दुःखाच्या अंधारापलीकडे सुखाचा प्रकाश...१
सामाजिक कथा
"सर, सर लवकर चला बाहेर!"
"अहो, पाटील काय झाल? एवढं घाबरत का आहात."
"अहो, साहेब ती कालची बाई परत आली आणि आज तिने तिच्या मुलांना सुध्दा सोबत आणले आहे."
" सानप मॅडम,"
"बघा बरं त्यांची काय अडचण आहे."
"हो सर."
"ओ बाई. काय झालं आहे. कालही आल्या तुम्ही. आज परत आल्या. काय अडचण आहे तुमची."
ती काहीतरी हातवारे करत होती. सानप मॅडमला काहीच समजत नव्हते.
सानप मॅडम परत आत गेल्या.
"सर ती बाई काहीच बोलत नाही. पण काहीतरी हातवारे करून सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण मला काहीच समजले नाही."
"एक काम करा. त्यांना आत घेऊन या."
"पण सर...."
"आता पण काय? आणा तिला बोलावून."
सानप मॅडम निमूटपणे बाहेर गेल्या.
"ए चल ग. तुला साहेबांनी बोलावलं आहे."
ती पटकन उठली आणि आत आली. पण दूर एका कोपऱ्यात उभी राहिली. तिची दोन्ही मुले भेदरलेल्या अवस्थेत होती.
"ताई काय झाले आहे. काल पण तुम्ही आल्या होत्या म्हणे. पण मी काल नव्हतो. तुमचे काही महत्वाचे काम आहे का?"
"मला पेन आणि कागद मिळेल का?" हाताने खूण करून सांगितले.
"पाटील यांना एक कागद आणि पेन द्या."
"ताई, इथे बसा."
हातानेच तिने नको म्हटले. ती जमिनीवर बसली.
"हे घ्या कागद आणि पेन." पाटीलने कागद आणि पेन हातात न देता तिच्या समोर ठेवले आणि दूर झाला.
"पाटील काय आहे हे. काही पध्दत वगैरे असते की नाही. असं कसं वागता त्यांच्यासोबत तुम्ही?"
"सर ती खालच्या जातीतील बाई आहे. तिला आपल्यासारखे चांगले लोक स्पर्श सुद्धा करत नाही."
"म्हणजे! अहो पाटील. तुम्ही कोणत्या शतकात वावरता. तुम्ही या देशाचे, समाजाचे एक घटक आहात. तुम्ही कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी असून ही भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही."
"सर , तुम्हाला या गावातली परिस्थिती माहिती नाही. तुम्ही नवीन आहात इथे. इथल्या गावातल्या लोकांना चांगले राजकारण कळते. तुम्ही कोणत्याही भानगडीत पडू नका साहेब."
"पाटील, मी काय करायचं आणि काय नाही. हे तुम्ही सांगण्याची गरज वाटत नाही मला."
"पण साहेब..."
"कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मला जे योग्य वाटेल तेच मी करेल. मग तो कोणताही व्यक्ती असो. मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही."
"ताई, या इथे वर बसा आणि काय सांगायचं आहे ते न घाबरता सांगा."
त्या स्त्रीसोबत एक बारा तेरा वर्षाची एक चुणचुणीत मुलगी आणि पाच वर्षांचा एक मुलगा होता.
तिने कागद पेन हाती घेतला आणि लिहायला सुरुवात केली.
"मी सुरेखा. गणपतरावांची दुसरी बायको. मला शिक्षणाची प्रचंड आवड. त्यामुळे बारावीपर्यंत शिक्षण घेतले. कुटुंबासाठी, समाजासाठी काही तरी करायचे होते. पण अस्पृश्यता समाजाला लागलेला एक कलंक. "
तेवढ्यात तिचा नवरा गणपत काही लोकांना घेऊन पोलिस स्टेशनला आला.
"ए भवाने, तुला कितीदा सांगितलं ना की घराच्या भाहेर पडायचं न्हाय म्हणून. आमची तक्रार करती का तू." त्याने तिच्या थोबाडीत ठेवून दिली आणि तिचे केस धरून तिला ओढत बाहेर घेऊन निघाला. तिची दोन्ही मुले तिच्या मागोमाग निघाली.
"ए कोण रे तू? इथे दादागिरी करायची नाही आणि महिलांवर तर हात अजिबातच उचलायचा नाही. "
"ओ साहेब, गपगुमान ऱ्हावा की. बायको हाय ती म्हाई. तुम्हाले नौकरी टिकवायची हाय की न्हाई."
"ए, तू कोण मला सांगणारा. सोड तिला. तिला त्रास दिला तर सरळ आत टाकेल तुला."
"घ्या सोडलं हिला. तुमची कोण लागतीया ही..."
"अरे, तुझी बुध्दी भ्रष्ट झाली का? "
तेवढ्यात पाटील आणि सानप मॅडम मध्ये पडतात. पाटील गणपतला जायला सांगतो. गणपत तिला जवळजवळ ओढत घेऊन जातो.
"पाटील, हे काय प्रकरण आहे याचा शोध लावा."
"साहेब, जाऊ द्या ना. ते आज भांडतील आणि उद्या एक होतील. आपण या प्रकरणापासून दूरच राहू या. "
"शेम ऑन पाटील. प्लीज हा घाबरटपणा थांबवा."
"साहेब, तुमच्या आधीचे साहेब होते ना. ते आठ दिवस आले नंतर ते इथे कधीच फिरकले नाही. त्यांनी त्यांची बदली करून घेतली. या गावात नोकरी करायची असेल. तर तोंडाला कुलूप लावून राहायचे."
"पाटील, हे तुम्ही कोणाला सांगत आहात विसरले का? "
इन्स्पेक्टरच्या आवाजात जरब निर्माण झाली.
"साॅरी सर."
"एक काम करा. सदर व्यक्तीची आणि त्याच्या कुटुंबाची माहिती गोळा करा आणि मला सांगा.
"हो, सर."
तिने जेमतेम चारच ओळी लिहील्या होत्या. मोत्यासारखे अक्षर असुनही मनात मात्र असंख्य वेदना जाणवत होत्या. काय लिहायचे होते तिला अजून? ती बोलत का नव्हती?
इन्स्पेक्टर विक्रमच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. इतका छान का सहन करत असेल ती ! काय असेल तिच्या मनात? तिचे दुःख, तिच्या वेदना तिच्या निरागस चेहऱ्यावर दिसून येत होत्या. काही समजवून सांगण्याची संधीच मिळाली नाही. इन्स्पेक्टर विक्रमचा या गावातील नवीन प्रवास . शहरापासून थोडं दूर असलेल्या ग्रामीण भागात स्त्रियांची काय अवस्था असते. हे पंधरावीस दिवसांच्या आतच त्याच्या लक्षात आले. तारुण्याच्या जोशात तो त्याची स्वप्ने पुर्ण करणार होता.
क्रमशः
© अश्विनी मिश्रीकोटकर
अष्टपैलू लेखन स्पर्धा
अष्टपैलू लेखन स्पर्धा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा