Login

दुभंग (भाग-२)

नात्यातील अंतर वाढत जाऊन स्वतःच दुभंग निर्माण करणाऱ्या अग्निशची कथा
जलद लेखन स्पर्धा - २०२५

विषय:- नात्यातील अंतर

शीर्षक:- दुभंग

भाग:- २

खूप उशीर गहन विचार केला तरी अग्निशला काही सुचले नाही. काय करावे हे त्याला कळेना. एक हात नाईट पॅन्टच्या खिशात तर दुसरा हात अस्वस्थ होत मानेवरून फिरवत इकडून तिकडे तिकडून इकडे हाॅलमध्ये येरझाऱ्या घालत‌ होता. यातच रात्र झाली.‌ त्याचे लक्ष समोरच्या भिंतीवरील घड्याळाकडे गेले. त्याला एकदम आठवले की राज यावेळी फ्री असेल हे त्याला त्याच्या सेक्रेटरीकडून कळले होते. म्हणून त्याने आधी त्याला फोन लावून सगळी परिस्थिती सांगितली. तेव्हा राजने त्याला दोन दिवसांचा वेळ दिला. त्यावेळेत नवीन हिरोईन भेटली तर ठीक नाहीतर तो फिल्म सोडून देईल असे स्पष्ट शब्दात सांगितले.

त्यावेळी खरं तर अग्निशला राजचा खूप राग आला होता. पण सध्या तो फिल्म इंडस्ट्रीतला सुपरस्टार होता. तो फिल्ममध्ये आहे म्हटल्यावर फिल्म सुपरहिट होण्याची शंभर टक्के ग्यॅरंटी होती. त्यामुळे त्याने त्याच्या रागावर आवर घालून त्याला होकार दिला.

नंतर तो बेडरूममध्ये आला तर समोर तेजस्वी पुस्तक वाचत बसलेली त्याला दिसली. त्याने एक कटाक्ष तिच्यावरती टाकला आणि पाठ बेडच्या मागे टेकवत मान मागे भिंतीला टेकवले. पाय‌ पसरून पायाला तिढी घालून तो बसला. डोळे मिटून घेत डोळ्यावर हात आडवा केला.

त्याला तसे बसलेले पाहून तेजस्वीने पुस्तक बाजूला ठेवले व त्याला म्हणाली," काय झालं, राजे? डोकं दुखतंय का? मी मालिश करून देते म्हणजे बरे वाटेलं."

"विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली माझी." तो डोळे बंद करूनच पुटपुटला.

"नका एवढी काळजी करू. होईल सगळं ठीक." असे म्हणून तिने मालिश करून दिल्यावर त्याला झोप लागली.

सकाळी उठल्यावर त्याला तोच विचार पडलेला. अशातच त्याचे लक्ष समोर लावलेल्या तेजस्वीच्या फोटोकडे गेले. त्या फोटोत ती खूपच सुंदर दिसत होती एकदम सोज्वळ, निरागस अशी.

तो फोटो पाहून त्याच्या डोळ्यांत चमक आली. त्याचे ओठ रूंदावले.

"अरे, हे माझ्या आधी का डोक्यात आलं नाही? हे तर असं झालं काखेत कळसा आणि गावाला वळसा. चला एक तर प्रश्न मिटला. आता मिशन टू." त्याने मनात हसत विचार केला.

त्याने पटकन साहिलला फोन करून बोलवून घेतले.

त्याने तेजस्वीला हाक मारली.‌ ती येताच तिला आपल्या पुढ्यात बसवत म्हणाला," तेजू, मला तुझ्याशी थोडसं बोलायचं आहे. माझं ऐकशील ना,  मला साथ देशील."

"अहो राजे, काहीही काय? मी तर आधीपासून सगळं तुमचं ऐकते, साथ देते. अजून नवीन काय?" तो नेमकं कशाबद्दल बोलतोय हे न कळल्याने ती प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाली.

"हो, माहिती गं सगळं, मी तुला अशी गोष्ट मागणार आहे जे तू मागे सोडून आली होतीस. प्लीज आता नाही म्हणून नकोस. जे तू ते सगळं मी म्हणालो म्हणून सोडल होतंस आणि आता मीच तुला सांगतो की पुन्हा ते तू करावसं. प्लीज नाही म्हणू नकोस." तो तिचे हात हातात घेत विनंती सुरात म्हणाला.

"तुम्ही कशाबद्दल बोलताय मला काहीच कळत नाहीय." तेजस्वी गोंधळून म्हणाली.

"सांगतो, लक्ष देऊन ऐक." तिच्या चेहऱ्यावरील जमा झालेला गोंधळ पाहून तो एक दीर्घ श्वास घेत म्हणाला.

