व सुरूवातीपासूनच करावे लागेल ज्यात खूप वेळ जाईल. त्यात राजसर थांबण्याऱ्यातले नाहीत. हे तर तुम्हाला माहिती आहेच." सेक्रेटरी साहिल काळजीयुक्त आवजात दिग्दर्शक अग्निशला म्हणाला.

"हम्म, तू म्हणतोस ते पण खरं आहे, बघू काय होतंय ते? मीही त्याचाच विचार करतोय. तुला काही सुचत असेल तर सांग. थोडसा वेळ मागवून घेऊ." अग्निश गंभीर चेहरा करत मनात काहीतरी विचार करत त्याला म्हणाला.

" ठिक आहे, सर. मीपण विचार करतो काही सोल्युशन निघतयं का? बघतो. लवकरात लवकर यावर विचार करायला हवा, नाहीतर फिल्म पूर्ण करताना दिरंगाई झाली की राजसर ही फिल्म सोडून जातील."  साहिल त्याला सुचवत म्हणाला.

त्याने गंभीर होत हुंकार भरला. थोड्यावेळ थांबून चर्चा करून साहिल तेथून निघून गेला.

तो जाताच अग्निश विचारात गढून गेला. तेवढ्यात त्याची बायको तेजस्वी त्याच्यासाठी काॅफीचा मग घेऊन आली. ती तो मग त्याच्यासमोर हसत धरत म्हणाली," हे घ्या, राजे तुमची गरमागरम काॅफी."

तो मात्र विचारात इतका गढून गेला होता की ती समोर मग घेऊन उभी आहे हे पण त्याला कळलं नाही. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसे त्याने एकदम दचकून तिच्याकडे पाहिलं.

"अहो, मी आहे. इतकं का दचकलात? काय झालं? कशाच इतकं टेन्शन आलंय तुम्हाला?" तिने काॅफीचा मग शेजारच्या टिपाॅयवर ठेवत काळजीच्या सुरात त्याच्याकडे बघत म्हणाली.

"अगं, ती नवीन फिल्म आहे ना, त्यातील हिरोईनचा अपघात झालाय. त्यात राजसरांच्या तारखा ठरवल्या होत्या. आता अचानक असं झालं म्हणजे शुटिंग थांबवाव लागेल ना." अग्निश चिंतेच्या सुरात म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर असंख्य चिंतेच्या रेषा उमटल्या होत्या.

" अरे देवा ! वाईट झालं. ती हिरोईन ठीक तर आहे ना?" तिने काळजीने विचारले.

"हो गं. ती ठीक आहे." तो कपाळावर दोन बोट घासत म्हणाला.

" हा का? मग ती बरी झाली की पुन्हा शुटिंग सुरू करा ना, एवढं टेन्शन का घेता तुम्ही?" तिने टेबलावरील काॅफीचा मग घेतला आणि पुन्हा त्याच्यापुढे धरत डोळ्यानेच घेण्याचा इशारा करत म्हणाली.

तो काॅफीचा एक घोट घेत म्हणाला,"अगं, तुला तर माहितच आहे ना, राजसर किती पंक्च्युवल आहेत. खूपच मुश्किलने त्यांनी वेळ दिला आहे. आता त्या हिरोईनला ठिक व्हायला कमीत कमी तीन-चार महिने तरी लागतील. मग तो पर्यंत ते सर नाही थांबणार आणि इतक्या कमी वेळात दुसरी मी हिरोईन कशी उभी करणार? अशी हिरोईन शोधायची म्हणजे पुन्हा पहिल्यापासून सुरूवात करावी आणि तेवढा वेळपण नाही. कारण ती फिल्म माझ्या करीयरमधील खूपच महत्त्वाची आहे.‌ माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे ती फिल्म. ती वेळेतच पूर्ण व्हावी अशी माझी इच्छा होती. पण.." तो खूप हताश होत केविलवाण्या स्वरात बोलता बोलता थांबला.

"पण काय, राजे? कळतंय हो मला. तुम्ही एकदा राज सरांनी बोलून बघा. ते नक्कीच समजून घेतील असे मला वाटते. तुम्ही टेंशन घेऊ नका, सगळं ठीक होईल." तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला दिलासा देत म्हणाली.

क्रमशः

राज समजून घेईल का परिस्थिती ? अग्निश नवी हिरोईन शोधेल का? तेजस्वी काही मदत करेल का यात?

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवित अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


0

🎭 Series Post

View all