Login

दुधावरची साय...

आजी नातू आणि तत्व
लघुकथा
दुधावरची साय

"आई, नातवापुढे तू तुझी तत्व, नियम, शिस्त सगळं गुंडाळून ठेवलंस. हो ना." नयन विभाला हसत म्हणाला. अन्वय शाळेत जायला तयार झाल्यावर विभा त्याला म्हणाली होती," देवाला जाऊन हात जोड, नमस्कार कर." तर तो म्हणाला," देवाला कशाला हात जोडायचे?"विभा काहीच बोलली नाही.

" हो ना काय करणार दुधापेक्षाही दुधावरच्या साईला जास्त जपावे लागते. "विभानेही हसतच उत्तर दिले.
नयन नेहाला सांगत होता, " काय शिस्त होती आईची बाहेरून आलं की हातपाय धुतल्या गेलेच पाहिजे. जेवायला पानावर बसण्या अगोदर 'वदनी कवळ घेता' म्हणावे लागायचे. कुरकुरही करता नव्हती येत. आणि आम्ही कधी केली ही नाही. जेवताना ताटात काही शिल्लक उरायला नको अगदी धुतल्याप्रमाणे ताट स्वच्छ दिसले पाहिजे.
एकदा शाळेतून कंप्लेंट आली होमवर्क अपूर्ण. घरी तर धुतलेच पण शाळेत सरांनाही सांगितले तुम्हाला हवी ती शिक्षा करा.

इतकेच काय स्वतः शिक्षिका म्हणून नोकरी करत असताना एक बड्या बापाचा बेटा तिच्या वर्गात होता.तो सगळ्या मुलांना डिस्टर्ब करायचा. उलट उत्तरे द्यायचा. आईने त्याची कंप्लेंट केली. पण अध्यक्ष म्हणाले,

"त्याला काही बोलू नका त्याच्या वडिलांनी खूप मोठी देणगी दिलीय आपल्या संस्थेला."
त्याला खूप बदलण्याचा प्रयत्न केला आईने पण व्यर्थ. इतर मुलांना शिक्षा आणि त्याला नाही. आईच्या तत्वात बसत नव्हते.शेवटी आईने नोकरीवर पाणी सोडले पण आपल्या तत्त्वाशी एकनिष्ठ राहिली.

रोज आजीला सायंकाळी पोर्चमध्ये हात धरून फिरवून आणायचे आणि रात्री आजीचे पाय दाबून द्यायचे. हा नियम होता. ती स्वतः पण आजीची खूप सेवा करायची.
ती स्वतः तत्व आचरायची.नियमाने चालायची. शिस्तीत जगायची.
त्यामुळे आमची हिम्मत व्हायची नाही तिच्या शब्दा बाहेर जायची.
आज एवढे मोठे झालो तरी अजूनही धाक आहे तिचा.

हा तर आजीलाच जाऊन सांगतो, " आजी ममाला सांग मला डब्यात पोळी भाजी नको मॅगी दे म्हणावं. "
आजी त्याला देवदर्शन करायला सांगते तर तो आजीलाच गुंडाळून ठेवतो.

त्याला मी म्हटले, " अन्वय आजीचे पाय दाबून दे."
तर म्हणतो, " माझेच हात दुखत आहेत."
आजी जवळ जाऊन म्हणतो, "आजी माझे हात दाबून दे ना."

आईही म्हणते, " राहू दे रे नको त्याच्या मागे लागू. लहान आहे अजून."
मला आठवून गेलं मी एखाद्या दिवशी नाही म्हटले तर आई मला मोठी शिक्षा करायची. माहितीय कोणती?

" मी बोलणार नाही. कट्टी "

त्यानेच मी विरघळून जायचो आणि कामाला लागायचो.
" आई किती बदललीस ग. "

"नयन,प्रत्येक ठिकाणी आपली तत्त्व नियम नाही लावता येते रे.
त्यावेळी तसे वागले नसते तर तुम्हाला शिस्त लागली नसती. आणि आज तसे वागले तर नातू दूर जाईल रे माझ्यापासून. तुम्ही आहात ना शिस्त लावायला. मला करू देत प्रेम त्याच्यावर.

व्यावहारिक आयुष्यात फक्त तत्त्वज्ञान वापरून आयुष्यच जगता येत नाही.तर परिस्थिती पाहून वागावं लागते. नाहीतर झटके बसतील आणि चटकेही खावे लागतील.

©®शरयू महाजन
0