साहिललाही काय चाललय ते कळत नव्हतं. तो एकदा त्याच्याकडे आणि एकदा तिच्याकडे पाहत फक्त बघायची भूमिका करत होता.

अग्निशने तेजस्वीचा हात हातात घट्ट धरून डोळे मिटून पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि तिला म्हणाला," तेजू, तू माझ्या फिल्मची हिरोईन हो, प्लीज नाही म्हणू नकोस. नवीन हिरोईनसाठी घाट घातला तर त्यात खूप वेळ निघून जाईल. राजने फक्त दोन दिवस दिलेत. जर ती नाही मिळाली तर तो फिल्म सोडून जाईल‌‌ आणि मला नाही वाटत की इतक्या कमी वेळात चांगली हिरोईन भेटेल."

तो थोडा थांबून पुन्हा तिला म्हणाला,"जान, तुला अभिनयाची खूप चांगली जाण आहे, शिवाय नृत्यातही तू पारंगत आहेस. राज आणि तुझी जोडी एकदम परफेक्ट वाटेल. यानिमित्ताने तू पुन्हा लोकांच्या मनात राज्य करशील. तू त्या फिल्मची हिरोईन आहेस म्हटल्यावर तो जोमाने काम करेल. तुमची मैत्री मला माहित आहे म्हणून म्हणतोय तू एकदा राजशी बोलून बघ. बाकी मी सांभाळून घेईन."

"अहो, पण मी आधी म्हटलं होतं मला संसार पाहिजे, हे फिल्म वगैरे नको." ती त्याच्या डोळ्यांत पाहत म्हणाली.

"येस, आय न्को दॅट, बट नाऊ ओन्ली फाॅर मी.  तुला पुन्हा म्हणणार नाही की परत त्याच क्षेत्रात राहा म्हणून. प्लीज तेजू, से येस, जान, प्लीज." तो खूप अगतिक होऊन म्हणाला.

"ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर करेन मी तेही  फक्त तुमच्यासाठी." त्याच्या डोळ्यांतील आर्जवीचे आसवे पाहून तिने त्याच्या फिल्ममध्ये काम करायला होकार दिला.

"ओ जान, थॅंक्यू हो मच. आय एम सो ग्लॅड, थॅंक्यू वन्स अगेन." तिने होकार देताच अग्निशने तिला घट्ट मिठीत कवटाळून घेत साश्रुनयनांनी म्हणाला.

साहिल तिथे आहे हेही तो विसरला. तिचं त्याच्या कानात तो असल्याची कुजबुजली. तेव्हा तो भानावर येत तिच्यापासून बाजूला झाला.

साहिल आनंदाने वेडा झाला होता. कारण त्याला माहीत होतं की तेजस्वी टॉपची हिरोईन होती ; पण अग्निशमुळे तिने ते करिअर सोडलं होतं. आता पुन्हा ती आहे म्हटल्यावर फिल्म सुपरहिट होणार याची ,ग्यॅरंटी त्याला होती.

तिनेच नंतर राजशी बोलून घेतले की ती अगोदरच्या हिरोईनच्या जागी रिप्लेस झाली. तेव्हा राजालाही खूप आनंद झाला की मैत्रिणीबरोबर पुन्हा एकदा फिल्म करायला भेटणार.

फिल्मची शूटिंग सुरू झाली सगळं काही छान चाललं होतं.

राज आणि तेजू अगोदरपासूनचे मित्र होते त्यामुळे त्यांचे वागणे, बोलणे खेळीमेळीचे होते; पण कुठे ना कुठे तरी हीच मैत्री अग्निशला खटकत होती.  शूटिंग दरम्यानची त्यांची जवळीक त्याला मान्य नव्हती. ते पाहून तो जेलस व्हायचा.‌ पण शूटिंग महत्वाची असल्यामुळे तो जास्त बोलत नव्हता.‌

ते दोघे जेव्हाही एकत्र हसत बोलायचे. तेव्हा अग्निशला फार चिड यायची ; पण मनातून तो तसा दाखवायचा नाही. हळूहळू त्याच्या मनात त्या दोघांविषयी संशयाची जागा निर्माण झाली. तरीही फिल्म संपेपर्यंत तो शांत राहिला.

फिल्म पूर्णपणे छान पद्धतीने झाली. नंतर प्रमोशन वगैरे झाले आणि फिल्म सुपरहिट झाली. रातोरात अग्निश चांगल्या डायरेक्टरच्या रांगेत बसला.

पण ह्या दोघांची संसाराची फिल्म मात्र डगमगत चालली होती.

क्रमशः

काय झालं पुढे? जाणून घेण्यासाठी वाचा पुढील भागात..

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवित अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


0

🎭 Series Post

View all